वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt तीत १:१-३:१५
  • तीत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तीत
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
तीत

तीत याला पत्र

१ मी पौल, देवाच्या निवडलेल्यांच्या विश्‍वासाप्रमाणे आणि सत्याच्या अचूक ज्ञानाप्रमाणे, देवाचा दास आणि येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे. हे सत्य देवाच्या भक्‍तीबद्दल आहे. २ ते सर्वकाळाच्या जीवनाच्या+ त्या आशेवर आधारित आहे, जिच्याबद्दल देवाने, जो कधीही खोटं बोलू शकत नाही,+ फार पूर्वीच वचन दिलं होतं. ३ पण त्याच्या ठरवलेल्या वेळी त्याने त्याचं वचन, मला सोपवण्यात आलेल्या प्रचाराच्या सेवेद्वारे+ प्रकट केलं. ही सेवा मला आपला तारणकर्ता, देव याच्या आज्ञेप्रमाणे सोपवण्यात आली आहे. ४ तर, मी पौल हे पत्र माझा सहविश्‍वासू आणि खऱ्‍या अर्थाने माझं लेकरू असलेला तीत, याला लिहीत आहे:

देव जो आपला पिता आणि ख्रिस्त येशू जो आपला तारणकर्ता, यांच्याकडून तुला अपार कृपा आणि शांती मिळो.

५ मी तुला क्रेतमध्ये यासाठी सोडून आलो, की तू तिथे घडत असलेल्या चुकीच्या गोष्टी सुधाराव्यात* आणि प्रत्येक शहरात वडिलांना नियुक्‍त करावं. याबद्दल मी तुला अशा सूचना दिल्या होत्या: ६ वडील म्हणून अशा माणसाला नेमावं, ज्याच्यावर कोणताही आरोप नाही, ज्याला एकच बायको आहे आणि ज्याची मुलं विश्‍वासात असून त्यांच्यावर नीच वागणुकीचा* किंवा बंडखोरपणाचा आरोप नाही.+ ७ कारण देवाचा कारभारी या नात्याने, मंडळीची देखरेख करणाऱ्‍यावर कोणताही आरोप असू नये. तो अडेल वृत्तीचा,+ तापट स्वभावाचा,+ दारुडा, हिंसक वृत्तीचा* किंवा बेइमानीच्या कमाईचा लोभ धरणारा असू नये. ८ तर तो पाहुणचार करणारा,+ चांगुलपणाची आवड असणारा, समंजस,*+ नीतिमान, एकनिष्ठ+ आणि संयमी असावा.+ ९ त्याची शिकवण्याची पद्धत देवाच्या विश्‍वसनीय वचनाला* धरून असावी.+ यामुळे तो फायदेकारक शिक्षणाने+ इतरांना प्रोत्साहन देऊ शकेल* आणि त्यासोबतच जे हे वचन मान्य करत नाहीत, त्यांना ताडनही देऊ शकेल.+

१० कारण बंडखोर वृत्तीची, निरर्थक गोष्टींबद्दल बोलणारी आणि फसवणूक करणारी, विशेषतः सुंतेची* प्रथा पाळायचा आग्रह धरणारी बरीच माणसं आहेत.+ ११ त्यांची तोंडं बंद केली पाहिजेत. कारण हीच माणसं, बेइमानीचं धन मिळवण्याच्या लोभाने नको त्या गोष्टींबद्दल शिकवून, संपूर्ण कुटुंबांचा विश्‍वास नष्ट करतात. १२ त्यांच्याच एका संदेष्ट्याने असं म्हटलं आहे: “क्रेतचे लोक सहसा खोटारडे, जनावरांसारखे क्रूर, ऐतखाऊ आणि अधाशी असतात.”

१३ ही साक्ष खरी आहे. म्हणूनच, त्यांचं कडक शब्दांत ताडन करत जा, म्हणजे ते विश्‍वासात सुदृढ राहू शकतील, १४ आणि यहुद्यांच्या कथा-कहाण्यांकडे आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञांकडे लक्ष देणार नाहीत. १५ जे शुद्ध आहेत, त्यांच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी शुद्ध असतात.+ पण जे अशुद्ध आणि विश्‍वासहीन आहेत, त्यांच्या दृष्टीने काहीच शुद्ध नसतं. कारण त्यांचं मन आणि त्यांचा विवेक दूषित झाला आहे.+ १६ चारचौघांत ते देवाला ओळखत असल्याचा दावा तर करतात, पण आपल्या कामांनी ते त्याला नाकारतात.+ कारण ते आज्ञा मोडणारे किळसवाणे लोक आहेत आणि कोणत्याही चांगल्या कामाच्या लायकीचे नाहीत.

२ तू मात्र नेहमी फायदेकारक शिक्षणाला धरून असलेल्या गोष्टींबद्दल सांगत राहा.+ २ वयस्कर पुरुषांनी मर्यादशील, गंभीर आणि समंजस असावं, तसंच विश्‍वास, प्रेम आणि धीर या बाबतींत सुदृढ असावं. ३ त्याच प्रकारे, वयस्कर स्त्रियांनी पवित्र जनांना शोभेल असं वागावं. त्या बदनामी करणाऱ्‍या, जास्त प्रमाणात मद्य* घेणाऱ्‍या असू नयेत; तर चांगल्या गोष्टी शिकवणाऱ्‍या असाव्यात. ४ हे यासाठी, की त्यांनी तरुण स्त्रियांना आपल्या नवऱ्‍यावर आणि मुलाबाळांवर प्रेम करायला, ५ समंजसपणे वागायला, आचरण शुद्ध ठेवायला, आपलं घर सांभाळायला,* दयाळूपणे वागायला, तसंच, आपापल्या नवऱ्‍याच्या अधीन राहायला शिकवावं.*+ म्हणजे लोक देवाच्या वचनाची निंदा करणार नाहीत.

६ त्याचप्रमाणे, तरुण पुरुषांनाही समंजस असण्याचं प्रोत्साहन देत राहा.+ ७ आणि तू स्वतःसुद्धा सगळ्या बाबतींत, चांगली कार्यं करण्याचं उदाहरण इतरांसमोर ठेव. जे शुद्ध आहे, ते गंभीरतेने शिकवत राहा.*+ ८ ज्यांची कोणी टीका करू शकणार नाही, अशा फायदेकारक गोष्टी शिकव.+ म्हणजे विरोधकांना आपल्याविरुद्ध काही नकारात्मक* बोलायला जागा नसल्यामुळे, त्यांची लाजिरवाणी स्थिती होईल.+ ९ दासांनी सगळ्या बाबतींत आपल्या मालकांच्या अधीन राहून+ त्यांना खूश करायचा प्रयत्न करत राहावा; त्यांनी उलट बोलू नये, १० चोरी करू नये,+ तर पूर्णपणे भरवशालायक असावं. म्हणजे सगळ्या बाबतींत ते आपला तारणकर्ता देव याच्या शिक्षणाला शोभा आणू शकतील.+

११ कारण देवाची अपार कृपा प्रकट करण्यात आली आहे; आणि या कृपेमुळे सर्व प्रकारच्या लोकांचं तारण होतं.+ १२ ती कृपा आपल्याला असं शिकवते, की आपण देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा आणि जगाच्या वासनांचा धिक्कार करावा.+ तसंच, आपण या जगाच्या व्यवस्थेत* समंजसपणे, नीतीने आणि देवाची भक्‍ती करत जीवन जगावं.+ १३ आणि आपण त्या दिवसाची वाट पाहत राहावी, जेव्हा आपली आनंददायक आशा पूर्ण होईल+ आणि महान देवाचा, तसंच आपला तारणकर्ता, येशू ख्रिस्त याचा गौरव प्रकट होईल. १४ त्याने स्वतःला आपल्याकरता यासाठी अर्पण केलं,+ की सर्व प्रकारच्या अनीतीपासून आपल्याला मुक्‍त करावं*+ आणि चांगल्या कामांसाठी आवेशी असे, आपल्या खास मालकीचे लोक स्वतःकरता शुद्ध करावेत.+

१५ या गोष्टी शिकवून त्यांना प्रोत्साहन देत राहा आणि पूर्ण अधिकाराने त्यांचं ताडन करत राहा.+ कोणीही तुला तुच्छ लेखू नये.

