गलतीकर यांना पत्र
१ जो माणसांकडून किंवा कोणत्याही मानवाद्वारे नाही, तर येशू ख्रिस्ताद्वारे+ आणि ज्या देवपित्याने+ त्याला मेलेल्यांतून उठवलं त्याच्याद्वारे प्रेषित झाला, तो मी पौल, २ आणि माझ्यासोबत असलेले सगळे बांधव यांच्याकडून गलतीयातल्या मंडळ्यांना:
३ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू, त्यांची अपार कृपा आणि शांती तुमच्यावर असो. ४ ख्रिस्ताने सध्याच्या जगाच्या दुष्ट व्यवस्थेपासून* आपली सुटका व्हावी,+ म्हणून आपल्या पापांसाठी स्वतःला दिलं.+ हे आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे झालं.+ ५ त्याला सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन.
६ ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या अपार कृपेने बोलावलं, त्याच्याकडे इतक्या लवकर पाठ फिरवून* तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या आनंदाच्या संदेशाकडे वळत आहात, याचं मला नवल वाटतं.+ ७ खरंतर, दुसरा कोणताच आनंदाचा संदेश नाही. पण, काही जण तुमची दिशाभूल करायचा+ आणि ख्रिस्ताबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशात फेरफार करायचा प्रयत्न करत आहेत. ८ पण आम्ही तुम्हाला घोषित केलेल्या आनंदाच्या संदेशाशिवाय, आम्ही स्वतः किंवा एखाद्या स्वर्गदूतानेही तुम्हाला आनंदाचा संदेश म्हणून दुसरं काही सांगितलं, तर तो शापित ठरो. ९ आम्ही पूर्वी म्हटल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा म्हणतो, तुम्ही स्वीकारलेल्या आनंदाच्या संदेशाशिवाय, जर कोणी वेगळाच आनंदाचा संदेश सांगत असेल, तर तो शापित ठरो.
१० मी कोणाचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे, माणसांचं की देवाचं? मी माणसांना खूश करायचा प्रयत्न करत आहे का? जर मी अजूनही माणसांना खूश करत असेन, तर मग मी ख्रिस्ताचा दास नाही. ११ कारण बांधवांनो, मी तुम्हाला घोषित केलेला आनंदाचा संदेश माणसांकडून नाही,+ हे तुम्ही समजून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. १२ कारण हा संदेश मला कोणा माणसाकडून मिळाला नाही आणि कोणी मला तो शिकवलाही नाही, तर स्वतः येशू ख्रिस्ताने तो मला प्रकट केला.
१३ पूर्वी यहुदी धर्मात असताना मी कसा वागलो याबद्दल तर तुम्ही ऐकलंच आहे.+ मी देवाच्या मंडळीचा खूप* छळ केला आणि तिचं भरपूर नुकसान केलं.+ १४ आणि माझ्या राष्ट्रातल्या माझ्याच वयाच्या इतर बऱ्याच जणांपेक्षा मी यहुदी धर्मात पुष्कळ प्रगती करत होतो. कारण माझ्या वाडवडिलांच्या रूढीपरंपरांबद्दल मी खूप आवेशी होतो.+ १५ पण ज्या देवाने मला माझ्या आईच्या पोटी जन्माला घातलं आणि त्याच्या अपार कृपेद्वारे मला बोलावलं,+ त्याला हे योग्य वाटलं, १६ की माझ्याद्वारे आपल्या मुलाला प्रकट करावं. हे यासाठी की मी विदेश्यांना त्याच्याबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करावा.+ त्याने मला या कार्यासाठी निवडलं, तेव्हा मी लगेच कोणा माणसाकडे* याबद्दल सल्ला घ्यायला गेलो नाही. १७ तसंच, जे माझ्याआधी प्रेषित होते त्यांच्याकडे मी यरुशलेमलाही गेलो नाही, तर मी अरबस्तानात गेलो आणि त्यानंतर दिमिष्कला परतलो.+
१८ मग तीन वर्षांनंतर मी केफाला*+ भेटायला यरुशलेमला गेलो+ आणि त्याच्याजवळ १५ दिवस राहिलो. १९ पण, मी प्रेषितांपैकी दुसऱ्या कोणालाही भेटलो नाही, फक्त प्रभूचा भाऊ याकोब+ यालाच भेटलो. २० आता, ज्या गोष्टी मी तुम्हाला लिहीत आहे, त्यांविषयी मी देवासमोर तुम्हाला ही खातरी देतो, की त्या अगदी खऱ्या आहेत.
