वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt कलस्सैकर १:१-४:१८
  • कलस्सैकर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कलस्सैकर
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
कलस्सैकर

कलस्सैकर यांना पत्र

१ देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित असलेला पौल आणि आपला भाऊ तीमथ्य+ यांच्याकडून, २ कलस्सै इथे ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या पवित्र जनांना आणि विश्‍वासू बांधवांना:

देव जो आपला पिता याच्याकडून तुम्हा सर्वांना अपार कृपा आणि शांती मिळो.

३ आम्ही जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा तेव्हा देवाचे, म्हणजेच आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या पित्याचे आभार मानतो. ४ कारण आम्ही ख्रिस्त येशूवर असलेल्या तुमच्या विश्‍वासाबद्दल आणि सर्व पवित्र जनांना तुम्ही दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल ऐकलं आहे. ५ ही मनोवृत्ती, स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे तुम्ही दाखवता.+ या आशेबद्दल तुम्ही पूर्वी त्या वेळी ऐकलं, जेव्हा आनंदाच्या संदेशाबद्दलचं सत्यवचन ६ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात फलदायी होत आहे आणि वाढत आहे.+ त्याचप्रमाणे, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या अपार कृपेबद्दल खऱ्‍या अर्थाने ऐकलं आणि अचूकपणे जाणून घेतलं, त्या दिवसापासून हा संदेश तुमच्यामध्येही फलदायी होऊन वाढत चालला आहे. ७ आमचा प्रिय सहकारी एपफ्रास+ याच्याकडून तुम्ही हेच शिकून घेतलं आहे. तो आमच्या वतीने कार्य करणारा ख्रिस्ताचा एक विश्‍वासू सेवक आहे. ८ तुम्ही देवाच्या पवित्र शक्‍तीच्या* मदतीने उत्पन्‍न केलेल्या प्रेमाबद्दल त्यानेच आम्हाला सांगितलं.

९ यामुळेच, ज्या दिवसापासून आम्ही हे ऐकलं त्या दिवसापासून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करायचं सोडलं नाही.+ आम्ही देवाला हीच विनंती करत आहोत, की तुम्हाला त्याच्या इच्छेबद्दलचं अचूक ज्ञान आणि सर्व बुद्धी, तसंच पवित्र शक्‍तीद्वारे दिली जाणारी समज भरपूर प्रमाणात मिळावी.+ १० हे यासाठी, की तुम्ही यहोवाच्या* सेवकांना शोभेल असं वागून त्याला पूर्णपणे संतुष्ट करावं, प्रत्येक चांगल्या कार्याचं फळ उत्पन्‍न करत राहावं आणि देवाच्या अचूक ज्ञानात वाढत जावं.+ ११ त्याच प्रकारे, सहनशक्‍ती दाखवून आनंदाने धीर धरता यावा, म्हणून तुम्हाला त्याच्या गौरवी सामर्थ्याच्या शक्‍तीने ताकद मिळावी.+ १२ तसंच, ज्याने तुम्हाला प्रकाशात पवित्र जनांच्या वारशाचे+ भागीदार व्हायला योग्य केलं, त्या पित्याचे तुम्ही आभार मानावेत.

१३ त्याने अंधाराच्या अधिकारातून सुटका करून+ आपल्याला त्याच्या प्रिय मुलाच्या राज्यात आणलं. १४ त्याच्याद्वारे खंडणी देऊन आपली सुटका करण्यात आली आहे, म्हणजे आपल्या पापांची क्षमा झाली आहे.+ १५ तो अदृश्‍य देवाचं प्रतिरूप+ आणि निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टींत पहिला जन्मलेला आहे.+ १६ कारण त्याच्याद्वारेच स्वर्गात आणि पृथ्वीवर, इतर सगळ्या दृश्‍य आणि अदृश्‍य गोष्टी निर्माण करण्यात आल्या.+ मग ती सिंहासनं असोत, अधिपती, सरकारं किंवा अधिकार असोत, सगळ्या गोष्टी त्याच्याद्वारे+ आणि त्याच्यासाठी निर्माण करण्यात आल्या. १७ तसंच, तो इतर सगळ्या गोष्टींच्या आधीचा आहे+ आणि त्याच्याचद्वारे इतर सर्व गोष्टी अस्तित्वात आणल्या गेल्या. १८ तो शरीराचं, म्हणजे मंडळीचं मस्तक आहे.+ तो सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे. तो मेलेल्यांमधून पहिला जन्मलेला आहे.+ हे यासाठी, की त्याने सगळ्या गोष्टींत पहिलं ठरावं. १९ कारण देवाला हे योग्य वाटलं, की ख्रिस्तामध्ये सर्व पूर्णता असावी.+ २० आणि त्याने वधस्तंभावर* वाहिलेल्या रक्‍ताद्वारे+ शांती स्थापन करून इतर सगळ्या गोष्टींचा,+ मग त्या पृथ्वीवरच्या गोष्टी असोत किंवा स्वर्गातल्या, त्यांचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करावा.

२१ खरं पाहिलं, तर एकेकाळी तुम्ही देवापासून दुरावलेले आणि त्याचे शत्रू होता. कारण तुमची मनं दुष्ट कामांकडे लागलेली होती. २२ पण ख्रिस्ताने आपलं मानवी शरीर अर्पण केल्यामुळे, त्याच्या मरणाद्वारे देवाने तुमच्यासोबत समेट केला आहे. हे यासाठी, की तुम्हाला पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असं स्वतःपुढे सादर करावं.+ २३ पण याकरता हे आवश्‍यक आहे, की तुम्ही विश्‍वासात टिकून राहावं+ आणि इमारतीच्या पायावर स्थापन केलेलं+ आणि स्थिर+ असं राहावं. तसंच, जो आनंदाचा संदेश तुम्ही ऐकला आणि ज्याची घोषणा आकाशाखालच्या सबंध सृष्टीत करण्यात आली,+ त्यापासून तुम्ही कधीही दूर जाऊ नये. मी पौल, याच आनंदाच्या संदेशाचा सेवक झालो आहे.+

२४ तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंदच आहे.+ ख्रिस्ताच्या शरीराचा भाग असल्यामुळे पुढेही दुःख सहन करत राहायला मी तयार आहे. कारण माझं हे दुःख सहन करणं ख्रिस्ताच्या शरीरासाठी,+ म्हणजे मंडळीसाठी+ फायद्याचं ठरेल. २५ देवाने माझ्यावर जो कारभार सोपवला आहे,+ त्याप्रमाणे मी तुमच्याकरता या मंडळीचा सेवक बनलो. हे यासाठी, की मी देवाच्या वचनाची पूर्णपणे घोषणा करावी. २६ हे पवित्र रहस्य+ पूर्वीच्या जगाच्या व्यवस्थांपासून*+ आणि पूर्वीच्या पिढ्यांपासून गुप्त ठेवण्यात आलं होतं. पण आता ते देवाच्या पवित्र जनांना प्रकट करण्यात आलं आहे.+ २७ हे गौरवी आणि मौल्यवान पवित्र रहस्य विदेश्‍यांमध्ये घोषित करणं देवाला योग्य वाटलं.+ ते रहस्य म्हणजे, तुमच्यासोबत ऐक्यात असलेला ख्रिस्त, ज्याच्या गौरवात सहभागी होण्याची तुम्हाला आशा आहे.+ २८ त्याच्याबद्दलच आम्ही घोषणा करत आहोत आणि सर्वांना समजावून सांगत आहोत आणि सर्व सुबुद्धीचं शिक्षण देत आहोत. हे यासाठी, की प्रत्येक माणसाला ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेला आणि प्रौढ,* असं देवापुढे सादर करावं.+ २९ म्हणूनच मी कठोर परिश्रम करत आहे आणि माझ्यामध्ये शक्‍तिशाली रितीने कार्य करत असलेल्या त्याच्या सामर्थ्याने झटत आहे.+

२ कारण तुमच्यासाठी, तसंच लावदिकीयात+ असलेल्यांसाठी आणि ज्यांनी मला प्रत्यक्ष पाहिलेलं नाही अशा सर्वांसाठीही मला किती संघर्ष करावा लागत आहे, याची तुम्हाला जाणीव व्हावी असं मला वाटतं. २ हा संघर्ष मी यासाठी करत आहे, की त्यांच्या मनाला दिलासा मिळावा+ आणि ते प्रेमाने एकमेकांशी ऐक्यात जोडले जावेत.+ तसंच, सत्याबद्दलची आपली समज खरी असल्याची पूर्ण खातरी झाल्यामुळे त्यांना भरपूर आशीर्वाद* मिळावेत, म्हणजे देवाचं पवित्र रहस्य, अर्थात ख्रिस्त याच्याबद्दल त्यांना अचूक ज्ञान मिळावं.+ ३ त्याच्यामध्येच सर्व बुद्धीचा आणि ज्ञानाचा खजिना गुप्त ठेवण्यात आला आहे.+ ४ कोणीही मन वळवणारे तर्क करून तुमची दिशाभूल करू नये, म्हणून मी हे सांगत आहे. ५ शरीराने जरी मी तुमच्यापासून दूर असलो, तरी मनाने तुमच्यासोबतच आहे. तसंच, तुमचा सुव्यवस्थितपणा+ आणि ख्रिस्तावर असलेला तुमचा दृढ विश्‍वास+ पाहून मला आनंद होतो.

६ म्हणूनच, जसं तुम्ही प्रभू ख्रिस्त येशूला स्वीकारलं, तसंच त्याच्यासोबत ऐक्यात राहून पुढेही चालत राहा. ७ ज्याप्रमाणे तुम्हाला शिकवण्यात आलं, त्याप्रमाणे त्याच्यात मुळावलेले व्हा आणि वाढत जा.+ तसंच विश्‍वासात स्थिर व्हा+ आणि नेहमी देवाची उपकारस्तुती करत जा.+

८ ख्रिस्ताप्रमाणे नसलेलं, तर मानवी परंपरांनुसार आणि जगाच्या विचारसरणीनुसार* असलेलं तत्त्वज्ञान आणि निरर्थक अशा फसव्या गोष्टी+ सांगून कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये,* म्हणून सांभाळा. ९ कारण ख्रिस्त देवाच्या सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे.+ १० त्यामुळे, जो सर्व शासनाचा आणि अधिकाराचा मुख्य आहे,+ त्याच्याद्वारे तुम्हाला पूर्णता लाभली आहे. ११ त्याच्यासोबत तुमचं नातं असल्यामुळे, ख्रिस्ताच्या सेवकांची जशी सुंता* झाली पाहिजे+ तशी तुमची झाली आहे. ती हातांनी केलेली नसून, पापी शरीर काढून टाकण्याद्वारे केलेली सुंता आहे.+ १२ तुम्हाला त्याच्या बाप्तिस्म्यामध्ये त्याच्यासोबत पुरण्यात आलं+ आणि त्याच्याशी तुमचं नातं असल्यामुळे तुम्हाला त्याच्यासोबत उठवण्यातही आलं.+ कारण ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून जिवंत केलं, त्याच्या या सामर्थ्यशाली कार्यावर तुम्ही विश्‍वास ठेवला.+

१३ शिवाय, तुम्ही तुमच्या अपराधांमुळे आणि तुमच्या शरीराच्या सुंता न झालेल्या स्थितीमुळे मेलेले असे होता. पण देवाने तुम्हाला ख्रिस्तासोबत जिवंत केलं.+ त्याने दयाळूपणे आपल्या सगळ्या अपराधांची क्षमा केली.+ १४ ज्यात पुष्कळ नियम होते+ आणि जे आपल्याविरुद्ध लिहिण्यात आलं होतं,+ त्या हातांनी लिहिलेल्या पत्रातला मजकूर त्याने खोडून टाकला.*+ त्याने ते पत्र वधस्तंभाला* खिळून रद्द केलं आहे.+ १५ त्याच्याद्वारे* त्याने शासनांना आणि अधिकारांना विवस्त्र* केलं आहे. त्याने त्यांचं पराजित कैद्यांप्रमाणे उघड प्रदर्शन करून,+ विजयोत्सवाच्या मिरवणुकीत त्यांना आपल्यामागे चालायला लावलं आहे.