३ त्यांना याची आठवण करून देत राहा, की त्यांनी सरकार आणि अधिकारी यांच्या अधीन आणि आज्ञेत राहावं,+ प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार असावं, २ कोणाचीही बदनामी करू नये, भांडखोर असू नये; तर समजूतदार असावं+ आणि सर्वांशी सौम्यतेने वागावं.+ ३ कारण आपणसुद्धा एकेकाळी अविचारी, आज्ञा मोडणारे, बहकलेले, वेगवेगळ्या वासनांच्या आणि शारीरिक सुखांच्या आहारी गेलेले, दुष्टपणे आणि ईर्ष्येने वागणारे, तिरस्कार करण्याच्या लायकीचे आणि एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो.

४ पण, आपल्या तारणकर्त्या देवाची कृपा+ आणि मानवजातीसाठी असलेलं त्याचं प्रेम प्रकट झालं. ५ त्याने आपल्याला एक नवीन जीवन देणाऱ्‍या स्नानाद्वारे+ आणि पवित्र शक्‍तीने* एक नवीन व्यक्‍ती बनवून आपलं तारण केलं.+ हे आपण केलेल्या नीतिमान कार्यांमुळे नाही,+ तर फक्‍त त्याच्या दयेमुळे झालं.+ ६ त्याने आपला तारणकर्ता, येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर या पवित्र शक्‍तीचा उदारपणे* वर्षाव केला आहे.+ ७ हे यासाठी, की त्याच्या अपार कृपेमुळे नीतिमान ठरवलं गेल्यावर,+ आपण आपल्या आशेप्रमाणे सर्वकाळाच्या जीवनाचे+ वारस बनावं.+

८ या गोष्टी विश्‍वसनीय आहेत आणि त्यांवर तू भर देत राहावा अशी माझी इच्छा आहे; म्हणजे, ज्यांनी देवावर विश्‍वास ठेवला आहे, ते आपली मनं चांगली कामं करत राहण्यावर केंद्रित करू शकतील. या गोष्टी उत्तम आणि लोकांच्या फायद्याच्या आहेत.

९ पण मूर्खपणाचे वादविवाद, वंशावळ्यांवर चर्चा आणि नियमशास्त्राबद्दल मतभेद आणि भांडणतंटे यांपासून दूर राहा. कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत.+ १० एखादा माणूस वेगळी शिकवण देत असेल,+ तर त्याला दोनदा ताकीद द्यावी*+ आणि तरीसुद्धा त्याने ऐकलं नाही, तर त्याच्याशी संबंध तोडून टाकावा.+ ११ कारण असा माणूस योग्य मार्गापासून बहकला असून तो पाप करत आहे. त्याच्या स्वतःच्या वागणुकीनेच त्याला दोषी ठरवलं आहे.

१२ मी अर्तमा आणि तुखिक+ यांना तुझ्याकडे पाठवीन, तेव्हा माझ्याकडे निकपलिसला यायचा होईल तितका प्रयत्न कर. कारण तिथेच हिवाळा घालवण्याचा माझा विचार आहे. १३ नियमशास्त्राचा जाणकार असलेला जेना आणि अपुल्लो यांना प्रवासात काही कमी पडायला नको, म्हणून त्यांना लागेल ते सगळं पुरवण्याचा होईल तितका प्रयत्न कर.+ १४ पण, बांधवांच्या तातडीच्या गरजा पुरवण्यासाठी आपल्या लोकांनीही चांगली कार्यं करण्याची स्वतःला सवय लावून घ्यावी,+ म्हणजे ते त्यांच्या सेवेत निष्फळ ठरणार नाहीत.+

१५ माझ्यासोबत असलेले सगळे तुला नमस्कार सांगतात. आमच्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्व सहविश्‍वासू बांधवांना माझा नमस्कार सांग.

देवाची अपार कृपा तुम्हा सगळ्यांवर असो.

किंवा “तिथल्या उणिवा दूर कराव्यात.”

किंवा “स्वैराचाराचा; बेतालपणाचा.”

किंवा “इतरांना शब्दांनी दुखावणारा.”

किंवा “चांगल्यावाइटातला फरक ओळखणारा; समजदार.”

किंवा “भरवशालायक संदेशाला.”

किंवा “आर्जवू शकेल.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “द्राक्षारस.”

किंवा “घरातली कामं करायला.”

किंवा “भान करून द्यावं; प्रशिक्षण द्यावं.”

किंवा कदाचित, “शुद्धतेने शिक्षण दे.”

किंवा “वाईट.”

किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “आपल्यासाठी खंडणी देऊन; आपल्याला सोडवून.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “समृद्धपणे.”

किंवा “समजवावं.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा