दानीएल
१ यहूदाचा राजा यहोयाकीम+ याच्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी, बाबेलचा* राजा नबुखद्नेस्सर याने यरुशलेममध्ये येऊन त्या शहराला वेढा घातला.+ २ काही काळानंतर, यहोवाने* यहूदाचा राजा यहोयाकीम याला त्याच्या हाती दिलं.+ याशिवाय, खऱ्या देवाच्या मंदिरातली काही भांडीही देवाने त्याला नेऊ दिली. तो ती भांडी शिनार*+ देशात त्याच्या देवाच्या मंदिरात घेऊन गेला. आणि त्याने ती भांडी त्याच्या देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.+
३ मग राजाने आपला मुख्य राजदरबारी अश्पनज याला काही इस्राएली लोकांना, खासकरून त्यांच्यातल्या शाही आणि उच्च घराण्यांतल्या लोकांना घेऊन येण्याची आज्ञा दिली.+ ४ राजाने त्याला असे तरुण* शोधून आणायला सांगितले जे दिसायला देखणे आहेत आणि ज्यांच्यात कोणताही दोष नाही. ते हुशार, ज्ञानी व समजबुद्धी+ असलेले असावेत, आणि ते राजाच्या महालात काम करण्यासाठी योग्य असावेत अशी राजाची अपेक्षा होती. तसंच, अश्पनजने त्यांना खास्दी लोकांची भाषा आणि लिपी शिकवावी असंही राजाने त्याला सांगितलं. ५ याशिवाय, राजाला जी पक्वान्नं दिली जातात तीच पक्वान्नं, आणि राजाला जो द्राक्षारस दिला जातो तोच द्राक्षारस दररोज त्या तरुणांनाही दिला जावा अशी आज्ञा राजाने दिली. त्या तरुणांना तीन वर्षं प्रशिक्षण द्यायचं होतं,* आणि त्यानंतर त्यांना राजाच्या सेवेसाठी राजदरबारात आणायचं होतं.
६ त्या तरुणांमध्ये यहूदा वंशातलेही काही तरुण होते. त्यांची नावं अशी: दानीएल,*+ हनन्या,* मीशाएल* आणि अजऱ्या.*+ ७ पण मुख्य राजदरबाऱ्याने त्यांना वेगळी नावं* दिली. त्याने दानीएलला बेल्टशस्सर,+ हनन्याला शद्रख, मीशाएलला मेशख आणि अजऱ्याला अबेद्नगो+ असं नाव दिलं.
८ पण दानीएलने आपल्या मनात पक्का निश्चय केला होता, की तो राजाची पक्वान्नं खाऊन किंवा राजा पीत असलेला द्राक्षारस पिऊन स्वतःला दूषित करणार नाही. त्यामुळे दूषित करणाऱ्या या गोष्टींतून आपल्याला सूट मिळावी, अशी विनंती त्याने मुख्य राजदरबाऱ्याला केली. ९ तेव्हा खऱ्या देवाने मुख्य राजदरबाऱ्याच्या मनात दानीएलविषयी कृपा आणि दया उत्पन्न केली.+ १० पण मुख्य राजदरबारी दानीएलला म्हणाला: “मला माझ्या प्रभूची, राजाची भीती वाटते! तुमच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था त्यानेच लावून दिली आहे. जर तुम्ही तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा* अशक्त दिसलात तर काय? राजा तुमच्यामुळे माझंच डोकं उडवून टाकेल!” ११ त्यावर ज्या कारभाऱ्याला मुख्य राजदरबाऱ्याने दानीएल, हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या यांची देखभाल करायला नेमलं होतं, त्या कारभाऱ्याला दानीएल म्हणाला: १२ “कृपा करून तुमच्या या सेवकांना फक्त शाकाहारी अन्न आणि पाणी द्या. अशी दहा दिवस आमची परीक्षा घेऊन बघा. १३ त्यानंतर जे तरुण* राजाच्या पक्वान्नांतून खातात त्यांच्याशी आमची तुलना करा, आणि कोण चांगलं दिसतं ते बघा. मग जे काही दिसून येईल त्यावरून आमच्या बाबतीत काय करायचं ते तुम्हीच ठरवा.”
१४ तेव्हा कारभाऱ्याने त्यांची विनंती मान्य केली आणि दहा दिवस त्यांची पारख केली. १५ दहा दिवसांनी असं दिसून आलं, की राजाच्या पक्वान्नांतून खाणाऱ्या तरुणांपेक्षा* हे तरुण सुदृढ असून त्यांचे चेहरे जास्त टवटवीत आहेत. १६ म्हणून मग कारभारी त्यांना पक्वान्नं आणि द्राक्षारस देण्याऐवजी शाकाहारी अन्न देऊ लागला. १७ आणि खऱ्या देवाने या चार तरुणांना* सर्व प्रकारच्या लिखाणांमध्ये बुद्धी, ज्ञान आणि सखोल समज दिली. तसंच, त्याने दानीएलला सर्व प्रकारच्या दृष्टान्तांची आणि स्वप्नांची समज दिली.+
१८ नबुखद्नेस्सर राजाने ठरवून दिलेल्या काळाची मुदत संपल्यावर, मुख्य राजदरबारी त्यांना राजासमोर घेऊन आला.+ १९ राजा त्यांच्यासोबत बोलला तेव्हा त्या सगळ्यांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या+ यांच्यासारखा दुसरा कोणीही नसल्याचं त्याला दिसून आलं. मग ते राजासमोर राहून त्याची सेवा करू लागले. २० राजा त्यांना बुद्धीची आणि समजशक्तीची गरज असलेल्या कोणत्याही विषयावर प्रश्न विचारायचा, तेव्हा त्याला दिसून यायचं की त्याच्या साम्राज्यातल्या सगळ्या जादूगारांपेक्षा+ आणि मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांपेक्षा ते दहा पटीने जास्त हुशार आहेत. २१ दानीएल हा कोरेश+ राजाच्या शासनकाळाच्या पहिल्या वर्षापर्यंत तिथेच राहिला.
२ नबुखद्नेस्सर राजाला आपल्या शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षात अनेक स्वप्नं पडली. त्या स्वप्नांमुळे तो इतका बेचैन झाला,+ की त्याची झोप उडाली. २ आपण कोणती स्वप्नं पाहिली ती सांगण्यासाठी राजाने जादूगारांना, मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांना, शकुन पाहणाऱ्यांना आणि खास्दी माणसांना* बोलावून आणण्याची आज्ञा दिली. तेव्हा ते सर्व राजासमोर येऊन उभे राहिले.+ ३ राजा त्यांना म्हणाला: “मला एक स्वप्न पडलंय, आणि त्यामुळे माझं मन खूप अस्वस्थ झालंय. ते स्वप्न काय आहे हे मला जाणून घ्यायचंय.” ४ त्यावर खास्दी माणसं अरामी भाषेत*+ राजाला म्हणाली: “महाराज, युगानुयुग जिवंत राहा! तुमच्या या सेवकांना तुमचं स्वप्न सांगा, म्हणजे आम्ही तुम्हाला त्याचा अर्थ सांगू.”
५ तेव्हा, राजा त्या खास्दी माणसांना म्हणाला: “माझा निर्णय पक्का आहे: तुम्ही जर माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ मला सांगितला नाही, तर तुमचे तुकडे-तुकडे केले जातील आणि तुमच्या घरादारांना सार्वजनिक शौचालय* बनवलं जाईल. ६ पण तुम्ही माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ मला सांगितला, तर तुम्हाला माझ्याकडून बक्षिसं, इनाम आणि मोठा मानसन्मान मिळेल.+ तेव्हा आता माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ मला सांगा.”
७ ते दुसऱ्यांदा राजाला म्हणाले: “राजाने आपल्या या सेवकांना आपलं स्वप्न सांगावं, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
८ त्यावर राजा म्हणाला: “मला माहीत आहे, तुम्ही जाणूनबुजून वेळ घालवण्याचा प्रयत्न करताय. कारण तुम्हाला कळून चुकलंय, की माझा निर्णय पक्का आहे. ९ तुम्ही जर मला माझं स्वप्न सांगितलं नाही, तर तुमच्या सगळ्यांसाठी एकच शिक्षा ठरलेली आहे. तुम्हाला असं वाटतंय, की माझं मन बदलेपर्यंत मला काहीतरी फसवं आणि खोटंनाटं सांगावं. आता माझं स्वप्न काय ते मला सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्ही मला त्याचा अर्थही सांगू शकता.”
१० तेव्हा ती खास्दी माणसं राजाला म्हणाली: “राजाने जी मागणी केली आहे ती पृथ्वीवरचा एकही माणूस पूर्ण करू शकत नाही. आजपर्यंत कोणत्याही महान राजाने किंवा राज्यपालाने आपल्या जादूगारांकडून, मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांकडून किंवा खास्दी माणसांकडून अशी मागणी केलेली नाही. ११ राजा जी मागणी करतोय ती पूर्ण करणं खूप कठीण आहे. देवांशिवाय दुसरा कोणीही ती पूर्ण करू शकत नाही, आणि देव तर नश्वर माणसांमध्ये राहत नाहीत.”
१२ हे ऐकून राजा क्रोधाने पेटून उठला. आणि त्याने बाबेलमधल्या सगळ्या ज्ञानी माणसांना मारून टाकण्याचा हुकूम दिला.+ १३ जेव्हा राजाचं हे फर्मान निघालं आणि सगळ्या ज्ञानी माणसांना मारून टाकलं जाणार होतं, तेव्हा ते दानीएलला आणि त्याच्या सोबत्यांनाही शोधू लागले.
१४ राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख अर्योक हा बाबेलच्या ज्ञानी माणसांना मारून टाकायला निघाला होता. त्या वेळी, दानीएल त्याच्याशी हुशारीने आणि समंजसपणे बोलला. १५ त्याने राजाच्या अधिकाऱ्याला, अर्योकला विचारलं: “राजाने इतका कठोर हुकूम का बरं दिला?” तेव्हा अर्योकने घडलेला सगळा प्रकार दानीएलला सांगितला.+ १६ म्हणून दानीएल राजाकडे गेला आणि राजाला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी त्याने त्याच्याकडून थोडा वेळ मागून घेतला.
१७ मग दानीएल आपल्या घरी गेला आणि त्याने हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या या आपल्या सोबत्यांना सगळी हकिगत सांगितली. १८ स्वर्गाच्या देवाने आपल्यावर दया करावी आणि हे रहस्य आपल्याला उलगडून सांगावं, यासाठी दानीएलने त्यांना प्रार्थना करायला सांगितली. म्हणजे बाबेलमधल्या बाकीच्या ज्ञानी माणसांसोबत दानीएलला आणि त्याच्या सोबत्यांना मारून टाकलं जाणार नाही.
१९ मग रात्री एका दृष्टान्तात दानीएलला त्या रहस्याचा उलगडा झाला.+ तेव्हा त्याने स्वर्गाच्या देवाची स्तुती केली. २० तो म्हणाला:
तो राजांना राजासनावर बसवतो आणि त्यांना राजासनावरून काढूनही टाकतो,+
तो सुज्ञांना बुद्धी आणि समंजसांना ज्ञान देतो.+
२२ तो गूढ आणि रहस्यमय गोष्टी प्रकट करतो,+
काळोखात काय आहे हे त्याला माहीत आहे,+
आणि प्रकाश त्याच्यासोबत वस्ती करतो.+
२३ हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो,
कारण तू मला बुद्धी आणि सामर्थ्य दिलंस.
आम्ही तुझ्याकडे जे मागितलं, ते तू मला दिलंस;
राजाला चिंतित करणारी गोष्ट तू आम्हाला कळवलीस.”+
२४ मग बाबेलमधल्या ज्ञानी माणसांना मारून टाकायला राजाने ज्याला नेमलं होतं त्याच्याकडे, म्हणजे अर्योककडे दानीएल गेला+ आणि म्हणाला: “बाबेलमधल्या कोणत्याही ज्ञानी माणसाला मारून टाकू नकोस. मला राजाकडे घेऊन चल. स्वप्नाचा अर्थ मी राजाला सांगीन.”
२५ तेव्हा, अर्योक दानीएलला लगेच राजासमोर घेऊन गेला आणि राजाला म्हणाला: “यहूदातल्या बंदिवानांमध्ये मला एक माणूस सापडलाय.+ तो राजाला स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो.” २६ त्यावर राजाने बेल्टशस्सर म्हटलेल्या दानीएलला विचारलं:+ “मी पाहिलेलं स्वप्न आणि त्याचा अर्थ तू खरंच मला सांगू शकतोस का?”+ २७ तेव्हा दानीएल राजाला म्हणाला: “राजाने जे रहस्य विचारलंय ते ज्ञानी पुरुष, जादूगार, ज्योतिषी* किंवा मंत्रतंत्र करणारे पुजारी यांच्यापैकी कोणीही सांगू शकत नाही.+ २८ पण स्वर्गात असा एक देव आहे जो रहस्यांचा उलगडा करू शकतो.+ आणि शेवटच्या काळात काय घडेल हे त्यानेच नबुखद्नेस्सर राजाला प्रकट केलंय. तुम्ही पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही बिछान्यावर पडलेले असताना पाहिलेले दृष्टान्त हे आहेत:
२९ हे राजा! तुम्ही आपल्या बिछान्यावर झोपला होता, तेव्हा येणाऱ्या काळात काय घडेल याबद्दल तुम्ही विचार करू लागलात. आणि रहस्यं प्रकट करणाऱ्याने पुढे काय घडणार आहे ते तुम्हाला कळवलंय. ३० माझ्याविषयी म्हणाल, तर मी काही इतर माणसांपेक्षा फार बुद्धिमान आहे म्हणून मला हे रहस्य प्रकट करण्यात आलंय असं नाही. तर तुम्हाला तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगावा, आणि तुम्ही मनात काय विचार करत होता ते तुम्हाला कळावं, म्हणून ते रहस्य मला प्रकट करण्यात आलंय.+
३१ हे राजा! तुम्हाला स्वप्नात एक अतिशय मोठा पुतळा दिसला. भव्य आणि तेजस्वी असलेला तो पुतळा तुमच्यासमोर उभा होता आणि त्याचं स्वरूप फार भयानक होतं. ३२ त्या पुतळ्याचं डोकं शुद्ध सोन्याचं,+ त्याची छाती आणि हात चांदीचे,+ त्याचं पोट आणि मांड्या तांब्याच्या,+ ३३ त्याचे पाय लोखंडाचे+ आणि त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा, तर काही भाग मातीचा होता.+ ३४ तुम्ही तो पुतळा पाहत होता, तेव्हा एक दगड कोणाचाही हात न लागता डोंगरातून निसटला, आणि पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर येऊन आदळला आणि त्याने त्यांचा चुराडा केला.+ ३५ तेव्हा लोखंड, माती, तांबं, चांदी आणि सोनं या सगळ्यांचा चुराडा झाला; ते उन्हाळ्याच्या दिवसांत खळ्यात* पडलेल्या धान्याच्या भुशासारखे झाले. वाऱ्याने ते उधळले गेले आणि त्यांचा लवलेशही उरला नाही. पण पुतळ्यावर आदळणारा तो दगड एक मोठा डोंगर बनला आणि त्याने संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली.
३६ राजाने पाहिलेलं स्वप्न हेच आहे. आता त्याचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगतो. ३७ हे राजा, तुम्ही राजांचे राजे आहात! स्वर्गाच्या देवाने तुम्हाला राज्य,+ सामर्थ्य, ताकद आणि वैभव दिलंय. ३८ त्याने तुमच्या हाती मानवांना दिलंय; मग ते कुठेही राहत असोत. तसंच, त्याने रानातली जनावरं आणि आकाशातले पक्षीही तुमच्या हाती दिलेत; आणि या सर्वांवर त्याने तुम्हाला अधिकारी बनवलंय.+ त्या पुतळ्याचं सोन्याचं डोकं तुम्हीच आहात.+
३९ पण तुमच्यानंतर दुसरं एक राज्य येईल;+ ते तुमच्यापेक्षा कमी दर्जाचं असेल. मग आणखी एक राज्य, म्हणजे तिसरं राज्य येईल. ते तांब्याचं असेल आणि संपूर्ण पृथ्वीवर त्याची सत्ता असेल.+
४० मग जे चौथं राज्य येईल ते लोखंडासारखं मजबूत असेल.+ लोखंड जसं सगळ्या गोष्टींचा चुराडा करून त्यांचा भुगा-भुगा करून टाकतं; हो, लोखंड जसं सगळ्या गोष्टींचे तुकडे-तुकडे करून टाकतं, तसं ते राज्य त्याच्या आधीच्या सगळ्या राज्यांचा चुराडा करून त्यांचा पूर्णपणे नाश करेल.+
४१ आणि तुम्ही पाहिलंत, की पुतळ्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा, तर काही भाग मातीचा होता. अगदी तसंच ते राज्य विभागलेलं असेल. पण जसं लोखंड मऊ मातीत मिसळलेलं तुम्ही पाहिलंत, तसंच त्या राज्यात लोखंडासारखी थोडीफार मजबुती असेल. ४२ आणि ज्याप्रमाणे पुतळ्याच्या पावलांच्या बोटांचा काही भाग लोखंडाचा आणि काही भाग मातीचा होता, तसंच ते राज्य थोडंफार मजबूत आणि थोडंफार कमजोर असेल. ४३ जसं लोखंड मऊ मातीत मिसळलेलं तुम्ही पाहिलंत, तसंच त्या राज्याचा मजबूत भाग लोकांसोबत* मिसळेल; पण जसं लोखंड आणि माती एकजीव होत नाहीत, तसंच ते एकजीव होणार नाहीत.
४४ त्या राजांच्या दिवसांत, स्वर्गाचा देव एक असं राज्य स्थापन करेल+ ज्याचा कधीही नाश होणार नाही.+ ते राज्य दुसऱ्या कोणाच्याही हाती जाणार नाही.+ तर ते या सगळ्या राज्यांचा चुराडा करून त्यांचा नाश करेल,+ आणि फक्त तेच कायम टिकेल.+ ४५ हे अगदी तसंच होईल जसं तुम्ही पाहिलं होतं. तुम्ही पाहिलं होतं, की एक दगड कोणाचाही हात न लागता डोंगरातून निसटला. आणि त्याने लोखंड, तांबं, माती, चांदी आणि सोनं या सगळ्यांचा चुराडा केला.+ हे राजा! भविष्यात काय घडेल हे महान देवाने तुम्हाला कळवलंय.+ हे स्वप्न खरं आहे आणि त्याचा अर्थ भरवशालायक आहे.”
४६ तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने जमिनीवर पडून दानीएलला दंडवत घातला आणि त्याचा सन्मान केला. तसंच, दानीएलला भेटवस्तू देण्याची आणि त्याच्यासाठी धूप जाळण्याची आज्ञाही त्याने दिली. ४७ मग राजा दानीएलला म्हणाला: “खरंच, तुझा देव हा देवांचा देव आणि राजांचा प्रभू आहे. तुला हे रहस्य प्रकट करता आलं, कारण तुझा देव रहस्य प्रकट करणारा आहे.”+ ४८ नंतर राजाने दानीएलला उच्च पद आणि अनेक भेटवस्तू दिल्या. त्याने त्याला बाबेलच्या संपूर्ण प्रांताचा शासक+ आणि बाबेलच्या सर्व ज्ञानी माणसांवर मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलं. ४९ दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख आणि अबेद्नगो+ यांना बाबेलच्या प्रांताची व्यवस्था पाहण्यासाठी नेमलं. दानीएल मात्र राजदरबारात सेवा करत राहिला.
३ नबुखद्नेस्सर राजाने सोन्याची एक मूर्ती बनवली. ती ६० हात* उंच आणि ६ हात* रुंद होती. त्याने ती मूर्ती बाबेल प्रांतातल्या दूरा नावाच्या मैदानात उभी केली. २ मग आपण उभ्या केलेल्या या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी नबुखद्नेस्सर राजाने सुभेदारांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, राज्यपालांना, सल्लागारांना, खजिनदारांना, न्यायाधीशांना, न्यायाधिकाऱ्यांना आणि प्रांतांची व्यवस्था पाहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र येण्याची आज्ञा दिली.
३ तेव्हा सगळे सुभेदार, प्रशासकीय अधिकारी, राज्यपाल, सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, न्यायाधिकारी आणि प्रांतांची व्यवस्था पाहणारे सर्व अधिकारी नबुखद्नेस्सर राजाने उभ्या केलेल्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी एकत्र जमले. ते सर्व येऊन त्या मूर्तीसमोर उभे राहिले. ४ तेव्हा घोषणा करणारा मोठ्याने म्हणाला: “वेगवेगळ्या राष्ट्रांतून आलेल्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, ऐका! तुम्हाला अशी आज्ञा दिली जात आहे, की ५ ज्या वेळी तुम्ही शिंग, बासरी, संतूर, वीणा,* तंतुवाद्य, पंचनलिका* आणि इतर संगीत वाद्यांचा आवाज ऐकाल, तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीला दंडवत घाला आणि तिची उपासना करा. ६ जो कोणी मूर्तीला दंडवत घालणार नाही आणि तिची उपासना करणार नाही, त्याला लगेच धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्यात येईल.”+ ७ म्हणून जेव्हा शिंग, बासरी, संतूर, वीणा, तंतुवाद्य, पंचनलिका आणि इतर संगीत वाद्यांचा आवाज ऐकू आला, तेव्हा सर्व राष्ट्रांतल्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनी नबुखद्नेस्सर राजाने उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीला दंडवत घातला आणि तिची उपासना केली.
८ त्या वेळी काही खास्दी लोक राजाकडे आले आणि यहुद्यांवर आरोप* करू लागले. ९ ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले: “महाराज युगानुयुग जिवंत राहोत! १० हे राजा, तुम्ही अशी आज्ञा दिली होती की शिंग, बासरी, संतूर, वीणा, तंतुवाद्य, पंचनलिका आणि इतर संगीत वाद्यांचा आवाज ऐकणाऱ्या प्रत्येकाने सोन्याच्या मूर्तीला दंडवत घालून तिची उपासना करावी. ११ आणि जो कोणी मूर्तीला दंडवत घालणार नाही आणि तिची उपासना करणार नाही, त्याला धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्यात येईल.+ १२ पण महाराज, अशी काही यहुदी माणसं आहेत ज्यांनी तुमचा अनादर केलाय! तुम्ही ज्यांना बाबेल प्रांताची व्यवस्था पाहण्यासाठी नेमलंय त्या शद्रख, मेशख आणि अबेद्नगो+ यांनी तुमचा अनादर केलाय. ते तुमच्या देवांची सेवा करत नाहीत, आणि तुम्ही उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीची उपासनाही करत नाहीत.”
१३ हे ऐकून नबुखद्नेस्सर राजाच्या तळपायाची आग मस्तकात शिरली, आणि त्याने शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांना आपल्यासमोर आणण्याचा हुकूम दिला. तेव्हा त्यांना राजासमोर आणण्यात आलं. १४ नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला: “शद्रख, मेशख आणि अबेद्नगो, तुम्ही माझ्या देवांची सेवा करत नाही+ आणि मी उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीचीही उपासना करत नाही, हे खरंय का? १५ आता जेव्हा शिंग, बासरी, संतूर, वीणा, तंतुवाद्य, पंचनलिका आणि इतर संगीत वाद्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येईल, तेव्हा मी बनवलेल्या मूर्तीला जर तुम्ही दंडवत घालायला आणि तिची उपासना करायला तयार झालात, तर ठीक. पण जर तुम्ही तिची उपासना केली नाही, तर तुम्हाला लगेच धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकलं जाईल. असा कोणता देव आहे जो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकेल?”+
१६ त्यावर शद्रख, मेशख आणि अबेद्नगो राजाला म्हणाले: “हे नबुखद्नेस्सर राजा! आम्हाला याबद्दल आणखी काहीही बोलायचं नाही. १७ हे राजा! आम्हाला जरी धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्यात आलं, तरी ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो देव आम्हाला त्या भट्टीतून आणि तुमच्या हातून वाचवू शकतो.+ १८ आणि त्याने जरी आम्हाला वाचवलं नाही, तरी हे राजा! एवढं मात्र नक्की, की आम्ही तुमच्या देवांची आणि तुम्ही उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीची उपासना करणार नाही.”+
१९ तेव्हा नबुखद्नेस्सर राजा शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांच्यावर भयंकर संतापला, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.* त्याने आगीची भट्टी नेहमीपेक्षा सात पटीने जास्त तापवण्याचा हुकूम दिला. २० त्याने आपल्या सैन्यातल्या काही ताकदवान माणसांना शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांना बांधून धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्याचा हुकूम दिला.
२१ म्हणून त्या तिघांना त्यांच्या अंगावरचे झगे, टोप्या आणि इतर कपड्यांसहित बांधून त्या धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्यात आलं. २२ राजाचा हुकूम अगदी कडक असल्यामुळे आणि भट्टी नेहमीपेक्षा जास्त तापवल्यामुळे जी माणसं शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांना तिथे घेऊन गेली तीच आगीच्या ज्वालांनी जळून मेली. २३ शद्रख, मेशख आणि अबेद्नगो हे तिघं मात्र बांधलेल्या अवस्थेतच धगधगत्या आगीच्या भट्टीत पडले.
२४ नंतर नबुखद्नेस्सर राजा अतिशय घाबरला आणि पटकन उठून आपल्या उच्च अधिकाऱ्यांना म्हणाला: “आपण तीन माणसांना बांधून आगीत फेकलं होतं ना?” त्यावर ते राजाला म्हणाले: “हो महाराज.” २५ तेव्हा राजा म्हणाला: “पण बघा! मला तर चार माणसं आगीत मोकळी फिरताना दिसत आहेत! त्यांना काहीच झालेलं नाही. आणि त्यांच्यातला चौथा तर देवपुत्रासारखा दिसतोय.”
२६ मग नबुखद्नेस्सर त्या धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ गेला आणि म्हणाला: “हे शद्रख, मेशख, अबेद्नगो! सर्वोच्च देवाच्या सेवकांनो,+ बाहेर या!” तेव्हा शद्रख, मेशख आणि अबेद्नगो हे तिघं त्या आगीतून बाहेर आले. २७ तेव्हा तिथे जमलेले राजाचे सुभेदार, प्रशासकीय अधिकारी, राज्यपाल आणि सर्व उच्च अधिकारी यांनी पाहिलं,+ की या तिघा माणसांच्या शरीरावर आगीचा काहीच परिणाम झालेला नाही.+ त्यांच्या डोक्यावरचा एक केसही जळाला नव्हता, त्यांच्या अंगावरचे कपडे जसेच्या तसे होते, आणि त्यांच्या अंगाला धुराचा वासही येत नव्हता.
२८ मग नबुखद्नेस्सर राजा म्हणाला: “शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांच्या देवाची स्तुती असो!+ त्यानेच आपल्या स्वर्गदूताला पाठवून त्याच्या सेवकांना वाचवलं. कारण त्यांनी आपल्या देवावर भरवसा ठेवला. त्यांनी राजाची आज्ञा पाळली नाही. त्यांच्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा किंवा उपासना करण्यापेक्षा, ते मरायला तयार झाले.+ २९ म्हणून आता मी असा आदेश देत आहे, की कोणत्याही राष्ट्रातले लोक किंवा कोणतीही भाषा बोलणारे लोक जर शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांच्या देवाच्या विरोधात काही बोलले, तर त्यांचे तुकडे-तुकडे केले जावेत. आणि त्यांच्या घरादारांना सार्वजनिक शौचालय* बनवलं जावं. कारण, असा कोणताही देव नाही जो या देवासारखा वाचवू शकतो.”+
३० राजाने मग शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांना बाबेल प्रांतात आणखी मोठं पद दिलं.*+
४ “नबुखद्नेस्सर राजाकडून संपूर्ण पृथ्वीवर असलेल्या सर्व राष्ट्रांना आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना असा संदेश आहे: तुमची शांती अधिकाधिक वाढो! २ सर्वोच्च देवाने माझ्या बाबतीत केलेली चिन्हं आणि अद्भुत कार्यं यांविषयी तुम्हाला सांगायला मला आनंद होत आहे. ३ त्याची चिन्हं किती महान आहेत! आणि त्याची अद्भुत कार्यं किती शक्तिशाली आहेत! त्याचं राज्य सदासर्वकाळाचं, आणि त्याचं शासन पिढ्या न् पिढ्या राहणारं आहे.+
४ मी, नबुखद्नेस्सर, आपल्या घरात शांतीने राहत होतो आणि आपल्या राजमहालात सुखसमृद्धीचं जीवन जगत होतो. ५ त्या वेळी मी एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नामुळे मला फार भीती वाटली. मी माझ्या बिछान्यावर पडलो होतो, तेव्हा मला अशी दृश्यं आणि दृष्टान्त दिसले ज्यांमुळे मी खूप घाबरून गेलो.+ ६ माझ्या या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी मी बाबेलच्या सगळ्या ज्ञानी माणसांना माझ्यासमोर बोलावून आणण्याचा हुकूम दिला.+
७ तेव्हा मंत्रतंत्र करणारे पुजारी, जादूगार, खास्दी माणसं* आणि ज्योतिषी*+ हे सर्व माझ्यासमोर हजर झाले. मी त्यांना माझं स्वप्न सांगितलं, पण ते त्याचा अर्थ मला सांगू शकले नाहीत.+ ८ शेवटी, ज्याला माझ्या देवाच्या नावावरून+ बेल्टशस्सर असं नाव देण्यात आलं होतं, तो दानीएल माझ्यासमोर आला.+ त्याच्यामध्ये पवित्र देवांची शक्ती होती.+ त्याला मी माझं स्वप्न सांगितलं; मी म्हणालो:
९ ‘हे बेल्टशस्सर! मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांच्या प्रमुखा!+ मला माहीत आहे, की तुझ्यामध्ये पवित्र देवांची शक्ती आहे+ आणि कोणतंही रहस्य उलगडून सांगणं तुझ्यासाठी कठीण नाही.+ म्हणून आता, मी स्वप्नात जे दृष्टान्त पाहिले त्यांचा अर्थ मला समजावून सांग.
१० मी माझ्या बिछान्यावर झोपलो होतो, तेव्हा मला काही दृष्टान्त दिसले. मला पृथ्वीच्या मधोमध एक वृक्ष दिसला.+ तो अतिशय उंच होता.+ ११ तो वृक्ष वाढत जाऊन खूप मजबूत झाला. त्याची उंची इतकी वाढली, की तो आकाशापर्यंत पोहोचला. आणि पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांतून तो दिसायचा. १२ त्याची पानं खूप सुंदर होती. त्याला भरपूर फळं लागली होती आणि सर्वांना पुरेल इतकं अन्न त्यापासून मिळायचं. रानातली जनावरं त्याच्या सावलीत आश्रय घ्यायची आणि आकाशातले पक्षी त्याच्या फांद्यांवर राहायचे. सगळ्या प्राण्यांचं त्या वृक्षामुळे पोषण व्हायचं.
१३ मी बिछान्यावर पडलेलो असताना मला जो दृष्टान्त दिसला त्यात पुढे मी पाहिलं, की एक पहारेकरी, एक पवित्र दूत स्वर्गातून खाली येत होता.+ १४ तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “हा वृक्ष कापून टाका.+ त्याच्या फांद्या तोडा आणि तो हलवून त्याची पानं पाडा. त्याची फळं इथे-तिथे विखरून टाका! त्याच्याखाली आश्रय घेणारी जनावरं पळून जावोत आणि पक्षी त्याच्या फांद्यांवरून उडून जावोत. १५ पण वृक्षाचा बुंधा मात्र त्याच्या मुळांसकट जमिनीत राहू द्या. त्याला लोखंड व तांब्याच्या पट्ट्याने बांधून रानातल्या गवतात तसंच राहू द्या. तो आकाशातून पडणाऱ्या दवामुळे भिजत राहो, आणि पृथ्वीवरच्या झाडाझुडपांत जनावरांसोबत राहो.+ १६ त्याचं मानवी हृदय बदलून जावो, व त्याला जनावराचं हृदय देण्यात येवो. आणि त्यावरून सात काळ+ जावोत.+ १७ पहारेकऱ्यांनी+ जाहीर केलेला आदेश आणि पवित्र दूतांनी घोषित केलेला निर्णय हाच आहे. यावरून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांना समजेल, की सर्वोच्च देव हाच मानवी राज्यांवर शासनकर्ता आहे.+ तसंच, आपली इच्छा असेल त्याला तो राज्य देतो आणि अगदी क्षुल्लक व साधारण माणसालाही त्यावर शासन करायला नेमतो.”
१८ मी, राजा नबुखद्नेस्सर, याने पाहिलेलं स्वप्न हेच आहे. आता हे बेल्टशस्सर! या स्वप्नाचा अर्थ मला सांग. कारण माझ्या साम्राज्यातल्या कोणत्याही ज्ञानी माणसाला त्याचा अर्थ समजावून सांगता येत नाही.+ पण तुला तो समजावून सांगता येईल, कारण तुझ्यामध्ये पवित्र देवांची शक्ती आहे.’
१९ तेव्हा बेल्टशस्सर म्हटलेला दानीएल+ क्षणभर स्तब्ध झाला आणि त्याच्या मनात आलेल्या विचारांमुळे तो घाबरून गेला.
त्यावर राजा त्याला म्हणाला: ‘हे बेल्टशस्सर! या स्वप्नामुळे आणि त्याच्या अर्थामुळे घाबरू नकोस.’
तेव्हा बेल्टशस्सरने उत्तर दिलं: ‘माझ्या प्रभू! हे स्वप्न, तुमचा द्वेष करणाऱ्यांना आणि त्याचा अर्थ तुमच्या शत्रूंना लागू होवो.
२० तुम्ही जो वृक्ष पाहिलात, जो वाढत जाऊन मजबूत झाला, ज्याची उंची आकाशापर्यंत पोहोचली आणि जो संपूर्ण पृथ्वीवरून दिसत होता,+ २१ ज्याची पानं सुंदर होती, ज्याला भरपूर फळं होती आणि ज्यापासून सर्वांना अन्न मिळायचं, ज्याच्याखाली रानातली जनावरं आश्रय घ्यायची आणि ज्याच्या फांद्यांवर आकाशातले पक्षी राहायचे,+ २२ तो वृक्ष तुम्हीच आहात. कारण हे राजा! तुम्ही खूप महान आणि शक्तिशाली बनला आहात. तुमचं वैभव वाढून आकाशापर्यंत पोहोचलंय+ आणि तुमचं शासन पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत पसरलंय.+
२३ मग राजाने एका पहारेकऱ्याला, एका पवित्र दूताला+ स्वर्गातून खाली येताना पाहिलं. तो म्हणत होता: “हा वृक्ष कापून टाका आणि त्याचा नाश करा. पण त्याचा बुंधा मात्र त्याच्या मुळांसकट जमिनीत राहू द्या. त्याला लोखंड व तांब्याच्या पट्ट्याने बांधून रानातल्या गवतात राहू द्या. त्याला आकाशातल्या दवामुळे भिजू द्या, आणि त्यावरून सात काळ जाईपर्यंत त्याला रानातल्या जनावरांसोबत राहू द्या.”+ २४ हे राजा! याचा अर्थ असा आहे; सर्वोच्च देवाने माझ्या प्रभूच्या, राजाच्या बाबतीत असा आदेश दिलाय, की २५ तुम्हाला माणसांमधून घालवून दिलं जाईल आणि तुम्ही रानातल्या जनावरांसोबत राहाल. तुम्ही बैलांप्रमाणे गवत खाल आणि आकाशातल्या दवामुळे भिजाल,+ आणि तुमच्यावरून सात काळ+ जातील.+ तेव्हा तुम्हाला समजेल, की सर्वोच्च देव हाच मानवी राज्यांवर शासनकर्ता आहे आणि आपली इच्छा असेल त्याला तो राज्य देतो.+
२६ पण ते म्हणाले, की वृक्षाचा बुंधा त्याच्या मुळांसकट तसाच राहू द्या.+ याचा अर्थ असा, की स्वर्गात शासन करणारा कोणीतरी आहे,* याची तुम्हाला जाणीव झाल्यावर तुमचं राज्य तुम्हाला परत मिळेल. २७ म्हणून हे राजा! कृपया माझा सल्ला मान्य करा. पाप करण्याचं सोडून द्या आणि चांगली कामं करा; आपला दुष्टपणा सोडून द्या आणि गरिबांना दया दाखवा. म्हणजे कदाचित तुमच्या सुखसमृद्धीचे दिवस आणखी वाढवले जातील.’”+
२८ हे सगळं नबुखद्नेस्सर राजाच्या बाबतीत घडलं.
२९ मग १२ महिन्यांनंतर, राजा एकदा बाबेलमधल्या आपल्या राजमहालाच्या छतावर फिरत होता, ३० तेव्हा तो म्हणाला: “पाहा, हे महान बाबेल शहर! मी ते माझ्या शाही निवासासाठी आणि माझ्या ऐश्वर्याच्या गौरवासाठी स्वतःच्या शक्तीने आणि सामर्थ्याने बांधलंय!”
३१ राजाच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात न पडतात तोच आकाशातून असा आवाज ऐकू आला: “हे राजा नबुखद्नेस्सर! तुला असं सांगण्यात येत आहे, की ‘तुझं राज्य तुझ्या हातून काढून घेण्यात आलंय.+ ३२ तुला माणसांमधून घालवून दिलं जाईल. तू रानातल्या जनावरांमध्ये राहशील व बैलांप्रमाणे गवत खाशील, आणि तुझ्यावरून सात काळ जातील. तेव्हा तुला समजेल, की सर्वोच्च देव हाच मानवी राज्यांवर शासनकर्ता आहे आणि आपली इच्छा असेल त्याला तो राज्य देतो.’”+
३३ आणि त्याच क्षणी हे शब्द नबुखद्नेस्सरच्या बाबतीत पूर्ण झाले. त्याला माणसांमधून घालवून देण्यात आलं. तो बैलांप्रमाणे गवत खाऊ लागला आणि त्याचं शरीर आकाशातल्या दवाने भिजू लागलं. त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे वाढले आणि त्याची नखं पक्ष्यांच्या नखांसारखी झाली.+
३४ “तो काळ संपल्यावर+ मी, नबुखद्नेस्सर, याने वर आकाशाकडे पाहिलं, आणि माझी बुद्धी मला परत मिळाली. तेव्हा मी सर्वोच्च देवाची स्तुती केली; सदासर्वकाळ जिवंत असणाऱ्या देवाचा मी गौरव व धन्यवाद केला. कारण त्याचं शासन सर्वकाळाचं, आणि त्याचं राज्य पिढ्या न् पिढ्या राहणारं आहे.+ ३५ पृथ्वीवर राहणारे त्याच्यासमोर काहीच नाहीत. स्वर्गातल्या सैन्याच्या बाबतीत आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत तो आपल्या इच्छेप्रमाणे करतो. कोणीही त्याला अडवू शकत नाही,*+ किंवा ‘तू हे काय केलंस?’ असं कोणीही त्याला विचारू शकत नाही.+
३६ त्या वेळी माझी बुद्धी मला परत मिळाली. माझं राजवैभव, माझा महिमा आणि माझं ऐश्वर्य मला पुन्हा मिळालं.+ मोठमोठे अधिकारी व प्रतिष्ठित लोक माझ्याशी बोलायला उत्सुक झाले. माझं राज्यपद मला परत मिळालं आणि आधीपेक्षा जास्त मानसन्मान मला मिळाला.
३७ आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गांच्या राजाची स्तुती करतो; त्याचा सन्मान आणि गौरव करतो.+ कारण त्याची सगळी कार्यं सत्य आहेत, त्याचे मार्ग न्यायाचे आहेत+ आणि जे गर्विष्ठपणे वागतात, त्यांना तो नमवू शकतो.”+
५ बेलशस्सर+ राजाने आपल्या एक हजार प्रतिष्ठित माणसांसाठी एक मोठी मेजवानी ठेवली होती, आणि तो त्यांच्यासमोर द्राक्षारस पीत होता.+ २ मग नशेत असताना बेलशस्सरने असा हुकूम दिला, की त्याचे वडील नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेममधल्या मंदिरातून जी सोन्या-चांदीची भांडी आणली होती ती घेऊन यावीत;+ म्हणजे राजा आणि त्याचे प्रतिष्ठित लोक, तसंच त्याच्या उपपत्नी आणि त्याच्या दुसऱ्या बायका हे सगळे त्यांतून द्राक्षारस पितील. ३ तेव्हा, यरुशलेममधल्या देवाच्या मंदिरातल्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची भांडी ते घेऊन आले. मग राजा, त्याचे प्रतिष्ठित लोक, त्याच्या उपपत्नी आणि त्याच्या दुसऱ्या बायका हे सगळे त्यांतून द्राक्षारस प्यायले. ४ द्राक्षारस पिऊन त्यांनी आपल्या दैवतांची, म्हणजे सोन्याच्या, चांदीच्या, तांब्याच्या, लोखंडाच्या, लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची स्तुती केली.
५ त्याच क्षणी, दीपवृक्षासमोर* असलेल्या राजमहालाच्या भिंतीवर माणसाच्या हाताची बोटं प्रकट झाली आणि भिंतीवर काहीतरी लिहू लागली. लिहीत असलेला तो हात राजाने पाहिला, ६ तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि आपल्या विचारांमुळे तो खूप घाबरला. त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले+ आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.
७ राजाने मोठ्याने ओरडून आपल्या जादूगारांना, खास्दी माणसांना* आणि ज्योतिष्यांना* बोलावून आणायला सांगितलं.+ मग राजा बाबेलच्या ज्ञानी माणसांना म्हणाला: “जो कोणी हे लिखाण वाचून त्याचा अर्थ मला सांगेल, त्याला जांभळ्या रंगाचं वस्त्र घातलं जाईल, त्याच्या गळ्यात सोन्याचा हार घातला जाईल+ आणि तो राज्यात शासन करणारा तिसऱ्या पदावरचा अधिकारी बनेल.”+
८ तेव्हा राजाची सर्व ज्ञानी माणसं आत आली, पण त्यांच्यापैकी एकालाही भिंतीवर काय लिहिलं आहे ते वाचता आलं नाही, किंवा त्याचा अर्थ राजाला समजावून सांगता आला नाही.+ ९ म्हणून बेलशस्सर राजा खूप घाबरला आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याची प्रतिष्ठित माणसंही गोंधळात पडली.+
१० राजाचं आणि त्याच्या प्रतिष्ठित लोकांचं बोलणं ऐकून राणी मेजवानी-गृहात आली. ती राजाला म्हणाली: “महाराज, युगानुयुग जिवंत राहा! तुमच्या चेहऱ्याचा रंग का उडालाय? घाबरण्याचं काहीही कारण नाही. ११ तुमच्या राज्यात असा एक माणूस आहे, ज्याच्यामध्ये पवित्र देवांची शक्ती आहे. तुमच्या वडिलांच्या काळात त्याच्याकडे ज्ञान, सखोल समज आणि देवांसारखी बुद्धी असल्याचं दिसून आलं होतं.+ तुमचे वडील, राजा नबुखद्नेस्सर, यांनी त्याला मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांवर, जादूगारांवर, खास्दी माणसांवर* आणि ज्योतिष्यांवर प्रमुख म्हणून नेमलं होतं.+ हो महाराज, तुमच्या वडिलांनी असंच केलं होतं. १२ कारण, राजाने ज्याला बेल्टशस्सर असं नाव दिलं होतं, त्या दानीएलकडे+ विलक्षण बुद्धिमत्ता होती. त्याच्याकडे स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी, तसंच कोडी आणि गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारं ज्ञान आणि सखोल समज होती.+ म्हणून आता दानीएलला बोलावून घ्या म्हणजे तो तुम्हाला अर्थ सांगेल.”
१३ तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आलं. राजाने दानीएलला विचारलं: “माझ्या वडिलांनी, महाराजांनी ज्या बंदिवानांना यहूदातून आणलं होतं,+ त्यांच्यातला दानीएल तूच ना?+ १४ मी तुझ्याबद्दल असं ऐकलंय, की तुझ्यामध्ये देवांची शक्ती आहे.+ आणि तुझ्याकडे ज्ञान, सखोल समज आणि विलक्षण बुद्धिमत्ता आहे.+ १५ भिंतीवर जे लिहिलंय ते वाचायला आणि त्याचा अर्थ सांगायला, माझ्यासमोर ज्ञानी माणसांना आणि जादूगारांना आणण्यात आलं होतं. पण त्यांच्यापैकी एकालाही या संदेशाचा अर्थ सांगता आला नाही.+ १६ पण तुझ्याबद्दल मी असं ऐकलंय, की तू रहस्यांचा अर्थ उलगडून सांगू शकतोस+ आणि गुंतागुंतीचे प्रश्न सोडवू शकतोस. म्हणून आता जर तुला हे वाचता आलं आणि त्याचा अर्थ मला समजावून सांगता आला, तर तुला जांभळ्या रंगाचं वस्त्र घातलं जाईल, तुझ्या गळ्यात सोन्याचा हार घातला जाईल आणि तू राज्यात शासन करणारा तिसऱ्या पदावरचा अधिकारी बनशील.”+
१७ त्यावर दानीएल राजाला म्हणाला: “तुमच्या भेटवस्तू तुमच्याजवळ असू द्या आणि तुमचे इनाम दुसऱ्यांना द्या. पण हा संदेश मात्र मी राजाला वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ सांगतो. १८ हे राजा! सर्वोच्च देवाने तुमच्या वडिलांना, नबुखद्नेस्सर यांना राज्य, महानता, मानसन्मान आणि वैभव दिलं होतं.+ १९ देवाने दिलेल्या महानतेमुळे सगळ्या राष्ट्रांतले आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक भीतीने त्यांच्यासमोर थरथर कापायचे.+ त्यांच्या मनात येईल त्याला ते मारून टाकायचे किंवा मनात येईल त्याला जिवंत सोडायचे; आणि मनात येईल त्याला ते सन्मानित करायचे किंवा मनात येईल त्याला ते अपमानित करायचे.+ २० पण जेव्हा त्यांचं मन गर्विष्ठ बनलं आणि ते कठोर होऊन उद्धटपणे वागू लागले,+ तेव्हा त्यांना त्यांच्या राजासनावरून काढून टाकण्यात आलं. तसंच त्यांचा मानसन्मान त्यांच्यापासून काढून घेण्यात आला. २१ त्यांना माणसांमधून घालवून देण्यात आलं. त्यांचं हृदय जनावरांच्या हृदयासारखं करण्यात आलं आणि ते रानगाढवांमध्ये राहू लागले. ते बैलांप्रमाणे गवत खायचे आणि त्यांचं शरीर आकाशातल्या दवाने भिजायचं. सर्वोच्च देव हाच मानवी राज्यांवर शासनकर्ता आहे आणि आपली इच्छा असेल त्याला तो राज्य देतो, हे त्यांना समजेपर्यंत त्यांच्या बाबतीत हे घडलं.+
२२ पण तुम्ही बेलशस्सर, त्यांचे पुत्र! तुम्हाला हे सगळं माहीत असूनही तुम्ही स्वतःला नम्र केलं नाही. २३ उलट, स्वर्गाच्या देवाविरुद्ध जाऊन तुम्ही स्वतःचा गौरव केला+ आणि त्याच्या मंदिरातली भांडी मागवून घेतली.+ मग तुम्ही आणि तुमचे प्रतिष्ठित लोक, तुमच्या उपपत्नी आणि तुमच्या दुसऱ्या बायका त्यांतून द्राक्षारस प्यायलात. तुम्ही तुमच्या सोन्याच्या, चांदीच्या, तांब्याच्या, लोखंडाच्या, लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची स्तुती केली. तुम्ही अशा दैवतांची स्तुती केली ज्यांना काही दिसत नाही, ऐकू येत नाही किंवा काही कळत नाही.+ पण ज्या देवाच्या हातात तुमचा श्वास+ आणि तुमचे सर्व मार्ग आहेत, त्या देवाचा मात्र तुम्ही गौरव केला नाही. २४ म्हणून त्या देवाने तो हात पाठवून हा संदेश लिहिला.+ २५ आणि जो संदेश लिहिण्यात आला तो असा: मने, मने, तकेल आणि पारसीन.