१६ म्हणून, खाणंपिणं+ किंवा एखादा सण पाळणं, नवचंद्राचा दिवस*+ किंवा शब्बाथ पाळणं या गोष्टींवरून कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका.+ १७ या सगळ्या येणाऱ्‍या गोष्टींच्या छाया आहेत,+ पण वास्तविकता ही ख्रिस्तामध्ये आहे.+ १८ नम्रतेचं ढोंग आणि स्वर्गदूतांची उपासना ज्याला आवडते आणि जो स्वतः पाहिलेल्या गोष्टींबाबत “ठामपणे उभा राहतो,”* अशा कोणत्याही माणसामुळे आपलं बक्षीस गमावू नका.+ असा माणूस खरंतर कोणतंही कारण नसताना आपल्या शारीरिक विचारसरणीमुळे गर्वाने फुगलेला आहे. १९ आणि शरीराचं मस्तक, ज्याच्याद्वारे संपूर्ण शरीराला पुरवठा होतो आणि त्याचे सांधे आणि अस्थिबंधनं एकमेकांशी जोडली जाऊन, ते देवाकडून होणाऱ्‍या वाढीमुळे वाढत जातं,+ त्या मस्तकाला तो जडून राहत नाही.+

२० जगाच्या विचारसरणीच्या* बाबतीत जर तुम्ही ख्रिस्तासोबत मेला आहात,+ तर मग अजूनही जगाचा भाग असल्याप्रमाणे तुम्ही अशा आज्ञांचं पालन का करता,+ जसं की, २१ “हातात घेऊ नका, चाखू नका, स्पर्श करू नका?” २२ या आज्ञा अशा गोष्टींबद्दल आहेत, ज्या वापरून नष्ट होतात आणि त्या माणसांच्या आदेशांवर आणि शिकवणींवर आधारित आहेत.+ २३ या आज्ञांप्रमाणे मनाला वाटेल तशी उपासना करणं, नम्रतेचं ढोंग करणं आणि शरीराला यातना देणं+ या गोष्टी जरी वरवर बुद्धीच्या गोष्टी वाटत असल्या, तरी शरीराच्या वासनांचा प्रतिकार करण्यात त्यांचा काहीही उपयोग होत नाही.

३ पण जर तुम्हाला ख्रिस्तासोबत उठवण्यात आलं होतं,+ तर मग स्वर्गातल्या, म्हणजे जिथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसला आहे,+ तिथल्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करत राहा. २ पृथ्वीवरच्या गोष्टींवर नाही,+ तर स्वर्गातल्या गोष्टींवर लक्ष लावा.+ ३ कारण तुम्ही मेला आहात आणि तुमचं जीवन देवाबरोबर ऐक्यात असलेल्या ख्रिस्तासोबत गुप्त ठेवण्यात आलं आहे. ४ ख्रिस्त, जो आपलं जीवन आहे,+ तो प्रकट होईल तेव्हा तुम्हालासुद्धा त्याच्यासोबत गौरवात प्रकट केलं जाईल.+

५ म्हणून अनैतिक लैंगिक कृत्यं,* अशुद्धपणा, अनावर लैंगिक वासना,+ वाईट इच्छा आणि लोभीपणा (जी एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे), यांसारख्या गोष्टी उत्पन्‍न करणाऱ्‍या पृथ्वीवरच्या आपल्या शरीराच्या अवयवांना मारून टाका.+ ६ अशाच गोष्टींमुळे लोकांवर देवाचा क्रोध भडकेल. ७ तुमची पूर्वीची जीवनशैली अशीच होती. तुम्हीसुद्धा याच गोष्टी करत होता.*+ ८ पण आता तुम्ही क्रोध, राग, वाईटपणा,+ शिवीगाळ,+ अश्‍लील बोलणं,+ या सर्व गोष्टी आपल्यामधून काढून टाकल्या पाहिजेत. ९ एकमेकांशी खोटं बोलू नका.+ आपलं जुनं व्यक्‍तिमत्त्व* त्याच्या वाईट सवयींसोबत काढून टाका.+ १० आणि देवाकडून असलेलं नवीन व्यक्‍तिमत्त्व घाला.+ हे व्यक्‍तिमत्त्व देवाने निर्माण केलं आणि त्याच्याच प्रतिरूपानुसार ते अचूक ज्ञानाद्वारे नवीन केलं जात आहे.+ ११ यात ग्रीक किंवा यहुदी, सुंता झालेला किंवा सुंता न झालेला, विदेशी किंवा स्कुथी,* दास किंवा स्वतंत्र माणूस, असा भेदभाव नाही; त्याऐवजी, ख्रिस्तच सर्वांमध्ये सर्वकाही आहे.+

१२ त्यामुळे पवित्र आणि प्रिय असे देवाचे निवडलेले लोक या नात्याने+ करुणा,+ दयाळूपणा, प्रेमळपणा, नम्रता,+ सौम्यता+ आणि सहनशीलता+ यांचं वस्त्र घाला. १३ कोणाविरुद्ध काही तक्रार असली,+ तरी एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.+ यहोवाने* जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.+ १४ पण या सर्व गोष्टींसोबतच प्रेमाचं वस्त्र घाला,+ कारण हे ऐक्याचं परिपूर्ण बंधन आहे.+

१५ तसंच, तुम्हाला एकाच शरीराचे अवयव या नात्याने ख्रिस्ताच्या शांतीमध्ये बोलावण्यात आलं होतं. म्हणून या शांतीला तुमच्या मनावर राज्य* करू द्या+ आणि कृतज्ञता दाखवा. १६ ख्रिस्ताचं वचन सर्व बुद्धीसोबत तुमच्यामध्ये भरपूर प्रमाणात राहावं. स्तुतिगीतं गाऊन, देवाचं गुणगान करून आणि कृतज्ञ मनाने उपासनेची गीतं गाऊन एकमेकांना शिकवत राहा. तसंच एकमेकांना प्रोत्साहन देत राहा* आणि आपल्या हृदयात यहोवासाठी* गीतं गा.+ १७ तुम्ही जे काही बोलता किंवा जे काही करता ते सगळं प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव, जो आपला पिता आहे त्याचे आभार माना.+

१८ पत्नींनो, आपल्या पतीच्या अधीन राहा,+ कारण असं करणं प्रभूमध्ये योग्य आहे. १९ पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा+ आणि तिच्याशी कठोरपणे वागू नका.*+ २० मुलांनो, सगळ्या बाबतींत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा,+ कारण यामुळे प्रभूला आनंद होतो. २१ वडिलांनो, आपल्या मुलांना वैताग आणू नका,*+ नाहीतर ती खचून जातील.* २२ दासांनो, सगळ्या बाबतींत आपल्या मालकांच्या आज्ञेत राहा.+ फक्‍त माणसांना खूश करण्यासाठी, ते पाहत असतानाच नाही,* तर यहोवाची* भीती बाळगून प्रामाणिक मनाने असं करा. २३ तुम्ही जे काही करता ते माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी* करत आहात असं समजून ते जीव* ओतून करा.+ २४ कारण तुम्हाला माहीत आहे, की यहोवाकडूनच* तुम्हाला बक्षिसाच्या रूपात वारसा मिळेल.+ आपला मालक, ख्रिस्त याचे दास होऊन त्याची सेवा करा. २५ जो वाईट काम करतो त्याला त्याचं फळ नक्कीच मिळेल+ आणि या बाबतीत कोणताही भेदभाव नाही.+

४ मालकांनो, स्वर्गात तुमचाही एक मालक आहे हे लक्षात ठेवून, आपल्या दासांशी नीतीने आणि न्यायाने वागा.+

२ बांधवांनो, नेहमी प्रार्थना करत राहा.+ या बाबतीत जागे राहा आणि उपकारस्तुती करा.+ ३ त्याच वेळी, आमच्यासाठीही प्रार्थना करा.+ हे यासाठी, की वचनाचा प्रचार करण्याकरता, म्हणजे ख्रिस्ताबद्दलचं पवित्र रहस्य घोषित करण्याकरता देवाने आमच्यासाठी संधीचं दार उघडावं. याच पवित्र रहस्यासाठी मी कैदेत आहे.+ ४ तसंच अशीही प्रार्थना करा, की मी ते जितक्या स्पष्टपणे घोषित केलं पाहिजे, तितक्या स्पष्टपणे मला ते करता यावं.

५ वेळेचा चांगला उपयोग करून* बाहेरच्यांशी सुज्ञपणे वागा.+ ६ तुमचं बोलणं नेहमी प्रेमळ,* मिठाने रुचकर केल्यासारखं असावं,+ म्हणजे प्रत्येकाला कसं उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजेल.+

७ माझा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये असलेला विश्‍वासू सेवक आणि माझा सोबतीचा दास, तुखिक+ तुम्हाला माझ्याबद्दल सगळी माहिती देईल. ८ त्याने तुम्हाला आमची खुशाली कळवावी आणि तुमच्या मनाला दिलासा द्यावा, म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवत आहे. ९ तुमच्यातलाच एक असलेला माझा विश्‍वासू आणि प्रिय भाऊ अनेसिम+ याच्यासोबत तो येत आहे. इथे घडत असलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल ते तुम्हाला कळवतील.

१० माझ्यासोबत कैदेत असलेला अरिस्तार्ख+ तुम्हाला नमस्कार सांगतो. तसंच, बर्णबाचा नातेवाईक मार्क+ (ज्याच्याबद्दल तुम्हाला सूचना मिळाल्या होत्या, की तो आला तर तुम्ही त्याचं स्वागत करावं)+ ११ आणि युस्त म्हटलेला येशू हेसुद्धा तुम्हाला नमस्कार सांगतात. हे सुंता झालेल्यांपैकी आहेत. देवाच्या राज्यासाठी हेच माझे सहकारी आहेत आणि त्यांनी मला खूप सांत्वन दिलं आहे.* १२ तुमच्यापैकीच असलेला ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास+ तुम्हाला नमस्कार सांगतो. तुम्ही शेवटपर्यंत प्रौढांप्रमाणे आणि देवाच्या इच्छेबद्दल पक्की खातरी असलेल्यांप्रमाणे स्थिर उभं राहावं, म्हणून तो नेहमी तुमच्यासाठी जीव ओतून प्रार्थना करत असतो. १३ तुमच्यासाठी, तसंच लावदिकीया आणि हेरापली इथल्या सगळ्यांसाठी तो किती मेहनत घेतो, याची मी स्वतः साक्ष देतो.

१४ आपल्या सगळ्यांचा लाडका वैद्य लूक+ आणि देमास+ हेही तुम्हाला नमस्कार सांगतात. १५ लावदिकीयातल्या बांधवांना, तसंच नुंफा आणि तिच्या घरी जमणाऱ्‍या मंडळीला माझा नमस्कार सांगा.+ १६ हे पत्र तुमच्या इथे वाचल्यावर ते लावदिकीयातल्या मंडळीतही वाचायची व्यवस्था करा.+ आणि त्यांना पाठवलेलं पत्र तुमच्या इथे वाचायची व्यवस्था करा. १७ तसंच, अर्खिप्प याला सांगा:+ “प्रभूमध्ये तू स्वीकारलेली सेवा पूर्ण करण्याकडे लक्ष दे.”

१८ आणि आता मी पौल, स्वतःच्या अक्षरांत लिहून तुम्हाला माझा नमस्कार सांगतो.+ माझी तुरुंगवासातली बंधनं+ आठवणीत असू द्या. देवाची अपार कृपा तुमच्यावर असो.

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पूर्वीच्या काळांपासून.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पूर्ण.”

किंवा “संपत्ती.”

किंवा “प्राथमिक गोष्टींनुसार.”

किंवा “शिकार बनवू नये.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पुसून टाकला.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “ख्रिस्ताद्वारे.”

किंवा “नग्न.”

चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.

हे शब्द खोट्या धर्मांशी संबंधित गूढ (दीक्षेच्या) प्रथांवरून आले आहेत.

किंवा “प्राथमिक गोष्टींच्या.”

ग्रीक, पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “अशा प्रकारे चालत होता.”

शब्दशः “जुना मनुष्य.”

या ठिकाणी “स्कुथी” या शब्दाचा अर्थ असंस्कृत लोक.

अति. क५ पाहा.

किंवा “नियंत्रण.”

किंवा “समजावत जा.”

अति. क५ पाहा.

किंवा “त्यांच्यावर संतापू नका.”

किंवा “चीड आणू नका.”

किंवा “निराश होतील.”

किंवा “माणसांची खुशामत करण्यासाठी तोंडदेखलेपणाने नाही.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दशः “नियुक्‍त वेळ विकत घेऊन.”

किंवा “कृपायुक्‍त.”

किंवा “ते मला धीर देणारे सहायक आहेत.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा