तीमथ्य याला पहिलं पत्र
१ आपल्या तारणकर्त्या देवाच्या आणि आपली आशा असलेल्या ख्रिस्त येशूच्या आज्ञेप्रमाणे, ख्रिस्त येशूचा एक प्रेषित, पौल याच्याकडून,+ २ विश्वासात माझा निष्ठावान मुलगा+ असलेल्या तीमथ्यला:*+
देव जो आपला पिता आणि ख्रिस्त येशू जो आपला प्रभू यांच्याकडून तुला अपार कृपा, दया आणि शांती मिळो.
३ मी मासेदोनियाला जायला निघालो होतो, तेव्हा मी तुला इफिसमध्ये राहायचं प्रोत्साहन दिलं होतं. आता मी तुला सांगतो, की तिथे असलेल्या काही जणांना, वेगळे सिद्धान्त न शिकवण्याची, ४ तसंच, काल्पनिक कथांकडे आणि वंशावळ्यांकडे लक्ष न देण्याची+ तू आज्ञा दे. कारण अशा गोष्टींमुळे उपयोगाचं असं काहीच साध्य होत नाही.+ आणि विश्वास वाढू शकेल अशी कोणतीही गोष्ट देवाकडून मिळण्याऐवजी, फक्त शंकाकुशंका उत्पन्न होतात. ५ या सूचना* देण्याचा उद्देश इतकाच आहे, की आपण शुद्ध मनाने, चांगल्या विवेकाने आणि निष्कपट विश्वासाने+ उत्पन्न होणारं प्रेम व्यक्त करावं.+ ६ या गोष्टींपासून भरकटून काही जण व्यर्थ गोष्टींवर चर्चा करू लागले आहेत.+ ७ त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक+ व्हायची इच्छा आहे, पण ते ज्या गोष्टी बोलतात किंवा ज्या गोष्टींवर इतकं अडून बसतात, त्या त्यांनाच समजत नाहीत.
८ योग्य प्रकारे* पालन केलं, तर नियमशास्त्र चांगलंच आहे, हे आपल्याला माहीत आहे. ९ शिवाय, नियमशास्त्र हे नीतिमान माणसासाठी देण्यात आलेलं नाही. तर, जे अनीतिमान,+ बंडखोर, अधार्मिक, पापी, बेइमान,* अपवित्र, आईवडिलांची आणि इतरांची हत्या करणारे, १० अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे, समलैंगिक कृत्यं करणारे पुरुष,* अपहरण करणारे, खोटं बोलणारे, खोटी शपथ घेणारे आणि फायदेकारक* शिकवणीच्या+ विरोधात असलेली दुसरी कोणतीही गोष्ट करणारे आहेत, त्यांच्यासाठी नियमशास्त्र देण्यात आलं आहे. ११ ही शिकवण, आनंदी देवाने मला सोपवलेल्या त्याच्या गौरवी आनंदाच्या संदेशाप्रमाणे आहे.+
१२ मला सामर्थ्य देणारा आपला प्रभू ख्रिस्त येशू याचा मी आभारी आहे. कारण त्याने मला विश्वासू समजून माझ्यावर एक सेवा सोपवली आहे.+ १३ खरंतर, मी पूर्वी देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट माणूस होतो.+ तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली कारण मी अज्ञानामुळे आणि विश्वास नसल्यामुळे तसं वागलो. १४ पण, आपल्या प्रभूने मला भरपूर अपार कृपा दाखवली आणि मला ख्रिस्त येशूकडून विश्वास आणि प्रेम मिळालं. १५ ही गोष्ट विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारण्यालायक आहे, की ख्रिस्त येशू पापी लोकांना वाचवायला* जगात आला.+ त्यांच्यापैकी मी सर्वात मोठा पापी आहे.+ १६ तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली. हे यासाठी की मी जो सर्वात मोठा पापी, त्या माझ्याद्वारे ख्रिस्त येशूने त्याची सगळी सहनशीलता दाखवावी. तसंच, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी जे त्याच्यावर विश्वास ठेवतील,+ अशा सर्वांसमोर माझं उदाहरण ठेवावं.
१७ सर्वकाळाचा राजा,+ अविनाशी,+ अदृश्य,+ जो एकच देव+ त्याला सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव मिळो. आमेन.
१८ तीमथ्य, माझ्या मुला, तुझ्याबद्दल करण्यात आलेल्या भविष्यवाण्यांप्रमाणे मी या सूचना* तुला सोपवून देत आहे. म्हणजे तुला एका चांगल्या उद्देशासाठी असलेली ही लढाई लढत राहायला मदत मिळेल.+ १९ तसंच, आपला विश्वास आणि चांगला विवेक टिकवून ठेव.+ कारण काहींनी तो नाकारल्यामुळे त्यांच्या विश्वासाचं जहाज फुटून उद्ध्वस्त झालं आहे. २० हुमनाय+ आणि आलेक्सांद्र हे त्यांच्यापैकी आहेत आणि मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केलं आहे.+ हे ताडन मिळाल्यामुळे ते देवाची निंदा न करण्याचा धडा शिकतील.
२ तर सगळ्यात आधी मी अशी विनंती करतो, की सर्व प्रकारच्या माणसांसाठी याचना, प्रार्थना, इतरांच्या वतीने विनवण्या आणि उपकारस्तुतीच्या प्रार्थना केल्या जाव्यात. २ राजे आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी यांच्यासाठीही प्रार्थना केल्या जाव्यात.+ हे यासाठी, की आपल्याला देवाला पूर्णपणे विश्वासू राहून, गांभीर्याने आणि शांतपणे जीवन जगता यावं.+ ३ आपला तारणकर्ता देव याच्या दृष्टीने हे चांगलं आणि योग्य आहे.+ ४ त्याची अशी इच्छा आहे, की सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं*+ आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं. ५ कारण, एकच देव+ आहे. तसंच, देवामध्ये आणि मानवांमध्ये+ एकच मध्यस्थ+ आहे, म्हणजे एक मानव, अर्थात ख्रिस्त येशू.+ ६ त्याने सर्वांच्या* मोबदल्यात योग्य अशी खंडणी देण्यासाठी स्वतःला अर्पण केलं.+ या गोष्टीबद्दल ठरवलेली वेळ आल्यावर साक्ष दिली जाईल. ७ हीच साक्ष देण्यासाठी,+ मला घोषणा करणारा आणि प्रेषित,+ म्हणजे विश्वास आणि सत्य यांबद्दल सांगण्यासाठी विदेश्यांचा शिक्षक+ म्हणून नेमण्यात आलं आहे. मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही.
८ म्हणून माझी अशी इच्छा आहे, की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून,+ शुद्ध मनाने प्रार्थना करत राहावी.*+ ९ त्याच प्रकारे, स्त्रियांनी योग्य* पेहराव करून, शालीनतेने आणि विचारशीलपणे* स्वतःला सजवावं. त्यांनी खास प्रकारच्या केशरचना करून,* तसंच सोनं, मोती किंवा महागडे कपडे घालून नाही,+ १० तर स्वतःला देवाच्या उपासक म्हणवणाऱ्या स्त्रियांना शोभेल अशा प्रकारे,+ म्हणजे चांगली कामं करून आपलं सौंदर्य वाढवावं.
११ स्त्रीने पूर्ण अधीनतेने शांत* राहून शिकावं.+ १२ मी स्त्रीला शिकवायची किंवा पुरुषावर अधिकार चालवायची परवानगी देत नाही. तिने शांत* राहावं.+ १३ कारण आधी आदामला आणि मग हव्वाला बनवण्यात आलं.+ १४ तसंच, आदाम फसवला गेला नाही, तर स्त्री ही पूर्णपणे फसली+ आणि अपराधी बनली. १५ तरीसुद्धा, मुलांना जन्म देण्याद्वारे ती सुरक्षित राहील.+ पण, यासाठी तिने* विचारशीलपणा,*+ तसंच विश्वास, प्रेम आणि पवित्रता यांत टिकून राहणं गरजेचं आहे.
३ जर एखादा माणूस मंडळीत देखरेख करायला पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करत असेल,+ तर तो चांगल्या कामाची इच्छा बाळगतो. हे वाक्य भरवशालायक आहे. २ त्यामुळे देखरेख करणारा हा, ज्याच्याकडे बोट दाखवता येणार नाही असा असावा; तो एकाच स्त्रीचा पती, संयमी, समंजस,*+ सुव्यवस्थित, पाहुणचार करण्याची आवड असलेला,+ शिकवण्याची योग्यता असलेला असावा.+ ३ तो दारुडा,+ किंवा मारामारी करणारा* नसावा, तर समजूतदार असावा;+ तो भांडखोर+ आणि पैशाचा लोभी नसावा.+ ४ तो आपल्या कुटुंबाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारा* आणि आपल्या मुलांना पूर्ण गांभीर्याने अधीनतेत ठेवणारा असावा+ ५ (कारण जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाचं नेतृत्व करता* येत नसेल, तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?), ६ तो विश्वासात नवीन नसावा,*+ नाहीतर तो गर्वाने फुगून, सैतानाला* देण्यात आलेला न्यायदंड स्वतःवर ओढवून घेईल. ७ तसंच, त्याची बदनामी* होऊ नये आणि तो सैतानाच्या पाशाला बळी पडू नये, म्हणून बाहेरच्या लोकांमध्येही त्याचं चांगलं नाव असावं.*+
८ त्याच प्रकारे, सहायक सेवकही गंभीर असावेत. ते कपटीपणे बोलणारे,* खूप जास्त पिणारे, बेइमानीच्या कमाईचा लोभ धरणारे असू नयेत.+ ९ शुद्ध विवेक टिकवून ठेवण्यासोबतच, ते पवित्र रहस्याला म्हणजेच विश्वासाला धरून राहणारे असावेत.+
१० तसंच, आधी त्यांच्या योग्यतेची* पारख केली जावी आणि मग निर्दोष आढळले,+ तर त्यांनी सेवक म्हणून कार्य करावं.
११ त्याच प्रकारे स्त्रियांनी गंभीर असावं. त्या दुसऱ्यांची बदनामी करणाऱ्या असू नयेत,+ तर संयमी आणि सर्व बाबतींत विश्वासू असाव्यात.+
१२ सहायक सेवक एकाच स्त्रीचा पती आणि आपल्या मुलांचं आणि कुटुंबाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारा असावा. १३ कारण जे पुरुष चांगल्या प्रकारे सेवा करतात, ते चांगलं नाव कमावतात आणि ख्रिस्त येशूवर असलेल्या विश्वासाबद्दल अगदी मोकळेपणाने बोलू शकतात.
१४ मला आशा आहे, की मी लवकरच तुझ्याकडे येईन. तरीसुद्धा, मी तुला या गोष्टी लिहीत आहे, १५ कारण जरी मला उशीर लागला, तरी देवाच्या घराण्यात,+ म्हणजे सत्याचा स्तंभ आणि आधार असलेल्या जिवंत देवाच्या मंडळीत तू कसं वागलं पाहिजे हे तुला माहीत असावं. १६ खरोखर, देवाच्या भक्तीचं पवित्र रहस्य नक्कीच महान आहे: ‘त्याला हाडामांसाच्या शरीरात प्रकट करण्यात आलं,+ स्वर्गीय शरीरात नीतिमान ठरवण्यात आलं,+ तो स्वर्गदूतांसमोर प्रकट झाला,+ विदेश्यांमध्ये त्याच्याबद्दल घोषणा करण्यात आली,+ जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला+ आणि त्याला गौरवात वर घेण्यात आलं.’
४ पण, प्रेरित वचन स्पष्टपणे सांगतं की भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा काही जण दिशाभूल करणाऱ्या प्रेरित संदेशांकडे+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या* शिकवणींकडे लक्ष देऊन विश्वास सोडून देतील. २ कारण ते खोटं बोलणाऱ्या अशा माणसांच्या ढोंगीपणाला बळी पडतील,+ ज्यांचा विवेक जणू तापलेल्या लोखंडाने डाग दिल्याप्रमाणे सुन्न झाला आहे. ३ ते लग्न करण्याची मनाई करतात+ आणि काही खाद्यपदार्थ न खाण्याची आज्ञा देतात.+ पण विश्वास ठेवणाऱ्यांनी+ आणि सत्याचं अचूक ज्ञान असलेल्यांनी हे खाद्यपदार्थ उपकारस्तुती करून खावेत, म्हणून स्वतः देवाने ते निर्माण केले आहेत.+ ४ कारण उपकारस्तुती करून स्वीकारली, तर देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही चांगलीच आहे.+ त्यामुळे कोणतीही गोष्ट नाकारली जाऊ नये.+ ५ कारण देवाच्या वचनाने आणि तिच्यावर केलेल्या प्रार्थनेने ती पवित्र होते.