२६ या शब्दांचा अर्थ असा आहे: मने म्हणजे, देवाने तुमच्या राज्याचे दिवस मोजलेत आणि त्याचा अंत केलाय.+
२७ तकेल म्हणजे, तुम्हाला तराजूत तोलण्यात आलंय आणि तुम्ही कमी भरलात.
२८ परेस म्हणजे, तुमचं राज्य विभागून ते मेदच्या आणि पर्शियाच्या लोकांना देण्यात आलंय.”+
२९ मग बेलशस्सरने हुकूम दिला, तेव्हा दानीएलला जांभळ्या रंगाचं वस्त्र घालण्यात आलं आणि त्याच्या गळ्यात सोन्याचा हार घालण्यात आला. तसंच त्याच्याविषयी अशी घोषणा करण्यात आली, की तो राज्यात शासन करणारा तिसऱ्या पदावरचा अधिकारी होणार आहे.+
३० त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर याला मारून टाकण्यात आलं.+ ३१ आणि मेदचा राजा दारयावेश+ याला राज्य मिळालं; तो सुमारे ६२ वर्षांचा होता.
६ दारयावेश राजाला आपल्या संपूर्ण साम्राज्यात १२० सुभेदारांना नेमणं योग्य वाटलं.+ २ त्या सुभेदारांवर तीन उच्च अधिकारी होते आणि दानीएल हा त्या तिघांपैकी एक होता.+ राजाचं काही नुकसान होऊ नये, म्हणून सुभेदार+ या अधिकाऱ्यांना सर्व बाबतींत हिशोब द्यायचे. ३ दानीएलकडे विलक्षण बुद्धिमत्ता असल्यामुळे तो बाकीच्या उच्च अधिकाऱ्यांपेक्षा आणि सुभेदारांपेक्षा श्रेष्ठ ठरला.+ त्यामुळे, आपल्या संपूर्ण साम्राज्यावर दानीएलला अधिकारी म्हणून नेमण्याचा राजाचा विचार होता.
४ त्या वेळी, उच्च अधिकारी आणि सुभेदार हे राज्यकारभाराच्या बाबतीत दानीएलवर आरोप लावण्यासाठी काही कारण शोधत होते. पण त्याच्यावर आरोप लावण्यासारखं कोणतंही कारण किंवा कोणताही दोष त्यांना सापडला नाही. कारण तो भरवशालायक असून त्याच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा किंवा अप्रामाणिकपणा नव्हता. ५ तेव्हा ती माणसं म्हणाली: “या दानीएलवर आरोप लावण्यासाठी आपल्याला एकही कारण सापडणार नाही. फक्त त्याच्या देवाच्या नियमांच्या बाबतीत काही कारण शोधता आलं, तर आपल्याला त्याच्यावर आरोप लावता येईल.”+
६ म्हणून उच्च अधिकारी आणि सुभेदार एकत्र जमून राजाकडे गेले आणि त्याला म्हणाले: “हे दारयावेश राजा, युगानुयुग जिवंत राहा! ७ सगळे शाही अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सुभेदार, उच्च शाही अधिकारी आणि राज्यपाल यांनी आपसात सल्लामसलत करून एक शाही फर्मान काढण्याचा आणि लोकांवर बंदी घालण्याचा विचार केलाय. आम्ही असा विचार केलाय, की ३० दिवसांपर्यंत जो कोणी राजाला सोडून इतर कोणत्याही देवाकडे किंवा माणसाकडे विनंती करेल, त्याला सिंहांच्या गुहेत टाकण्यात यावं.+ ८ म्हणून महाराज, आता हे फर्मान काढा आणि त्यावर सही करा;+ म्हणजे मेद आणि पर्शिया यांच्या कधीही न बदलणाऱ्या कायद्यानुसार, त्यात कोणालाही बदल करता येणार नाही.”+
९ तेव्हा दारयावेश राजाने बंदी घालण्याच्या फर्मानावर सही केली.
१० राजाने फर्मानावर सही केली आहे हे कळताच दानीएल आपल्या घरी गेला; घराच्या छतावर असलेल्या त्याच्या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेला असून त्या उघड्या होत्या.+ आणि नेहमीप्रमाणे दिवसातून तीन वेळा दानीएल दररोज गुडघे टेकून आपल्या देवाला प्रार्थना करत राहिला आणि त्याची स्तुती करत राहिला. ११ त्या वेळी, ती माणसं आत घुसली आणि त्यांनी दानीएलला आपल्या देवाकडे विनंती करत असल्याचं आणि कृपेची भीक मागत असल्याचं पाहिलं.
१२ मग ती माणसं राजाकडे गेली आणि राजाने घातलेल्या बंदीची त्यांनी त्याला आठवण करून दिली. ते म्हणाले: “महाराज! ३० दिवसांपर्यंत जो कोणी राजाला सोडून इतर कोणत्याही देवाकडे किंवा माणसाकडे विनंती करेल त्याला सिंहांच्या गुहेत टाकण्यात यावं, अशी बंदी घालणाऱ्या फर्मानावर तुम्ही सही केली होती ना?” त्यावर राजा म्हणाला: “हो, मी केली होती. आणि मेद व पर्शिया यांच्या कधीही न बदलणाऱ्या कायद्यानुसार त्यात कोणताही बदल होऊ शकत नाही.”+ १३ तेव्हा ते लगेच राजाला म्हणाले: “महाराज, यहूदाच्या बंदिवानांमधल्या दानीएलने+ तुमचा अनादर केलाय. तुम्ही सही केलेलं फर्मान तो मानत नाही. उलट दिवसातून तीन वेळा तो प्रार्थना करतोय.”+ १४ हे ऐकताच राजाला फार वाईट वाटलं, आणि दानीएलला कसं वाचवता येईल याचा तो विचार करू लागला. त्याने सूर्य मावळेपर्यंत त्याला वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले. १५ शेवटी ती माणसं एकत्र जमून राजाकडे गेली आणि त्याला म्हणाली: “महाराज! लक्षात असू द्या, मेद व पर्शिया यांच्या कायद्यानुसार राजाने घातलेली कोणतीही बंदी किंवा राजाने काढलेलं कोणतंही फर्मान बदललं जाऊ शकत नाही.”+
१६ मग राजाच्या हुकमावरून त्यांनी दानीएलला पकडून सिंहांच्या गुहेत टाकलं.+ राजा दानीएलला म्हणाला: “ज्या देवाची तू दिवसरात्र सेवा करतोस, तो तुला वाचवेल.” १७ नंतर एक मोठा दगड आणून गुहेचं तोंड बंद करण्यात आलं, आणि राजाने त्यावर आपल्या मुद्रेच्या अंगठीची आणि आपल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुद्रेच्या अंगठीची मोहर लावली; म्हणजे दानीएलच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयात कोणताही बदल होऊ नये.
१८ मग राजा आपल्या महालात परत गेला. त्या रात्री त्याने काहीच खाल्लं नाही किंवा स्वतःच्या मनोरंजनासाठी काही केलं नाही,* आणि तो रात्रभर झोपूही शकला नाही. १९ शेवटी दिवस उजाडताच तो उठला आणि घाईघाईने सिंहांच्या गुहेकडे गेला. २० गुहेजवळ आल्यावर, त्याने मोठ्या दुःखाने दानीएलला हाक मारून विचारलं: “दानीएल! जिवंत देवाच्या सेवका! ज्या देवाची तू दिवसरात्र सेवा करतोस, तो तुला सिंहांपासून वाचवू शकला का?” २१ तेव्हा दानीएल लगेच राजाला म्हणाला: “महाराज, युगानुयुग जिवंत राहा! २२ माझ्या देवाने आपला स्वर्गदूत पाठवून सिंहांची तोंडं बंद केली+ आणि त्यांनी मला काहीच केलं नाही.+ कारण देवासमोर मी निर्दोष ठरलो, आणि महाराज! मी तुमचंही काही वाईट केलेलं नाही.”
२३ हे ऐकून राजाला अतिशय आनंद झाला आणि त्याने दानीएलला गुहेतून वर काढण्याचा हुकूम दिला. तेव्हा त्यांनी दानीएलला बाहेर काढलं. दानीएलला कोणतीही इजा झालेली नव्हती, कारण त्याने आपल्या देवावर भरवसा ठेवला होता.+
२४ मग ज्या माणसांनी दानीएलवर आरोप लावला होता,* त्यांना राजाच्या हुकमावरून पकडून आणण्यात आलं. आणि त्यांना त्यांच्या बायका-मुलांसोबत सिंहांच्या गुहेत फेकण्यात आलं. ते गुहेच्या तळापर्यंत पोहोचलेही नाहीत, तोच सिंहांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या सगळ्या हाडांचा चुराडा केला.+
२५ यानंतर दारयावेश राजाने पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांतल्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना असा संदेश लिहून पाठवला:+ “तुम्हाला भरपूर शांती लाभो! २६ मी असं फर्मान काढतोय, की माझ्या साम्राज्यातल्या प्रत्येक भागात राहणाऱ्या लोकांनी दानीएलच्या देवाचं भय बाळगावं आणि त्याचा आदर करावा.+ कारण तो जिवंत देव आहे आणि त्याचं अस्तित्व सदासर्वकाळाचं आहे. त्याच्या राज्याचा कधीही नाश होणार नाही आणि त्याचं शासन* कायम टिकून राहील.+ २७ तो आपल्या लोकांना सोडवणारा+ आणि वाचवणारा आहे; तो स्वर्गात आणि पृथ्वीवर चिन्हं आणि अद्भुत कार्यं करणारा आहे.+ त्यानेच दानीएलला सिंहांच्या पंजातून सोडवलं.”
२८ अशा प्रकारे, दारयावेशच्या+ राज्यात आणि पर्शियाचा राजा कोरेश+ याच्या राज्यात दानीएल यशस्वी होत गेला.
७ बाबेलचा राजा बेलशस्सर+ याच्या शासनकाळाच्या पहिल्या वर्षी, दानीएल आपल्या बिछान्यावर झोपलेला असताना त्याला एक स्वप्न आणि काही दृष्टान्त दिसले.+ मग त्याने ते स्वप्न लिहून काढलं;+ त्याने त्या गोष्टींचा संपूर्ण अहवाल लिहून काढला. २ दानीएल म्हणाला:
“रात्रीच्या वेळी मला जे दृष्टान्त दिसले त्यात मी पाहिलं, की आकाशातल्या चार वाऱ्यांमुळे मोठा समुद्र+ खवळला होता. ३ त्या समुद्रातून अतिशय मोठे असे चार प्राणी+ बाहेर आले; सगळे प्राणी एकमेकांपेक्षा वेगळे होते.
४ पहिला प्राणी हा सिंहासारखा होता,+ आणि त्याला गरुडाचे पंख होते.+ मी पाहत होतो, तेव्हा त्याचे पंख उपटण्यात आले. मग त्याला जमिनीवरून उचलून माणसांसारखं दोन पायांवर उभं करण्यात आलं, आणि त्याला माणसाचं हृदय देण्यात आलं.
५ दुसरा प्राणी अस्वलासारखा होता.+ त्याच्या शरीराच्या एका बाजूचा भाग वर उचललेला असून त्याने आपल्या तोंडात दातांच्या मधे तीन फासळ्या धरल्या होत्या. त्याला असं सांगण्यात आलं: ‘ऊठ, भरपूर मांस खा.’+
६ त्यानंतर मी चित्त्यासारखा+ एक प्राणी पाहिला. त्याच्या पाठीवर पक्षाच्या पंखांसारखे चार पंख होते, आणि त्याला चार डोकी होती.+ त्याला राज्य करायचा अधिकार देण्यात आला.
७ रात्री मला जे दृष्टान्त दिसले त्यांत मी नंतर चौथा प्राणी पाहिला. तो खूप भयानक आणि अतिशय शक्तिशाली होता. त्याला मोठमोठे लोखंडी दात होते. तो सगळं काही खाऊन त्याचा चुराडा करत होता, आणि उरलेलं आपल्या पायांखाली तुडवत होता.+ तो आधीच्या सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा असून त्याला दहा शिंगं होती. ८ मी त्या शिंगांकडे लक्ष देऊन बघत होतो, तेव्हा पाहा! त्यांच्यामधून एक लहानसं शिंग वर आलं.+ त्याच्यासमोर आधीच्या शिंगांपैकी तीन शिंगं उपटण्यात आली. त्या शिंगाला माणसाच्या डोळ्यांसारखे डोळे आणि मगरूरपणे बोलणारं* तोंड होतं.+
९ मी पाहत असताना राजासनं मांडण्यात आली आणि ‘अति प्राचीन’+ असा कोणी एक आपल्या राजासनावर बसला.+ त्याचे कपडे बर्फासारखे* पांढरे शुभ्र,+ आणि त्याच्या डोक्यावरचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचं राजासन आगीच्या ज्वालांचं आणि राजासनाची चाकं धगधगत्या आगीची होती.+ १० त्याच्यासमोरून आगीचा प्रवाह वाहत होता.+ हजारो स्वर्गदूत त्याची सेवा करत होते, आणि लाखो स्वर्गदूत त्याच्यासमोर उभे होते.+ मग न्यायसभा+ भरली आणि पुस्तकं उघडली गेली.
११ ते शिंग मगरूरपणे बोलत होतं,* म्हणून मी त्याच्याकडे पाहत राहिलो.+ मी पाहत असताना त्या प्राण्याला मारून टाकण्यात आलं आणि त्याचं शरीर आगीत टाकून नष्ट करण्यात आलं. १२ पण बाकीच्या प्राण्यांकडून+ मात्र त्यांचा राज्य करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. आणि त्यांचं आयुष्य काही वेळासाठी आणि काही काळासाठी वाढवण्यात आलं.
१३ रात्रीच्या वेळी मला जे दृष्टान्त दिसले त्यांत मी पुढे पाहिलं, की मनुष्याच्या मुलासारखा कोणीतरी आकाशातल्या ढगांबरोबर येत होता.+ मग जो ‘अति प्राचीन’+ होता त्याच्यासमोर जाण्याची त्याला परवानगी देण्यात आली. आणि त्यांनी त्याला त्याच्याजवळ नेलं. १४ आणि त्याला राज्याधिकार,+ सन्मान+ आणि राज्य देण्यात आलं; म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रांतल्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांनी त्याची सेवा करावी.+ त्याचा राज्याधिकार सदासर्वकाळाचा आहे, आणि त्याच्या राज्याचा कधीही नाश होणार नाही.+
१५ मग मी, दानीएल फार अस्वस्थ झालो, कारण मी पाहिलेले दृष्टान्त खूप भीतिदायक होते.+ १६ या सगळ्या गोष्टींचा खरा अर्थ काय आहे, हे विचारायला मी तिथे उभे असलेल्यांपैकी एकाकडे गेलो. तेव्हा या गोष्टींचा काय अर्थ होतो ते त्याने मला सांगितलं.
१७ ‘ते अतिशय मोठे चार प्राणी,+ म्हणजे सत्तेवर येणारे पृथ्वीवरचे चार राजे आहेत.+ १८ पण राज्य सर्वश्रेष्ठ देवाच्या पवित्र जनांना+ मिळेल.+ आणि ते राज्य कायमसाठी, हो सदासर्वकाळासाठी त्यांचं राहील.’+
१९ मग, इतर प्राण्यांपेक्षा वेगळ्या असलेल्या चौथ्या प्राण्याविषयी मला आणखी जाणून घ्यायची इच्छा झाली. तो खूप भयानक होता. त्याचे दात लोखंडाचे तर पंजे तांब्याचे होते. तो सगळं काही खाऊन त्याचा चुराडा करायचा, आणि उरलेलं आपल्या पायांखाली तुडवायचा.+ २० तसंच, त्याच्या डोक्यावर असलेल्या दहा शिंगांबद्दल+ आणि नंतर उगवलेल्या शिंगाबद्दल, म्हणजे ज्याच्यासमोर तीन शिंगं पडली,+ ज्याला डोळे होते आणि मगरूरपणे बोलणारं* तोंड होतं आणि जे इतर शिंगांपेक्षा मोठं दिसतं होतं, त्याच्याबद्दल आणखी जाणून घ्यायची मला इच्छा झाली.
२१ मग मी पाहिलं, की त्या शिंगाने पवित्र जनांसोबत युद्ध केलं, आणि ते शिंग त्यांच्यावर प्रबळ ठरत राहिलं.+ २२ शेवटी, जो ‘अति प्राचीन’+ तो आला आणि त्याने सर्वश्रेष्ठ देवाचे पवित्र जन+ यांच्या बाजूने न्याय दिला. आणि पवित्र जनांना राज्य मिळण्याची वेळ आली.+
२३ दृष्टान्ताचा अर्थ सांगणारा मला म्हणाला: ‘चौथा प्राणी, म्हणजे सत्तेवर येणारं पृथ्वीवरचं चौथं राज्य. ते बाकीच्या सगळ्या राज्यांपेक्षा वेगळं असेल. ते संपूर्ण पृथ्वी खाऊन टाकेल आणि तिला पायांखाली तुडवून तिचा चुराडा करेल.+ २४ आता दहा शिंगांविषयी सांगायचं, तर त्या राज्यातून दहा राजे येतील. आणि त्यांच्यानंतर आणखी एक राजा येईल. तो आधीच्या राजांपेक्षा वेगळा असून तीन राजांना अपमानित करेल.+ २५ तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल+ आणि सर्वश्रेष्ठ देवाच्या पवित्र जनांचा सतत छळ करेल. तो काळ आणि कायदा बदलण्याचा प्रयत्न करेल आणि एक काळ, दोन काळ आणि अर्ध्या काळासाठी*+ पवित्र जनांना त्याच्या हाती दिलं जाईल. २६ पण न्यायसभा भरली आणि त्यांनी त्याचा अंत करण्यासाठी व त्याचा पूर्णपणे नाश करण्यासाठी+ त्याचा राज्याधिकार काढून घेतला.
२७ मग राज्य, राज्याधिकार आणि आकाशाखाली असलेल्या सगळ्या राज्यांचं वैभव हे सर्वश्रेष्ठ देवाच्या पवित्र जनांना+ देण्यात आलं. या पवित्र जनांचं राज्य सदासर्वकाळाचं+ असून इतर सर्व राज्यं त्यांची सेवा करतील आणि त्यांच्या अधीन राहतील.’
२८ हा अहवाल इथेच संपतो. मी, दानीएल माझ्या मनातल्या विचारांनी इतका घाबरलो, की माझ्या चेहऱ्याचा रंगच बदलला. पण या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनातच ठेवल्या.”
८ बेलशस्सर+ राजाच्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी मला, दानीएलला, आणखी एक दृष्टान्त दिसला.+ २ मी एलाम+ प्रांतातल्या शूशन*+ राजवाड्यात* होतो. मी तो दृष्टान्त उलई नदीजवळ* पाहिला. ३ मी नजर वर करून बघितलं, तेव्हा त्या नदीसमोर एक एडका+ उभा असलेला मला दिसला. त्याला दोन शिंगं होती.+ ती दोन्ही शिंगं मोठी होती, पण त्यातलं एक शिंग दुसऱ्यापेक्षा जास्त मोठं असून ते नंतर उगवलं होतं.+ ४ मी पाहिलं की तो एडका पश्चिमेला, उत्तरेला आणि दक्षिणेला धडका मारत होता. आणि कोणताही जंगली प्राणी त्याच्यासमोर टिकाव धरू शकत नव्हता किंवा कोणीही त्यांना त्याच्या हातून सोडवू शकत नव्हतं.+ त्याच्या मनाला येईल ते करून तो मगरूरपणे वागत होता.
५ पुढे दृष्टान्तात मी पाहिलं, की एक बकरा+ पश्चिमेकडून येत होता; तो संपूर्ण पृथ्वी पार करून येत होता, आणि येताना त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते. त्याच्या डोळ्यांच्या मधोमध ठळकपणे दिसणारं एक शिंग होतं.+ ६ मी नदीजवळ जो दोन शिंगांचा एडका उभा असलेला पाहिला होता, त्याच्या दिशेने तो बकरा मोठ्या रागाने धावत येत होता.
७ तो बकरा, एडक्याच्या अधिकाधिक जवळ येत असल्याचं मी पाहिलं. त्याच्या मनात एडक्याबद्दल खूप द्वेष भरला होता. त्याने येऊन त्या एडक्याला धडक मारली आणि त्याची दोन्ही शिंगं मोडून टाकली. आणि त्या एडक्यात, बकऱ्याच्या विरोधात उभं राहायची शक्ती उरली नाही. बकऱ्याने एडक्याला जमिनीवर पाडून टाकलं आणि त्याला आपल्या पायांखाली तुडवलं. कोणीही त्याला बकऱ्याच्या हातून सोडवू शकलं नाही.
८ मग तो बकरा जास्तच मगरूरपणे वागू लागला. तो शक्तिशाली झाला तेव्हा लगेच त्याचं मोठं शिंग मोडण्यात आलं. मग त्याच्या जागी आकाशाच्या चार वाऱ्यांच्या दिशेने, ठळकपणे दिसणारी चार शिंगं उगवली.+
९ त्यांपैकी एका शिंगातून आणखी एक लहान शिंग उगवलं आणि ते दक्षिणेला, पूर्वेला आणि ‘सुंदर देशाच्या’+ दिशेला खूप वाढलं. १० ते शिंग इतकं वाढलं, की ते थेट आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचलं. त्याने आकाशातल्या सैन्यापैकी व ताऱ्यांपैकी काहींना खाली पृथ्वीवर पाडलं आणि त्यांना आपल्या पायांखाली तुडवलं. ११ ते शिंग सैन्याच्या अधिकाऱ्याशीही मगरूरपणे वागलं. त्याने त्या अधिकाऱ्याकडून, नियमितपणे दिलं जाणारं बलिदान काढून घेतलं आणि त्याचं स्थिर असलेलं पवित्र ठिकाण उलथून टाकलं.+ १२ अपराधामुळे सैन्य आणि नियमितपणे दिलं जाणारं बलिदान त्याच्या हाती देण्यात आलं. ते सत्याला जमिनीवर पाडत राहिलं, आणि त्याला आपल्या कामात यश मिळालं.
१३ मग मी एका स्वर्गदूताला बोलताना ऐकलं. आणि या स्वर्गदूताला दुसरा एक स्वर्गदूत असं म्हणाला: “नियमितपणे दिल्या जाणाऱ्या बलिदानाचा आणि नाश करणाऱ्या अपराधाचा दृष्टान्त कधीपर्यंत चालू राहील?+ पवित्र ठिकाण आणि सैन्य पायांखाली तुडवलं जाण्याचा दृष्टान्त कधीपर्यंत चालू राहील?” १४ तेव्हा तो मला म्हणाला: “२,३०० संध्याकाळ आणि सकाळ पूर्ण होत नाहीत तोपर्यंत; त्यानंतर पवित्र ठिकाण परत त्याच्या योग्य स्थितीत आणलं जाईल.”
१५ मी, दानीएल, जेव्हा हा दृष्टान्त पाहत होतो आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा अचानक माणसासारखा कोणीतरी माझ्यासमोर उभा असलेला मला दिसला. १६ मग मला उलई+ नदीच्या मधून माणसाचा आवाज ऐकू आला. तो मोठ्याने म्हणाला: “गब्रीएल!+ या माणसाने जे पाहिलं ते त्याला समजावून सांग.”+ १७ म्हणून मी उभा होतो तिथे तो माझ्याजवळ आला. पण तो आला तेव्हा मी इतका घाबरलो, की मी जमिनीवर पालथा पडलो. तो मला म्हणाला: “हे मनुष्याच्या मुला, हा दृष्टान्त अंताच्या समयासाठी आहे हे समजून घे.”+ १८ पण तो माझ्याशी बोलत असताना, मी जमिनीवर पालथा पडून गाढ झोपी गेलो. म्हणून त्याने मला स्पर्श केला आणि मी आधी जिथे उभा होतो, तिथे त्याने मला परत उभं केलं.+ १९ मग तो मला म्हणाला: “न्यायदंड बजावण्याच्या शेवटल्या काळात काय घडेल ते मी तुला समजावून सांगतो; कारण हा दृष्टान्त अंताच्या नेमलेल्या समयासाठी आहे.+
२० तू पाहिलेला दोन शिंगांचा एडका म्हणजे मेद आणि पर्शिया यांचे राजे.+ २१ तो केसाळ बकरा म्हणजे ग्रीसचा राजा;+ आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध असलेलं मोठं शिंग म्हणजे ग्रीसचा पहिला राजा.+ २२ मोडलेल्या शिंगाच्या जागी उगवलेली चार शिंगं,+ म्हणजे त्याच्या राष्ट्रातून सत्तेवर येणारी चार राज्यं. पण ती राज्यं त्याच्याइतकी शक्तिशाली नसतील.
२३ आणि त्यांच्या राज्याच्या शेवटल्या काळात जेव्हा अपराध्यांच्या पापाचा घडा भरेल, तेव्हा गुंतागुंतीच्या गोष्टी समजू शकणारा* एक क्रूर राजा सत्तेवर येईल. २४ तो खूप शक्तिशाली होईल, पण स्वतःच्या बळावर नाही. तो अशा रितीने नाश करेल, की सगळ्यांना आश्चर्य वाटेल.* त्याला आपल्या कामात यश मिळेल. आणि तो शक्तिशाली लोकांचा व पवित्र जनांचासुद्धा नाश करेल.+ २५ तो धूर्तपणे इतरांना फसवेल आणि यशस्वी होईल; तो मगरूर होईल आणि शांतीच्या काळात* अनेकांचा नाश करेल. जो अधिकाऱ्यांचा अधिकारी आहे त्याच्या विरोधातही तो उभा राहील, पण कोणत्याही माणसाचा हात न लागता तो मोडला जाईल.
२६ दृष्टान्तात संध्याकाळ आणि सकाळ यांबद्दल जे सांगितलंय ते अगदी खरंय. पण तू हा दृष्टान्त गुप्त ठेव, कारण तो आजपासून अनेक दिवसांनंतरच्या काळासाठी आहे.”*+
२७ मग मी, दानीएल, पार गळून गेलो आणि काही दिवस आजारी पडलो.+ त्यानंतर मी उठून पुन्हा राजाचं कामकाज करू लागलो;+ पण मी जे पाहिलं होतं, त्यामुळे मी अगदी सुन्न झालो होतो; आणि कोणालाही तो दृष्टान्त समजला नाही.+
९ अहश्वेरोश राजाचा मुलगा दारयावेश+ याच्या शासनकाळाचं ते पहिलं वर्ष होतं. दारयावेश हा मेदच्या लोकांचा वंशज असून त्याला खास्दी लोकांच्या राज्यावर राजा नेमण्यात आलं होतं.+ २ त्याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी, मला, दानीएलला पुस्तकांतून* हे समजलं, की यहोवाने यिर्मया संदेष्ट्याला सांगितल्याप्रमाणे यरुशलेम+ ७० वर्षांपर्यंत ओसाड पडून राहील.+ ३ म्हणून मी खरा देव यहोवा याच्याकडे वळलो; आणि मी उपास+ करून, गोणपाट घालून आणि अंगाला राख फासून त्याच्याकडे प्रार्थनेत विनंती करू लागलो. ४ मी माझा देव यहोवा, याच्याकडे प्रार्थनेत आमच्या पापांची कबुली देत म्हणालो:
“हे खऱ्या देवा यहोवा, तू महान आणि विस्मयकारक देव आहेस. तू तुझा करार नेहमी पाळतोस आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांवर आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्यांवर तू एकनिष्ठ प्रेम करतोस.+ ५ आम्ही पापं केली, वाईट कामं केली, दुष्टपणे वागलो आणि तुझ्याविरुद्ध बंड केलं.+ आम्ही तुझ्या आज्ञांपासून आणि तुझ्या नियमांपासून भरकटलो. ६ आमच्या राजांशी, अधिकाऱ्यांशी, वाडवडिलांशी आणि देशातल्या सर्व लोकांशी तुझ्या नावाने बोलणाऱ्या तुझ्या सेवकांचं, संदेष्ट्यांचं आम्ही ऐकलं नाही.+ ७ हे यहोवा, तू नीतिमान आहेस. पण आम्ही मात्र आमची मान आज शरमेने खाली घातली आहे; यहूदातल्या माणसांची, यरुशलेमच्या रहिवाशांची आणि तुझ्याशी अविश्वासूपणे वागल्यामुळे ज्या इस्राएली लोकांची तू जवळच्या व दूरच्या देशात पांगापांग केलीस, त्या सर्वांची मान शरमेने खाली गेली आहे.+
८ हे यहोवा! आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केलंय. आणि म्हणून आमची, आमच्या राजांची, आमच्या अधिकाऱ्यांची आणि आमच्या वाडवडिलांची मान शरमेने खाली गेली आहे. ९ हे आमच्या देवा यहोवा, तू दयाळू आणि क्षमा करणारा+ आहेस, पण आम्ही तुझ्याविरुद्ध बंड केलंय.+ १० हे आमच्या देवा यहोवा, आम्ही तुझं ऐकलं नाही. तू तुझ्या सेवकांद्वारे, तुझ्या संदेष्ट्यांद्वारे जे कायदे आम्हाला दिले, ते आम्ही पाळले नाहीत.+ ११ इस्राएलच्या एकाही माणसाने तुझ्या नियमशास्त्राचं पालन केलं नाही. संपूर्ण इस्राएलने तुझ्या आज्ञा मोडून तुझ्याकडे पाठ फिरवली. म्हणून खऱ्या देवाचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात तू शपथ घेऊन सांगितलेले सगळे शाप तू आमच्यावर आणले.+ कारण आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केलंय. १२ आमच्यावर मोठं संकट आणून तू आमच्या विरोधात आणि आमच्यावर राज्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या* विरोधात जे काही बोलला होतास ते तू पूर्ण केलंस.+ यरुशलेमच्या बाबतीत जसं घडलं,+ तसं संपूर्ण पृथ्वीवर कोणाच्याही बाबतीत घडलं नाही. १३ मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे, ही सगळी संकटं आमच्यावर आली.+ पण तरीसुद्धा हे आमच्या देवा यहोवा, आम्ही आमचा चुकीचा मार्ग सोडला नाही,+ तुझं सत्य* समजून घेतलं नाही आणि तुझ्याकडे कृपेची भीक मागितली नाही.
१४ म्हणून हे यहोवा, तू नजर ठेवून होतास आणि तू आमच्यावर संकट आणलंस. हे आमच्या देवा यहोवा! तू नीतिमान आहेस; तू नेहमी योग्य तेच करतोस. पण आम्ही मात्र तुझं ऐकलं नाही.+
१५ हे आमच्या देवा यहोवा, तू आपल्या शक्तिशाली हाताने आपल्या लोकांना इजिप्तमधून* बाहेर आणलंस,+ आणि आजपर्यंत तू आपलं नाव महान केलंस.+ पण आम्ही मात्र पाप केलं आणि दुष्टपणे वागलो. १६ हे यहोवा, तू नेहमी नीतीने वागतोस.+ म्हणून आता तुझ्या यरुशलेम शहरावर, तुझ्या पवित्र डोंगरावर तुझा जो राग आणि क्रोध भडकला आहे तो कृपा करून आवर. कारण आमच्या पापांमुळे आणि आमच्या वाडवडिलांच्या अपराधांमुळे, आजूबाजूच्या सर्व लोकांमध्ये यरुशलेमची आणि तुझ्या लोकांची बदनामी झाली आहे.+ १७ तर आता हे आमच्या देवा, तुझ्या या सेवकाची प्रार्थना ऐक, त्याच्या विनंत्यांकडे लक्ष दे. हे यहोवा, तुझा गौरव व्हावा म्हणून ओसाड पडलेल्या+ तुझ्या या पवित्र ठिकाणावर कृपा कर.+ १८ हे माझ्या देवा, कान देऊन ऐक! आपले डोळे उघडून आमच्या दयनीय स्थितीकडे लक्ष दे. तुझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तुझ्या शहराकडे लक्ष दे. आम्ही नीतीची कामं केली आहेत म्हणून तुझ्याकडे विनंती करतोय असं नाही; तर तू खूप दयाळू आहेस+ म्हणून आम्ही तुझ्याकडे विनंती करतोय. १९ हे यहोवा, कृपा करून ऐक. हे यहोवा, आम्हाला क्षमा कर.+ हे यहोवा, आमच्याकडे लक्ष दे आणि आम्हाला मदत कर! हे माझ्या देवा, तुझ्या नावाकरता उशीर करू नकोस. कारण तुझं शहर आणि तुझे लोक हे तुझ्याच नावाने ओळखले जातात.”+
२० अशा प्रकारे, मी बोलत होतो आणि प्रार्थना करत होतो; माझं व माझ्या इस्राएली लोकांचं पाप कबूल करत होतो. आणि माझ्या देवाच्या पवित्र डोंगरासाठी+ मी माझा देव यहोवा याच्याकडे कृपेची भीक मागत होतो. २१ मी प्रार्थना करतच होतो इतक्यात गब्रीएल+ माझ्याकडे आला; हा तोच माणूस आहे जो मी दृष्टान्तात अगोदर पाहिला होता.+ ती संध्याकाळच्या अर्पणाची वेळ होती आणि मी फार दमून गेलो होतो. २२ तो मला समजावत असं म्हणाला:
“हे दानीएल, मी तुला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आणि समज देण्यासाठी आलोय. २३ तू विनंती करू लागताच, मला देवाकडून एक संदेश मिळाला आणि तो सांगायला मी आलोय. कारण तू देवाला खूप प्रिय* आहेस.+ तेव्हा मी काय सांगतोय त्याकडे लक्ष दे आणि हा दृष्टान्त समजून घे.
