वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt २ थेस्सलनीकाकर १:१-३:१८
  • २ थेस्सलनीकाकर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २ थेस्सलनीकाकर
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ थेस्सलनीकाकर

थेस्सलनीकाकर यांना दुसरं पत्र

१ पौल, सिल्वान* आणि तीमथ्य+ यांच्याकडून, देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्यासोबत ऐक्यात असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला:

२ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांची अपार कृपा आणि शांती तुम्हाला मिळो.

३ बांधवांनो, तुमच्यासाठी नेहमी देवाचे आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे. असं करणं योग्यच आहे, कारण तुमचा विश्‍वास खूप वाढत आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचं एकमेकांवरचं प्रेमही वाढत आहे.+ ४ त्यामुळे, देवाच्या मंडळ्यांमध्ये आम्ही स्वतः तुमच्याबद्दल मोठ्या अभिमानाने बोलत असतो.+ कारण, बराच छळ आणि संकटं सोसत असतानाही तुमचा धीर आणि विश्‍वास टिकून आहे.+ ५ हा देवाच्या नीतिमान न्यायाचा पुरावा आहे आणि याद्वारे तुम्हाला देवाच्या राज्यासाठी योग्य मानलं जाईल. खरंतर या राज्यासाठीच सध्या तुम्ही दुःख सहन करत आहात.+

६ देव नीतिमान असल्यामुळे, जे तुमच्यावर संकटं आणतात त्यांची तो नक्कीच संकटाने परतफेड करेल.+ ७ सध्या तुम्हाला संकटं सोसावी लागत असली, तरी जेव्हा प्रभू येशू स्वर्गातून आपल्या शक्‍तिशाली स्वर्गदूतांसोबत+ अग्नीच्या ज्वालेत प्रकट होईल,+ तेव्हा आमच्यासोबत तुम्हालाही सुटका मिळेल. ८ त्या वेळी, जे देवाला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूबद्दलचा आनंदाचा संदेश मानत नाहीत त्यांचा तो सूड घेईल.+ ९ या लोकांना सर्वकाळाच्या नाशाची शिक्षा ठोठावण्याद्वारे+ प्रभूच्या समोरून आणि त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर केलं जाईल. १० हे तेव्हा घडेल जेव्हा तो आपल्या पवित्र जनांसोबत गौरवला जाण्यासाठी येईल आणि त्या दिवशी विश्‍वास ठेवणाऱ्‍या सगळ्यांमध्ये त्याची प्रशंसा होईल; आणि खरोखर, आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्हीही विश्‍वास ठेवला आहे.

११ त्यामुळे, आम्ही तुमच्यासाठी नेहमी अशी प्रार्थना करतो, की देवाने तुम्हाला त्याच्याकडून असलेल्या बोलावण्याला योग्य ठरवावं.+ आणि त्याच्या सर्व सदिच्छा आणि विश्‍वासाचं प्रत्येक कार्य त्याने आपल्या सामर्थ्याने पूर्ण करावं. १२ या उद्देशाने, की आपल्या देवाच्या, तसंच प्रभू येशू ख्रिस्ताच्या अपार कृपेप्रमाणे, आपल्या प्रभू येशूचं नाव तुमच्यामध्ये गौरवलं जावं आणि तुमचासुद्धा त्याच्यासोबत ऐक्यात गौरव व्हावा.

२ पण बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती+ आणि त्याच्याजवळ आपलं एकत्र केलं जाणं+ यांबद्दल आम्हाला हे सांगायचं आहे: २ यहोवाचा* दिवस+ आला आहे असं सुचवणाऱ्‍या कोणत्याही प्रेरित संदेशामुळे,+ तोंडी सांगितलेल्या संदेशामुळे किंवा आमच्याकडून आहे असं भासणाऱ्‍या पत्रामुळे लगेच गोंधळून जाऊ नका किंवा घाबरू नका.

३ कोणीही तुम्हाला बहकवू नये* म्हणून सांभाळा. कारण जोपर्यंत धर्मत्याग+ होत नाही आणि अनीतिमान माणूस,+ म्हणजेच नाशाचा मुलगा प्रकट होत नाही तोपर्यंत तो दिवस येणार नाही.+ ४ हा नाशाचा मुलगा विरोधी असून देव समजल्या जाणाऱ्‍या प्रत्येकापेक्षा आणि पूज्य समजल्या जाणाऱ्‍या प्रत्येक वस्तूपेक्षा स्वतःला वरचढ करतो. अशा रितीने तो देवाच्या मंदिरात बसून आपण जणू एक देव असल्याचं सगळ्यांना दाखवतो. ५ मी तुमच्यामध्ये असताना तुम्हाला या गोष्टी सांगायचो, हे तुम्हाला आठवत नाही का?

६ आणि ठरवलेल्या वेळी त्याने प्रकट व्हावं म्हणून त्याला कोणी रोखून धरलं आहे, हे तुम्हाला माहीत आहे. ७ हे खरं आहे, की या अनीतिमान माणसाचं कार्य आधीच सुरू झालं आहे+ आणि ते गुप्त आहे. पण, जोपर्यंत रोखून धरणारा मार्गातून निघणार नाही, तोपर्यंतच हे कार्य गुप्त राहील. ८ मग मात्र तो अनीतिमान माणूस प्रकट होईल. त्याला प्रभू येशू आपल्या तोंडाच्या श्‍वासाने नाहीसं करेल+ आणि आपली उपस्थिती प्रकट करून नष्ट करेल.+ ९ पण, अनीतिमान माणसाची उपस्थिती सैतानाच्या प्रभावामुळे असून+ तो प्रत्येक शक्‍तिशाली कार्य, खोटी चिन्हं, चमत्कार,+ १० आणि सर्व प्रकारच्या अनीतीची आणि फसवणुकीची कामं करेल.+ आणि जे नाशाकडे वाटचाल करत आहेत त्यांची यांमुळे फसवणूक होईल. हीच त्यांची शिक्षा आहे, कारण तारण मिळावं म्हणून त्यांनी सत्यावर प्रेम केलं नाही. ११ आणि त्यांनी असत्यावर विश्‍वास ठेवावा, म्हणून देव एका फसव्या प्रभावामुळे त्यांची दिशाभूल होऊ देतो.+ १२ हे यासाठी, की त्या सर्वांचा न्याय केला जावा, कारण त्यांनी सत्यावर विश्‍वास ठेवला नाही, तर अनीतीमध्ये आनंद मानला.

१३ पण यहोवाला* प्रिय असलेल्या माझ्या बांधवांनो, तुमच्यासाठी नेहमी देवाचे आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण देवाने आपल्या पवित्र शक्‍तीने* तुम्हाला पवित्र करण्याद्वारे+ आणि सत्यावरच्या तुमच्या विश्‍वासाद्वारे सुरुवातीपासूनच तारणासाठी तुमची निवड केली.+ १४ आम्ही घोषित करत असलेल्या आनंदाच्या संदेशाद्वारे त्याने तुम्हाला बोलावलं. हे यासाठी, की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे तुम्हालाही गौरवलं जावं.+ १५ तर मग बांधवांनो, स्थिर उभे राहा+ आणि ज्या गोष्टी* तुम्ही आमच्याकडून शिकून घेतल्या, मग त्या तोंडी दिलेल्या संदेशाद्वारे असोत किंवा पत्राद्वारे असोत, त्यांना जडून राहा.+ १६ शिवाय, स्वतः आपला प्रभू येशू ख्रिस्त आणि ज्याने आपल्यावर प्रेम केलं+ आणि अपार कृपेद्वारे आपल्याला सर्वकाळाचं सांत्वन आणि एक चांगली आशा दिली,+ तो देव जो आपला पिता आहे, १७ त्याने तुमच्या मनाला सांत्वन द्यावं आणि तुम्हाला स्थिर* करावं, म्हणजे तुमचं वागणं आणि बोलणं नेहमी चांगलं असेल.

३ बांधवांनो, शेवटी इतकंच सांगतो की आमच्यासाठी प्रार्थना करत राहा.+ हे यासाठी, की यहोवाच्या* वचनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत राहावा+ आणि जसं तुमच्यामध्ये ते गौरवलं जात आहे, तसंच पुढेही ते गौरवलं जावं; २ आणि वाईट व दुष्ट माणसांपासून आपलं संरक्षण व्हावं,+ कारण सर्वांजवळच विश्‍वास असतो असं नाही.+ ३ पण, प्रभू विश्‍वासू आहे आणि तो तुम्हाला बळ देईल आणि त्या दुष्टापासून तुमचं संरक्षण करेल. ४ शिवाय, प्रभूमध्ये तुमच्याबद्दल आम्हाला हा भरवसा आहे, की आम्ही दिलेल्या सूचनांचं तुम्ही पालन करत आहात आणि पुढेही करत राहाल. ५ तुम्ही देवावर प्रेम करावं+ आणि ख्रिस्तामध्ये धीर धरावा+ म्हणून प्रभूने तुमच्या मनाला योग्य दिशा दाखवावी, हीच आमची प्रार्थना आहे.

६ आता बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही सूचना देतो, की अशा बांधवापासून दूर राहा जो तुम्हाला* दिलेल्या शिकवणीप्रमाणे* चालत नाही,+ तर अव्यवस्थितपणे वागतो.+ ७ आमचं अनुकरण कसं करावं+ हे तुम्हाला स्वतःला माहीत आहे. कारण तुमच्यामध्ये असताना आम्ही अव्यवस्थितपणे वागलो नाही, ८ किंवा कोणाचं अन्‍न फुकट* खाल्लं नाही.+ उलट, तुम्हाला खर्चात पाडून तुमच्यावर ओझं बनू नये, म्हणून आम्ही रात्रंदिवस मेहनत आणि कष्ट करत होतो.+ ९ अर्थात, आम्हाला तो अधिकार नाही असं नाही,+ पण तुम्ही आमचं अनुकरण करावं म्हणून तुमच्यासमोर स्वतःचं उदाहरण ठेवायची आमची इच्छा होती.+ १० खरंतर, तुमच्यामध्ये असताना आम्ही नेहमी तुम्हाला असा आदेश द्यायचो: “जर कोणाला काम करायची इच्छा नसेल, तर त्याने खाऊसुद्धा नये.”+ ११ कारण आम्ही असं ऐकलं आहे, की तुमच्यापैकी काही जण अव्यवस्थितपणे वागत आहेत.+ ते काहीच काम करत नाहीत, तर दुसऱ्‍यांच्या कामात लुडबुड करतात.+ १२ अशांना, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही ही आज्ञा आणि सल्ला देतो, की त्यांनी शांतपणे आपलं काम करावं आणि स्वतः कमवून खावं.+

१३ बांधवांनो, तुम्ही मात्र चांगलं ते करायचं सोडू नका. १४ पण, या पत्राद्वारे आम्ही जे सांगितलं त्याचं जर कोणी पालन करत नसेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्याबरोबर उठणं-बसणं सोडून द्या.+ १५ पण, त्याला शत्रू मानू नका, तर आपला बांधव म्हणून त्याला समजावत राहा.+

१६ आता, शांतीचा प्रभू स्वतः तुम्हाला नेहमी सर्व प्रकारे शांती देत राहो.+ प्रभू तुमच्या सगळ्यांसोबत असो.

१७ मी पौल स्वतःच्या अक्षरांत तुम्हाला माझा नमस्कार सांगतो.+ प्रत्येक पत्रात हीच माझी खूण आहे; मी अशाच पद्धतीने लिहितो.

१८ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्या सर्वांवर असो.

याला सीला असंही म्हणतात.

अति. क५ पाहा.

किंवा “मोहात पाडू नये.”

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “परंपरा.”

किंवा “बळकट.”

अति. क५ पाहा.

किंवा कदाचित, “त्यांना.”

किंवा “परंपरेनुसार.”

किंवा “पैसे न देता.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा