तीमथ्य याला दुसरं पत्र
१ ख्रिस्त येशूद्वारे मिळणाऱ्या जीवनाच्या+ अभिवचनाची घोषणा करण्यासाठी, जो देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित आहे त्या पौलकडून, २ माझा प्रिय मुलगा, तीमथ्य याला:+
देव जो आपला पिता आणि ख्रिस्त येशू जो आपला प्रभू यांच्याकडून तुला अपार कृपा, दया आणि शांती मिळो.
३ माझ्या वाडवडिलांप्रमाणेच मी ज्या देवाची शुद्ध विवेकाने पवित्र सेवा करत आहे, त्याचे मी आभार मानतो. आणि रात्रंदिवस त्याला याचना करताना न चुकता तुझी आठवण करतो. ४ तुझे अश्रू मला आठवतात तेव्हा तुला भेटायची मला फार ओढ लागते. तुला भेटता आलं तर माझं मन आनंदाने भरून जाईल. ५ मला तुझा निष्कपट* विश्वास आठवतो.+ असाच विश्वास तुझी आजी लोईस आणि आई युनीके यांच्यामध्ये होता. माझी खातरी आहे, की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
६ म्हणूनच मी तुला याची आठवण करून देतो, की मी तुझ्यावर हात ठेवले तेव्हा देवाचं जे दान तुला मिळालं होतं ते ज्वलंत ठेव.+ ७ कारण देवाने आपल्याला जी पवित्र शक्ती* दिली आहे, तिच्यामुळे भित्रेपणा नाही,+ तर सामर्थ्य,+ प्रेम आणि समंजसपणा* निर्माण होतो. ८ त्यामुळे, आपल्या प्रभूबद्दल साक्ष देण्याची किंवा मी जो त्याच्यासाठी कैदेत आहे, त्या माझीसुद्धा लाज बाळगू नकोस.+ तर, देवाच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवून+ आनंदाच्या संदेशासाठी दुःख सोसायला तयार राहा.+ ९ देवाने आपल्याला वाचवलं* आणि पवित्र जन होण्यासाठी बोलावलं.+ अर्थात, आपल्या कार्यांमुळे नाही, तर त्याच्या उद्देशामुळे आणि त्याच्या अपार कृपेमुळे त्याने आपल्याला बोलावलं.+ ख्रिस्त येशूद्वारे फार पूर्वीच आपल्यावर ही अपार कृपा करण्यात आली होती. १० पण, आता आपला तारणकर्ता, ख्रिस्त येशू प्रकट झाल्यामुळे ती आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवण्यात आली आहे.+ त्याने मृत्यूला निकामी केलं आहे+ आणि आनंदाच्या संदेशाद्वारे+ जीवनावर+ आणि अविनाशीपणावर+ प्रकाश टाकला आहे. ११ या आनंदाच्या संदेशासाठीच मला घोषणा करणारा, प्रेषित आणि शिक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं.+
१२ याच कारणामुळे मी या गोष्टी सोसत आहे,+ पण मला याची लाज वाटत नाही.+ कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो. आणि मी त्याच्या स्वाधीन केलेला ठेवा तो न्यायाच्या दिवसापर्यंत जपून ठेवेल, याची मला खातरी आहे.+ १३ ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे उत्पन्न होणारा विश्वास आणि प्रेम दाखवण्यासोबतच, माझ्याकडून ऐकलेल्या फायदेकारक* वचनांच्या नमुन्याला* धरून राहा.+ १४ तुला सोपवण्यात आलेला हा ठेवा, आपल्यामध्ये राहणाऱ्या पवित्र शक्तीच्या+ मदतीने जपून ठेव.
