योना
१ अमित्तयचा मुलगा, योना*+ याला यहोवाकडून हा संदेश मिळाला: २ “ऊठ आणि त्या मोठ्या निनवे शहरात जाऊन+ त्याच्याविरुद्ध न्यायदंड घोषित कर. कारण, त्या शहरातल्या लोकांचा दुष्टपणा मी पाहिला आहे.”
३ पण योना यहोवापासून पळून जाण्यासाठी तार्शीशला जायला निघाला. तो यापो इथे गेला आणि तिथे त्याला तार्शीशला जाणारं एक जहाज मिळालं. तेव्हा त्याने प्रवासाचं भाडं भरलं आणि इतरांसोबत त्या जहाजावर चढून, तो यहोवापासून दूर तार्शीशला जायला निघाला.
४ मग यहोवाने समुद्रावर जोरदार वारा वाहायला लावला. त्यामुळे समुद्रात इतकं भयंकर वादळ आलं, की जहाज फुटतं की काय, अशी भीती वाटू लागली! ५ जहाजातले खलाशी तर इतके घाबरले, की ते आपापल्या दैवताला मदतीसाठी हाक मारू लागले. त्यांनी जहाज हलकं करण्यासाठी जहाजातलं सामान समुद्रात फेकायला सुरुवात केली.+ पण योना खाली जाऊन, जहाजाच्या आतल्या भागात अगदी गाढ झोपला होता. ६ तेव्हा जहाजाचा कप्तान खाली येऊन त्याला म्हणाला: “झोपा काय काढतोस? ऊठ आणि तुझ्या देवाला हाक मार! कदाचित खरा देव आपल्याला दया दाखवेल आणि आपला जीव वाचेल.”+
७ मग ते एकमेकांना म्हणाले: “चला, आपण चिठ्ठ्या टाकू,+ म्हणजे आपल्याला समजेल की हे संकट आपल्यावर कोणामुळे आलंय.” म्हणून त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली.+ ८ ते त्याला म्हणाले: “आमच्यावर हे संकट कोणामुळे आलंय ते खरंखरं सांग. तू काय करतोस, कुठून आलास? तुझा देश कुठला आणि तू कोणत्या लोकांमधला आहेस?”
९ तो म्हणाला: “मी एक इब्री आहे. मी स्वर्गाचा देव यहोवा याची उपासना करतो.* त्यानेच समुद्र आणि कोरडी जमीन बनवली.”
१० हे ऐकून खलाशी आणखीनच घाबरले. ते त्याला म्हणाले: “तू हे काय केलंस?” (तो यहोवापासून पळून जात आहे, हे त्यांना कळलं, कारण त्यानेच त्यांना तसं सांगितलं होतं.) ११ म्हणून ते त्याला म्हणाले: “मग आता समुद्र शांत होण्यासाठी आम्ही तुझ्यासोबत काय करावं?” कारण समुद्रातल्या वादळाचा जोर वाढतच चालला होता. १२ तो म्हणाला: “मला उचलून समुद्रात टाका, म्हणजे समुद्र शांत होईल. कारण मला माहीत आहे, की माझ्यामुळेच या भयंकर वादळात तुम्ही सापडलाय.” १३ तरीही ती माणसं जहाज किनाऱ्याला नेण्याचा प्रयत्न करू लागली.* पण त्यांना ते जमेना, कारण वादळाचा जोर वाढतच चालला होता.
१४ मग ते लोक यहोवाला हाक मारून म्हणू लागले: “हे यहोवा, दया कर, या माणसामुळे* आमचा नाश होऊ देऊ नकोस! निर्दोष रक्तासाठी आम्हाला जबाबदार धरू नकोस. कारण हे यहोवा, हे सगळं तुझ्या मनाप्रमाणेच घडलंय.” १५ मग त्यांनी योनाला उचलून समुद्रात टाकलं आणि खवळलेला समुद्र शांत झाला. १६ तेव्हा त्या लोकांच्या मनात यहोवाची खूप भीती बसली.+ त्यांनी यहोवाला बलिदान अर्पण केलं आणि नवसही केले.
१७ मग यहोवाने एका मोठ्या माशाला पाठवलं आणि त्या माशाने योनाला गिळून टाकलं. योना तीन दिवस आणि तीन रात्री त्या माशाच्या पोटात होता.+
२ मग योनाने माशाच्या पोटातून आपला देव यहोवा याला प्रार्थना केली.+ २ तो म्हणाला:
“मी संकटात सापडलो, तेव्हा मी यहोवाला हाक मारली आणि त्याने मला उत्तर दिलं.+
खोल कबरेतून* मी मदतीसाठी याचना केली.+
आणि तू माझा आवाज ऐकलास.
३ तू मला महासागराच्या तळाशी टाकलंस,
तेव्हा प्रवाहांनी मला घेरलं.+
तुझ्या प्रचंड मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या.+
४ तेव्हा मी म्हणालो, ‘तू मला आपल्या नजरेसमोरून घालवून दिलं आहेस!
आता मी तुझं पवित्र मंदिर कसं पाहू शकेन?’
सागरातल्या वेलींनी माझ्या डोक्याला गुरफटलं.
६ मी पर्वतांच्या अगदी तळाशी गेलो.
पृथ्वीच्या फाटकांनी मला कायमचं कोंडलं असतं,
पण हे यहोवा, माझ्या देवा, तू माझा जीव मृत्यूच्या गर्तेतून* वर आणलास.+
मग माझी प्रार्थना तुझ्यापर्यंत, तुझ्या पवित्र मंदिरात पोहोचली.+
८ निरुपयोगी मूर्तींची भक्ती करणारे, एकनिष्ठ प्रेम* करायचं सोडून देतात.
९ पण मी उपकारस्तुती करून तुला बलिदान अर्पण करीन.
मी जो नवस केला आहे, तो मी फेडीन.+
हे यहोवा, तारण करणारा तूच आहेस.”+
१० मग, यहोवाने माशाला आज्ञा दिली आणि माशाने योनाला जमिनीवर ओकून टाकलं.
३ मग योनाला दुसऱ्यांदा यहोवाकडून हा संदेश मिळाला:+ २ “ऊठ आणि त्या मोठ्या निनवे शहरात जाऊन+ मी तुला सांगितलेला संदेश घोषित कर.”
३ म्हणून यहोवाच्या आज्ञेप्रमाणे+ योना उठला आणि निनवेला गेला.+ निनवे फार मोठं शहर* होतं. त्या संपूर्ण शहराला पायी फेरी मारायला तीन दिवस लागायचे. ४ योना त्या शहरात गेला आणि एका दिवसाच्या अंतरापर्यंत चालत जाऊन त्याने हा संदेश घोषित केला: “फक्त ४० दिवस, मग निनवेचा नाश होईल.”
५ तेव्हा निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला.+ त्यांनी उपास घोषित केला आणि त्यांच्यापैकी लहानमोठ्या सर्व माणसांनी गोणपाट घातलं. ६ निनवेच्या राजापर्यंत हा संदेश पोहोचला, तेव्हा तो आपल्या राजासनावरून उठला आणि त्याने आपली राजवस्त्रं काढून गोणपाट घातलं आणि तो राखेत बसला. ७ शिवाय, त्याने संपूर्ण निनवे शहरात ही घोषणा करण्याचा हुकूम दिला:
“राजा आणि त्याच्या अधिकाऱ्यांचा असा हुकूम आहे, की कोणत्याही माणसाने किंवा प्राण्याने, गुरांनी किंवा मेंढरांनी काहीही खाऊ नये. त्यांनी अन्न खाऊ नये किंवा पाणीही पिऊ नये. ८ माणसांनी आणि प्राण्यांनी गोणपाट घालावं; लोकांनी आपली दुष्ट आणि हिंसक कामं सोडून, देवाला कळकळून प्रार्थना करावी. ९ म्हणजे कदाचित खऱ्या देवाचा क्रोध शांत होईल आणि त्याने जे करायचं ठरवलंय, त्यावर तो पुन्हा विचार करेल* आणि आपला नाश होणार नाही.”
१० जेव्हा खऱ्या देवाने त्यांचं वागणं पाहिलं, म्हणजेच त्यांनी आपली दुष्ट कामं सोडून दिली आहेत हे त्याने पाहिलं,+ तेव्हा त्यांच्यावर जे संकट आणण्याबद्दल तो बोलला होता, त्यावर त्याने पुन्हा विचार केला* आणि त्याने ते संकट आणलं नाही.+
४ पण योनाला हे अजिबात आवडलं नाही, आणि त्याला खूप राग आला. २ म्हणून त्याने यहोवाला अशी प्रार्थना केली: “हे यहोवा, मी माझ्या देशात होतो तेव्हा मला याचीच भीती नव्हती का? म्हणूनच तर मी तार्शीशला पळून जायचा प्रयत्न केला;+ कारण मला माहीत आहे, की तू एक दयाळू आणि कृपाळू* देव आहेस, तू सहनशील आणि एकनिष्ठ प्रेमाने भरलेला देव आहेस.+ आणि तुला संकटं आणायला आवडत नाही. ३ म्हणून हे यहोवा, आता माझा जीव घे; कारण अशा जगण्यापेक्षा मी मरून गेलेलो बरा.”+
४ यहोवाने त्याला विचारलं: “तुझं असं रागावणं बरोबर आहे का?”
५ तेव्हा योना शहराबाहेर निघून गेला आणि शहराच्या पूर्वेकडे जाऊन बसला. त्याने तिथे स्वतःसाठी एक मांडव तयार केला. आणि त्या शहराचं काय होतं हे पाहण्यासाठी, तो त्याच्या सावलीत बसला.+ ६ मग योनाच्या डोक्याला सावली मिळावी आणि त्याचा त्रास थोडा कमी व्हावा, म्हणून यहोवाने भोपळ्याचा एक वेल* उगवायला लावला. योनाला तो भोपळ्याचा वेल पाहून खूप आनंद झाला.
७ पण, दुसऱ्या दिवशी पहाटेच, देवाने एक किडा पाठवला; किड्याने तो वेल खायला सुरुवात केली आणि तो वेल सुकला. ८ सूर्य वर आल्यावर देवाने पूर्वेकडून गरम वारा वाहायला लावला; सूर्य तापला, तेव्हा योनाच्या डोक्याला खूप ऊन लागलं आणि योना अगदी गळून गेला. मला मारून टाक, अशी तो देवाला विनंती करू लागला. तो म्हणाला, “असं जगण्यापेक्षा मी मेलेलो बरा.”+
९ देवाने योनाला विचारलं: “भोपळ्याच्या वेलासाठी तुला इतका राग येणं बरोबर आहे का?”+
तेव्हा योना म्हणाला: “हो, माझं रागावणं बरोबरच आहे, मला इतका राग आलाय, की मला आता जगायचंच नाही.” १० पण यहोवा म्हणाला: “या भोपळ्याच्या वेलासाठी तू काहीच मेहनत केली नव्हतीस आणि तो तू वाढवला नव्हतास; तो एका रात्रीत वाढला आणि एका रात्रीत सुकून गेला आणि तरी तुला त्याच्यासाठी इतकं वाईट वाटतंय. ११ मग चांगल्यावाइटाचा* फरक माहीत नसलेली १,२०,००० माणसं आणि त्यांची पुष्कळ गुरंढोरं ज्यात राहतात, त्या मोठ्या निनवे शहराबद्दल+ मला वाईट वाटायला नको का?”+
म्हणजे, “कबुतर.”
किंवा “भय मानतो.”
किंवा “जोराने वल्हवू लागली.”
किंवा “या माणसाच्या जिवामुळे.”
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कबरेतून.”
किंवा “माझ्या प्राणाला ओहोटी लागली होती.”
किंवा कदाचित, “त्यांची निष्ठा.”
शब्दशः “देवाच्या दृष्टीत मोठं शहर.”
किंवा “त्याला पस्तावा होईल.”
किंवा “त्याला पस्तावा झाला.”
किंवा “करुणामय.”
किंवा कदाचित, “एरंडाचं झाड.”
किंवा “उजव्याडाव्या हाताचा.”