थेस्सलनीकाकर यांना पहिलं पत्र
१ पौल, सिल्वान*+ आणि तीमथ्य+ यांच्याकडून, देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्यासोबत ऐक्यात असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला:
तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.
२ आम्ही आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हा सर्वांचा उल्लेख करून नेहमी देवाचे आभार मानतो.+ ३ कारण तुम्ही विश्वासूपणे जे कार्य केलं आणि प्रेमळपणे जे परिश्रम घेतले; तसंच, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या तुमच्या आशेमुळे तुम्ही जो धीर धरला,+ त्याची आम्ही सतत आपला देव आणि पिता याच्यासमोर आठवण करतो. ४ देवाला प्रिय असलेल्या आमच्या बांधवांनो, त्याने तुम्हाला निवडलं आहे हे आम्हाला माहीत आहे. ५ कारण आम्ही घोषित करत असलेला आनंदाचा संदेश हा तुम्हाला फक्त शब्दांनीच देण्यात आला नाही, तर सामर्थ्याने आणि पवित्र शक्तीने* आणि पूर्ण खातरीने देण्यात आला. आणि तुमच्यामध्ये असताना आम्ही तुमच्यासाठी कशा प्रकारे काम केलं, हे तर तुम्हाला माहीतच आहे. ६ तुम्ही आमचं आणि प्रभूचं अनुकरण करणारे झाला,+ कारण बऱ्याच संकटांत असतानाही+ तुम्ही पवित्र शक्तीद्वारे मिळणाऱ्या आनंदाने वचन स्वीकारलं ७ आणि असं केल्यामुळे तुम्ही मासेदोनिया आणि अखया इथे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी उदाहरण बनला.
८ खरंतर, तुमच्यामुळे संपूर्ण मासेदोनिया आणि अखयात लोकांना यहोवाचं* वचन ऐकायला मिळालं. पण त्यासोबतच तुमच्या विश्वासाबद्दल सर्व ठिकाणी चर्चा होत आहे,+ आणि यामुळे आम्ही काही वेगळं सांगायची गरज नाही. ९ कारण तिथले लोक स्वतःच हे सांगतात, की कशा प्रकारे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटलो आणि कशा प्रकारे तुम्ही आपल्या मूर्तींना सोडून देवाकडे वळला.+ हे यासाठी, की तुम्ही एका जिवंत आणि खऱ्या देवाची सेवा करावी; १० आणि त्याचा मुलगा, येशू, ज्याला त्याने मेलेल्यांतून उठवलं आणि जो येणाऱ्या क्रोधापासून आपल्याला वाचवेल,+ तो स्वर्गातून यायची वाट पाहावी.+
२ बांधवांनो, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ ठरली नाही+ याची तुम्हाला स्वतःलाही नक्कीच जाणीव आहे. २ कारण तुम्हाला हे माहीत आहे, की फिलिप्पै इथे सुरुवातीला आमचा छळ झाला आणि आम्हाला वाईट वागणूक देण्यात आली.+ पण, इतका विरोध होत असूनही* तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आम्ही आमच्या देवाच्या मदतीने धैर्य एकवटलं.+ ३ कारण आम्ही तुम्हाला देत असलेली शिकवण ही असत्यातून किंवा वाईट हेतूंमधून उत्पन्न झालेली, किंवा फसवणुकीने दिलेली शिकवण नाही. ४ तर, आनंदाचा संदेश सांगण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवण्यासाठी देवाने स्वतः आम्हाला त्याची पसंती दिली आहे. म्हणून, आम्ही माणसांना खूश करण्यासाठी नाही, तर आमची मनं पारखणाऱ्या देवाला+ आनंदित करण्यासाठी बोलतो.
५ खरं पाहिलं, तर तुम्हाला हे माहीत आहे, की आम्ही कधीही कोणाची खोटी प्रशंसा केली नाही. किंवा लोभी हेतूने+ कधीही ढोंगीपणा केला नाही. देव स्वतः याचा साक्षी आहे! ६ तसंच, ख्रिस्ताचे प्रेषित या नात्याने खरंतर आम्ही तुम्हाला खर्चात पाडून तुमच्यावर ओझं बनू शकलो असतो.+ तरीही, आम्ही माणसांकडून, म्हणजे तुमच्याकडून किंवा इतरांकडूनही कधीच गौरव मिळवायचा प्रयत्न केला नाही. ७ उलट, अंगावर पाजणारी आई जशी स्वतःच्या मुलांची मायेने* काळजी घेते,* तसंच आम्हीही तुमच्याशी सौम्यतेने वागलो. ८ तुमच्याबद्दल जिव्हाळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेशच नाही, तर आमचा जीवही द्यायला तयार होतो,+ कारण तुम्ही आमच्यासाठी खूप प्रिय बनला होता.+
९ बांधवांनो, आम्ही घेतलेली मेहनत आणि आमचे परिश्रम तुम्हाला नक्कीच आठवत असतील. तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेश सांगताना तुमच्यापैकी कोणालाही खर्चात पाडून तुमच्यावर ओझं बनू नये,+ म्हणून आम्ही रात्रंदिवस कष्ट केले. १० विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सर्वांशी आम्ही किती एकनिष्ठ, नीतिमान आणि निर्दोष राहून वागलो, या बाबतीत तुम्ही स्वतः साक्षी आहात आणि देवसुद्धा आहे. ११ तुम्हाला हे चांगलं माहीत आहे, की पिता आपल्या मुलांना देतो, त्याप्रमाणे+ आम्ही कसं तुमच्यापैकी प्रत्येकाला सतत मार्गदर्शन देत राहिलो, तुमची समजूत काढत राहिलो आणि तुम्हाला प्रोत्साहन देत राहिलो.+ १२ ज्याने तुम्हाला आपल्या राज्यात+ आणि गौरवात+ सहभागी होण्यासाठी बोलावलं, त्या देवाच्या सेवकांना शोभेल असं तुम्ही नेहमी वागावं,+ म्हणून आम्ही असं केलं.
१३ खरंतर, याच कारणामुळे आम्ही देवाचे सतत आभार मानतो.+ कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचं वचन ऐकलं, तेव्हा तुम्ही ते माणसांचं वचन म्हणून नाही, तर देवाचं वचन म्हणून स्वीकारलं; आणि ते खरोखर देवाचंच वचन आहे आणि तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये कार्यही करत आहे. १४ कारण बांधवांनो, तुम्ही यहूदीयामध्ये ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या देवाच्या मंडळ्यांचं अनुकरण केलं. त्यांना यहुद्यांच्या हातून ज्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, त्याच गोष्टी तुम्हीही आपल्या स्वतःच्या देशातल्या लोकांच्या हातून सोसल्या.+ १५ त्या यहुद्यांनी तर प्रभू येशूला आणि संदेष्ट्यांना ठार मारलं+ आणि आमचाही छळ केला.+ शिवाय, ते देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीत, तर सगळ्या माणसांच्या हिताच्या विरोधात वागतात. १६ कारण विदेशी लोकांचं तारण व्हावं म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलतो, तेव्हा ते आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतात.+ अशा रितीने, ते आपल्या पापाचं माप सतत भरत राहतात. पण शेवटी देवाचा क्रोध त्यांच्यावर आला आहे.+
१७ बांधवांनो, जेव्हा आम्ही फक्त थोड्या काळासाठी तुमच्यापासून दूर गेलो होतो* (मनाने नाही तर शरीराने), तेव्हा तुम्हाला भेटायच्या आमच्या तीव्र इच्छेमुळे आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. १८ याच कारणासाठी आम्हाला तुमच्याकडे यायची इच्छा होती. मी, म्हणजे पौलने एकदा नाही, तर दोनदा प्रयत्न केला. पण सैतान आमच्या मार्गात आडवा आला. १९ कारण आपला प्रभू येशू याच्या उपस्थितीच्या वेळी आमची आशा, आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट शेवटी काय आहे? तुम्हीच नाही का?+ २० खरोखर, तुम्हीच आमचा गौरव आणि आमचा आनंद आहात.
३ त्यामुळे जेव्हा आमच्याने आणखी राहावलं नाही, तेव्हा आम्ही एकटेच अथेन्समध्ये+ राहणं योग्य आहे असं ठरवलं; २ आणि तुम्हाला विश्वासात स्थिर करावं* आणि सांत्वन द्यावं, म्हणून आम्ही आमचा भाऊ आणि ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करणारा देवाचा सेवक* तीमथ्य,+ याला तुमच्याकडे पाठवलं. ३ हे यासाठी, की या संकटांमुळे तुमच्यापैकी कोणाचाही विश्वास डळमळू* नये. या गोष्टी आपल्याला सोसाव्याच लागतील* हे तुम्हाला स्वतःलाही माहीत आहे.+ ४ कारण, आपल्याला संकटं सोसावी लागतील हे तुमच्यासोबत असताना आम्ही तुम्हाला आधीच सांगत होतो आणि अगदी तसंच घडलं हे तुम्हाला माहीत आहे.+ ५ त्यामुळे, मला राहावलंच नाही तेव्हा तुमच्या विश्वासूपणाबद्दल जाणून घेण्यासाठी मी तीमथ्यला पाठवलं.+ कारण आम्हाला अशी भीती वाटली, की कदाचित मोहात पाडणाऱ्याने+ तुम्हाला मोहात पाडलं असेल आणि तुमच्यासाठी केलेले आमचे परिश्रम वाया गेले असतील.
६ पण इतक्यातच तीमथ्य तुमच्याकडून परत आला आहे+ आणि त्याने आम्हाला तुमच्या विश्वासूपणाबद्दल आणि प्रेमाबद्दल चांगली बातमी दिली आहे. म्हणजे, हेच की तुम्ही अजूनही आमची प्रेमाने आठवण काढत असता, आणि जसं आम्ही तुम्हाला पाहायला उत्सुक आहोत, तसंच तुम्हीही आम्हाला पाहायला उत्सुक आहात. ७ म्हणून बांधवांनो, आमच्या सगळ्या दुःखात* आणि संकटातही आम्हाला तुमच्यामुळे आणि तुम्ही दाखवत असलेल्या विश्वासूपणामुळे सांत्वन मिळालं आहे.+ ८ कारण तुम्ही प्रभूमध्ये स्थिर उभे आहात हे कळल्यामुळे आम्हाला नवीन उमेद मिळाली आहे.* ९ तुमच्यामुळे आम्हाला देवासमोर मनापासून जो आनंद झाला आहे, त्याबद्दल आम्ही त्याचे आभार कसे व्यक्त करावेत? १० आम्ही रात्रंदिवस अगदी प्रामाणिकपणे देवाला याचना करतो, की तुम्हाला प्रत्यक्ष पाहणं आणि तुमच्या विश्वासात जी काही कमी असेल ती भरून काढणं आम्हाला शक्य व्हावं.+
११ आता स्वतः देव आणि पिता याने आणि आपल्या प्रभू येशूने तुमच्याकडे यायचा मार्ग आमच्यासाठी मोकळा करावा. १२ शिवाय, आम्ही प्रभूला अशीही विनंती करतो, की आम्हाला तुमच्यासाठी वाटत असलेल्या प्रेमाप्रमाणेच, तुम्हाला एकमेकांबद्दल आणि सर्वांबद्दल वाटणारं प्रेम वाढावं आणि ओसंडून वाहावं.+ १३ हे यासाठी, की प्रभू येशू त्याच्या सगळ्या पवित्र जनांसोबत उपस्थित होईल, तेव्हा+ त्याने आपला देव आणि पिता याच्यासमोर तुमची मनं स्थिर करावीत आणि तुम्हाला पवित्र आणि निर्दोष ठरवावं.+
४ शेवटी बांधवांनो, देवाचं मन आनंदित करण्यासाठी तुम्ही कसं वागावं याबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन दिलं आहे+ आणि तुम्ही त्याप्रमाणे करतही आहात. आता आम्ही प्रभू येशूद्वारे तुम्हाला विनंती आणि आग्रह करतो, की असं आणखी पूर्णपणे करत राहा. २ कारण, प्रभू येशूद्वारे आम्ही तुम्हाला ज्या सूचना* दिल्या, त्या तुम्हाला माहीतच आहेत.
३ देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही पवित्र असावं+ आणि अनैतिक लैंगिक कृत्यांपासून* स्वतःला दूर ठेवावं.+ ४ तुमच्यापैकी प्रत्येकाला स्वतःच्या शरीरावर,* पवित्रतेने+ आणि आदराने नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.+ ५ देवाला न ओळखणाऱ्या विदेश्यांसारखं+ लोभीपणाने, अनियंत्रित लैंगिक वासनेच्या आहारी जाऊ नका.+ ६ कोणीही या बाबतीत योग्य मर्यादा ओलांडून आपल्या भावाचा गैरफायदा घेऊ नये. कारण या सर्व गोष्टींबद्दल यहोवा* शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल आम्ही तुम्हाला पूर्वीच सांगितलं होतं आणि कडक ताकीदही दिली होती. ७ कारण देवाने आपल्याला अशुद्धतेसाठी नाही, तर पवित्रतेसाठी बोलावलं आहे.+ ८ त्यामुळे, जो कोणी या शिकवणीचा अनादर करतो तो माणसांचा नाही, तर तुम्हाला आपली पवित्र शक्ती* देणाऱ्या देवाचा+ अनादर करतो.+
९ पण बंधुप्रेमाबद्दल+ म्हणाल, तर या बाबतीत आम्ही तुम्हाला काही लिहायची गरज नाही. कारण देवाने स्वतः तुम्हाला एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं आहे.+ १० खरंतर, संपूर्ण मासेदोनियाच्या सगळ्या बांधवांवर तुम्ही अशा प्रकारचं प्रेम करतही आहात. पण बांधवांनो, आम्ही तुम्हाला ते जास्तीत जास्त करण्याचं प्रोत्साहन देतो. ११ आम्ही शिकवल्याप्रमाणे, तुम्ही दुसऱ्याच्या कारभारात लुडबुड न करता+ शांतीने राहायचा+ आणि आपल्या हातांनी कष्ट करायचा नेहमी प्रयत्न करा.+ १२ हे यासाठी, की बाहेरच्या लोकांच्या दृष्टीत तुम्ही नेहमी सभ्यपणे चालावं+ आणि तुमच्यामध्ये कोणतीही कमी असू नये.
१३ शिवाय बांधवांनो, जे मरण पावले आहेत* त्यांच्याबद्दल तुम्ही अंधारात* असावं अशी आमची इच्छा नाही.+ हे यासाठी, की ज्यांना कोणतीही आशा नाही अशा लोकांप्रमाणे तुम्ही शोक करू नये.+ १४ कारण येशू मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला या गोष्टीवर जर आपला विश्वास असेल,+ तर मग जे येशूचे अनुयायी या नात्याने मरण पावले आहेत, त्यांनाही त्याच्यासोबत असण्यासाठी देव पुन्हा जिवंत करेल.+ १५ यहोवाच्या* वचनाने आम्ही तुम्हाला हे सांगतो, की जिवंत असलेल्यांपैकी जे आपण प्रभूच्या उपस्थितीपर्यंत हयात असू, ते मरण पावलेल्यांच्या* पुढे जाणारच नाही. १६ कारण, प्रभू स्वतः देवाचा कर्णा घेऊन प्रमुख स्वर्गदूताच्या*+ वाणीने आज्ञा देत स्वर्गातून उतरेल, आणि ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्यांपैकी जे मेले आहेत ते आधी जिवंत होतील.+ १७ त्यानंतर, जिवंत असलेल्यांपैकी जे आपण हयात असू त्यांना आकाशात प्रभूला भेटण्यासाठी+ ढगांमध्ये उचलून घेतलं जाईल+ आणि अशा रितीने आपण सदासर्वकाळ प्रभूसोबत राहू.+ १८ तेव्हा, या गोष्टींनी एकमेकांना सांत्वन देत जा.
५ आता बांधवांनो, काळ आणि समय* यांबद्दल आम्ही तुम्हाला काही लिहायची गरज नाही. २ कारण, रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा* दिवस+ येत आहे, हे तुम्हाला स्वतःला चांगलं माहीत आहे.+ ३ “शांती आहे, सुरक्षा आहे!” असं जेव्हा ते म्हणत असतील तेव्हा एकाएकी, गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे प्रसूतिवेदना सुरू होतात, त्याप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश येईल,+ आणि त्यातून त्यांची सुटका होणारच नाही. ४ पण बांधवांनो, तुम्ही मात्र अंधारात नाही. त्यामुळे, दिवसाच्या प्रकाशाने चोराला गाठावं तसा तो दिवस तुम्हाला गाठणार नाही. ५ कारण तुम्ही सर्व प्रकाशाची आणि दिवसाची मुलं आहात.+ आपण रात्रीचे किंवा अंधाराचेही नाही.+
६ म्हणून, आपण इतरांप्रमाणे झोपेत राहू नये,+ तर जागं+ आणि सावध राहावं.+ ७ कारण झोप घेणारे, रात्री झोपतात आणि दारू पिऊन झिंगणारे रात्री झिंगतात.+ ८ पण आपण जे दिवसाचे आहोत, ते आपण सावध राहून विश्वासाचं आणि प्रेमाचं कवच* आणि तारणाच्या आशेचा टोप घालू या.+ ९ कारण देवाने आपल्याला क्रोधासाठी नाही, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळवण्यासाठी निवडलं आहे.+ १० ख्रिस्त आपल्याकरता मरण पावला.+ हे यासाठी, की आपण जागे असलो किंवा झोपलो,* तरी आपण त्याच्यासोबत राहावं.+ ११ त्यामुळे, आता जसं तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन* देत आहात आणि एकमेकांना बळकट करत आहात, तसंच पुढेही करत राहा.+
१२ आता बांधवांनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो, की तुमच्यामध्ये जे मेहनत घेतात आणि प्रभूच्या सेवेत जे तुमचं नेतृत्व करतात आणि तुम्हाला शिकवतात त्यांचा आदर करा. १३ आणि ते करत असलेल्या कामाबद्दल प्रेमळपणे त्यांची आणखी जास्त कदर करा.+ एकमेकांबरोबर शांतीने राहा.+ १४ त्याच वेळी बांधवांनो, आम्ही तुम्हाला अशीही विनंती करतो, की जे शिस्तीने वागत नाहीत त्यांना ताकीद द्या,*+ निराश झालेल्यांचं सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.+ १५ कोणीही वाइटाची फेड वाइटाने करणार नाही, याची काळजी घ्या.+ आणि नेहमी एकमेकांचं आणि एकंदरीत सगळ्यांचंच भलं करायचा प्रयत्न करत राहा.+
१६ नेहमी आनंदी राहा.+ १७ प्रार्थना करत राहा.+ १८ सर्व गोष्टींसाठी आभार माना.+ तुमच्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. १९ पवित्र शक्तीची* आग विझवू नका.+ २० भविष्यवाण्यांना तुच्छ लेखू नका.+ २१ सगळ्या गोष्टींची खातरी करा;+ जे चांगलं आहे त्याला धरून राहा. २२ सगळ्या प्रकारच्या दुष्टपणापासून दूर राहा.+
२३ शांतीच्या देवाने स्वतः तुम्हाला पूर्णपणे पवित्र करावं. आणि बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळी तुमची मनोवृत्ती,* जीव* आणि शरीर सर्व बाबतींत निर्दोष राखलं जावं.+ २४ तुम्हाला बोलावणारा विश्वासू असून तो नक्कीच असं करेल.
२५ बांधवांनो, आमच्यासाठी प्रार्थना करत राहा.+
२६ सर्व बांधवांना भेटताना बंधुप्रेमाचं चुंबन घ्या.
२७ मी तुम्हाला प्रभूच्या नावाने आग्रह करतो, की हे पत्र सर्व बांधवांना वाचून दाखवा.+
२८ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्यावर असो.
याला सीला असंही म्हणतात.
शब्दार्थसूची पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा कदाचित, “खूप संघर्ष करावा लागला तरीही.”
किंवा “कोमलतेने.”
किंवा “मुलांचा सांभाळ करते.”
किंवा “आपली थोड्या काळासाठी ताटातूट झाली होती.”
किंवा “तुम्हाला विश्वासात मजबूत करावं.”
किंवा कदाचित, “देवाचा सहकारी.”
शब्दशः “बहकू.”
किंवा “या गोष्टी आपल्यासाठी ठरलेल्या आहेत.”
शब्दशः “गरजेत.”
शब्दशः “आम्ही जगतो.”
किंवा “आदेश.”
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “भांड्यावर.”
अति. क५ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “झोपलेले आहेत.”
किंवा “अजाण.”
अति. क५ पाहा.
किंवा “झोपलेल्यांच्या.”
शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, नेमलेले दिवस
अति. क५ पाहा.
छातीचं संरक्षण करणारं साधन. किंवा “उरस्त्राण.”
किंवा “मरण पावलो.”
किंवा “सांत्वन.”
किंवा “समजावून सांगा.”
शब्दार्थसूची पाहा.
ग्रीक भाषेत “न्यूमा.” शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.
किंवा “जीवन.” शब्दार्थसूची पाहा.