६ बांधवांना हा सल्ला दिलास, तर तू ख्रिस्त येशूचा एक चांगला सेवक ठरशील. असा सेवक, ज्याचं विश्वासाच्या वचनांनी आणि तू काटेकोरपणे पाळत असलेल्या उत्तम शिकवणीने पोषण झालं आहे.+ ७ पण, म्हाताऱ्या बायका सांगतात तशा काल्पनिक, आणि देवाचा अनादर करणाऱ्या कथा कहाण्यांपासून दूर राहा.+ उलट, देवाच्या भक्तीचं ध्येय ठेवून त्याप्रमाणे स्वतःला प्रशिक्षित कर. ८ शारीरिक प्रशिक्षण* हे फक्त काही प्रमाणात उपयोगी आहे, पण देवाची भक्ती तर सर्व गोष्टींसाठी फायदेकारक आहे. कारण ती आताच्या जीवनाचं आणि येणाऱ्या जीवनाचंही अभिवचन देते.+ ९ हे वाक्य विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारण्यालायक आहे. १० म्हणूनच आपण मेहनत आणि परिश्रम करतो.+ कारण आपण एका जिवंत देवावर आशा ठेवली आहे. तो सर्व प्रकारच्या लोकांचा,+ आणि खासकरून विश्वासू जनांचा तारणकर्ता आहे.+
११ त्यांना या आज्ञा देऊन शिकवत राहा. १२ तुझ्या तरुण वयामुळे कोणीही तुला तुच्छ लेखणार नाही याची काळजी घे. त्याऐवजी, बोलण्यात आणि वागण्यात, तसंच प्रेम, विश्वास आणि शुद्धता या बाबतींत विश्वासू जनांसमोर एक चांगलं उदाहरण ठेव. १३ मी येईपर्यंत, सार्वजनिक वाचन,+ मार्गदर्शन* देणं आणि शिकवणं यांत स्वतःला वाहून घे. १४ वडीलवर्गाने तुझ्यावर हात ठेवले, तेव्हा एका भविष्यवाणीद्वारे जे दान तुला देण्यात आलं,+ त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. १५ या गोष्टींबद्दल खोलवर विचार* करत राहा; त्यांत अगदी गढून जा, म्हणजे तुझी प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल. १६ स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.+ या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असं केल्याने तू स्वतःला आणि जे तुझं ऐकतात त्यांनाही वाचवशील.*+
५ वयस्कर माणसांशी कठोर शब्दांत बोलू नकोस.+ उलट, त्यांना आपल्या वडिलांसारखं समजून प्रेमाने सल्ला दे. तसंच, तरुणांना भाऊ समजून, २ वयस्कर स्त्रियांना आई समजून आणि तरुण स्त्रियांना अगदी शुद्ध मनाने आपल्या बहिणी समजून सल्ला दे.
३ ज्या विधवा खरोखरच विधवा आहेत,* त्यांच्याकडे लक्ष दे.*+ ४ पण जर एखाद्या विधवेला मुलं किंवा नातवंडं असतील, तर त्यांनी आधी आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन आपण देवाची भक्ती करतो हे दाखवावं.+ त्यांनी आपल्या आईवडिलांच्या आणि आजीआजोबांच्या उपकारांची परतफेड करायला शिकावं,+ कारण देवाच्या दृष्टीने हे योग्य आहे.+ ५ जी खरोखरच विधवा असून पूर्णपणे निराधार असते, ती देवावर आशा ठेवते+ आणि रात्रंदिवस त्याला प्रार्थना आणि याचना करत राहते.+ ६ पण जी ऐशआरामाच्या मागे लागते ती जिवंत असूनही मेलेली आहे. ७ त्यामुळे, कोणी त्यांच्याकडे बोट दाखवू नये म्हणून त्यांना या सूचना* देत जा. ८ जो स्वतःच्या माणसांच्या, आणि विशेषतः आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा पुरवत नाही, त्याने विश्वास नाकारला आहे. तो विश्वास नसलेल्या माणसापेक्षाही वाईट आहे.+
९ मदतीसाठी असलेल्या यादीत अशाच विधवेचा समावेश करावा, जी कमीतकमी ६० वर्षांची आहे, जी एकाच पतीची पत्नी होती, १० जी चांगली कामं केल्याबद्दल नावाजलेली आहे,+ जिने मुलांचं संगोपन केलं असेल,+ जिने पाहुणचार केला असेल,+ जिने पवित्र जनांचे पाय धुतले असतील,+ जिने दुःखीकष्टी लोकांना मदत केली असेल,+ आणि जिने प्रत्येक चांगल्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं असेल.
११ पण, तरुण विधवांचा यादीत समावेश करू नकोस. कारण जेव्हा त्यांच्या लैंगिक इच्छा त्यांच्या आणि ख्रिस्ताच्या आड येतात, तेव्हा त्यांना लग्न करावंसं वाटू लागतं. १२ आणि सुरुवातीला घेतलेल्या निर्णयाच्या* विरोधात गेल्यामुळे त्या स्वतःवर न्यायदंड ओढवून घेतील. १३ त्याच वेळी, त्यांना रिकामेपणाची आणि घरोघरी फिरण्याची सवय लागते. रिकामेपणासोबतच त्यांना गप्पा मारण्याचीही सवय लागते आणि त्या दुसऱ्यांच्या कामांत लुडबुड करू लागतात.+ तसंच, ज्यांबद्दल त्यांनी बोलायला नको अशा गोष्टींबद्दल त्या बोलू लागतात. १४ म्हणून, माझी अशी इच्छा आहे की तरुण विधवांनी लग्न करावं,+ मुलांना जन्म द्यावा,+ आपलं घरदार सांभाळावं आणि विरोधकांना टीका करायची संधी देऊ नये. १५ काही तर आधीच भरकटून सैतानाच्या मागे गेल्या आहेत. १६ जर विश्वासात असलेल्या एखाद्या स्त्रीच्या नातेवाइकांमध्ये विधवा असतील, तर तिने या विधवांना मदत करावी. यामुळे, मंडळीवर भार पडणार नाही आणि मंडळी अशा विधवांना मदत करू शकेल, ज्या खरोखरच विधवा आहेत.*+
१७ जे वडील मंडळीचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात,+ खासकरून जे बोलण्याच्या आणि शिकवण्याच्या बाबतीत मेहनत घेतात,+ त्यांना दुप्पट मान द्यायच्या योग्य समजलं जावं.+ १८ कारण शास्त्रात असं म्हटलं आहे, “धान्याची मळणी करणाऱ्या बैलाचं तोंड बांधू नका,”+ तसंच, “कामकऱ्याला त्याची मजुरी मिळण्याचा हक्क आहे.”+ १९ दोन किंवा तीन साक्षीदारांनी पुरावा दिल्याशिवाय कोणत्याही वयस्कर माणसाविरुद्ध* केलेला आरोप खरा मानू नकोस.+ २० जे पाप करत राहतात+ त्यांची सर्वांच्या देखत कानउघाडणी कर,+ म्हणजे बाकीच्या सगळ्यांना इशारा मिळेल.* २१ मी देवासमोर, ख्रिस्त येशूसमोर आणि निवडलेल्या स्वर्गदूतांसमोर तुला ही आज्ञा देतो, की तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता आणि कोणताही पक्षपात न करता या सूचनांचं पालन कर.+
२२ कोणत्याही माणसावर आपले हात ठेवायची घाई करू नकोस.*+ तसंच, इतरांच्या पापांत भागीदार होऊ नकोस; स्वतःला शुद्ध ठेव.
२३ यापुढे पाणी पिऊ नकोस,* तर आपल्या पोटाच्या दुखण्यासाठी आणि तू वारंवार आजारी पडत असल्यामुळे, थोडा द्राक्षारस घेत जा.
२४ काही माणसांची पापं जाहीर होतात आणि त्यांचा लगेच न्याय होतो, तर इतर माणसांची पापं नंतर उघड होतात.+ २५ त्याच प्रकारे, चांगली कामंसुद्धा जाहीर होतात+ आणि जी होत नाहीत, तीसुद्धा फार काळ लपून राहत नाहीत.+
६ जे दास* आहेत त्यांनी आपल्या मालकांचा मनापासून आदर करावा,+ म्हणजे देवाच्या नावाची आणि त्याच्या शिकवणीची कधीच बदनामी होणार नाही.+ २ तसंच, ज्यांचे मालक विश्वासात आहेत त्यांनी ते फक्त आपले भाऊ आहेत म्हणून त्यांचा अनादर करू नये. याउलट, त्यांनी आणखीनच आनंदाने सेवा करावी, कारण ज्यांना त्यांच्या चांगल्या सेवेचा फायदा होतो ते मुळात विश्वासात असलेले आणि प्रिय आहेत.
या गोष्टी त्यांना शिकवत जा आणि त्यांचं पालन करण्याचा त्यांना सल्ला देत राहा. ३ जर कोणी वेगळे सिद्धान्त शिकवत असेल आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या फायदेकारक* शिकवणीशी+ किंवा देवाच्या भक्तीप्रमाणे असलेल्या शिकवणीशी+ सहमत नसेल, ४ तर तो गर्वाने फुगलेला आहे आणि त्याला काहीच समजत नाही.+ त्याला वाद घालण्याचं आणि शब्दांवरून भांडणं करण्याचं वेड आहे.*+ अशा गोष्टींमुळे ईर्ष्या, भांडणतंटा, निंदा* आणि दुष्ट संशय निर्माण होतात. ५ अशा माणसांची मनं दूषित झाल्यामुळे+ आणि ते सत्यापासून दुरावल्यामुळे त्यांचे छोट्याछोट्या गोष्टींवरून सतत वादविवाद होत राहतात. देवाची भक्ती ही फायदा मिळवण्याचं साधन आहे असं त्यांना वाटतं.+ ६ अर्थात, समाधानी राहून देवाची भक्ती करणं नक्कीच खूप फायदेकारक आहे.+ ७ कारण आपण जगात काहीच आणलेलं नाही, आणि आपण काही घेऊनही जाऊ शकत नाही.+ ८ त्यामुळे, आपल्याजवळ खायला अन्न आणि घालायला कपडे* असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.+
९ पण ज्यांना कसंही करून श्रीमंत व्हायचं आहे, ते मोहात आणि पाशात सापडतात,+ आणि बऱ्याच मूर्खपणाच्या आणि घातक इच्छांना बळी पडतात. आणि त्या त्यांना सर्वनाशाच्या दरीत लोटून देतात.+ १० कारण पैशाचं प्रेम हे सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे आणि या प्रेमाच्या नादी लागून काही जण विश्वासापासून भरकटले आहेत आणि त्यांनी स्वतःला पुष्कळ दुःखांनी भोसकून घेतलं आहे.+
११ पण देवाच्या सेवका, तू अशा गोष्टींपासून दूर पळ! त्याऐवजी न्याय, देवाची भक्ती, विश्वास, प्रेम, धीर आणि सौम्यता हे गुण उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत राहा.+ १२ विश्वासाची लढाई चांगल्या प्रकारे लढ. ज्यासाठी तुला बोलावण्यात आलं होतं आणि ज्याबद्दल तू पुष्कळ साक्षीदारांसमोर अगदी चांगल्या प्रकारे जाहीर कबुली दिली होती, त्या सर्वकाळाच्या जीवनाला घट्ट धरून ठेव.
१३ जो सर्वांना जिवंत ठेवतो त्या देवाला, आणि ज्याने पंतय पिलातपुढे चांगल्या प्रकारे जाहीर कबुली दिली,+ त्या ख्रिस्त येशूला समोर ठेवून मी तुला आदेश देतो, की १४ आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत, मी दिलेल्या आज्ञेचं निष्कलंक आणि निर्दोष राहून पालन करत राहा.+ १५ जो आशीर्वादित आणि एकमेव सामर्थ्यशाली अधिपती आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त ठरवलेली वेळ आल्यावर स्वतःला प्रकट करेल. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे.+ १६ तो एकटाच अमर आहे+ आणि जिथे कोणीही पोहोचू शकत नाही अशा दिव्य, तेजस्वी प्रकाशात तो राहतो.+ कोणत्याही माणसाने त्याला पाहिलेलं नाही आणि पाहूही शकत नाही.+ त्यालाच सन्मान आणि अनंत सामर्थ्य मिळो. आमेन.
१७ जे सध्याच्या जगाच्या व्यवस्थेत* श्रीमंत आहेत त्यांना आज्ञा* दे, की त्यांनी गर्विष्ठ* होऊ नये. तसंच, त्यांनी नाश होणाऱ्या धनावर नाही,+ तर देवावर आशा ठेवावी. आपण उपभोगत असलेल्या सगळ्या गोष्टी त्यानेच भरपूर प्रमाणात पुरवल्या आहेत.+ १८ त्यांना अशीही आज्ञा दे, की त्यांनी नेहमी भलं करत राहावं, चांगली कामं करण्याच्या बाबतीत श्रीमंत, मोठ्या मनाचं* आणि उदार असावं.+ १९ अशाने ते स्वतःसाठी असं धन साठवतील जे एका सुरक्षित भविष्याचा भक्कम आधार बनू शकेल.+ हे यासाठी, की त्यांना खरं जीवन घट्ट धरून ठेवता यावं.+
२० तीमथ्य, जो ठेवा तुझ्या स्वाधीन करण्यात आला आहे तो जपून ठेव.+ आणि पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्या पोकळ संभाषणांपासून आणि ज्याला “ज्ञान” असं खोटं नाव देण्यात आलं आहे, त्याच्या विरोधी मतांपासून दूर राहा.+ २१ अशा ज्ञानाचा दिखावा करून काही जण विश्वासापासून भरकटले आहेत.
देवाची अपार कृपा तुझ्यावर असो.
म्हणजे “जो देवाचा सन्मान करतो.”
किंवा “हुकूम; आदेश.”
शब्दशः “कायद्यानुसार.”
किंवा “एकनिष्ठ प्रेम नसलेले.”
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “पुरुषांसोबत संभोग करणारे पुरुष.” शब्दशः “पुरुषांसोबत झोपणारे पुरुष.”
किंवा “उपयोगी.”
किंवा “लोकांचं तारण करण्यासाठी.”
किंवा “हुकूम; आदेश.”
किंवा “लोकांना वाचवलं जावं.”
किंवा “सर्व प्रकारच्या लोकांच्या.”
शब्दशः “हात वर करून प्रार्थना करत राहावी.”
किंवा “आदरणीय.”
शब्दशः “निरोगी मनाने.”
शब्दशः “खास प्रकारे केस गुंफून.”
किंवा “गप्प.”
किंवा “गप्प.”
शब्दशः “त्यांनी.”
शब्दशः “मनाचा निरोगीपणा.”
शब्दशः “निरोगी मनाचा.”
किंवा “हिंसक वृत्तीचा.”
किंवा “व्यवस्था चालवणारा.”
किंवा “व्यवस्था चालवता.”
किंवा “अलीकडेच परिवर्तन झालेला नसावा.”
शब्दशः “दियाबलाला.” म्हणजे, निंदा करणारा.
किंवा “निंदा.”
किंवा “बाहेरच्या लोकांनीही त्याच्याबद्दल चांगली साक्ष दिलेली असावी.”
किंवा “दुतोंडे.”
किंवा “ते पात्र आहेत की नाही याची.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “व्यायाम.”
किंवा “प्रोत्साहन.”
किंवा “मनन.”
किंवा “तारण मिळेल.”
किंवा “खरोखरच गरजू आहेत”; म्हणजे, ज्यांना कोणाचाही आधार नाही.
शब्दशः “त्यांचा सन्मान कर.”
किंवा “आज्ञा.”
किंवा “पूर्वी घेतलेल्या शपथेच्या.”
किंवा “खरोखरच गरजू आहेत”; म्हणजे, ज्यांना कोणाचाही आधार नाही.
किंवा “मंडळीतल्या वडिलाविरुद्ध.”
शब्दशः “बाकीच्या सर्वांना धाक बसेल.”
म्हणजे, कोणत्याही माणसाला नियुक्त करण्याची घाई करू नकोस.
किंवा “नुसतंच पाणी प्यायचं सोडून दे.”
किंवा “गुलामगिरीच्या जोखडाखाली असलेले दास.”
किंवा “उपयोगी.”
किंवा “करण्याची विकृत आवड आहे.”
किंवा “शिवीगाळ.”
किंवा कदाचित, “निवारा.”
किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “सूचना.”
किंवा “बढाईखोर.”
किंवा “दानशूर.”