२१ त्यानंतर मी सीरियाच्या आणि किलिकियाच्या प्रदेशांत गेलो.+ २२ पण ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या यहूदीयातल्या मंडळ्यांसाठी मी अनोळखी होतो. २३ त्यांनी माझ्याबद्दल फक्त इतकंच ऐकलं होतं, की “जो माणूस आधी आपला छळ करायचा,+ तो आता त्याच विश्वासाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत आहे, ज्याचं पूर्वी त्याने पुष्कळ नुकसान केलं.”+ २४ अशा रितीने, ते माझ्यामुळे देवाचा गौरव करू लागले.
२ मग १४ वर्षांनंतर मी बर्णबासोबत पुन्हा एकदा यरुशलेमला गेलो.+ तीतलाही मी आपल्यासोबत घेतलं.+ २ मी तिथे जावं हे प्रभूने मला प्रकट केल्यामुळे मी गेलो आणि विदेश्यांमध्ये घोषित करत असलेला आनंदाचा संदेश त्यांना सांगितला. पण, ज्यांना खूप आदरणीय समजलं जातं, फक्त त्या बांधवांसमोरच मी या गोष्टी सांगितल्या. मी करत असलेली किंवा आजवर केलेली सेवा* वाया जाणार नाही, याची मला खातरी करायची होती. ३ माझ्यासोबत असलेला तीत+ हा ग्रीक असूनही, त्यालासुद्धा सुंता* करायला भाग पाडण्यात आलं नाही.+ ४ पण हा मुद्दा निघाला, तो फक्त मंडळीत गुपचूप शिरलेल्या खोट्या बांधवांमुळे.+ ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं आहे, त्याबद्दल लपूनछपून माहिती काढण्यासाठी+ आणि आम्हाला पूर्णपणे गुलामगिरीत जखडण्यासाठी ते मंडळीत घुसले होते.+ ५ आम्ही त्यांचं ऐकून त्यांच्या अधीन झालो नाही.+ अगदी एका क्षणासाठीही नाही. हे यासाठी, की आनंदाच्या संदेशाचं सत्य तुमच्यामध्ये टिकून राहावं.
६ पण प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या त्या बांधवांबद्दल बोलायचं,+ तर ते तसे असले किंवा नसले, तरी मला काही फरक पडत नाही. कारण देव कोणत्याही व्यक्तीचं बाहेरचं रूप पाहत नाही. खरंतर, खूप आदरणीय मानल्या जाणाऱ्या त्या बांधवांनी मला नवीन असं काहीच सांगितलं नाही. ७ उलट, ज्या प्रकारे पेत्रला सुंता* झालेल्यांकडे पाठवण्यात आलं होतं, त्याच प्रकारे मला सुंता न झालेल्यांना आनंदाचा संदेश सांगायचं काम सोपवण्यात आलं आहे,+ हे त्यांनी पाहिलं. ८ कारण ज्याने पेत्रला सुंता झालेल्यांसाठी प्रेषित होण्याकरता समर्थ केलं, त्यानेच मलाही विदेश्यांसाठी प्रेषित होण्याकरता समर्थ केलं.+ ९ ही गोष्ट त्यांनी पाहिली आणि माझ्यावर अपार कृपा झाली आहे, हे त्यांनी ओळखलं.+ तेव्हा याकोब,+ केफा* आणि योहान, जे मंडळीचे आधारस्तंभ मानले जात होते, त्यांनी या कार्यात आपण सगळे सहभागी* आहोत हे दाखवण्यासाठी बर्णबा आणि माझ्यासोबत+ उजवा हात मिळवला. तसंच, आम्ही विदेश्यांकडे तर त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावं असंही त्यांनी मान्य केलं. १० त्यांनी फक्त इतकीच विनंती केली, की आम्ही गरिबांची आठवण ठेवावी आणि ही गोष्ट करण्याचा मी आजपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलो आहे.+
११ पण केफा*+ अंत्युखियाला आला+ तेव्हा मी त्याच्या तोंडावर त्याला बोललो,* कारण त्याचं चुकलं होतं* हे अगदी स्पष्ट होतं. १२ कारण याकोबकडून+ काही माणसं येण्याआधी तो विदेशी लोकांसोबत बसून जेवायचा.+ पण ती माणसं आल्यावर मात्र त्याने असं करायचं बंद केलं आणि सुंता झालेल्यांच्या भीतीमुळे तो त्यांच्यापासून वेगळा राहू लागला.+ १३ बाकीच्या यहुद्यांनीही त्याच्यासोबत हे ढोंग करायला सुरुवात केली. इतकंच काय, तर बर्णबासुद्धा त्यांचा ढोंगीपणा पाहून त्यांच्यासारखाच वागू लागला. १४ पण त्यांचं हे वागणं आनंदाच्या संदेशाच्या सत्याप्रमाणे नाही हे मी पाहिलं,+ तेव्हा मी त्या सर्वांच्यासमोर केफाला* म्हणालो: “तू यहुदी असून यहुद्यांसारखा वागत नाहीस, विदेश्यांसारखा वागतोस. तर मग तू विदेशी लोकांना यहुद्यांच्या रीतीप्रमाणे चालायला कसा भाग पाडू शकतोस?”+
१५ आपण पापी असलेल्या विदेश्यांपैकी नाही, तर जन्माने यहुदी आहोत. १६ आणि आपण ही गोष्ट ओळखतो की कोणताही माणूस नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे नाही, तर फक्त येशू ख्रिस्तावर+ असलेल्या विश्वासाद्वारे नीतिमान ठरवला जातो.+ म्हणूनच, आपण ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला आहे. हे यासाठी, की नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे नाही तर ख्रिस्तावर असलेल्या विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरवलं जावं. कारण, नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे कोणालाही नीतिमान ठरवलं जाणार नाही.+ १७ पण आता, जर ख्रिस्ताद्वारे नीतिमान ठरवलं जाण्याचा प्रयत्न करत असतानासुद्धा आपण पापी असल्याचं दिसून आलं, तर याचा अर्थ ख्रिस्त आपल्याला पाप करायला प्रोत्साहन देत आहे का? नक्कीच नाही! १८ ज्या गोष्टी मी एकेकाळी स्वतःच पाडून टाकल्या होत्या, त्या जर मी पुन्हा उभ्या करत असलो, तर मी एक अपराधी असल्याचं दाखवून देतो. १९ कारण नियमशास्त्राद्वारे मी नियमशास्त्राकरता मरण पावलो.+ हे यासाठी, की मी देवासाठी जिवंत व्हावं. २० मला ख्रिस्तासोबत वधस्तंभावर* खिळण्यात आलं आहे.+ मी जो जगत आहे, तो यापुढे मी नसून+ माझ्यासोबत ऐक्यात राहणारा ख्रिस्त आहे. खरंच, या शरीरात जे जीवन मी सध्या जगत आहे, ते देवाच्या मुलावर असलेल्या विश्वासानेच जगत आहे.+ त्याने माझ्यावर प्रेम केलं आणि माझ्यासाठी स्वतःला अर्पण केलं.+ २१ देवाची अपार कृपा मी नाकारत* नाही.+ कारण जर माणसाला नियमशास्त्राद्वारे नीतिमान ठरवलं जात असेल, तर मग ख्रिस्ताचं बलिदान व्यर्थ ठरलं आहे.+
३ अरे मूर्ख गलतीकरांनो! वधस्तंभावर* खिळलेल्या येशू ख्रिस्ताबद्दल तुम्हाला अगदी स्पष्टपणे समजावण्यात आलं असूनही,+ तुमची अशी फसवणूक कोणी केली?+ २ मला तुम्हाला एकच विचारायचं* आहे: तुम्हाला पवित्र शक्ती* कशी मिळाली? नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे, की तुम्ही जे ऐकलं त्यावर विश्वास ठेवल्यामुळे?+ ३ तुम्ही इतके मूर्ख आहात का? सुरुवातीला तुम्ही देवाच्या पवित्र शक्तीवर अवलंबून राहत होता. मग आता तुम्ही माणसांच्या विचारसरणीप्रमाणे चालत आहात का?+ ४ तुम्ही सोसलेली सगळी दुःखं व्यर्थ होती का? ती नक्कीच व्यर्थ नव्हती. ५ जो तुम्हाला पवित्र शक्ती पुरवतो आणि तुमच्यामध्ये अद्भुत कार्यं घडवून आणतो,+ तो तुम्ही करत असलेल्या नियमशास्त्रातल्या कार्यांमुळे असं करतो का? की, जे ऐकलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवल्यामुळे तो असं करतो? ६ कारण अब्राहामनेही “यहोवावर* विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान ठरवण्यात आलं.”+
७ तुम्हाला तर माहीतच असेल, की जी विश्वास ठेवतात तीच अब्राहामची मुलं आहेत.+ ८ विदेशी लोकांना विश्वासाद्वारे नीतिमान ठरवलं जाईल, हे देवाने पूर्वीच शास्त्रात सांगितलं होतं. म्हणूनच, अब्राहामला आधीपासूनच हा आनंदाचा संदेश घोषित करण्यात आला, की “तुझ्यामुळे सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.”+ ९ अब्राहामने यावर विश्वास ठेवला. म्हणूनच जे विश्वास ठेवतात त्यांनाही अब्राहामसोबत आशीर्वाद मिळत आहेत.+
१० जे नियमशास्त्रातल्या कार्यांवर अवलंबून राहतात ते सगळे शापित आहेत. कारण असं लिहिलं आहे: “जो कोणी नियमशास्त्राच्या गुंडाळीत लिहिलेल्या या सर्व गोष्टी करण्यात टिकून राहत नाही, तो शापित असो.”+ ११ शिवाय, नियमशास्त्राद्वारे कोणीही देवापुढे नीतिमान ठरत नाही हे स्पष्टच आहे.+ कारण असं लिहिलं आहे, “नीतिमान त्याच्या विश्वासामुळे जगेल.”+ १२ नियमशास्त्र हे विश्वासावर आधारित नाही. उलट त्यात असं म्हटलं होतं, “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यांमुळे जगेल.”+ १३ ख्रिस्ताने आपल्याला विकत घेतलं+ आणि आपल्याऐवजी स्वतः शापित होऊन त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केलं.+ कारण असं लिहिलं आहे: “वधस्तंभावर टांगलेला प्रत्येक माणूस शापित असो.”+ १४ यामागे असा उद्देश होता की अब्राहामला ज्यांबद्दल वचन दिलं होतं, ते आशीर्वाद ख्रिस्त येशूद्वारे इतर राष्ट्रांनाही मिळावेत.+ हे यासाठी, की वचन दिलेली पवित्र शक्ती आपल्याला विश्वासाद्वारे मिळावी.+
१५ बांधवांनो, मी रोजच्या जीवनातलं एक उदाहरण देतो: जेव्हा एखादा करार पक्का केला जातो, मग तो माणसाने केलेला असला, तरी एकदा का तो पक्का करण्यात आला, की मग कोणीही तो रद्द करू शकत नाही किंवा त्यात कशाची भर घालू शकत नाही. १६ तर, जी अभिवचनं देण्यात आली होती, ती अब्राहामला आणि त्याच्या संततीला* देण्यात आली होती.+ शास्त्रात “तुझ्या वंशजांना,”* असं पुष्कळ जणांना उद्देशून म्हणण्यात आलं नाही. उलट, “तुझ्या संततीला”* असं म्हणण्यात आलं, म्हणजे फक्त एकाला आणि तो ख्रिस्त आहे.+ १७ मी असंही म्हणतो: ४३० वर्षांनंतर आलेलं नियमशास्त्र,+ देवाने पूर्वीच पक्का केलेला करार रद्द करून त्याचं अभिवचन व्यर्थ ठरवू शकत नाही. १८ कारण जर देव नियमाच्या आधाराने वारसा देत असेल, तर मग तो अभिवचनाद्वारे नाही; पण देवाने अब्राहामवर कृपा करून त्याला अभिवचनाद्वारे वारसा दिला आहे.+
१९ मग, मुळात नियमशास्त्र कशासाठी? जिला अभिवचन देण्यात आलं होतं, ती संतती* येईपर्यंत+ अपराध प्रकट करण्यासाठी नियमशास्त्र देण्यात आलं होतं.+ आणि ते स्वर्गदूतांद्वारे+ एका मध्यस्थाच्या हातून देण्यात आलं.+ २० जेव्हा एकाच व्यक्तीचा समावेश असतो, तेव्हा मध्यस्थाची गरज नसते आणि अभिवचन देणारा देव हा एकच आहे. २१ तर मग, नियमशास्त्र देवाच्या अभिवचनांच्या विरोधात आहे का? नक्कीच नाही! कारण जो जीवन देऊ शकेल, असा नियम देण्यात आला असता, तर मग माणूस नियमशास्त्राच्या आधारावर नीतिमान ठरू शकला असता. २२ पण शास्त्राने सगळ्या गोष्टी पापाच्या स्वाधीन केल्या. हे यासाठी, की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे मिळणारं अभिवचन, विश्वास ठेवणाऱ्यांना देण्यात यावं.
२३ खरा विश्वास येण्याआधी, आपण नियमशास्त्राच्या संरक्षणात होतो. आपल्याला त्याच्या स्वाधीन करण्यात आलं होतं आणि पुढे प्रकट होणार असलेल्या विश्वासाची आपण वाट पाहत होतो.+ २४ अशा रितीने, आपल्याला विश्वासाद्वारे नीतिमान ठरवलं जावं,+ म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्तापर्यंत नेणारा मार्गदर्शक* होतं.+ २५ पण खरा विश्वास आला असल्यामुळे,+ आता आपण मार्गदर्शकाच्या* अधीन नाही.+
२६ ख्रिस्त येशूवर असलेल्या तुमच्या विश्वासाद्वारे+ तुम्ही सर्व खरंतर देवाची मुलं आहात.+ २७ कारण तुम्हा सगळ्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा* झाला असून, तुम्ही ख्रिस्तासारखे बनला आहात.*+ २८ तुमच्यात कोणी यहुदी नाही आणि कोणी ग्रीक नाही,+ कोणी दास नाही आणि कोणी स्वतंत्र नाही,+ कोणी पुरुष नाही आणि कोणी स्त्रीही नाही.+ कारण ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे तुम्ही सगळे एक आहात.+ २९ शिवाय, जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तर तुम्ही खरोखर अब्राहामची संतती*+ आणि त्याला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे+ वारस आहात.+
४ आता मी म्हणतो, की वारस सर्व गोष्टींचा मालक असला, तरी तो लहान असेपर्यंत त्याच्यामध्ये आणि दासामध्ये कोणताही फरक नसतो. २ कारण त्याच्या वडिलांनी आधीच ठरवलेल्या दिवसापर्यंत तो देखरेख करणाऱ्यांच्या आणि कारभाऱ्यांच्या अधीन असतो. ३ त्याच प्रकारे आपणही लहान होतो, तेव्हा जगाच्या विचारसरणीचे* दास होतो.+ ४ पण ठरवलेली वेळ पूर्ण झाल्यावर देवाने आपल्या मुलाला पाठवलं. तो एका स्त्रीच्या पोटी जन्माला आला+ आणि नियमशास्त्राच्या अधीन होता.+ ५ देवाने त्याला यासाठी पाठवलं, की त्याने नियमशास्त्राच्या अधीन असलेल्यांना विकत घेऊन त्यांची सुटका करावी+ आणि अशा रितीने आपल्याला मुलं म्हणून दत्तक घ्यावं.+
६ आता तुम्ही मुलं असल्यामुळे देवाने त्याच्या मुलाला देण्यात आलेली पवित्र शक्ती* आपल्या मनात+ पाठवली आहे,+ आणि ती “अब्बा,* बापा!” अशी हाक मारते.+ ७ त्यामुळे, आता तुमच्यापैकी प्रत्येक जण दास नाही, तर मुलगा आहे; आणि जर मुलगा आहे, तर देवाने तुम्हा प्रत्येकाला वारसही केलं आहे.+
८ पण जेव्हा तुम्हाला देवाची ओळख नव्हती, तेव्हा जे खऱ्या अर्थाने देव नाहीत अशांचे तुम्ही दास होता. ९ आता मात्र तुम्हाला देवाची ओळख झाली आहे; खरंतर, देवानेच तुमची ओळख करून घेतली आहे. तर मग, तुम्ही पुन्हा पूर्वीच्या त्या निरर्थक+ आणि तुच्छ अशा जगाच्या विचारसरणीकडे वळून तिचे दास व्हायचा प्रयत्न का करता?+ १० तुम्ही दिवस, महिने, ऋतू आणि वर्षं अगदी काटेकोरपणे पाळता.+ ११ मला तर अशी भीती वाटते, की तुमच्यासाठी मी केलेली सगळी मेहनत वाया गेली आहे.
१२ बांधवांनो, मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही माझ्यासारखे व्हा. कारण एकेकाळी मीसुद्धा तुमच्यासारखाच होतो.+ तुम्ही माझं काहीच वाईट केलं नाही. १३ कारण तुम्हाला माहीत आहे, की माझ्या आजारामुळेच मला पहिल्यांदा तुम्हाला आनंदाचा संदेश घोषित करायची संधी मिळाली होती. १४ आणि माझं ते आजारपण तुमच्यासाठी एक परीक्षा असली, तरी तुम्ही मला तुच्छ लेखलं नाही किंवा माझा द्वेष केला नाही.* तर एखाद्या स्वर्गदूतासारखा, खरंतर ख्रिस्त येशूसारखा तुम्ही माझा स्वीकार केला. १५ मग आता कुठे गेला तुमचा तो आनंद? कारण, तुमच्याबद्दल मी साक्ष देऊन सांगतो, की शक्य असतं तर तुम्ही स्वतःचे डोळे उपटून मला दिले असते.+ १६ तर मग, आता खरं बोलत असल्यामुळे मी तुमचा शत्रू बनलो आहे का? १७ ते तुमची मनं जिंकायला खूप उत्सुक असले, तरी त्यांचा हेतू चांगला नाही. तुम्ही खूप उत्सुकतेने त्यांच्या मागे जावं म्हणून ते तुम्हाला माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न करतात. १८ कोणी चांगल्या हेतूने तुमची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि फक्त मी तुमच्यामध्ये असतानाच नाही, तर तुमच्यापासून दूर असतानाही त्यांनी असं करावं. १९ माझ्या प्रिय मुलांनो,+ जोपर्यंत ख्रिस्त तुमच्यामध्ये आकार घेत नाही* तोपर्यंत मला पुन्हा तुमच्यासाठी प्रसूतीच्या वेदना सोसाव्या लागतील. २० या क्षणी, मी तुमच्यामध्ये असतो आणि तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलू शकलो असतो, तर किती बरं झालं असतं! कारण तुमच्या बाबतीत मी गोंधळात पडलो आहे.
२१ तुम्हाला नियमशास्त्राच्या अधीन राहायची इच्छा आहे ना? मग मला एक गोष्ट सांगा. नियमशास्त्र काय म्हणतं ते तुम्ही ऐकलं नाही का? २२ उदाहरणार्थ, असं लिहिलं आहे, की अब्राहामला दोन मुलं होती; एक दासीकडून झालेला+ आणि एक स्वतंत्र स्त्रीकडून.+ २३ पण, दासीकडून झालेल्या मुलाचा जन्म नैसर्गिक रितीने,*+ तर स्वतंत्र स्त्रीकडून झालेल्या मुलाचा जन्म एका अभिवचनाद्वारे झाला होता.+ २४ या गोष्टींमध्ये एक लाक्षणिक अर्थ दडलेला आहे. कारण, या दोन स्त्रिया म्हणजे दोन करार. त्यांपैकी एक सीनाय पर्वतावर केलेला करार आहे+ आणि तो दास होण्यासाठी मुलांना जन्म देतो, अर्थात हागार. २५ आता हागार म्हणजे सीनाय.+ तो अरबस्तानातला एक पर्वत आहे. आणि ती आजच्या यरुशलेमला सूचित करते, कारण ती आपल्या मुलांसोबत दास्यात आहे. २६ पण वरची यरुशलेम मात्र स्वतंत्र आहे आणि ती आपली आई आहे.
२७ कारण असं लिहिलं आहे: “जी मुलांना जन्म देऊ शकत नाही त्या वांझ स्त्रीने आनंदी व्हावं; जिला प्रसूतीच्या वेदना होत नाहीत तिने आनंदाने जयजयकार करावा. कारण, जिला नवरा आहे तिच्यापेक्षा, सोडून दिलेल्या स्त्रीची मुलं जास्त आहेत.”+ २८ आता बांधवांनो, इसहाकप्रमाणेच तुम्हीसुद्धा अभिवचनाची मुलं आहात.+ २९ पण नैसर्गिक रितीने* जन्मलेल्या मुलाने जसा त्या वेळी, पवित्र शक्तीच्या सामर्थ्याने जन्मलेल्या मुलाचा छळ केला होता,+ तसाच आताही होत आहे.+ ३० पण शास्त्रवचन काय म्हणतं? “त्या दासीला आणि तिच्या मुलाला हाकलून दे, कारण स्वतंत्र स्त्रीच्या मुलासोबत दासीचा मुलगा मुळीच वारस होणार नाही.”+ ३१ तर मग बांधवांनो, आपण दासीची नाही, तर स्वतंत्र स्त्रीची मुलं आहोत.
५ आपल्याला हे स्वातंत्र्य मिळावं म्हणून ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलं. त्यामुळे, स्थिर उभे राहा+ आणि स्वतःला पुन्हा एकदा दासत्वाच्या जोखडात* अडकवून घेऊ नका.+
२ मी पौल तुम्हाला सांगतो, की तुम्ही सुंता केली, तर ख्रिस्ताचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.+ ३ तसंच, सुंता करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला मी अशी साक्ष देतो, की त्याने संपूर्ण नियमशास्त्राचं पालन करणं आवश्यक आहे.+ ४ नियमशास्त्राद्वारे नीतिमान ठरवलं जाण्याचा प्रयत्न करणारे तुम्ही,+ ख्रिस्तापासून वेगळे झाला आहात. त्याच्या अपार कृपेपासून तुम्ही दुरावला आहात. ५ पण आम्ही पवित्र शक्तीच्या* मदतीने, विश्वासाद्वारे मिळणारं ते नीतिमत्त्व प्राप्त करण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्याची आम्ही आशा धरली होती. ६ कारण ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्यांसाठी सुंता* करण्याला किंवा न करण्यालाही काही महत्त्व नाही;+ तर प्रेमाद्वारे कार्य करणारा विश्वास महत्त्वाचा आहे.
७ तुम्ही आजपर्यंत चांगलं धावत होता.+ मग, सत्याचं पालन करत राहण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं? ८ अशा प्रकारची शिकवण,* ज्याने तुम्हाला बोलावलं त्याच्याकडून नक्कीच नाही. ९ थोडंसं खमीरसुद्धा पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवतं.*+ १० प्रभूसोबत ऐक्यात असलेल्या तुमच्याबद्दल मला खातरी आहे,+ की तुम्ही माझ्यापेक्षा वेगळा विचार करणार नाही. पण जो तुम्हाला त्रास देतो,+ मग तो कोणी का असेना, त्याला योग्य दंड मिळेल. ११ बांधवांनो, मी जर अजूनही सुंतेबद्दल प्रचार करत असेन, तर मग अजूनही माझा छळ का केला जात आहे? मी खरंच तसं करत असतो, तर वधस्तंभामुळे* कोणाला अडखळण झालं नसतं.+ १२ मी तर म्हणतो, की तुमच्यामध्ये गोंधळ माजवायचा प्रयत्न करणाऱ्या माणसांनी स्वतःला नपुंसक करून घ्यावं. *
१३ बांधवांनो, तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. पण, या स्वातंत्र्याचा उपयोग आपल्या शारीरिक वासना पूर्ण करण्यासाठी करू नका,+ तर प्रेमाने एकमेकांचे दास व्हा.+ १४ कारण, “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर,”+ या एकाच आज्ञेत सबंध नियमशास्त्र पूर्ण* होतं. १५ पण जर तुम्ही एकमेकांशी भांडत असाल* आणि एकमेकांना फाडून खात असाल,+ तर सांभाळून राहा, कारण अशाने तुम्ही एकमेकांचा सर्वनाश कराल.+
१६ मी म्हणतो, पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत राहा,+ म्हणजे तुम्ही शारीरिक वासना पूर्ण करणारच नाही.+ १७ कारण शरीराची वासना ही पवित्र शक्तीच्या विरोधात आणि पवित्र शक्ती शरीराच्या विरोधात आहे. हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात आहेत; त्यामुळे, ज्या गोष्टी करण्याची तुमची इच्छा असते, नेमक्या त्याच गोष्टी तुम्ही करत नाही.+ १८ शिवाय, जर तुम्ही पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत असाल, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.
१९ आता शरीराची कामं तर अगदी स्पष्ट आहेत; ती म्हणजे, अनैतिक लैंगिक कृत्यं,*+ अशुद्धपणा, निर्लज्ज वर्तन,*+ २० मूर्तिपूजा, भूतविद्या,*+ वैर, भांडणं, हेवेदावे, रागाने भडकणं, मतभेद, फुटी, वेगवेगळे पंथ निर्माण करणं, २१ ईर्ष्या, दारुडेपणा,+ बेलगाम मौजमस्ती* आणि अशाच इतर गोष्टी.+ मी आधी दिला होता, तसाच पुन्हा एकदा तुम्हाला या गोष्टींबद्दल इशारा देतो, की अशा गोष्टी करत राहणारे देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.+
२२ याउलट, पवित्र शक्तीचं फळ म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा,+ विश्वास, २३ सौम्यता, आत्मसंयम.+ अशा गोष्टींविरुद्ध कोणताही नियम नाही. २४ शिवाय, जे ख्रिस्त येशूचे आहेत, त्यांनी आपल्या शरीराला त्याच्या सगळ्या वासनांसोबत आणि इच्छांसोबत वधस्तंभावर खिळलं आहे.+
२५ जर आपण पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगत असू, तर ती आपल्याला जसा मार्ग दाखवेल त्याप्रमाणे आपण सुव्यवस्थितपणे चालत राहू या.+ २६ आपण अहंकारी+ किंवा आपसात स्पर्धेची भावना उत्पन्न करणारे+ किंवा एकमेकांबद्दल ईर्ष्या बाळगणारे होऊ नये.
६ बांधवांनो, एखाद्या माणसाने नकळत एखादं चुकीचं पाऊल उचललं, तर ज्यांच्याकडे देवाने ठरवलेल्या पात्रता आहेत, ते तुम्ही अशा माणसाची चूक सौम्यतेने सुधारण्याचा प्रयत्न करा.+ पण, तुम्हीही मोहात पडू नये+ म्हणून स्वतःकडे लक्ष द्या.+ २ एकमेकांची ओझी वाहत राहा.+ अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.+ ३ कारण, काहीही नसताना जर आपण काहीतरी आहोत असा कोणी विचार करत असेल,+ तर तो स्वतःलाच फसवत आहे. ४ पण, प्रत्येकाने आपापल्या कामांचं परीक्षण करावं,+ म्हणजे मग दुसऱ्या कोणाशी तुलना केल्यामुळे नाही,+ तर स्वतःच्या कामांमुळे त्याला आनंदी होता येईल. ५ कारण प्रत्येक जण स्वतःचा भार* वाहील.+
६ तसंच, ज्याला देवाच्या वचनाचं शिक्षण दिलं* जात आहे, त्याने हे शिक्षण* देणाऱ्याला सगळ्या चांगल्या गोष्टींत आपल्यासोबत सहभागी करून घ्यावं.+
७ फसू नका: देवाची थट्टा केली जाऊ शकत नाही. कारण एखादा माणूस जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.+ ८ जो शरीरासाठी पेरणी करतो, तो आपल्या शरीरापासून नाशाच्या पिकाची कापणी करेल. पण, जो पवित्र शक्तीसाठी* पेरणी करतो, तो पवित्र शक्तीपासून सर्वकाळाच्या जीवनाची कापणी करेल.+ ९ म्हणून, आपण हिंमत हारून चांगलं ते करत राहायचं सोडू नये. कारण जर आपण खचून गेलो नाही,* तर योग्य वेळी आपल्या पदरी पीक पडेल.+ १० म्हणून, संधी* आहे तोपर्यंत आपण सगळ्यांचं आणि खासकरून विश्वासात असलेल्या आपल्या भाऊबहिणींचं भलं करू या.
११ पाहा! मी किती मोठ्या अक्षरांत स्वतःच्या हाताने तुम्हाला पत्र लिहिलं आहे.
१२ जे शरीराच्या बाबतीत इतरांवर छाप पाडायचा प्रयत्न करतात,* तेच तुम्हाला सुंता करायला भाग पाडत आहेत. ख्रिस्ताच्या वधस्तंभासाठी* त्यांचा छळ होऊ नये फक्त एवढ्यासाठी ते असं करतात. १३ कारण जे सुंता करतात ते स्वतःसुद्धा नियमशास्त्राचं पालन करत नाहीत.+ पण, तुमच्या शरीराबद्दल बढाई मारायचं निमित्त मिळावं, म्हणून तुमची सुंता व्हावी असं त्यांना वाटतं. १४ पण मला तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय* दुसऱ्या कशाचीही बढाई मारायची इच्छा नाही.+ त्याच्याद्वारे जग माझ्यासाठी मेलं* आहे आणि मी जगासाठी मेलो आहे. १५ कारण सुंता करण्याला किंवा न करण्याला काही महत्त्व नाही,+ तर नवीन सृष्टीला महत्त्व आहे.+ १६ जे या नियमाप्रमाणे सुव्यवस्थितपणे चालतात त्या सगळ्यांवर, अर्थात देवाच्या इस्राएलवर शांती आणि दया असो.+
१७ यापुढे कोणी मला त्रास देऊ नये; कारण माझ्या शरीरावर, येशूचा दास अशी माझी ओळख करून देणाऱ्या खुणा आहेत.+
१८ बांधवांनो, तुम्ही दाखवत असलेल्या चांगल्या मनोवृत्तीमुळे आपला प्रभू येशू ख्रिस्त याची अपार कृपा तुमच्यावर असो. आमेन.
किंवा “सध्याच्या दुष्ट काळापासून.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “त्याला इतक्या लवकर सोडून देऊन.”
शब्दशः “अगदी टोकाला जाऊन.”
शब्दशः “मांस आणि रक्त यांकडे.”
याला पेत्र असंही म्हणतात.
शब्दशः “जी धाव मी धावत आहे किंवा धावलो ती.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
याला पेत्र असंही म्हणतात.
किंवा “भागीदार.”
याला पेत्र असंही म्हणतात.
किंवा “विरोध केला.”
किंवा “तो दोषी होता.”
याला पेत्र असंही म्हणतात.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “झिडकारत.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “जाणून घ्यायचं.”
शब्दार्थसूची पाहा.
अति. क५ पाहा.
शब्दशः “बीजाला.”
शब्दशः “बीजांना.”
शब्दशः “बीजाला.”
शब्दशः “बीज.”
मूळ ग्रीक भाषेतल्या शब्दाचा अर्थ, मुलांची काळजी घेणारा किंवा रक्षण करणारा असा आहे.
मूळ ग्रीक भाषेतल्या शब्दाचा अर्थ, मुलांची काळजी घेणारा किंवा रक्षण करणारा असा आहे.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “ख्रिस्ताला धारण केलं आहे.”
शब्दशः “बीज.”
किंवा “प्राथमिक गोष्टींचे.”
शब्दार्थसूची पाहा.
हा ‘वडील’ या अर्थाचा हिब्रू किंवा ॲरामेईक (अरामी) भाषेतला शब्द आहे. सहसा मुलं आपल्या वडिलांना संबोधण्यासाठी हा शब्द वापरतात.
किंवा “माझ्यावर थुंकला नाहीत.”
किंवा “तयार होत नाही.”
शब्दशः “शरीरानुसार.”
शब्दशः “शरीरानुसार.”
किंवा “जुवात.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “अशा प्रकारचं मन वळवणं.”
किंवा “आंबवतं.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “स्वतःचं खच्चीकरण करावं; षंढ बनावं,” म्हणजे ज्या नियमशास्त्राचं ते समर्थन करत आहेत त्याचं पालन करायला ते योग्य राहणार नाहीत.
किंवा कदाचित, “नियमशास्त्राचं सार आहे.”
किंवा “एकमेकांना चावत असाल.”
ग्रीक पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “रंगेल पार्ट्या.”
किंवा “जबाबदारीचा भार.”
किंवा “तोंडी शिकवलं.”
किंवा “तोंडी शिक्षण.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “थकलो नाही.”
शब्दशः “ठरवलेली वेळ.”
किंवा “ज्यांना बाहेरून चांगलं दिसायचं आहे.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जगाला वधस्तंभावर खिळून मृत्युदंड देण्यात आला.”