१५ तुला माहीतच आहे, की आशिया प्रांतातल्या+ सर्व लोकांनी मला सोडून दिलं आहे. फुगल आणि हर्मगनेस हेही त्यांच्यापैकी आहेत. १६ अनेसिफरच्या घराण्यावर+ प्रभूने दया दाखवावी, अशी मी प्रार्थना करतो. कारण त्याने कित्येकदा मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्या बेड्यांची त्याला लाज वाटली नाही. १७ उलट, तो रोममध्ये असताना त्याने मला शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि शेवटी मला शोधून काढलं. १८ प्रभू यहोवा* न्यायाच्या दिवशी त्याला दया दाखवो. इफिसमध्ये त्याने माझ्यासाठी कायकाय केलं, हे तुला चांगलं माहीत आहे.
२ त्यामुळे माझ्या मुला,+ ख्रिस्त येशूद्वारे मिळणाऱ्या अपार कृपेतून सामर्थ्य मिळवत राहा. २ आणि ज्या गोष्टी तू माझ्याकडून ऐकल्या आणि ज्यांना पुष्कळ साक्षीदारांनीही दुजोरा दिला,+ त्या गोष्टी विश्वासू पुरुषांच्या स्वाधीन कर; म्हणजे, इतरांना शिकवण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेशी पात्रता असेल. ३ ख्रिस्त येशूचा एकनिष्ठ सैनिक+ या नात्याने संकटं सोसायला तयार राहा.+ ४ कोणताही सैनिक जगाच्या व्यवहारांत* स्वतःला गुरफटून घेत नाही. हे यासाठी, की ज्याने त्याला सैन्यात भरती केलं त्याला खूश करता यावं. ५ तसंच, खेळांत भाग घेणाराही जर खेळाच्या नियमांप्रमाणे खेळला नाही, तर त्याला मुकुट दिला जात नाही.+ ६ पिकाचा पहिला वाटा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यालाच मिळाला पाहिजे. ७ मी जे काही सांगत आहे त्यावर सतत विचार कर. प्रभू तुला सगळ्या गोष्टींबद्दलची समज देईल.
८ येशू ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं+ आणि तो दावीदचा वंशज* होता+ ही गोष्ट आठवणीत ठेव; याबद्दलच मी आनंदाचा संदेश घोषित करतो.+ ९ आणि त्यासाठीच मी एका अपराध्याप्रमाणे दुःख सोसत आहे आणि कैदेत आहे.+ पण, देवाचं वचन मात्र बंधनात नाही.+ १० म्हणूनच, निवडलेल्या जनांसाठी मी सर्वकाही सोसत आहे.+ म्हणजे त्यांनाही सर्वकाळाच्या गौरवासोबत ख्रिस्त येशूद्वारे तारण मिळेल.* ११ ही गोष्ट भरवशालायक आहे: आपण जर त्याच्यासोबत मेलो, तर त्याच्यासोबत जगूसुद्धा;+ १२ आपण जर सहन करत राहिलो, तर त्याच्यासोबत राज्यही करू;+ आपण जर त्याला नाकारलं, तर तोही आपल्याला नाकारेल.+ १३ आपण अविश्वासूपणे वागलो, तरी तो विश्वासू राहतो, कारण त्याच्या स्वभावाच्या विरोधात वागणं त्याला शक्य नाही.
१४ देवासमोर त्यांना या गोष्टींची आठवण करून देत जा आणि शब्दांवरून भांडण न करण्याची सूचना देत राहा.* कारण त्याने काहीच फायदा होत नाही, उलट ऐकणाऱ्यांचं नुकसानच होतं.* १५ देवाच्या पसंतीला उतरलेला; लाज वाटायचं कोणतंही कारण नसलेला; आणि सत्याच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग करणारा कामकरी बनायचा आटोकाट प्रयत्न कर.+ १६ पण, पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्या पोकळ भाषणांपासून दूर राहा,+ कारण त्यांमुळे लोक आणखी मोठ्या प्रमाणावर देवाचा अनादर करतील. १७ आणि त्यांची शिकवण, शरीराला सडवत जाणाऱ्या जखमेप्रमाणे* पसरेल. हुमनाय आणि फिलेत हे अशांपैकीच आहेत.+ १८ ही माणसं सत्यापासून भरकटली आहेत, कारण पुनरुत्थान* आधीच झालं आहे असं ते म्हणतात,+ आणि ते काही जणांचा विश्वास नष्ट करत आहेत. १९ असं असलं तरी, देवाचा भक्कम पाया मात्र स्थिर राहतो आणि त्यावर असा शिक्का आहे: “जे आपले आहेत त्यांना यहोवा* ओळखतो,”+ आणि “जो कोणी यहोवाचं* नाव घेऊन त्याला हाक मारतो+ त्याने अनीतीपासून दूर राहावं.”
२० एका मोठ्या घरात फक्त सोन्याचांदीचीच नाही, तर लाकडाची आणि मातीचीही भांडी असतात. तसंच, काही भांडी आदरणीय कामासाठी, तर काही हलक्या दर्जाच्या कामासाठी असतात. २१ जो स्वतःला या दुसऱ्या प्रकारच्या भांड्यांपासून दूर ठेवतो, तो आदरणीय कामासाठी असलेल्या भांड्यासारखा म्हणजे पवित्र केलेल्या, आपल्या मालकासाठी उपयोगी असलेल्या आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेल्या भांड्यासारखा बनेल. २२ म्हणून, तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि त्याऐवजी शुद्ध मनाने प्रभूला हाक मारणाऱ्यांसोबत न्याय, विश्वास, प्रेम आणि शांती हे गुण उत्पन्न करायचा प्रयत्न कर.
२३ तसंच, मूर्खपणाच्या आणि व्यर्थ वादविवादांपासून दूर राहा,+ कारण यांमुळे भांडणं होतात. २४ प्रभूच्या दासाला भांडण करायची गरज नाही, तर तो सगळ्यांशी सौम्यतेने* वागणारा,+ शिकवण्याची योग्यता असलेला, तसंच इतरांनी त्याचं वाईट केलं, तरी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असावा.+ २५ याशिवाय, ज्यांची योग्य मनोवृत्ती नाही अशांना त्याने सौम्यतेने शिकवावं.+ म्हणजे कदाचित देव त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळवण्यासाठी पश्चात्ताप* करायची संधी देईल.+ २६ आणि कदाचित ते भानावर येतील आणि सैतानाने* आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी जिवंत धरलं आहे,+ याची जाणीव होऊन ते त्याच्या पाशातून सुटतील.
३ पण, शेवटच्या दिवसांत+ खूप कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. २ कारण, लोक फक्त स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, निंदा करणारे, आईवडिलांचं न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, ३ माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले, ४ विश्वासघात करणारे, अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची आवड असलेले, ५ देवाची भक्ती करायचा फक्त दिखावा करून आपल्या जीवनावर तिचा प्रभाव न होऊ देणारे*+ असे असतील. त्यांच्यापासून दूर राहा. ६ अशा लोकांमधूनच काही माणसं चलाखीने घरांमध्ये शिरून, पापांत बुडालेल्या आणि निरनिराळ्या वासनांच्या आहारी गेलेल्या कमजोर मनाच्या स्त्रियांना आपलं गुलाम बनवतील. ७ या स्त्रिया सतत शिकत असूनही त्यांना सत्य कधीच पूर्णपणे समजत नाही. *
८ ज्याप्रमाणे यान्नेस आणि यांब्रेस यांनी मोशेचा विरोध केला होता, त्याचप्रमाणे ही माणसंसुद्धा सत्याचा विरोध करत राहतात. त्यांची मनं पूर्णपणे भ्रष्ट झाली असून ते विश्वासाच्या बाबतीत नाकारलेले असे आहेत. ९ तरीसुद्धा ते याहून पुढे जाऊ शकत नाहीत. कारण जसा त्या दोघा पुरुषांचा मूर्खपणा सगळ्यांना दिसून आला, तसाच यांचाही मूर्खपणा सगळ्यांना अगदी स्पष्टपणे दिसून येईल.+ १० पण, तू मात्र माझी शिकवण, माझं जीवन, माझं ध्येय, माझा विश्वास, माझी सहनशीलता, माझं प्रेम आणि माझा धीर यांचं जवळून अनुकरण केलं आहेस.+ ११ तसंच, अंत्युखिया,+ इकुन्या+ आणि लुस्त्र+ इथे माझा किती छळ झाला आणि मला किती दुःखं सोसावी लागली, हेही तुला माहीत आहे. ही सगळी संकटं मी धीराने सोसली आणि त्या सगळ्यांतून प्रभूने मला सोडवलं.+ १२ खरंतर, ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्या सगळ्यांचा छळ केला जाईल.+ १३ पण, दुष्ट आणि फसवी माणसं दिवसेंदिवस आणखी वाईट होतील; ती स्वतः बहकतील आणि दुसऱ्यांनाही बहकवतील.+
१४ तू मात्र, ज्या गोष्टी शिकलास आणि ज्यांबद्दल तुला खातरी पटवून देण्यात आली, त्यांचं पालन करत राहा.+ कारण, या गोष्टी तू कोणाकडून शिकलास हे तुला माहीत आहे. १५ आणि बालपणापासून+ तुला पवित्र लिखाणांचं ज्ञान आहे,+ याचीही तुला जाणीव आहे. या गोष्टी, ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाद्वारे तुला तारणासाठी सुज्ञ बनवू शकतात.+ १६ संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं असून+ ते शिकवण्यासाठी,+ ताडन देण्यासाठी, सुधारणूक करण्यासाठी,* न्यायनीतीप्रमाणे शिस्त लावण्यासाठी उपयोगी आहे.+ १७ यामुळे देवाचा माणूस सगळ्या बाबतींत कुशल आणि प्रत्येक चांगलं काम करायला पूर्णपणे सज्ज होतो.
४ मी तुला देवासमोर आणि जो प्रकट होऊन+ आपल्या राज्याद्वारे+ जिवंतांचा आणि मेलेल्यांचा+ न्याय करणार आहे,+ त्या ख्रिस्त येशूसमोर असा आदेश देतो: २ वचनाची घोषणा कर;+ काळाची गरज ओळखून चांगल्या आणि वाईट दोन्ही काळांत आवेशाने हे काम कर; पूर्ण सहनशीलतेने आणि कुशलतेने शिकवत असताना+ चूक करणाऱ्याचं ताडन कर,+ त्याला ताकीद आणि प्रोत्साहन दे. ३ कारण असा एक काळ येईल, जेव्हा ते फायदेकारक* शिक्षण नाकारतील.+ उलट, त्यांना ऐकायच्या आहेत अशाच गोष्टी ऐकण्यासाठी,* ते स्वतःच्या इच्छांप्रमाणे आपल्याभोवती शिक्षक गोळा करतील.+ ४ ते सत्याकडे पाठ फिरवतील आणि काल्पनिक कहाण्यांकडे लक्ष देतील. ५ तू मात्र सगळ्या बाबतींत सावध राहा, संकटात धीर धर,+ प्रचारकाचं काम कर* आणि आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण कर.+
६ कारण मला पेयार्पणासारखं ओतलं जात आहे+ आणि माझ्या सुटकेची वेळ अगदी जवळ आली आहे.+ ७ मी चांगल्या उद्देशासाठी असलेली लढाई लढलो आहे;+ मी धाव पूर्ण केली आहे+ आणि विश्वास टिकवून ठेवला आहे. ८ आता यापुढे माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट राखून ठेवण्यात आला आहे;+ प्रभू म्हणजेच नीतिमान न्यायाधीश+ त्या दिवशी तो मुकुट मला बक्षीस म्हणून देईल;+ आणि फक्त मलाच नाही, तर जे आतुरतेने त्याच्या प्रकट होण्याची वाट पाहतात त्या सगळ्यांना तो देईल.
९ माझ्याकडे लवकरात लवकर यायचा प्रयत्न कर. १० कारण देमासला+ सध्याच्या जगाच्या व्यवस्थेची* ओढ असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकाला गेला आहे. क्रेस्केस हा गलतीयाला आणि तीत दालमतियाला गेला आहे. ११ फक्त लूक माझ्याबरोबर आहे. येताना मार्कला आपल्यासोबत घेऊन ये, कारण सेवाकार्यात मला त्याची खूप मदत होईल. १२ पण तुखिकला+ मी इफिसला पाठवून दिलं आहे. १३ तू येशील तेव्हा, मी त्रोवसमध्ये कार्प याच्याजवळ ठेवलेला माझा झगा घेऊन ये. तसंच, गुंडाळ्या आणि खासकरून चर्मपत्रंही* घेऊन ये.
१४ तांब्याची कामं करणारा आलेक्सांद्र याने मला खूप त्रास दिला आहे. यहोवा* त्याच्या कृत्यांप्रमाणे त्याची परतफेड करेल.+ १५ तूही त्याच्यापासून सांभाळून राहा, कारण त्याने आपल्या संदेशाचा खूप विरोध केला आहे.
१६ माझ्या पहिल्या सुनावणीच्या वेळी, माझी बाजू घेण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. उलट, सगळे मला सोडून गेले; मी प्रार्थना करतो, की याबद्दल देवाने त्यांना जबाबदार धरू नये. १७ पण, प्रभू माझ्याजवळ उभा राहिला आणि माझ्याद्वारे संदेशाचा पूर्णपणे प्रचार केला जावा आणि सर्व राष्ट्रांना तो ऐकायला मिळावा,+ म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि सिंहाच्या जबड्यातून माझी सुटका केली.+ १८ प्रभू प्रत्येक दुष्ट कार्यापासून माझी सुटका करेल आणि आपल्या स्वर्गीय राज्यासाठी माझा बचाव करेल.+ त्यालाच सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन.
१९ प्रिस्का आणि अक्विल्ला,+ तसंच अनेसिफरचं घराणं+ यांना माझा नमस्कार सांग.
२० एरास्त+ करिंथमध्येच राहिला, पण, त्रफिम+ आजारी असल्यामुळे मी त्याला मिलेतामध्ये ठेवून आलो. २१ हिवाळ्याच्या आधी इथे यायचा होईल तितका प्रयत्न कर.
यूबूल आणि पुदेस; लीन आणि क्लौदिया तसंच, सगळे बांधव तुला नमस्कार सांगतात.
२२ तू दाखवत असलेल्या योग्य मनोवृत्तीमुळे प्रभू तुझ्यासोबत असो. त्याची अपार कृपा तुझ्यावर असो.
किंवा “प्रामाणिक.”
किंवा “मनोवृत्ती.” ग्रीक भाषेत न्यूमा. शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “मनाचा निरोगीपणा.”
किंवा “आपलं तारण केलं.”
किंवा “उपयोगी.”
किंवा “रूपरेषेला.”
अति. क५ पाहा.
किंवा कदाचित, “दररोजच्या कारभारांत.”
शब्दशः “दावीदचं बीज.”
किंवा “वाचवलं जावं.”
शब्दशः “अगदी पूर्णपणे साक्ष दे.”
किंवा “ऐकणाऱ्यांचा नाशच होतो.”
किंवा “गँगरीनप्रमाणे.”
शब्दार्थसूची पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “विचारशीलपणे.”
किंवा “मनाचं परिवर्तन.”
शब्दशः “दियाबलाने.” म्हणजे, निंदा करणारा.
शब्दशः “तिची ताकद नाकारणारे.”
किंवा “सत्याचं अचूक ज्ञान कधीच प्राप्त होत नाही.”
किंवा “ताळ्यावर आणण्यासाठी.”
किंवा “उपयोगी.”
किंवा “आपल्या कानांना गुदगुल्या करून घेण्यासाठी.”
किंवा “आनंदाचा संदेश घोषित करत राहा.”
किंवा “सध्याच्या काळाची.” शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, चामड्याच्या गुंडाळ्या.
अति. क५ पाहा.