पेत्र याचं पहिलं पत्र
१ येशू ख्रिस्ताचा प्रेषित, पेत्र+ याच्याकडून पंत, गलतीया, कप्पदुकिया,+ आशिया आणि बिथुनिया या प्रांतांत विखुरलेल्या, तात्पुरत्या रहिवाशांना आणि निवडलेल्यांना; २ अर्थात देव जो पिता, याने ज्यांना त्याच्या पवित्र शक्तीद्वारे* शुद्ध करून+ आपल्या पूर्वज्ञानाप्रमाणे निवडलं होतं,+ यासाठी की त्यांनी आज्ञाधारक व्हावं आणि त्यांच्यावर येशू ख्रिस्ताचं रक्त शिंपडलं जावं,+ अशांना:
तुमच्यावर देवाच्या अपार कृपेचा आणि शांतीचा वर्षाव होत राहो.
३ जो आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे, त्याची स्तुती असो. कारण त्याच्या महान दयेप्रमाणे त्याने येशू ख्रिस्ताचं मेलेल्यांतून पुनरुत्थान* करण्याद्वारे+ एका जिवंत आशेसाठी+ आपल्याला नवीन जन्म दिला आहे.+ ४ हे यासाठी, की आपल्याला एक अविनाशी आणि निष्कलंक असा वारसा मिळावा,+ जो कधीही नाहीसा होणार नाही. हा वारसा तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवला आहे.+ ५ तुमच्या विश्वासामुळे देव त्याच्या सामर्थ्याद्वारे तारणासाठी तुमचं रक्षण करत आहे. हे तारण शेवटच्या काळात प्रकट केलं जाईल. ६ याच कारणामुळे तुम्ही खूप आनंदी आहात. तरीसुद्धा, थोड्या काळासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणं आवश्यक आहे.+ ७ हे यासाठी, की येशू ख्रिस्त प्रकट होण्याच्या वेळी+ तुमच्या पारखलेल्या विश्वासामुळे+ तुम्हाला प्रशंसा, गौरव आणि सन्मान मिळावा. तुमचा हा विश्वास आगीत परीक्षा झाल्यावरही* नष्ट होणाऱ्या सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. ८ तुम्ही ख्रिस्ताला कधीच पाहिलेलं नसूनही तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. आता जरी तुम्हाला तो दिसत नसला, तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि खूप आनंदित आहात. तुमचा हा आनंद अद्भुत आहे आणि त्याचं वर्णन करता येणार नाही. ९ कारण तुम्हाला खातरी आहे, की तुमच्या विश्वासामुळे तुम्हाला तारणाचं प्रतिफळ मिळेल.*+
१० तुमच्यासाठी असलेल्या अपार कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केली होती, त्यांनी या तारणाबद्दल कसून चौकशी केली आणि बारकाईने शोध घेतला.+ ११ त्यांच्यामध्ये असलेली देवाची पवित्र शक्ती ख्रिस्ताबद्दल कोणत्या विशिष्ट काळाकडे किंवा समयाकडे संकेत करत आहे, याबद्दल ते तपासून पाहत राहिले.+ कारण, ख्रिस्ताला कोणकोणती दुःखं सहन करावी लागतील+ आणि त्यानंतर त्याचा कशा प्रकारे गौरव केला जाईल, याबद्दल पवित्र शक्तीने त्यांना आधीच साक्ष दिली होती. १२ ते स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी सेवा करत आहेत, ही गोष्ट त्यांना प्रकट करण्यात आली होती. आणि स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र शक्तीद्वारे ज्यांनी आता तुम्हाला आनंदाचा संदेश सांगितला आहे, त्यांनी याबद्दलचंच वचन तुम्हाला घोषित केलं.+ खरंतर, या गोष्टी समजून घेण्यासाठी* स्वर्गदूतही खूप उत्सुक आहेत.
१३ म्हणून, तुम्ही उत्साहाने काम करण्यासाठी आपलं मन सज्ज करा+ आणि पूर्णपणे सावध राहा.+ येशू ख्रिस्त प्रकट होण्याच्या वेळी जी अपार कृपा तुम्हाला मिळणार आहे, तिच्यावर आशा ठेवा. १४ आता तुम्ही देवाची आज्ञाधारक मुलं आहात. म्हणून त्याच्याबद्दलचं ज्ञान नसताना, पूर्वी तुमच्यात ज्या वाईट इच्छा होत्या त्यांप्रमाणे वागायचं सोडून द्या. १५ याउलट, ज्या पवित्र देवाने तुम्हाला बोलावलं आहे, त्याच्यासारखं तुम्हीसुद्धा आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.+ १६ कारण असं लिहिलं आहे: “तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी पवित्र आहे.”+
१७ जो भेदभाव न करता, ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे प्रत्येकाचा न्याय करतो,+ त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारत असाल, तर मग तात्पुरते रहिवासी म्हणून या जगात राहत असताना त्याची भीती बाळगून चाला.+ १८ कारण तुम्हाला हे माहीत आहे, की तुमच्या वाडवडिलांपासून* चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ जीवनशैलीतून, सोनं किंवा चांदी यांसारख्या नाशवंत गोष्टींनी तुमची सुटका करण्यात आलेली नाही.*+ १९ तर, एका निष्कलंक आणि निर्दोष कोकऱ्याच्या,+ म्हणजेच ख्रिस्ताच्या+ मौल्यवान रक्ताने+ तुमची सुटका करण्यात आली आहे. २० हे खरं आहे, की देवाने आपल्या पूर्वज्ञानाप्रमाणे त्याला जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडलं होतं,+ पण तुमच्यासाठी त्याला काळाच्या शेवटी प्रकट करण्यात आलं.+ २१ त्याच्याद्वारेच तुम्ही देवावर विश्वास ठेवणारे झाला.+ देवाने मेलेल्यांतून उठवून+ त्याचा गौरव केला.+ हे यासाठी, की तुम्ही देवावर विश्वास आणि आशा ठेवावी.
२२ तुम्ही सत्याचं पालन करण्याद्वारे स्वतःला शुद्ध केलं आहे. आणि यामुळे तुम्ही निष्कपट मनाने बंधुप्रेम दाखवता.+ म्हणून, आता एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम करत राहा.+ २३ कारण तुम्हाला नाश होणाऱ्या बीजाद्वारे नाही, तर अविनाशी बीजाद्वारे,*+ म्हणजेच जिवंत आणि अनंत देवाच्या वचनाद्वारे+ नवीन जन्म देण्यात आला आहे.+ २४ कारण, “सर्व मानव हे गवतासारखे आहेत आणि त्यांचं वैभव रानातल्या फुलासारखं आहे; गवत कोमेजून जातं आणि फूल गळून पडतं, २५ पण यहोवाचं* वचन सर्वकाळ टिकतं.”+ हे “वचन” म्हणजेच तुम्हाला सांगण्यात आलेला आनंदाचा संदेश आहे.+
२ त्यामुळे सर्व प्रकारचा दुष्टपणा,+ कपट, ढोंग, हेवा आणि लोकांच्या मागे त्यांची निंदा करायचं सोडून द्या. २ नवीन जन्मलेल्या मुलांसारखी,+ देवाच्या वचनाच्या शुद्ध* दुधासाठी तीव्र इच्छा उत्पन्न करा, म्हणजे तुमची वाढ होत राहील आणि तुमचं तारण होईल.*+ ३ कारण, प्रभू किती प्रेमळ आहे हे तुम्ही स्वतः अनुभवलं* आहे.
४ माणसांनी जिवंत दगडाला नाकारलं,+ पण तो देवाचा निवडलेला आणि त्याच्या नजरेत मौल्यवान आहे.+ जेव्हा तुम्ही प्रभूकडे येता, ५ तेव्हा तुम्हीसुद्धा पवित्र शक्तीद्वारे बांधल्या जाणाऱ्या मंदिराकरता जिवंत दगडांसारखे रचले जाता.+ हे यासाठी, की तुम्ही पवित्र याजकवर्ग बनावं आणि येशू ख्रिस्ताद्वारे बलिदानं अर्पण करावीत. अशी बलिदानं जी पवित्र शक्तीप्रमाणे आहेत+ आणि देवाला मान्य आहेत.+ ६ कारण शास्त्रात म्हटलं आहे: “पाहा! मी सीयोनमध्ये एक निवडलेला दगड, इमारतीच्या पायात एक मौल्यवान, कोपऱ्याचा दगड बसवत आहे; आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याची कधीच निराशा* होणार नाही.”+
७ म्हणून, तुमच्यासाठी तो मौल्यवान आहे कारण तुम्ही विश्वास ठेवता. पण, जे विश्वास ठेवत नाहीत अशांबद्दल शास्त्र म्हणतं, की “बांधकाम करणाऱ्यांनी जो दगड नाकारला+ तोच कोपऱ्याचा मुख्य दगड* बनला आहे,”+ ८ आणि त्यांच्यासाठी तो “ठेच लागण्याचा दगड आणि अडखळणाचा खडक” बनला आहे.+ ते वचनाचं पालन करत नाहीत म्हणून अडखळतात. त्यांचा हा अंत ठरलेला आहे. ९ तुम्ही मात्र, निवडलेले लोक, राजे असलेले याजक, एक पवित्र राष्ट्र+ आणि देवाची खास प्रजा आहात.+ हे यासाठी, की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात आणलं,+ त्याच्या महान गुणांची* तुम्ही संपूर्ण जगात घोषणा करावी.+ १० कारण एके काळी तुम्ही देवाचे लोक नव्हता, पण आता तुम्ही त्याचे लोक आहात;+ एके काळी तुमच्यावर दया दाखवण्यात आली नव्हती, पण आता मात्र दाखवण्यात आली आहे.+
११ प्रिय बांधवांनो, तुम्ही विदेशी आणि तात्पुरते रहिवासी+ असल्यामुळे मी विनंती करतो, की तुमच्याशी लढत राहणाऱ्या+ शारीरिक वासनांपासून दूर राहा.+ १२ जगातल्या लोकांमध्ये आपलं वागणं चांगलं ठेवा.+ हे यासाठी, की ते तुम्हाला वाईट म्हणून तुमच्यावर दोष लावत असले, तरी तुमची चांगली कामं स्वतः पाहिल्यामुळे,+ देव परीक्षण करायला येईल त्या दिवशी ते देवाचा गौरव करतील.
१३ माणसांनी स्थापन केलेल्या प्रत्येक अधिकाराच्या अधीन राहा;+ राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा;+ १४ तसंच, राजाने नेमलेल्या राज्यपालांच्या अधीन राहा. कारण वाईट कामं करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामं करणाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी त्यांना नेमलं जातं.+ १५ खुद्द देवाची अशी इच्छा आहे, की तुम्ही चांगली कामं करून, अविचारीपणे बोलणाऱ्या मूर्ख माणसांची तोंडं बंद करावीत.*+ १६ स्वतंत्र लोकांसारखे जीवन जगा.+ पण, वाईट कामांवर पांघरूण घालण्यासाठी* आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग करू नका,+ तर देवाचे दास व्हा.+ १७ सर्व प्रकारच्या लोकांचा आदर करा,+ संपूर्ण बंधुसमाजावर* प्रेम करा,+ देवाची भीती बाळगा+ आणि राजाचा आदर करा.+
१८ सेवकांनी योग्य भीती बाळगून आपल्या मालकांच्या अधीन राहावं.+ जे चांगले आणि समजूतदार आहेत फक्त त्यांच्याच नाही, तर ज्यांना संतुष्ट करणं कठीण असतं अशांच्याही त्यांनी अधीन राहावं. १९ कारण देवासमोर शुद्ध विवेक बाळगण्यासाठी जर कोणी त्रास* आणि अन्याय सहन करत असेल, तर देवाच्या नजरेत ही एक चांगली गोष्ट आहे.+ २० कारण पाप केल्याबद्दल जर तुम्हाला मारहाण झाली आणि तुम्ही ती निमूटपणे सहन केली, तर त्यात कोणता मोठेपणा?+ पण, जर चांगलं केल्याबद्दल तुम्ही दुःख सोसलं, तर देवाच्या नजरेत ही एक चांगली गोष्ट आहे.+
२१ खरंतर, याच मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला बोलावण्यात आलं होतं, कारण ख्रिस्तानेसुद्धा दुःख सोसलं+ आणि असं करून त्याने तुमच्यासाठी एक आदर्श घालून दिला. हे यासाठी, की तुम्ही त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करावं.+ २२ त्याने कोणतंही पाप केलं नाही+ आणि कपटीपणाच्या गोष्टी त्याच्या तोंडून कधीही निघाल्या नाहीत.+ २३ त्याचा अपमान* केला जात होता,+ तेव्हा त्याने उलटून अपमान* केला नाही.+ दुःख भोगत असताना,+ त्याने धमकावलं नाही. उलट, त्याने नीतीने न्याय करणाऱ्याच्या हाती स्वतःला सोपवून दिलं.+ २४ त्याने वधस्तंभावर*+ तुमची-आमची पापं स्वतःच्या शरीरावर घेतली.+ हे यासाठी, की आपली पापांपासून सुटका व्हावी आणि आपण नीतिमत्त्वासाठी जगावं. आणि “त्याच्या जखमांनी तुम्हाला आरोग्य मिळालं.”+ २५ कारण तुम्ही भरकटलेल्या मेंढरांसारखे होता,+ पण आता तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे+ आणि तुमच्या जिवाची* देखरेख करणाऱ्याकडे परत आला आहात.
३ त्याच प्रकारे पत्नींनो, तुम्हीसुद्धा आपल्या पतीच्या अधीन राहा.+ म्हणजे जरी एखादा पती वचनाचं पालन करणारा नसला, तरी त्याने एकाही शब्दाशिवाय फक्त आपल्या पत्नीच्या वागणुकीमुळे,+ २ म्हणजेच, तिचं शुद्ध आचरण+ आणि ती मनापासून दाखवत असलेला आदर पाहून विश्वासात यावं. ३ बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींनी, म्हणजेच खास प्रकारच्या केशरचना करून,* तसंच सोन्याचे दागिने+ किंवा महागडे कपडे घालून आपलं सौंदर्य वाढवायचा प्रयत्न करू नका. ४ तर आपल्या मनातल्या गुप्त व्यक्तीला शांत वृत्ती आणि सौम्यता यांसारख्या गुणांनी सजवा.+ हे सौंदर्य कधीच नष्ट होत नाही आणि ते देवाच्या नजरेत फार मौल्यवान आहे. ५ कारण जुन्या काळात देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रिया, आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला असंच सजवत होत्या. ६ जसं की, सारा ही अब्राहामच्या आज्ञेत राहिली आणि ती त्याला प्रभू म्हणायची.+ तुम्हीसुद्धा चांगलं करत राहिला आणि भीतीला बळी पडला नाहीत,+ तर तुम्हीही तिच्या मुली बनू शकता.
७ त्याच प्रकारे, पतींनो आपापल्या पत्नीसोबत विचारशीलपणे राहा.* त्या स्त्रिया असल्यामुळे, जास्त नाजूक भांड्यांसारख्या आहेत हे ओळखून त्यांना मान द्या,+ नाहीतर तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहीत. कारण, तुमच्यासोबत त्यासुद्धा देवाच्या अपार कृपेने मिळणार असलेल्या जीवनाच्या वारस आहेत.+
८ शेवटी, तुमच्या सर्वांच्या विचारांत एकता असावी,+ तसंच एकमेकांशी वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा+ आणि नम्रता दाखवा.+ ९ कोणी तुमचं नुकसान केलं, तर त्याचं नुकसान करू नका+ किंवा कोणी तुमचा अपमान केला, तर त्याचा अपमान करू नका.+ उलट, आशीर्वाद देऊन* त्याची परतफेड करा+ कारण तुम्हाला याच मार्गावर चालण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. हे यासाठी, की तुम्हाला वारशात आशीर्वाद मिळावेत.
