वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt हाग्गय १:१-२:२३
  • हाग्गय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हाग्गय
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
हाग्गय

हाग्गय

१ दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, यहूदाचा राज्यपाल, म्हणजे शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा मुलगा, म्हणजे महायाजक यहोशवा यांना संदेष्टा हाग्गय*+ याच्याकडून यहोवाचा* हा संदेश मिळाला:

२ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘“यहोवाचं मंदिर बांधण्याची* वेळ अजून आली नाही,”+ असं हे लोक म्हणतात.’”

३ मग हाग्गय+ संदेष्ट्याला पुन्हा यहोवाकडून हा संदेश मिळाला: ४ “तुम्ही आपापल्या सुंदर घरांमध्ये राहण्याची ही वेळ आहे का? पाहा, तिथे माझं मंदिर ओसाड पडलं आहे.+ ५ म्हणून सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘आपल्या वागण्याकडे लक्ष द्या. ६ तुम्ही भरपूर पेरणी करता, पण तुम्हाला फार थोडं पीक मिळतं.+ तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. आणि मजुरी करणारा आपली मजुरी, भोकं पडलेल्या बटव्यात टाकतो.’”

७ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘आपल्या वागण्याकडे लक्ष द्या.’

८ यहोवा म्हणतो, ‘उठा, डोंगरावर जाऊन लाकडं आणा+ आणि माझं मंदिर बांधा,+ म्हणजे त्यामुळे मी संतुष्ट होईन आणि माझा गौरव होईल.’”+

९ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘तुम्ही भरपूर पिकाची अपेक्षा करायचा, पण तुम्हाला फार थोडं मिळायचं, आणि जेव्हा तुम्ही ते घरी आणायचा, तेव्हा मी ते उडवून लावायचो.+ कशामुळे? कारण इकडे माझं मंदिर ओसाड पडलं आहे, आणि तुम्ही मात्र आपापल्या घरासाठी धावपळ करत आहात.+ १० म्हणून आकाशाने दव आणि पृथ्वीने पीक देणं बंद केलं. ११ मी तुमची जमीन आणि डोंगर कोरडे पाडले. त्यामुळे अन्‍नधान्य, द्राक्षारस, तेल आणि जमिनीच्या उत्पन्‍नाचा दुष्काळ पडला. तुमच्यासोबतच तुमच्या गुराढोरांचेही हाल होत आहेत आणि तुमची सगळी मेहनत वाया जात आहे.’”

१२ तेव्हा, शल्तीएलचा+ मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा+ मुलगा म्हणजे महायाजक यहोशवा, तसंच बाकीचे सर्व लोक, यांनी आपला देव यहोवा याचं ऐकलं आणि संदेष्टा हाग्गय याने दिलेल्या संदेशाकडे लक्ष दिलं. कारण त्यांचा देव यहोवा यानेच हाग्गयला पाठवलं होतं. आणि लोक यहोवाचं भय मानू लागले.

१३ मग यहोवाचा संदेष्टा हाग्गय याने यहोवाकडून मिळालेल्या आज्ञेप्रमाणे, लोकांना हा संदेश दिला: “यहोवा म्हणतो, ‘मी तुमच्यासोबत आहे.’”+

१४ मग यहोवाने यहूदाचा राज्यपाल+ म्हणजे शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल आणि यहोसादाकचा मुलगा म्हणजे महायाजक यहोशवा,+ तसंच बाकीचे सर्व लोक यांच्या मनाला प्रेरणा दिली.+ तेव्हा त्या सर्वांनी येऊन आपला देव, सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली.+ १५ दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी,+ सहाव्या महिन्याच्या २४ व्या दिवशी हे घडलं.

२ मग सातव्या महिन्याच्या २१ व्या दिवशी संदेष्टा हाग्गय+ याला यहोवाकडून हा संदेश मिळाला: २ “कृपा करून, यहूदाचा राज्यपाल,+ म्हणजे शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा+ मुलगा, म्हणजे महायाजक यहोशवा+ यांना, तसंच बाकीच्या सर्व लोकांना असं विचार, ३ ‘या मंदिराचं आधीचं वैभव ज्याने पाहिलं होतं, असा एखादा तुमच्यामध्ये उरला आहे का?+ आता हे मंदिर तुम्हाला कसं दिसतं? पूर्वीच्या वैभवाच्या तुलनेत हे मंदिर काहीच नाही, असं तुम्हाला वाटत नाही का?’+

४ यहोवा म्हणतो, ‘जरूब्बाबेल, हिंमत धर आणि यहोसादाकच्या मुला, महायाजक यहोशवा तूही हिंमत धर.’

यहोवा म्हणतो, ‘देशातल्या सर्व लोकांनो, तुम्हीही हिंमत धरा+ आणि काम करा.’

‘कारण मी तुमच्यासोबत आहे,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. ५ ‘तुम्ही इजिप्तमधून* बाहेर आलात, तेव्हा मी तुम्हाला काय वचन दिलं होतं ते आठवा.+ आजही मी माझ्या शक्‍तीने तुमचं मार्गदर्शन करत आहे,*+ म्हणून भिऊ नका.’”+

६ “कारण सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘थोड्याच काळात, मी पुन्हा एकदा आकाश व पृथ्वी आणि समुद्र व कोरडी जमीन हालवीन.’+

७ ‘आणि मी सर्व राष्ट्रांना हलवीन आणि सर्व राष्ट्रांतल्या मौल्यवान* वस्तू येतील+ आणि मी हे मंदिर माझ्या वैभवाने भरून टाकीन,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.

८ ‘चांदी माझी आहे आणि सोनंही माझं आहे,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.

९ ‘या मंदिराचं भविष्यातलं वैभव पूर्वीच्या वैभवापेक्षाही महान असेल,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.

‘आणि या ठिकाणी मी शांती स्थापन करीन,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”

१० दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी, नवव्या महिन्याच्या २४ व्या दिवशी, संदेष्टा हाग्गय+ याला यहोवाकडून हा संदेश मिळाला: ११ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘कृपा करून, याजकांना नियमशास्त्राबद्दल असं विचारा:+ १२ “जर एखादा माणूस आपल्या कपड्यांत पवित्र मांस घेऊन जात असेल आणि त्याच्या कपड्यांचा स्पर्श भाकरी, कालवण, द्राक्षारस किंवा तेल यांपैकी कशालाही झाला, तर ते पवित्र होईल का?”’”

याजक म्हणाले: “नाही!”

१३ मग हाग्गयने विचारलं: “जर एखाद्या मृतदेहाचा स्पर्श झाल्यामुळे अशुद्ध झालेल्या माणसाने, यांपैकी एखाद्या वस्तूला स्पर्श केला, तर ती अशुद्ध होईल का?”+

याजकांनी उत्तर दिलं: “हो, ती अशुद्ध होईल.”

१४ तेव्हा हाग्गय म्हणाला: “यहोवा म्हणतो, ‘हे लोक आणि हे राष्ट्र आणि त्यांच्या हातांची सर्व कामं माझ्या दृष्टीने अशीच आहेत. ते तिथे जे काही अर्पण करतात ते अशुद्ध आहे.’

१५ ‘पण कृपा करून, तुम्ही आजपासून या गोष्टीकडे लक्ष द्या: यहोवाचं मंदिर पुन्हा बांधण्याचं काम सुरू होण्याआधी+ १६ परिस्थिती कशी होती? जेव्हा कोणी २० मापांच्या अपेक्षेने धान्याच्या राशीकडे जायचा, तेव्हा तिथे फक्‍त १० मापं असायची; आणि जेव्हा एखादा ५० मापं द्राक्षारस काढण्यासाठी द्राक्षकुंडाजवळ जायचा, तेव्हा त्यात फक्‍त २० मापं असायची;+ १७ मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या हातांच्या सर्व कामांना उष्ण वारा, कीड+ आणि गारा यांनी पीडित केलं. पण तरी तुमच्यापैकी कोणीही माझ्याकडे परत आलं नाही,’ असं यहोवा म्हणतो.

१८ ‘कृपा करून, आजपासून या गोष्टीकडे लक्ष द्या; नवव्या महिन्याच्या २४ व्या दिवसापासून, म्हणजेच यहोवाच्या मंदिराचा पाया घालण्याच्या दिवसापासून,+ या गोष्टीकडे लक्ष द्या: १९ कोठारात आता धान्य आहे का?+ द्राक्षवेलींवर, तसंच अंजिर, डाळिंब आणि जैतून यांच्या झाडांवर फळं आली आहेत का, नाही ना? पण आजपासून मी एक आशीर्वाद पाठवीन.’”+

२० त्याच दिवशी, हाग्गय याला पुन्हा यहोवाकडून हा संदेश मिळाला:+ २१ “यहूदाचा राज्यपाल जरूब्बाबेल याला सांग, ‘मी आकाश आणि पृथ्वी हालवणार आहे.+ २२ मी राज्यांची राजासनं उलथून टाकीन आणि सर्व राष्ट्रांची ताकद नष्ट करीन;+ मी रथाला त्याच्या स्वारांसोबत उलथून टाकीन; सर्व घोडे पडतील आणि त्यांचे सगळे स्वार एकमेकांना तलवारीने मारतील.’”+

२३ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘हे जरूब्बाबेल,+ शल्तीएलच्या मुला,+ माझ्या सेवका, त्या दिवशी मी तुला बोलवीन.’ यहोवा म्हणतो, ‘मी तुला मुद्रेच्या अंगठीसारखा करीन, कारण मी तुलाच निवडलं आहे,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”

म्हणजे, सणाच्या दिवशी जन्मलेला.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पुन्हा बांधण्याची.”

किंवा “मिसरमधून.”

किंवा कदाचित, “त्या वेळी माझी शक्‍ती तुमच्यामध्ये उभी होती.”

किंवा “उत्तम.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा