जखऱ्या
१ दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षी,+ आठव्या महिन्यात जखऱ्या*+ संदेष्ट्याला यहोवाकडून* संदेश मिळाला; जखऱ्या हा बरेख्याचा मुलगा आणि इद्दोचा नातू होता. जखऱ्याला देवाकडून असा संदेश मिळाला: २ “तुमच्या वाडवडिलांवर यहोवाचा क्रोध भयंकर भडकला होता.+
३ आता लोकांना जाऊन सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “मी सैन्यांचा देव यहोवा आहे! माझ्याकडे परत या, म्हणजे मीही तुमच्याकडे परत येईन.”+ तुम्हाला हे सांगणारा मी सैन्यांचा देव यहोवा आहे.’
४ ‘तुमच्या वाडवडिलांसारखं होऊ नका. पूर्वीच्या संदेष्ट्यांनी त्यांना सांगितलं होतं, की “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘कृपया तुमची वाईट वागणूक आणि तुमची वाईट कामं सोडून द्या, आणि माझ्याकडे परत या.’”’+
‘पण त्यांनी माझं ऐकलं नाही किंवा माझ्याकडे लक्ष दिलं नाही,’+ असं यहोवा म्हणतो.
५ ‘आता कुठे आहेत तुमचे वाडवडील? आणि ते संदेष्टे तरी कुठे कायमचे जगले? ६ पण मी माझ्या सेवकांना, म्हणजे संदेष्ट्यांना जो संदेश आणि ज्या आज्ञा घोषित करायला सांगितल्या होत्या, त्या सगळ्या तुमच्या वाडवडिलांच्या बाबतीत खऱ्या ठरल्या नाहीत का?’+ तेव्हा ते माझ्याकडे परत आले आणि म्हणाले: ‘सैन्यांचा देव यहोवा याने आमच्या बाबतीत जे ठरवलं होतं ते त्याने केलंय. त्याने आम्हाला आमच्या वाईट वागणुकीचं आणि आमच्या वाईट कामांचं फळ दिलंय.’”+
७ मग दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षी,+ ११ व्या महिन्याच्या, म्हणजे शबाट* महिन्याच्या २४ व्या दिवशी, बरेख्याचा मुलगा आणि इद्दोचा नातू, जखऱ्या संदेष्टा याला यहोवाकडून परत संदेश मिळाला. ८ जखऱ्या म्हणाला: “मी रात्री एक दृष्टान्त पाहिला. मी पाहिलं, की एक माणूस लाल घोड्यावर स्वारी करत आला आणि खोल दरीत असलेल्या मेंदीच्या झुडपांमध्ये येऊन थांबला. त्याच्या मागे लाल, तपकिरी आणि पांढऱ्या रंगांचे घोडे होते.”
९ तेव्हा मी विचारलं: “प्रभू, हे कोण आहेत?”
त्यावर माझ्याशी बोलत असलेला स्वर्गदूत म्हणाला: “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.”
१० मग मेंदीच्या झुडपांमध्ये थांबलेला तो माणूस म्हणाला: “हे ते आहेत ज्यांना यहोवाने पृथ्वीवर फेरी मारण्यासाठी पाठवलंय.” ११ तेव्हा त्यांनी मेंदीच्या झुडपांमध्ये थांबलेल्या यहोवाच्या स्वर्गदूताला म्हटलं: “आम्ही पृथ्वीवर फेरी मारून आलो. आणि पाहा! संपूर्ण पृथ्वी शांत आहे, तिथे कोणतीही खळबळ नाही.”+
१२ त्यावर यहोवाचा स्वर्गदूत म्हणाला: “हे सैन्यांच्या देवा यहोवा, गेल्या ७० वर्षांपासून यरुशलेमवर आणि यहूदाच्या शहरांवर तुझा क्रोध भडकलेला आहे;+ आणखी किती काळ तू त्यांच्यावर दया करणार नाहीस?”+
१३ तेव्हा माझ्याशी बोलणाऱ्या स्वर्गदूताला यहोवाने प्रेमळ आणि सांत्वनदायक शब्दांत उत्तर दिलं. १४ मग तो स्वर्गदूत मला म्हणाला: “अशी घोषणा कर, की ‘सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “मी यरुशलेमचं आणि सीयोनचं आवेशाने, हो मोठ्या आवेशाने रक्षण करीन.+ १५ पण ज्या राष्ट्रांना असं वाटतं की आपण अगदी सुरक्षित आहोत, त्यांच्यावर माझा क्रोध भडकलाय.+ कारण मला माझ्या लोकांना खरंतर कमी शिक्षा करायची होती;+ पण त्या राष्ट्रांनी त्यांचा पूर्णच नाश करून टाकला.”’+
१६ म्हणून यहोवा म्हणतो: ‘“मी पुन्हा एकदा यरुशलेमवर दया करीन.+ तिथे माझं मंदिर पुन्हा बांधलं जाईल.”+ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, की “यरुशलेम पुन्हा बांधण्यासाठी मोजमाप घेतलं जाईल.”’*+
१७ आणखी एकदा अशी घोषणा कर: ‘सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, की “माझ्या शहरांमध्ये पुन्हा एकदा चांगुलपणा ओसंडून वाहील. आणि यहोवा पुन्हा सीयोनचं सांत्वन करेल+ आणि पुन्हा एकदा यरुशलेमची निवड करेल.”’”+
१८ मग मी नजर वर करून पाहिलं आणि मला चार शिंगं दिसली.+ १९ तेव्हा माझ्याशी बोलणाऱ्या स्वर्गदूताला मी विचारलं: “या शिंगांचा काय अर्थ होतो?” तो म्हणाला: “ही ती शिंगं आहेत ज्यांनी यहूदाची,+ इस्राएलची+ आणि यरुशलेमची पांगापांग केली.”+
२० मग यहोवाने मला चार कारागीर दाखवले. २१ मी विचारलं: “हे काय करतील?”
तेव्हा तो म्हणाला: “राष्ट्रांच्या त्या शिंगांनी यहूदाची इतकी पांगापांग केली, की एकालाही आपलं डोकं वर काढता आलं नाही. म्हणून हे कारागीर त्यांच्या मनात दहशत निर्माण करतील, आणि ज्या राष्ट्रांनी आपल्या शिंगांनी यहूदा देशाची पांगापांग केली त्यांची शिंगं ते मोडून टाकतील.”
२ मग मी नजर वर करून पाहिलं, तेव्हा हातात मोजमापाची दोरी असलेला एक माणूस मला दिसला.+ २ मी त्याला विचारलं: “तू कुठे चाललास?”
तो म्हणाला: “मी यरुशलेमचं मोजमाप घ्यायला चाललोय; तिची लांबी आणि रुंदी किती आहे ते पाहायला चाललोय.”+
३ मग पाहा! माझ्याशी बोलत असलेला स्वर्गदूत निघून गेला, आणि दुसरा एक स्वर्गदूत त्याला भेटायला आला. ४ तो त्याला म्हणाला: “धावत जाऊन त्या तरुण माणसाला सांग: ‘“यरुशलेममधल्या लोकांची आणि गुराढोरांची संख्या इतकी वाढेल,+ की सभोवती भिंती नसलेल्या खेड्यांसारखी तिच्यात लोकवस्ती होईल.+ ५ आणि मी स्वतः तिच्याभोवती आगीची भिंत होईन,+ आणि माझ्या वैभवाने यरुशलेम भरून जाईल,” असं यहोवा म्हणतो.’”+
६ “या! उत्तरेकडच्या देशातून पळून या!”+ असं यहोवा म्हणतो.
“कारण मी चारही दिशांना* तुमची पांगापांग केली आहे,”+ असं यहोवा म्हणतो.
७ “हे सीयोन, ये! बाबेलच्या* मुलीसोबत राहणारी तू, तिथून पळ काढ.+ ८ कारण गौरवशाली झाल्यावर ज्या सैन्यांच्या देवाने, यहोवाने मला तुमची लुटालूट करणाऱ्या राष्ट्रांकडे पाठवलं,+ तो असं म्हणतो: ‘जो तुम्हाला हात लावतो, तो जणू माझ्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावतो.+ ९ म्हणून आता मी माझा हात त्यांच्यावर उगारीन, आणि त्यांचेच गुलाम त्यांना लुटतील.’+ तेव्हा तुमची खातरी पटेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय.
१० हे सीयोनच्या मुली, आनंदाने जयजयकार कर!+ कारण मी येतोय,+ आणि मी तुझ्यामध्ये राहीन,”+ असं यहोवा म्हणतो. ११ “त्या दिवशी अनेक राष्ट्रं मला, यहोवाला येऊन मिळतील.+ ते माझे लोक होतील आणि मी त्यांच्यामध्ये राहीन.” तेव्हा तुमची खातरी पटेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय. १२ मग यहोवा, पवित्र जमिनीवरून आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल, आणि पुन्हा यरुशलेमला निवडेल.+ १३ सर्व मानवांनो, यहोवापुढे शांत राहा. कारण, तो आपल्या पवित्र निवासस्थानातून कार्य करायला निघाला आहे.
३ नंतर त्याने मला दाखवलं, की यहोवाच्या स्वर्गदूतासमोर महायाजक यहोशवा+ उभा आहे, आणि त्याचा विरोध करण्यासाठी सैतान+ त्याच्या उजवीकडे उभा आहे. २ मग यहोवाचा स्वर्गदूत सैतानाला म्हणाला: “अरे सैताना! यहोवा तुला धमकावो!+ हो, यरुशलेमची निवड+ करणारा यहोवा तुला धमकावो! हा यहोशवा, आगीतून बाहेर काढलेलं जळतं लाकूड नाही का?”
३ यहोशवा स्वर्गदूतासमोर उभा होता त्या वेळी यहोशवाच्या अंगावर मळके कपडे होते. ४ तेव्हा आपल्यासमोर उभे असलेल्यांना तो स्वर्गदूत म्हणाला: “याचे मळके कपडे काढा.” मग तो यहोशवाला म्हणाला: “पाहा! मी तुझा दोष* तुझ्यापासून दूर केलाय. आणि आता तुला चांगल्या प्रतीचे कपडे घातले जातील.”+
५ तेव्हा मी म्हणालो: “त्याच्या डोक्यावर एक स्वच्छ पगडी ठेवली जावी.”+ मग त्यांनी त्याच्या डोक्यावर एक स्वच्छ पगडी ठेवली आणि त्याला चांगले कपडे घातले. त्या वेळी यहोवाचा स्वर्गदूत जवळच उभा होता. ६ मग यहोवाचा स्वर्गदूत यहोशवाला म्हणाला: ७ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘तू जर नेहमी माझ्या मार्गांवर चाललास आणि माझ्यासमोर तुझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यास, तर तू माझ्या मंदिरात न्यायाधीश म्हणून सेवा करशील+ आणि माझ्या मंदिराच्या अंगणांची देखरेख* करशील; तसंच, इथे उभे असलेल्यांसारखंच मी तुलाही माझ्यासमोर येण्या-जाण्याची मोकळीक देईन.’
८ ‘हे महायाजक यहोशवा! कृपा करून ऐक. तू आणि तुझ्यासमोर बसणारे तुझे सोबती, तुम्ही सगळे भविष्यासाठी एक चिन्ह व्हाल. पाहा! मी ‘अंकुर’+ म्हटलेल्या माझ्या सेवकाला+ आणतोय! ९ मी यहोशवासमोर जो दगड ठेवलाय तो पाहा! त्या एका दगडाला सात डोळे आहेत* आणि त्यावर मी काहीतरी कोरून लिहितोय. याशिवाय, मी त्या देशाचा अपराध एका दिवसात दूर करीन,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.+
१० ‘त्या दिवशी, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्याला आपल्या द्राक्षवेलीखाली आणि अंजिराच्या झाडाखाली यायचं आमंत्रण देईल,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”+
४ मग जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो परत आला, आणि एखाद्याला झोपेतून उठवावं तसं त्याने मला उठवलं. २ तो मला म्हणाला: “तुला काय दिसतंय?”
तेव्हा मी म्हणालो: “मला सोन्याचा एक दीपवृक्ष* दिसतोय.+ त्याच्या टोकावर एक वाटी आहे, आणि दीपवृक्षावर सात दिवे+ आहेत. हो, सात दिवे! आणि दीपवृक्षावरच्या या दिव्यांना सात नळ्या आहेत. ३ आणि दीपवृक्षाच्या शेजारी जैतुनाची दोन झाडं+ आहेत; एक झाड वाटीच्या उजवीकडे, तर दुसरं वाटीच्या डावीकडे आहे.”
४ मग माझ्याशी बोलणाऱ्या स्वर्गदूताला मी विचारलं: “माझ्या प्रभू, या गोष्टींचा काय अर्थ होतो?” ५ तेव्हा माझ्याशी बोलणारा तो स्वर्गदूत मला म्हणाला: “या गोष्टींचा काय अर्थ होतो हे तुला माहीत नाही का?”
मी म्हणालो: “नाही माझ्या प्रभू, मला माहीत नाही.”
६ त्यावर तो मला म्हणाला: “जरूब्बाबेलसाठी यहोवाचा असा संदेश आहे: ‘“सैन्याच्या बळाने नाही किंवा माणसाच्या ताकदीने नाही,+ तर माझ्या पवित्र शक्तीने* हे सगळं घडून येईल,”+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. ७ हे मोठ्या पर्वता! तू कोण आहेस? जरूब्बाबेलसमोर+ तू सपाट मैदान होशील!+ आणि “खूप छान! खूप छान” असा जयजयकार होत असताना, तो मंदिराचा वरचा दगड घेऊन येईल.’”
८ नंतर पुन्हा एकदा मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ९ “जरूब्बाबेलच्या हातांनी या मंदिराचा पाया घातलाय+ आणि मंदिराचं बांधकामही त्याचेच हात पूर्ण करतील.+ मग तुम्हाला कळेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय. १० लहान गोष्टींच्या दिवसाला* कोणीही तुच्छ लेखू नये!+ कारण जरूब्बाबेलच्या हातात ओळंबा* पाहून त्यांना खूप आनंद होईल. हे सात डोळे म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर नजर असलेले यहोवाचे डोळे आहेत.”+
११ मग मी त्याला विचारलं: “दीपवृक्षाच्या उजवीकडे आणि डावीकडे असलेल्या दोन जैतुनाच्या झाडांचा काय अर्थ होतो?”+ १२ मी दुसऱ्यांदा त्याला विचारलं: “सोन्याच्या दोन नळ्यांतून सोनेरी तेल ओतणाऱ्या जैतुनाच्या झाडांच्या त्या दोन फांद्यांचा* काय अर्थ होतो?”
१३ तेव्हा त्याने मला विचारलं: “या गोष्टींचा काय अर्थ होतो हे तुला माहीत नाही का?”
मी म्हणालो: “नाही माझ्या प्रभू, मला माहीत नाही.”
१४ तो म्हणाला: “संपूर्ण पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे दोन अभिषिक्त आहेत.”+
५ मी पुन्हा नजर वर करून पाहिलं, तेव्हा मला उडत असलेली एक गुंडाळी दिसली. २ स्वर्गदूताने मला विचारलं: “तुला काय दिसतंय?”
मी म्हणालो: “मला उडत असलेली एक गुंडाळी दिसत आहे. तिची लांबी २० हात* आणि रुंदी १० हात आहे.”
३ त्यावर तो मला म्हणाला: “संपूर्ण पृथ्वीवर येणारा हा शाप आहे. कारण, गुंडाळीच्या एका बाजूला लिहिल्याप्रमाणे चोरी करणारा शापित आहे;+ पण तरीही त्याला शिक्षा झालेली नाही. आणि गुंडाळीच्या दुसऱ्या बाजूला लिहिल्याप्रमाणे खोटी शपथ घेणारा शापित आहे;+ पण तरीही त्याला शिक्षा झालेली नाही. ४ म्हणून ‘मी तो शाप पाठवलाय,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. ‘तो शाप चोरी करणाऱ्याच्या आणि माझ्या नावाने खोटी शपथ घेणाऱ्याच्या घरात शिरेल आणि तिथेच राहील. तिथे राहून तो ते घर त्याच्या लाकडांसकट आणि दगडांसकट नष्ट करेल.’”
५ मग माझ्याशी बोलत असलेला स्वर्गदूत पुढे आला आणि मला म्हणाला: “आता आपली नजर वर कर आणि काय जात आहे ते बघ.”
६ तेव्हा मी विचारलं: “हे काय आहे?”
तो म्हणाला: “हे एफाचं भांडं* जात आहे.” तो पुढे म्हणाला: “संपूर्ण पृथ्वीवरच्या दुष्ट लोकांचं हे रूप आहे.” ७ मग मी पाहिलं, की त्या भांड्यावरचं शिशाचं गोल झाकण काढण्यात आलं, आणि त्यात एक स्त्री बसली होती. ८ तेव्हा तो म्हणाला: “ही दुष्टता आहे.” मग त्याने तिला परत त्या एफाच्या भांड्यात ढकललं, आणि भांड्याचं तोंड वजनदार शिशाच्या झाकणाने बंद केलं.
९ मग मी वर पाहिलं, तेव्हा मला दोन स्त्रिया उडत येताना दिसल्या; त्यांचे पंख करकोचा पक्षाच्या पंखांसारखे होते. त्यांनी ते एफाचं भांडं आकाशात* उचलून नेलं. १० म्हणून माझ्याशी बोलत असलेल्या स्वर्गदूताला मी विचारलं: “एफाचं भांडं त्या कुठे घेऊन चालल्या आहेत?”
११ तो म्हणाला: “ते शिनार*+ देशात तिच्यासाठी घर बांधायला चालल्या आहेत. घर तयार झाल्यावर ते तिला त्या घरात, तिच्या योग्य ठिकाणी ठेवतील.”
६ मग मी पुन्हा नजर वर करून पाहिलं, तेव्हा मला दोन पर्वतांच्या मधून चार रथ येताना दिसले; हे दोन पर्वत तांब्याचे होते. २ त्यातल्या पहिल्या रथाला लाल घोडे, दुसऱ्या रथाला काळे घोडे,+ ३ तिसऱ्या रथाला पांढरे घोडे आणि चौथ्या रथाला ठिपकेदार घोडे व वेगवेगळे रंगांचे चट्टे असलेले घोडे होते.+
४ तेव्हा, माझ्याशी बोलत असलेल्या स्वर्गदूताला मी विचारलं: “माझ्या प्रभू, यांचा काय अर्थ होतो?”
५ त्यावर तो स्वर्गदूत म्हणाला: “हे चार स्वर्गदूत* आहेत.+ ते संपूर्ण पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे होते+ आणि आता ते बाहेर निघत आहेत. ६ काळे घोडे असलेला रथ उत्तरेकडच्या देशाकडे+ जात आहे; पांढरे घोडे समुद्राच्या पलीकडे जात आहेत; ठिपकेदार घोडे दक्षिणेकडच्या देशाकडे जात आहेत. ७ आणि वेगवेगळ्या रंगांचे चट्टे असलेले घोडे संपूर्ण पृथ्वीवर फिरण्यासाठी उत्सुक आहेत.” तेव्हा तो म्हणाला: “जा, संपूर्ण पृथ्वीवर फिरा.” मग ते संपूर्ण पृथ्वीवर फिरू लागले.
८ नंतर त्याने मला हाक मारून म्हटलं: “पाहा! उत्तरेकडच्या देशाला जाणाऱ्या घोड्यांनी, त्या देशाविरुद्ध असलेला यहोवाचा राग शांत केलाय.”
९ मग मला पुन्हा यहोवाकडून असा संदेश मिळाला: १० “हेल्दय, तोबीयाह आणि यदाया यांनी बंदिवासातल्या लोकांकडून ज्या गोष्टी आणल्यात त्या त्यांच्याकडून घे. आणि त्याच दिवशी तू सफन्याचा मुलगा योशीया याच्या घरी जा. बाबेलमधून आलेल्या या लोकांनाही आपल्यासोबत घेऊन जा. ११ तू सोनं-चांदी घेऊन त्यांपासून एक सुंदर मुकुट बनव, आणि तो मुकुट महायाजक यहोसादाक याचा मुलगा यहोशवा+ याच्या डोक्यावर ठेव. १२ मग त्याला सांग,
‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “पाहा! ज्याला ‘अंकुर’+ म्हटलं आहे, तो हा आहे. तो आपल्या स्थानातून उगवेल आणि यहोवाचं मंदिर बांधेल.+ १३ यहोवाचं मंदिर बांधणारा हाच आहे आणि यालाच गौरव मिळेल. तो आपल्या राजासनावर बसेल आणि राज्य करेल. शिवाय तो याजकही असेल.+ तसंच, या दोन्हींमध्ये* चांगला ताळमेळ असेल. १४ आणि यहोवाच्या मंदिरात हेलेम, तोबीयाह, यदाया+ आणि सफन्याचा मुलगा हेन यांची आठवण म्हणून तो सुंदर मुकुट ठेवला जाईल. १५ मग दुरून लोक येतील आणि यहोवाचं मंदिर बांधण्याच्या कामात हातभार लावतील.” त्या वेळी तुम्हाला कळेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय. आपला देव यहोवा याचं तुम्ही काळजीपूर्वक ऐकलंत, तर हे सगळं घडून येईल.’”
७ दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी, किसलेव* महिन्याच्या म्हणजे नवव्या महिन्याच्या चौथ्या दिवशी, जखऱ्याला+ यहोवाकडून संदेश मिळाला. २ यहोवाकडून दयेची भीक मिळावी, म्हणून बेथेलच्या लोकांनी शरेसरला आणि रगेम्मेलेक व त्याच्या माणसांना पाठवलं. ३ त्यांनी त्यांना सैन्यांचा देव यहोवा याच्या संदेष्ट्यांकडे आणि मंदिरातल्या याजकांकडे असं विचारायला पाठवलं: “मी वर्षानुवर्षं शोक आणि उपास करत आलोय, तसा पाचव्या महिन्यात करावा का?”+
४ मग सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून मला पुन्हा असा संदेश मिळाला: ५ “देशातल्या सगळ्या लोकांना आणि याजकांना असं विचार, की ‘तुम्ही ७० वर्षं,+ पाचव्या आणि सातव्या महिन्यात+ जो उपास आणि शोक केला, तो खरोखर माझ्यासाठीच केला का? ६ तुम्ही खातपीत होता तेव्हा ते स्वतःसाठीच करत नव्हता का? ७ यरुशलेममध्ये आणि तिच्या आसपासच्या नगरांमध्ये जेव्हा लोकवस्ती होती, आणि तिथे शांती होती; तसंच, नेगेबमध्ये आणि शेफीलामध्येही लोकवस्ती होती, तेव्हा यहोवाने त्याच्या पूर्वीच्या संदेष्ट्यांद्वारे ज्या आज्ञा दिल्या होत्या, त्या तुम्ही पाळायला नकोत का?’”+
८ मग जखऱ्याला यहोवाकडून पुन्हा असा संदेश मिळाला: ९ “सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘खरेपणाने न्याय करा,+ एकमेकांशी प्रेमाने*+ आणि दयेने वागा. १० विधवांना किंवा अनाथांना,*+ गरिबांना किंवा विदेशी लोकांना फसवू नका;+ आपल्या मनात एकमेकांचं वाईट करण्याचं कटकारस्थान रचू नका.’+ ११ पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.+ त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि आपली अडेल वृत्ती सोडली नाही.+ ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी आपले कान बंद केले.+ १२ त्यांनी आपलं मन दगडासारखं* कठीण केलं.+ आणि सैन्यांचा देव यहोवा याने पूर्वीच्या संदेष्ट्यांकडून आपल्या पवित्र शक्तीद्वारे जे नियम* आणि ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या त्या त्यांनी पाळल्या नाहीत.+ म्हणून सैन्यांचा देव यहोवा याचा क्रोध त्यांच्यावर भडकला.”+
१३ “‘मी हाक मारली तेव्हा त्यांनी जसं माझं ऐकलं नाही,+ तसंच त्यांनी हाक मारली तेव्हा मीही त्यांचं ऐकलं नाही,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. १४ ‘आणि मी वादळी वाऱ्याने त्यांची अशा राष्ट्रांमध्ये पांगापांग केली जी त्यांना माहीत नव्हती.+ आणि त्यांच्यामागे त्यांचा देश ओसाड पडला; त्यातून कोणीही आलं-गेलं नाही.+ कारण ‘सुंदर देशाची’ अशी दशा झाली, की बघणाऱ्यांच्या मनात दहशत बसली.’”
८ सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून मला पुन्हा एकदा असा संदेश मिळाला: २ “सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘मी मोठ्या आवेशाने सीयोनचा बचाव करीन,+ आणि क्रोधित होऊन मी तिचं रक्षण करीन.’”
३ “यहोवा म्हणतो: ‘मी सीयोनकडे परत येईन+ आणि यरुशलेममध्ये राहीन.+ यरुशलेम खरेपणाचं* शहर म्हणून ओळखलं जाईल,+ आणि सैन्यांचा देव यहोवा याच्या पर्वताला पवित्र पर्वत म्हटलं जाईल.’”+
४ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘यरुशलेमच्या चौकाचौकांत वृद्ध स्त्री-पुरुष पुन्हा बसतील. आपल्या आयुष्याची बरीच वर्षं जगल्यामुळे, ते हातात काठी घेऊन बसतील.+ ५ आणि शहरातले चौक तिथे खेळणाऱ्या मुला-मुलींनी गजबजून जातील.’”+
६ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘त्या दिवसांत, या लोकांपैकी उरलेल्यांना जरी ही गोष्ट अशक्य वाटली, तरी ती माझ्यासाठी अशक्य असेल का?’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”
७ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘मी माझ्या लोकांना पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या राष्ट्रांतून सोडवून आणीन.+ ८ मी त्यांना यरुशलेममध्ये आणीन आणि ते तिथे वस्ती करतील.+ ते माझे लोक होतील आणि खरेपणाने* व नीतीने वागणारा मी त्यांचा देव होईन.’”+
९ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘संदेष्टे+ सांगत आहेत त्या गोष्टी ऐकणाऱ्या लोकांनो! तुम्ही हिंमत धरा!*+ या गोष्टी, सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिराचा पाया घालण्यात आला, त्या दिवशीही सांगण्यात आल्या होत्या. १० याआधी माणसांना किंवा जनावरांना त्यांच्या कामाची मजुरी दिली जात नव्हती.+ आणि शत्रूंमुळे प्रवास करणं धोकादायक झालं होतं. कारण मी सगळ्या माणसांना एकमेकांच्या विरुद्ध केलं होतं.’
११ ‘पण आता, मी पूर्वी जसा वागलो तसा या उरलेल्या लोकांसोबत वागणार नाही,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. १२ ‘कारण शांतीचं बी पेरलं जाईल आणि द्राक्षवेल आपलं फळ देईल; पृथ्वी आपलं उत्पन्न देईल+ आणि आकाशातून दव पडेल. या सगळ्या गोष्टी मी उरलेल्या लोकांना वारसा म्हणून देईन.+ १३ हे यहूदाच्या आणि इस्राएलच्या घराण्या! राष्ट्रं तुमची नावं शाप देताना वापरायची.+ पण मी तुम्हाला वाचवीन आणि यापुढे ती राष्ट्रं तुमची नावं आशीर्वाद देताना वापरतील.+ तुम्ही घाबरू नका!+ हिंमत धरा!’*+
१४ कारण सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘“तुमच्या वाडवडिलांनी मला क्रोध आणल्यामुळे मी तुमच्यावर संकट आणण्याचा पक्का निश्चय केला होता, आणि त्या बाबतीत मी माझा विचारही बदलला नव्हता,”* असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.+ १५ “तसंच, आता मी यरुशलेमसाठी आणि यहूदाच्या घराण्यासाठी चांगलं करण्याचा पक्का निश्चय केलाय.+ म्हणून तुम्ही घाबरू नका!”’+
१६ ‘तुम्ही या गोष्टी करा: एकमेकांसोबत खरं बोला+ आणि आपल्या शहराच्या दरवाजांत खरेपणाने न्याय करा; असा न्याय करा ज्यामुळे शांती निर्माण होईल.+ १७ आपल्या मनात एखाद्याचं वाईट करण्याचं कटकारस्थान रचू नका+ आणि खोट्या शपथेची आवड धरू नका.+ कारण या सगळ्या गोष्टींचा मला तिरस्कार आहे,’+ असं यहोवा म्हणतो.”
१८ सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून मला पुन्हा असा संदेश मिळाला: १९ “सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यांतले उपासांचे दिवस,+ यहूदाच्या घराण्यासाठी आनंदाचे आणि हर्षाचे दिवस होतील; ते आनंदोत्सवाने सण साजरा करण्याचे दिवस होतील.+ म्हणून खरेपणाची आणि शांतीची आवड धरा.’
२० सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘पुढे असं होईल, की राष्ट्रा-राष्ट्रांतले आणि पुष्कळ शहरांतले लोक येतील; २१ आणि एका शहरातले लोक दुसऱ्या शहरातल्या लोकांकडे जाऊन त्यांना म्हणतील: “चला, आपण लवकर जाऊ! आणि यहोवाकडून दयेची भीक मागू आणि सैन्यांचा देव यहोवा याची सेवा करू. आम्हीसुद्धा चाललोय.”+ २२ तेव्हा, मोठमोठी राष्ट्रं आणि राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक यरुशलेममध्ये सैन्यांचा देव यहोवा याची सेवा करायला आणि यहोवाकडे दयेची भीक मागायला येतील.’+
२३ सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘त्या दिवसांत, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व राष्ट्रांमधून+ दहा माणसं एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील आणि म्हणतील: “आम्हालाही तुमच्याबरोबर यायचंय.+ कारण आम्ही ऐकलंय, की देव तुमच्यासोबत आहे.”’”+
९ देवाकडून असलेला संदेश:
“यहोवाचा संदेश हद्राख देशाविरुद्ध आहे,
आणि दिमिष्क त्याच्या निशाण्यावर आहे.+
(कारण यहोवाची नजर मानवजातीवर आहे,+
त्याची नजर इस्राएलच्या सर्व वंशांवर आहे.)
२ तिच्या शेजारी असलेल्या हमाथविरुद्ध तो संदेश आहे,+
सोर आणि सीदोन+ शहाण्या असल्या, तरी तो संदेश त्यांच्याविरुद्ध आहे.+
३ सोरने आपल्याभोवती मजबूत भिंत उभी केली.*
तिने धुळीच्या कणांइतकी असंख्य चांदी,
आणि रस्त्यांवरच्या मातीइतकं भरमसाट सोनं जमा केलं.+
४ पण पाहा! यहोवा तिची सगळी संपत्ती काढून घेईल.
५ अष्कलोन ते पाहील आणि भयभीत होईल;
गाझाला मोठ्या यातना होतील.
आशा धुळीस मिळाल्यामुळे एक्रोनचेही तेच हाल होतील,
आणि अष्कलोनमध्ये कधीही लोकवस्ती होणार नाही.+
७ मी त्याच्या तोंडातून रक्ताने माखलेल्या गोष्टी,
आणि त्याच्या दातांमधून घृणास्पद गोष्टी काढून टाकीन.
आणि पलिष्ट्यातून जो कोणी उरेल तो आमच्या देवाचा होईल.
८ माझ्या घराचं रक्षण करण्यासाठी मी स्वतः घराबाहेर तळ देईन,+
म्हणजे कोणताही शत्रू तिथून ये-जा करणार नाही.
आणि पुन्हा कधी जुलूम करणारा तिथून जाऊ शकणार नाही.+
कारण आता मी सर्वकाही* स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे.
९ सीयोनच्या मुली, आनंद कर!
यरुशलेमच्या मुली, मोठ्याने जयघोष कर!
पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे.+
तो नीतीने वागणारा आहे, आणि त्याच्याजवळ तारण आहे.*
तो नम्र आहे.+ तो गाढवावर,
गाढवीच्या पिल्लावर बसून येत आहे.+
१० मी एफ्राईममधले युद्धाचे रथ,
आणि यरुशलेममधले घोडे काढून घेईन.
युद्धाची धनुष्यं काढून घेतली जातील.
आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल.+
त्याचं राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत,
११ हे स्त्री,* तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्या कराराच्या रक्तामुळे,
मी तुझ्या बंदिवानांना कोरड्या विहिरीतून बाहेर काढीन.+
१२ आशा धरून राहिलेल्या बंदिवानांनो! तुम्ही मजबूत किल्ल्यात परत या.+
आज मी तुला सांगतो,
‘हे स्त्री, मी तुला दुप्पट आशीर्वाद देईन!+
१३ कारण यहूदाला मी माझ्या धनुष्यासारखं वाकवीन.
आणि त्या धनुष्यावर एफ्राईमला मी बाण म्हणून लावीन.
हे सीयोन! मी तुझ्या मुलांना ग्रीसच्या मुलांविरुद्ध उठवीन.
आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखं बनवीन.’
१४ यहोवा दाखवून देईल, की तो त्याच्या लोकांसोबत आहे.
त्याचा बाण विजेसारखा सुटेल.
सर्वोच्च प्रभू यहोवा रणशिंग फुंकेल,+
आणि दक्षिणेकडच्या वादळासोबत तो पुढे जाईल.
१५ सैन्यांचा देव यहोवा त्यांचं रक्षण करेल,
शत्रू त्यांच्यावर गोफणींच्या दगडांनी हल्ला करतील, पण ते त्या शत्रूंना हरवून टाकतील.+
द्राक्षारस पिऊन करावा तसा आनंद आणि जयघोष ते करतील.
बलिदानांच्या वाट्यांसारखे,
आणि वेदीच्या कोपऱ्यांसारखे ते भरून जातील.+
१६ त्या दिवशी त्यांचा देव यहोवा त्यांना वाचवेल,
तो आपल्या लोकांचा कळपासारखा बचाव करेल.+
कारण ते त्याच्या देशात, मुकुटात चमकणाऱ्या रत्नांसारखे होतील.+
१७ देवाचा चांगुलपणा किती महान आहे!+
त्याचं वैभव किती थोर आहे!
अन्नधान्य खाऊन तरुण बलवान होतील,
आणि नवा द्राक्षारस तरुणींना उत्साह देईल.”+
१० “वसंतातल्या पावसाच्या काळात, यहोवाकडे पावसासाठी विनंती करा.
कारण काळे घनदाट ढग बनवणारा यहोवाच आहे,
तो लोकांसाठी पाऊस पाडतो,+
आणि प्रत्येकासाठी शेतात हिरवळही तोच उगवतो.
ते निरर्थक स्वप्नांबद्दल बोलतात,
आणि व्यर्थ सांत्वन देण्याचा प्रयत्न करतात.
म्हणून ते मेंढरांसारखे भटकतील,
आणि कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांना दुःख सोसावं लागेल.
३ मेंढपाळांवर माझा क्रोध भडकलाय,
मी जुलूम करणाऱ्या पुढाऱ्यांकडून हिशोब घेईन;
कारण सैन्यांचा देव यहोवा याने त्याच्या कळपाकडे, यहूदाच्या घराण्याकडे लक्ष दिलंय.+
त्याने लढाईतल्या त्याच्या वैभवशाली घोड्यासारखं त्यांना बनवलंय.
४ त्यांच्यातून एक प्रमुख* निघेल,
त्यांच्यातून मदत करणारा शासक* येईल,
युद्धाचं एक धनुष्य त्यांच्यातूनच निघेल,
आणि देखरेख करणारा प्रत्येक जण त्यांच्यापासूनच येईल.
हे सगळे एकत्र निघतील.
५ युद्धाच्या वेळी रस्त्यावरचा चिखल तुडवत जाणाऱ्या योद्ध्यांसारखे ते होतील.
६ मी यहूदाच्या घराण्याला शक्तिशाली बनवीन,
मी योसेफच्या घराण्याला वाचवीन.+
मी त्यांच्यावर दया करीन,+
आणि त्यांना पुन्हा त्यांच्या देशात घेऊन येईन;
मी कधी त्यांचा त्याग केलाच नव्हता असे ते होतील.+
कारण मी त्यांचा देव यहोवा आहे, आणि मी त्यांच्या प्रार्थना ऐकीन.
७ एफ्राईमचे लोक शूर योद्ध्यांसारखे होतील,
द्राक्षारसाने होतो, तसा आनंद त्यांच्या मनाला होईल.+
हे पाहून त्यांची मुलं हर्ष करतील;
यहोवामुळे त्यांचं मन आनंदी होईल.+
८ ‘मी शिट्टी वाजवून* त्यांना एकत्र करीन;
मी त्यांना सोडवून घेईन+ व त्यांची संख्या खूप वाढेल,
आणि पुढेही ती तशीच वाढत जाईल.
९ मी त्यांना राष्ट्रांमध्ये बीयांसारखं जरी विखुरलं,
तरी ते तिथे, दूरच्या देशांतही माझी आठवण ठेवतील;
ते आणि त्यांची मुलं-मुली नवीन शक्ती मिळवतील आणि परत येतील.
११ मी समुद्राची शांतता भंग करून पार जाईन
आणि त्याच्या लाटा हाणून पाडीन.+
मी नाईल नदीचं सगळं पाणी सुकवून टाकीन.
अश्शूरचा गर्व उतरवला जाईल,
आणि इजिप्तचा राजदंड त्याच्यापासून निघून जाईल.+
११ “हे लबानोन! आपले दरवाजे उघड,
म्हणजे अग्नी तुझे देवदार वृक्ष भस्म करेल.
२ हे गंधसरू, आक्रोश कर! कारण देवदार पडलाय;
उंच-उंच झाडांचा नाश झालाय.
बाशानच्या अल्लोन* वृक्षांनो शोक करा,
कारण घनदाट जंगल जमीनदोस्त झालंय.
३ ऐका! मेंढपाळांचा आक्रोश ऐका!
कारण त्यांचं वैभव धुळीस मिळालंय.
ऐका! तरुण सिंहांची गर्जना ऐका!
कारण यार्देनच्या किनाऱ्यावर असलेली घनदाट अरण्यं नष्ट झाली आहेत.
४ माझा देव यहोवा म्हणतो, ‘कापण्यासाठी नेमलेल्या मेंढरांचा मेंढपाळ हो.+ ५ त्या मेंढरांना विकत घेणारे त्यांना कापतात,+ आणि तरीही त्या लोकांना कोणी दोषी ठरवत नाही. त्यांना विकणारे+ म्हणतात: “यहोवाची स्तुती होवो, कारण आता मी श्रीमंत होईन.” आणि त्या मेंढरांच्या मेंढपाळांना त्यांची जराही दया येत नाही.’+
६ यहोवा म्हणतो: ‘यापुढे मी या देशात राहणाऱ्या लोकांवर दया करणार नाही. मी प्रत्येक माणसाला त्याच्या शेजाऱ्याच्या आणि त्याच्या राजाच्या हाती देईन; ते देशाचा नाश करतील आणि मी त्यांना त्यांच्या हातून वाचवणार नाही.’”
७ तेव्हा कापण्यासाठी नेमलेल्या कळपाचा मी मेंढपाळ झालो;+ कळपातल्या त्रासलेल्यांसाठी! हो, तुमच्यासाठी मी मेंढपाळ झालो! मग मी दोन काठ्या घेतल्या. एका काठीला मी कृपा असं नाव दिलं, तर दुसऱ्या काठीला ऐक्य असं नाव दिलं.+ आणि मी कळप चारू लागलो. ८ मी एका महिन्यात तीन मेंढपाळांना काढून टाकलं. कारण मी त्यांचं आणखी सहन करू शकत नव्हतो, आणि तेही माझा द्वेष करत होते. ९ मी म्हणालो: “यापुढे मी मेंढरांची काळजी घेणार नाही. तुमच्यापैकी कोणी मेला, तर मरू द्या; कोणी नष्ट झाला, तर नष्ट होऊ द्या. आणि जे उरतील त्यांना एकमेकांना फाडून खाऊ द्या.” १० मग मी कृपा नावाची माझी काठी घेतली+ आणि तिचे कापून तुकडे केले; सगळ्या लोकांसोबत मी जो करार केला होता, तो मी मोडून टाकला. ११ अशा प्रकारे त्या दिवशी तो करार मोडण्यात आला. आणि कळपामधली त्रासलेली जी मेंढरं मला बघत होती, त्यांना कळलं की हा संदेश यहोवाकडून आहे.
१२ त्यानंतर मी त्यांना म्हणालो: “तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला माझी मजुरी द्या, नाहीतर नका देऊ.” मग त्यांनी मला माझी मजुरी म्हणून चांदीचे ३० तुकडे दिले.+
१३ तेव्हा यहोवा मला म्हणाला: “जा आणि ते तुकडे खजिन्यात फेकून दे. त्यांनी खरंच माझी खूप मोठी किंमत लावली आहे!”+ म्हणून मी चांदीचे ते ३० तुकडे घेतले आणि यहोवाच्या मंदिरातल्या खजिन्यात फेकून दिले.+
१४ मग मी ऐक्य नावाच्या माझ्या दुसऱ्या काठीचे कापून तुकडे केले.+ अशा प्रकारे यहूदा आणि इस्राएलमधलं भावा-भावांसारखं नातं संपलं.+
१५ मग यहोवा मला म्हणाला: “आता, काहीही कामाचा नाही अशा मेंढपाळाची साधनसामग्री घे.+ १६ कारण मी देशावर एका मेंढपाळाला अधिकारी होऊ देतोय. तो मरायला टेकलेल्या मेंढरांची काळजी घेणार नाही,+ लहान मेंढरांना शोधणार नाही, जखमी मेंढरांची मलमपट्टी करणार नाही,+ आणि सुदृढ मेंढरांना चारणार नाही. याउलट, तो धष्टपुष्ट मेंढरांना फाडून खाईल+ आणि मेंढरांचे खूर उपटून टाकेल.+
१७ आपल्या कळपाला सोडून देणाऱ्या+ व्यर्थ मेंढपाळाचा धिक्कार असो!+
तलवार त्याच्या हातावर आणि उजव्या डोळ्यावर वार करेल.
त्याचा संपूर्ण हात सुकून जाईल,
आणि तो उजव्या डोळ्याने पूर्णपणे आंधळा होईल.”
१२ देवाकडून असलेला संदेश:
ज्या यहोवा देवाने आकाश पसरवलं,+
पृथ्वीचा पाया घातला,+
आणि माणसात जीवनाचा श्वास फुंकला,
तो म्हणतो, “इस्राएलबद्दल यहोवाचा असा संदेश आहे:
२ मी यरुशलेमला असा प्याला* बनवीन, जो पिऊन आजूबाजूची राष्ट्रं लटपटतील. यहूदाला आणि यरुशलेमला वेढा घातला जाईल.+ ३ त्या दिवशी मी यरुशलेमला सगळ्या राष्ट्रांसाठी एखाद्या जड दगडासारखं करीन. जो कोणी तो उचलेल, तो जबर जखमी होईल.+ पृथ्वीवरची सगळी राष्ट्रं यरुशलेमविरुद्ध गोळा होतील.”+ ४ यहोवा म्हणतो, “त्या दिवशी मी प्रत्येक घोड्याला गोंधळून सोडीन आणि त्याच्यावर स्वारी करणाऱ्याला वेडं करीन. माझी नजर यहूदाच्या घराण्यावर राहील. पण, राष्ट्रांच्या सगळ्या घोड्यांना मी आंधळं करीन. ५ आणि यहूदाचे शेख* आपल्या मनात म्हणतील, ‘यरुशलेमचे राहणारे आपल्यासाठी पाठबळ आहेत. कारण सैन्यांचा यहोवा त्यांचा देव आहे.’+ ६ त्या दिवशी मी यहूदाच्या शेखांना लाकडांमध्ये पेटलेल्या आगीसारखं करीन; नुकत्याच कापलेल्या धान्याच्या पेंढ्यांमधल्या एखाद्या जळत्या मशालीसारखं मी त्यांना करीन.+ ते आपल्या उजवीकडच्या व डावीकडच्या सगळ्या राष्ट्रांना भस्म करतील.+ आणि यरुशलेमचे रहिवासी परत आपल्या जागी, यरुशलेममध्ये राहतील.+
७ यहोवा आधी यहूदाचे तंबू वाचवेल, आणि त्यामुळे दावीदच्या घराण्याचं वैभव आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांचं वैभव यहूदापेक्षा जास्त होणार नाही. ८ त्या दिवशी यहोवा एखाद्या ढालीसारखं यरुशलेमच्या लोकांचं रक्षण करेल.+ त्या दिवशी त्यांच्यापैकी जो सगळ्यात दुर्बळ असेल,* तो दावीदसारखा बलवान होईल. आणि दावीदचं घराणं देवासारखं, लोकांच्या पुढे चालणाऱ्या यहोवाच्या स्वर्गदूतासारखं होईल.+ ९ त्या दिवशी यरुशलेमवर हल्ला करायला येणाऱ्या सगळ्या राष्ट्रांचा मी नक्कीच सर्वनाश करीन.+
१० मी दावीदच्या घराण्यावर आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्यांवर माझ्या पवित्र शक्तीचा* वर्षाव करीन; ते मला याचना करतील आणि मी त्यांच्यावर कृपा करीन. ज्याला त्यांनी भोसकलं,+ त्याच्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका मुलासाठी कोणी आक्रोश करावा, तसा आक्रोश ते त्याच्यासाठी करतील. पहिला जन्मलेला मुलगा मेल्यावर मोठ्याने रडून शोक करावा, तसा शोक ते त्याच्यासाठी करतील. ११ त्या दिवशी यरुशलेममध्ये मोठा शोक होईल. मगिद्दोच्या+ मैदानातल्या हदद-रिम्मोन इथे जसा मोठा शोक झाला होता, तसा मोठा शोक यरुशलेममध्ये होईल. १२ संपूर्ण देश शोक करेल. प्रत्येक जण आपल्या कुटुंबात शोक करेल. दावीदचं घराणं शोक करेल; त्यातले पुरुष एका बाजूला, तर स्त्रिया दुसऱ्या बाजूला शोक करतील. नाथानचं+ घराणं शोक करेल; त्यातले पुरुष एका बाजूला, तर स्त्रिया दुसऱ्या बाजूला शोक करतील. १३ लेवीचं+ घराणं शोक करेल; त्यातले पुरुष एका बाजूला, तर स्त्रिया दुसऱ्या बाजूला शोक करतील. शिमीचं+ घराणं शोक करेल; त्यातले पुरुष एका बाजूला, तर स्त्रिया दुसऱ्या बाजूला शोक करतील. १४ आणि उरलेली सगळी घराणीसुद्धा शोक करतील; त्यांतले पुरुष एका बाजूला, तर स्त्रिया दुसऱ्या बाजूला शोक करतील.
१३ त्या दिवशी, दावीदच्या घराण्यासाठी आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांसाठी त्यांची पापं आणि अशुद्धता धुऊन काढायला+ एक विहीर खोदली जाईल.”
२ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “त्या दिवशी, मी देशातून मूर्तींचं नामोनिशाण मिटवून टाकीन.+ कोणालाही त्यांची आठवण राहणार नाही. आणि मी देशातून संदेष्ट्यांना आणि अशुद्ध शक्तींना घालवून देईन.+ ३ जर कोणी पुन्हा भविष्यवाणी करायला लागला, तर त्याला जन्म देणारे त्याचे आईवडील त्याला म्हणतील: ‘तू यहोवाच्या नावाने खोट्या गोष्टी सांगितल्यास, म्हणून तू जिवंत राहणार नाहीस.’ आणि त्याने भविष्यवाणी केल्यामुळे, त्याला जन्म देणारे त्याचे आईवडीलच त्याला भोसकून मारून टाकतील.+
४ त्या दिवशी, प्रत्येक संदेष्ट्याला आपण पाहिलेल्या दृष्टान्ताबद्दल भविष्यवाणी करताना लाज वाटेल. आणि इतरांना फसवण्यासाठी तो आपला केसाळ झगा*+ घालणार नाही. ५ तो म्हणेल: ‘मी काही संदेष्टा नाही, मी शेती करणारा माणूस आहे. कारण मी तरुण असताना एका माणसाने मला दास म्हणून विकत घेतलं होतं.’ ६ आणि कोणी जर त्याला विचारलं: ‘तुझ्या शरीरावर* या जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल: ‘या जखमा मला माझ्या मित्रांच्या* घरी झाल्या आहेत.’”
७ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “हे तलवारी! माझ्या मेंढपाळाविरुद्ध+ ऊठ;
जो माझा सोबती आहे त्याच्याविरुद्ध ऊठ.
मेंढपाळाला मार,+ आणि मेंढरांची* पांगापांग होऊ दे.+
जे साधारण लोक आहेत त्यांच्याविरुद्ध मी आपला हात उचलीन.”
८ यहोवा म्हणतो: “संपूर्ण देशात असं होईल, की
त्यातले दोन भाग कापून टाकले जातील आणि त्यांचा नाश होईल.
पण त्यातल्या तिसऱ्या भागाला तसंच राहू दिलं जाईल.
९ तिसऱ्या भागाला मी आगीत टाकून बाहेर काढीन;
चांदी जशी शुद्ध केली जाते, तसं मी त्यांना शुद्ध करीन.
आणि सोनं जसं पारखतात, तसं मी त्यांची पारख करीन.+
ते माझं नाव घेऊन मला हाक मारतील,
आणि मी त्यांना उत्तर देईन.
मी म्हणीन, ‘हे माझे लोक आहेत,’+
आणि ते म्हणतील, ‘यहोवा आमचा देव आहे.’”
१४ “पाहा! यहोवाचा दिवस येतोय. त्या दिवशी, तुझा* माल लुटून तुझ्यासमोरच वाटून घेतला जाईल. २ सगळ्या राष्ट्रांनी यरुशलेमशी युद्ध करावं, म्हणून मी त्यांना एकत्र करीन. ते शहर काबीज केलं जाईल. त्यातली घरं लुटली जातील आणि तिथल्या बायकांची अब्रू घेतली जाईल. शहरातले अर्धे लोक बंदिवासात जातील, पण उरलेल्या लोकांचा शहरातून नाश होणार नाही.
३ यहोवा त्या राष्ट्रांशी युद्ध करायला जाईल+ आणि तो लढाईच्या दिवशी जसा लढतो, तसा लढेल.+ ४ त्या दिवशी, यरुशलेमच्या पूर्वेकडे असलेल्या जैतुनांच्या डोंगरावर+ तो आपले पाय ठेवून उभा राहील. आणि त्या डोंगराचे पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत दोन भाग होतील. त्या डोंगराचा अर्धा भाग उत्तरेकडे सरकेल, तर अर्धा भाग दक्षिणेकडे सरकेल; आणि मधे एक मोठी दरी तयार होईल. ५ माझ्या डोंगरांच्या मधे तयार झालेल्या त्या दरीत तुम्ही पळून जाल. कारण ती दरी थेट आसेलपर्यंत पोहोचेल. यहूदाचा राजा उज्जीया याच्या काळात भूकंप झाल्यावर जसं तुम्ही पळाला होता, तसं तुम्हाला पळावं लागेल.+ माझा देव यहोवा येईल आणि सगळे पवित्र जण त्याच्यासोबत असतील.+
६ त्या दिवशी तेजस्वी प्रकाश नसेल.+ गोष्टी गोठून जातील. ७ तो ना धड दिवस असेल, ना धड रात्र. आणि संध्याकाळी उजेड असेल. तो दिवस यहोवाचा दिवस+ म्हणून ओळखला जाईल. ८ त्या दिवशी यरुशलेममधून जिवंत पाण्याचे झरे+ वाहतील;+ अर्धे झरे पूर्व समुद्राकडे*+ आणि अर्धे पश्चिम समुद्राकडे*+ वाहतील. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही तसंच होईल. ९ यहोवा सर्व पृथ्वीचा राजा होईल.+ त्या दिवशी यहोवा एक असेल+ आणि त्याचं नावसुद्धा एक असेल.+
१० गेबापासून+ यरुशलेमच्या दक्षिणेकडे रिम्मोनपर्यंत,+ संपूर्ण देश अराबासारखा+ होईल. आणि यरुशलेमला तिच्या जागी उंचावलं जाईल आणि तिच्यात लोकवस्ती होईल;+ बन्यामीनच्या फाटकापासून+ थेट पहिल्या फाटकापर्यंत आणि कोपऱ्याच्या दरवाजापर्यंत, तसंच हनानेलच्या बुरुजापासून+ थेट राजाच्या द्राक्षकुंडांपर्यंत तिच्यात लोकवस्ती होईल. ११ तिला पुन्हा कधीही नाशाच्या लायक ठरवलं जाणार नाही.+ यरुशलेम वसवली जाईल आणि लोक तिच्यात शांतीने राहतील.+
१२ आणि यरुशलेमसोबत युद्ध करणाऱ्या सगळ्या राष्ट्रांच्या लोकांवर यहोवा ही पीडा आणेल:+ ते आपल्या पायांवर उभे आहेत तोच त्यांचं शरीर सडेल; त्यांचे डोळे आपल्या खाचांतच आणि त्यांच्या जिभा आपल्या तोंडातच सडतील.
१३ त्या दिवशी यहोवा त्या सगळ्यांना मोठ्या गोंधळात पाडेल. आणि प्रत्येक जण आपल्या सोबत्याला धरून त्याच्यावर हल्ला करेल.+ १४ यहूदासुद्धा यरुशलेममध्ये युद्ध करेल. आणि आजूबाजूच्या सगळ्या राष्ट्रांची धनसंपत्ती, म्हणजे कपडे, सोनं आणि चांदी हे फार मोठ्या प्रमाणात गोळा केलं जाईल.+
१५ आणि अशीच पीडा त्यांच्या छावणीत असलेल्या त्यांच्या घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर, गाढवांवर आणि सगळ्या गुराढोरांवर येईल.
१६ यरुशलेमशी लढायला आलेल्या सर्व राष्ट्रांपैकी जे उरतील ते राजाला, म्हणजे सैन्यांचा देव यहोवा याला दंडवत घालायला*+ आणि मंडपांचा* सण साजरा करायला+ दरवर्षी यरुशलेमला जातील.+ १७ पण पृथ्वीवरच्या घराण्यांपैकी जे कोणी राजाला, सैन्यांचा देव यहोवा याला दंडवत घालायला यरुशलेमला येणार नाहीत, त्यांच्यावर पाऊस पडणार नाही.+ १८ आणि इजिप्तचं घराणं जर वर यरुशलेमला आलं नाही आणि त्याने शहरात प्रवेश केला नाही, तर त्यावरही पाऊस पडणार नाही. याउलट, मंडपांचा सण साजरा करण्यासाठी न आलेल्या राष्ट्रांवर यहोवा जी पीडा आणेल, तीच पीडा त्यावर येईल. १९ इजिप्तला आणि मंडपांचा सण साजरा करण्यासाठी न येणाऱ्या सर्व राष्ट्रांना त्यांच्या पापासाठी हीच शिक्षा होईल.
२० त्या दिवशी, घोड्यांच्या घंट्यांवर, ‘पवित्रता यहोवाची आहे!’+ हे शब्द लिहिले जातील. आणि यहोवाच्या मंदिरात असलेल्या कढया,+ वेदीपुढे ठेवलेल्या वाट्यांसारख्या होतील.+ २१ यरुशलेममधली आणि यहूदामधली प्रत्येक कढई पवित्र असून ती सैन्यांचा देव यहोवा याला समर्पित असेल. आणि बलिदानं द्यायला येणारे सर्व जण त्यांतल्या काही कढयांमध्ये बलिदानांचं मांस शिजवतील. त्या दिवशी सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिरात एकही कनानी* नसेल.”+
म्हणजे, “यहोवाने आठवण केली आहे.”
शब्दार्थसूची पाहा.
अति. ख१५ पाहा.
शब्दशः “यरुशलेमला मोजमापाची दोरी लावली जाईल.”
शब्दशः “आकाशातल्या चारही वाऱ्यांसारखी.”
किंवा “बॅबिलॉनच्या.”
किंवा “अपराध.”
किंवा “राखण.”
कदाचित याचा अर्थ, सात डोळे त्या दगडाकडे पाहत आहेत, असा होऊ शकतो.
किंवा “समई.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “ज्या दिवशी लहान सुरुवात झाली त्या दिवसाला.”
भिंत सरळ रेषेत बांधली जात आहे की नाही हे पाहण्याचं साधन. यात एका दोरीला खाली वजन बांधलेलं असतं.
म्हणजे, भरपूर फळं लागलेल्या फांद्या.
एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
शब्दशः “एफा.” इथे हे अशा एका भांड्याला किंवा टोपलीला सूचित करतं जी एक एफा माप मोजण्यासाठी वापरली जायची. एक एफा म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “पृथ्वीच्या आणि आकाशाच्या मधे.”
म्हणजे, बॅबिलोनिया.
हे कदाचित स्वर्गदूतांचे समूह असावेत.
म्हणजे, राजा आणि याजक या त्याच्या दोन्ही भूमिकांमध्ये.
अति. ख१५ पाहा.
किंवा “एकनिष्ठ प्रेमाने.”
किंवा “वडील नसलेल्यांना.”
इथे वापरलेला हिब्रू शब्द हिऱ्याला किंवा त्याच्यासारख्या दुसऱ्या एखाद्या कठीण दगडाला सूचित करतो.
किंवा “सूचना.”
किंवा “विश्वासूपणाचं.”
किंवा “विश्वासाने.”
किंवा “आपले हात बळकट करा.”
किंवा “आपले हात बळकट करा.”
किंवा “त्याचा मला पस्तावा झाला नव्हता.”
किंवा “तटबंदी बांधली.”
किंवा कदाचित, “समुद्रावर नाश करेल.”
म्हणजे, “विवाहबाह्य संबंधातून जन्मलेला.”
शेख म्हणजे कुळाचा प्रमुख. उत्प ३६:१५ ची तळटीप पाहा.
इथे कदाचित लोकांच्या दुःखाबद्दल बोललं जात असावं.
किंवा “आणि तो यशस्वी आहे; आणि तो वाचवला गेला आहे.”
म्हणजे, फरात नदी.
म्हणजे, सीयोन किंवा यरुशलेम.
किंवा “तेराफीम मूर्ती.”
किंवा “जादूटोण्याच्या गोष्टी; रहस्यमय गोष्टी.”
शब्दशः “कोपऱ्यावरचा बुरूज,” हे एका खास किंवा महत्त्वाच्या व्यक्तीला दर्शवतं; एक प्रधान.
शब्दशः “खुंटी,” ही एका अशा व्यक्तीला सूचित करते जी आधार आहे; एक शासक.
किंवा “शीळ घालून.”
किंवा “मिसरहून.”
एक प्रकारचा मोठा वृक्ष. इंग्रजीत या वृक्षांना “ओक” म्हणतात.
किंवा “वाटी.”
शेख म्हणजे कुळाचा प्रमुख. उत्प ३६:१५ ची तळटीप पाहा.
किंवा “जो अडखळेल.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “संदेष्ट्याचा झगा.”
शब्दशः “हातांच्या मधे.” म्हणजे, छातीवर किंवा पाठीवर.
किंवा “माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या.”
किंवा “कळपाची.”
म्हणजे, वचन २ मध्ये सांगितलेलं शहर.
म्हणजे, मृत समुद्र.
म्हणजे, भूमध्य समुद्र.
किंवा “याची उपासना करायला.”
किंवा “तात्पुरत्या आश्रयांचा.”
किंवा कदाचित, “व्यापारी.”