१० कारण “ज्या कोणाला जीवनात सुख आणि भरपूर आनंदाचे दिवस पाहायचे आहेत, त्याने वाईट गोष्टी बोलण्यापासून+ आपली जीभ आणि कपटीपणाच्या गोष्टी करण्यापासून आपलं तोंड आवरावं. ११ त्याने वाइटापासून वळून+ चांगलं ते करावं;+ त्याने शांती टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करावा.+ १२ कारण यहोवाची* नजर नीतिमानांवर असते आणि तो त्यांच्या याचना ऐकतो,+ पण वाईट गोष्टी करणाऱ्यांकडे यहोवा* पाठ फिरवतो.”+
१३ खरं पाहिलं, तर तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आवेशी असला, तर कोण तुमचं नुकसान करेल?+ १४ पण न्यायनीतीने वागल्यामुळे जरी तुम्हाला दुःख सोसावं लागलं, तरी तुम्ही सुखी आहात.+ लोकांना ज्या गोष्टींची भीती वाटते त्यांची भीती तुम्ही बाळगू नका* आणि अस्वस्थ होऊ नका.+ १५ तर, ख्रिस्ताला आपल्या मनात प्रभू म्हणून पवित्र माना. तुम्ही बाळगत असलेल्या आशेबद्दल जो कोणी प्रश्न विचारतो, त्याला उत्तर देण्यासाठी नेहमी तयार राहा, पण सौम्यतेने+ आणि मनापासून आदर दाखवून असं करा.+
१६ चांगला विवेक टिकवून ठेवा,+ म्हणजे तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारे वाईट बोललं जात असेल, तर ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने तुमची चांगली वागणूक पाहून+ तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांना लाज वाटेल.+ १७ कारण जर चांगलं करत असल्यामुळे तुम्हाला दुःख सोसावं लागलं,+ आणि जर या गोष्टीला परवानगी देण्याची देवाची इच्छा असेल, तर वाईट केल्यामुळे दुःख सोसण्यापेक्षा, चांगलं करून दुःख सोसणं बरं आहे.+ १८ कारण आपल्या पापांबद्दल, ख्रिस्ताने सर्वकाळासाठी एकदाच मरण सोसलं.+ तो नीतिमान असूनही अनीतिमान लोकांसाठी मरण पावला.+ हे यासाठी, की तुम्ही देवाकडे यावं.+ त्याला हाडामांसाच्या शरीरात ठार मारण्यात आलं,+ पण स्वर्गीय शरीर देऊन जिवंत करण्यात आलं.+ १९ आणि या स्थितीत त्याने जाऊन कैदेत असलेल्या दुष्ट स्वर्गदूतांना* प्रचार केला.+ २० हे तेच दुष्ट स्वर्गदूत होते, ज्यांनी पूर्वी नोहाच्या काळात देवाची आज्ञा मोडली होती. त्या वेळी, देव सहनशीलपणे वाट पाहत असताना*+ जहाजाचं* बांधकाम सुरू होतं+ आणि त्या जहाजात मोजकेच लोक, म्हणजे आठ जण* पाण्यातून सुखरूप बचावले.+
२१ ही घटना आज येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे* तुम्हाला वाचवणाऱ्या बाप्तिस्म्याचं* चिन्ह आहे. (बाप्तिस्मा म्हणजे शरीराचा मळ दूर करणं नाही, तर देवाला एका शुद्ध विवेकाची विनंती करणं आहे.)+ २२ ख्रिस्त, देवाच्या उजव्या हाताला आहे,+ कारण तो स्वर्गात गेला आणि स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता यांना त्याच्या अधीन करण्यात आलं.+
४ ख्रिस्ताने शरीरात दुःख सोसलं,+ त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच्यासारखीच मनोवृत्ती* ठेवायला तयार असा, कारण जो शरीरात दुःख सोसतो त्याने पाप करायचं सोडून दिलं आहे.+ २ हे यासाठी, की त्याने आपल्या उरलेल्या आयुष्यात माणसांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही,+ तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगावं.+ ३ कारण जगाच्या लोकांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात आतापर्यंत तुम्ही जो वेळ घालवला तो पुरे झाला.+ कारण तेव्हा तुम्ही निर्लज्ज वर्तन* करत होता, अनियंत्रित वासनांच्या आहारी गेला होता, तसंच प्रमाणाबाहेर पिणं, बेलगाम मौजमस्ती,* दारूबाजी* आणि घृणित मूर्तिपूजा यांसारख्या गोष्टी करत होता.+ ४ पण, आता तुम्ही त्यांच्यासोबत या अनैतिकतेच्या चिखलात लोळायचं सोडून दिलं असल्यामुळे, ते गोंधळात पडले आहेत आणि त्यामुळे ते तुमच्याबद्दल वाईट बोलतात.+ ५ पण या लोकांना, जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तयार आहे, त्याला हिशोब द्यावा लागेल.+ ६ खरंतर याच कारणामुळे आनंदाचा संदेश मेलेल्यांनाही घोषित करण्यात आला.+ हे यासाठी, की जरी सर्व माणसांप्रमाणेच त्यांचाही न्याय करण्यात आला, तरी त्यांनी देवाच्या पवित्र शक्तीच्या* मार्गदर्शनाप्रमाणे जगावं.
७ पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे. म्हणून समंजस* असा+ आणि प्रार्थना करण्याच्या बाबतीत सतर्क* राहा.+ ८ पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा,+ कारण प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकतं.+ ९ कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा.+ १० आपण वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होणारी देवाची अपार कृपा मिळालेले कारभारी आहोत.+ त्यामुळे, चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकाला ज्या प्रमाणात दान मिळालं आहे, त्याप्रमाणे त्याने ते इतरांच्या सेवेसाठी उपयोगात आणावं. ११ जर कोणी बोलत असेल, तर त्याने देवाची वचनं बोलत असल्याप्रमाणे बोलावं; जर कोणी सेवा करत असेल, तर देव पुरवत असलेल्या सामर्थ्याने सेवा करत असल्याप्रमाणे त्याने ती करावी.+ यामुळे सर्व गोष्टींत येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा गौरव होईल.+ गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ त्याचंच आहे. आमेन.
१२ प्रिय बांधवांनो, तुमच्यावर येत असलेल्या अग्निपरीक्षांचं आश्चर्य वाटू देऊ नका.+ तुमच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडत आहे असा विचार करू नका. १३ उलट, तुम्हीसुद्धा ख्रिस्तासारखी दुःखं सहन करत आहात,+ म्हणून आनंद करा.+ यामुळे जेव्हा त्याचा गौरव प्रकट होईल, तेव्हाही तुम्ही खूप आनंदी व्हाल.+ १४ ख्रिस्ताच्या नावासाठी तुमची निंदा* होत असेल, तर तुम्ही सुखी आहात+ कारण देवाची गौरवशाली पवित्र शक्ती तुमच्यावर आहे.
१५ पण तुमच्यापैकी कोणालाही खुनी, चोर, अपराधी किंवा इतरांच्या कारभारांत लुडबुड करणारा म्हणून दुःख भोगावं लागू नये.+ १६ पण ख्रिस्ती म्हणून जर एखाद्याला दुःख सोसावं लागलं तर त्याला याबद्दल लाज वाटायचं कारण नाही.+ उलट, त्याने या नावाने ओळखलं जात असताना देवाचा गौरव करत राहावा. १७ देवाच्या घरापासून न्यायाची सुरुवात होण्याची ठरवलेली वेळ आली आहे.+ आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून होणार आहे,+ तर मग जे देवाबद्दलच्या आनंदाच्या संदेशाप्रमाणे चालत नाहीत, त्यांचं काय होईल?+ १८ “शिवाय, जर नीतिमानाचं तारण* मुश्कीलीने होत असेल तर मग जो अधार्मिक आणि पापी आहे, त्याचं काय होईल?”+ १९ म्हणूनच, देवाच्या इच्छेप्रमाणे दुःखं सोसणाऱ्यांनी स्वतःला विश्वासू निर्माणकर्त्याच्या हाती सोपवून द्यावं आणि चांगलं ते करत राहावं.+
५ म्हणून, तुमच्यामध्ये असलेल्या वडिलांना मी, जो तुमच्यासारखाच एक वडील, ख्रिस्ताच्या दुःखांचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि भविष्यात प्रकट होणार असलेल्या गौरवाचा भागीदार आहे,+ अशी विनंती करतो:* २ तुमच्या हाती सोपवलेल्या देवाच्या कळपाचा मेंढपाळांप्रमाणे सांभाळ करा.+ देखरेख करणारे* या नात्याने नाइलाजाने नाही, तर देवासमोर स्वखुषीने सेवा करा.+ तसंच, बेइमानीने कमवलेल्या पैशाच्या लोभाने नाही,+ तर उत्सुकतेने सेवा करा. ३ जे देवाची संपत्ती आहेत, त्यांच्यावर अधिकार गाजवू नका+ तर कळपासाठी उदाहरण बना,+ ४ म्हणजे प्रमुख मेंढपाळ+ प्रकट झाल्यावर तुम्हाला कधीही नष्ट न होणारा गौरवी मुकुट मिळेल.+
५ त्याच प्रकारे तरुणांनो, वडीलधाऱ्या माणसांच्या* अधीन राहा.+ पण, तुम्ही सगळेच एकमेकांशी नम्रतेने वागत जा.* कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.+
६ म्हणून, देवाच्या सामर्थ्यवान हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे योग्य वेळी तो तुमचा सन्मान करेल.+ ७ आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या,+ कारण त्याला तुमची काळजी आहे.+ ८ सावध राहा, जागे राहा!+ तुमचा शत्रू, सैतान* हा एखाद्या गर्जणाऱ्या सिंहासारखा, कोणाला गिळावं हे शोधत फिरतो.+ ९ पण तुम्ही विश्वासात दृढ राहून त्याचा विरोध करा,+ कारण तुम्हाला माहीत आहे, की संपूर्ण जगातले तुमचे बांधव* अशाच प्रकारची दुःखं सोसत आहेत.+ १० तुम्ही थोड्या काळापर्यंत दुःखं सोसल्यावर, सर्व प्रकारची अपार कृपा करणारा देव स्वतः तुमचं प्रशिक्षण पूर्ण करेल. त्याने तुम्हाला आपल्या सर्वकाळाच्या गौरवात बोलावलं आहे,+ कारण तुम्ही ख्रिस्तासोबत ऐक्यात आहात. तो तुम्हाला दृढ करेल,+ तुम्हाला बळ देईल+ आणि स्थिर उभं राहायला मदत करेल. ११ सामर्थ्य सदासर्वकाळ त्याचंच आहे. आमेन.
१२ मी ज्याला एक विश्वासू भाऊ मानतो त्या सिल्वानच्या*+ हातून मी थोडक्यात तुम्हाला हे पत्र लिहिलं आहे. हे यासाठी, की तुम्हाला प्रोत्साहन द्यावं आणि हीच देवाची खरी अपार कृपा आहे अशी प्रामाणिक साक्ष द्यावी. या अपार कृपेत तुम्ही स्थिर राहा. १३ जी बाबेलमध्ये आहे आणि तुमच्यासारखीच निवडलेली आहे, ती तुम्हाला नमस्कार सांगते. तसंच माझा मुलगा, मार्क+ हाही तुम्हाला नमस्कार सांगतो. १४ एकमेकांना भेटताना प्रेमाचं चुंबन घ्या.
ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या तुम्हा सर्वांना शांती मिळो.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “शुद्ध केल्यावरही.”
किंवा “तुमचा जीव वाचवला जाईल.”
शब्दशः “गोष्टींत डोकावून पाहण्यासाठी.”
किंवा “परंपरेनुसार.”
शब्दशः “तुम्हाला खंडणी देऊन सोडवण्यात आलेलं नाही.”
म्हणजे, प्रजोत्पादन किंवा फळ उत्पन्न करू शकणारं बीज.
अति. क५ पाहा.
किंवा “भेसळ नसलेल्या.”
किंवा “तुम्हाला वाचवलं जाईल.”
शब्दशः “चाखून पाहिलं.”
शब्दशः “लज्जित.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “सद्गुणांची,” म्हणजे, त्याचे प्रशंसनीय गुण आणि कार्यं.
शब्दशः “माणसांच्या मुसक्या बांधाव्यात.”
किंवा “वाईट कामांसाठी सबब म्हणून.”
शब्दशः “बंधुत्वावर.”
किंवा “दुःख; यातना.”
किंवा “निंदा.”
किंवा “निंदा.”
किंवा “झाडावर.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जीवनाची.”
शब्दशः “खास प्रकारे केस गुंफून.”
शब्दशः “ज्ञानाप्रमाणे.” किंवा “पत्नींना समजून घ्या.”
किंवा “त्याचं भलं करून.”
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा कदाचित, “त्यांच्या धमक्यांना भिऊ नका.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “देवाची सहनशीलता वाट पाहत होती.”
मत्त २४:३८ तळटीप पाहा.
शब्दशः “जीव.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “त्याच्यासारखाच निर्धार; निश्चय.”
ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “रंगेल पार्ट्या.”
किंवा “पिण्याच्या शर्यती लावणं.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “निरोगी मनाचे.”
किंवा “सावध; जागे.”
किंवा “अपमान.”
किंवा “वाचवलं जाणं.”
किंवा “असं प्रोत्साहन देतो.”
किंवा “कळपाची काळजीपूर्वक राखण करणारे.”
किंवा “वडिलांच्या.”
किंवा “नम्रतेचं वस्त्र घाला.”
शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.
किंवा “संपूर्ण बंधुसमाज.”
याला सीला असंही म्हणतात.