२४ तुझ्या लोकांकरता आणि तुझ्या पवित्र शहराकरता+ ७० आठवडे* ठरवण्यात आले आहेत. अपराधाचा अंत करण्यासाठी, पाप मिटवून टाकण्यासाठी,+ चुकांबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी,+ नीतिमत्त्व कायमचं प्रस्थापित करण्यासाठी,+ दृष्टान्तावर आणि भविष्यवाणीवर मोहर लावण्यासाठी+ आणि परमपवित्र स्थानाचा अभिषेक करण्यासाठी हा काळ ठरवण्यात आला आहे. २५ तू ही गोष्ट जाणून घे आणि समजून घे, की यरुशलेम पुन्हा बांधण्याची आणि ते आधीच्या स्थितीला आणण्याची आज्ञा दिली जाईल+ तेव्हापासून मसीहा*+ येईपर्यंत, म्हणजे नेतृत्व करणारा+ येईपर्यंत ७ आठवडे, तसंच ६२ आठवडे+ लोटतील. यरुशलेम पूर्वस्थितीला आणलं जाईल; त्याच्या सभोवती पाण्यासाठी खड्डा खणला जाईल, एक चौक बांधला जाईल आणि त्याची पुनर्बांधणी केली जाईल; पण हे संकटाच्या काळात घडेल.
२६ आणि ६२ आठवडे उलटल्यावर, मसीहा मारला जाईल.+ त्याच्याकडे काहीही उरणार नाही.+
आणि येणाऱ्या प्रमुखाचं सैन्य शहराचा व पवित्र जागेचा+ नाश करेल. आणि पूर येऊन त्याचा अंत होईल व शेवटपर्यंत युद्ध चालेल; विनाश हा ठरलेला आहे.+
२७ तो अनेकांसाठी एक आठवड्यापर्यंत करार चालू राहू देईल; आणि अर्धा आठवडा उलटल्यावर, तो बलिदान व अर्पण बंद करेल.+
आणि जो उद्ध्वस्त करणारा+ आहे तो घृणास्पद गोष्टींच्या पंखावर स्वार होऊन येईल. आणि जे ठरवण्यात आलं होतं, ते ओसाड पडलेल्यावरही ओतलं जाईल; त्याचा सर्वनाश होत नाही तोपर्यंत ते ओतलं जाईल.”
१० पर्शियाचा राजा कोरेश+ याच्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी, बेल्टशस्सर म्हटलेल्या दानीएलला+ एक संदेश मिळाला. तो संदेश खरा असून एका मोठ्या लढाईबद्दल होता. दानीएलला तो संदेश समजला, आणि त्याने जे काही पाहिलं होतं त्याचं स्पष्टीकरण त्याला देण्यात आलं.
२ त्या दिवसांत मी, दानीएल तीन आठवडे शोक करत होतो.+ ३ या तीन आठवड्यांदरम्यान मी चमचमीत अन्न किंवा मांस खाल्लं नाही, द्राक्षारस प्यायलो नाही किंवा अंगाला तेलही लावलं नाही. ४ मग पहिल्या महिन्याच्या २४ व्या दिवशी मी टायग्रीस*+ या मोठ्या नदीच्या काठावर होतो. ५ मी नजर वर करून पाहिलं, तेव्हा मला एक माणूस दिसला; त्याने मलमलीचे* कपडे घातले होते+ आणि त्याच्या कमरेला उफाज प्रदेशातल्या सोन्याचा एक पट्टा होता. ६ त्याचं शरीर चमकणाऱ्या चंद्रकांत रत्नासारखं+ होतं आणि चेहरा विजेसारखा तेजस्वी होता. त्याचे डोळे जळत्या मशालींसारखे आणि त्याचे हात व पाय चकचकणाऱ्या तांब्यासारखे+ होते. आणि त्याचा आवाज एखाद्या जमावाच्या आवाजासारखा मोठा होता. ७ हा दृष्टान्त फक्त मला, दानीएललाच दिसला; माझ्यासोबत असलेल्या माणसांना मात्र तो दिसला नाही.+ पण तरी ते खूप घाबरले आणि पळून जाऊन लपले.
८ मग मी एकटाच तिथे उरलो. हा अद्भुत दृष्टान्त पाहिल्यावर मी अगदी गळून गेलो आणि माझा चेहरा निस्तेज झाला आणि माझ्यात काहीच शक्ती उरली नाही.+ ९ मग मला त्याच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला; पण जेव्हा मी त्याला बोलताना ऐकलं, तेव्हा मी जमिनीवर पालथा पडून गाढ झोपी गेलो.+ १० मग मला जागं करण्यासाठी एका हाताने मला स्पर्श केला,+ आणि मला उठून गुडघ्यांवर बसायला आधार दिला. ११ तो माणूस मला म्हणाला:
“हे अतिप्रिय* दानीएल,+ मी तुला जे काही सांगणार आहे त्याकडे लक्ष दे. मला तुझ्याकडे पाठवण्यात आलं आहे. म्हणून आता उठून उभा राहा.”
तो असं बोलला तेव्हा मी थरथर कापत उठून उभा राहिलो.
१२ मग तो मला म्हणाला: “घाबरू नकोस+ दानीएल. कारण ज्या दिवशी तू या गोष्टी समजून घ्यायला आपलं मन लावलंस आणि आपल्या देवापुढे नम्र झालास, त्या पहिल्या दिवसापासूनच तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. आणि तू केलेल्या प्रार्थनेमुळेच मी तुझ्याकडे आलो आहे.+ १३ पण पर्शियाच्या राज्याचा अधिकारी+ २१ दिवसांपर्यंत माझा विरोध करत राहिला. पण मग प्रमुख अधिकाऱ्यांपैकी* एक, मीखाएल*+ मला मदत करायला आला; आणि मी तिथे पर्शियाच्या राजांजवळ थांबलो. १४ शेवटल्या काळात तुझ्या लोकांसोबत काय घडेल हे तुला समजावून सांगण्यासाठी मी आलोय.+ कारण हा दृष्टान्त भविष्यात घडणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत आहे.”+
१५ तो या गोष्टी माझ्याशी बोलला, तेव्हा मी जमिनीकडे तोंड करून गप्प राहिलो. १६ मग माणसासारख्या दिसणाऱ्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला+ आणि मी बोलू लागलो. आणि माझ्यासमोर जो उभा होता, त्याला मी म्हणालो: “माझ्या प्रभू, मी पाहिलेल्या दृष्टान्तामुळे मी थरथर कापतोय आणि माझ्यात काहीच शक्ती उरली नाही.+ १७ मग माझ्या प्रभूचा हा सेवक माझ्या प्रभूशी कसा काय बोलू शकतो?+ कारण मी पार गळून गेलोय, आणि माझ्यात काही जीव उरला नाही.”+
१८ तेव्हा माणसासारख्या दिसणाऱ्याने पुन्हा एकदा मला स्पर्श केला आणि मला बळ दिलं.+ १९ मग तो म्हणाला: “हे अतिप्रिय* माणसा,+ तुला शांती असो.+ तू घाबरू नकोस.+ धीर धर, खंबीर हो.” तो माझ्याशी बोलला तेव्हा मला धीर मिळाला आणि मी म्हणालो: “माझ्या प्रभू तुम्ही बोला, कारण तुम्ही मला बळ दिलंय.”
२० मग तो मला म्हणाला: “तुला माहीत आहे मी तुझ्याकडे का आलोय? आता मी परत पर्शियाच्या अधिकाऱ्याशी लढायला चाललोय.+ मी इथून गेल्यावर ग्रीसचा अधिकारी येईल. २१ पण सत्याच्या लिखाणांमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या मी तुला सांगीन. या गोष्टींच्या बाबतीत तुमचा अधिकारी+ मीखाएल+ याच्याशिवाय मला पूर्णपणे साथ देणारा दुसरा कोणीही नाही.
११ मेदचा राजा दारयावेश+ याच्या शासनकाळाच्या पहिल्या वर्षी, मी त्याला हिंमत द्यायला आणि बळ द्यायला उभा राहिलो.* २ आता मी तुला एक अशी गोष्ट सांगतो जी खरी आहे:
पाहा! पर्शियात आणखी तीन राजे सत्तेवर येतील. चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनसंपत्ती जमा करेल. तो जेव्हा आपल्या धनसंपत्तीच्या जोरावर शक्तिशाली होईल, तेव्हा तो सगळं काही ग्रीसच्या राज्याविरुद्ध+ उभं करेल.
३ मग एक शक्तिशाली राजा सत्तेवर येईल आणि मोठ्या अधिकाराने राज्य करेल.+ तो आपल्या मनाला येईल तसं वागेल. ४ तो जेव्हा अतिशय शक्तिशाली होईल, तेव्हा त्याच्या राज्याचे तुकडे-तुकडे केले जातील आणि ते चार दिशांना* विभागलं जाईल.+ पण त्याच्या वंशजांना ते मिळणार नाही. तसंच, त्याच्या अधिकाराखाली असताना ते राज्य जितकं शक्तिशाली होतं, तितकं ते नंतर राहणार नाही. कारण ते मुळासकट उपटून इतरांना दिलं जाईल.
५ मग त्याचा एक अधिकारी, म्हणजे दक्षिणेचा राजा शक्तिशाली होईल. पण दुसरा एक अधिकारी त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली होऊन जास्त अधिकाराने राज्य करेल.
६ काही वर्षांनंतर ते एकमेकांशी करार करतील. आणि हा करार पक्का करण्यासाठी दक्षिणेच्या राजाची मुलगी उत्तरेच्या राजाकडे येईल. पण तिची सत्ता टिकणार नाही; तसंच राजा आणि त्याची सत्ताही टिकणार नाही. तिला आणि तिला घेऊन येणाऱ्यांना दुसऱ्यांच्या हाती दिलं जाईल; तसंच, ज्याने तिला जन्म दिला त्याला आणि ज्याने त्या काळात तिला शक्तिशाली बनवलं त्यालाही दुसऱ्यांच्या हाती दिलं जाईल. ७ पण तिच्याच कुटुंबातला एक जण त्याच्या जागी सत्तेवर येईल. आणि तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर व त्याच्या किल्ल्यावर हल्ला करेल. तो त्यांच्याशी लढेल आणि त्यांच्यावर विजय मिळवेल. ८ तो त्यांची दैवतं, धातूच्या मूर्ती* आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू घेऊन इजिप्तला येईल. तसंच, तो तिथल्या लोकांना बंदी करून इजिप्तला आणेल. आणि काही वर्षं तो उत्तरेच्या राजाच्या वाट्याला जाणार नाही. ९ उत्तरेचा राजा मात्र दक्षिणेच्या राजाच्या राज्यावर हल्ला करेल, पण तो आपल्या देशात परत निघून जाईल.
१० त्याची मुलं युद्धाची तयारी करतील आणि एक मोठं, अफाट सैन्य जमवतील. तो पुढे-पुढे जात राहील आणि पुराच्या पाण्यासारखा देशातून पार जाईल. पण तो परत मागे वळेल आणि लढाई करत करत आपल्या किल्ल्यापर्यंत येईल.
११ मग दक्षिणेचा राजा रागाने पेटून उठेल, आणि उत्तरेच्या राजाशी जाऊन लढेल. आणि तो लोकांचा एक मोठा जमाव गोळा करेल, पण तो जमाव त्याच्या हाती दिला जाईल. १२ तो त्या जमावाला घेऊन जाईल आणि त्यामुळे त्याचं मन गर्वाने फुगेल. तो लाखोंचा नाश करेल; तो खूप ताकदवान होईल, पण तो आपल्या ताकदीचा उपयोग करणार नाही.
१३ उत्तरेचा राजा परत येईल. तो आधीपेक्षा खूप मोठा जमाव गोळा करेल. काही काळाने व काही वर्षांनी, तो युद्धसामग्रीने सज्ज असलेलं एक मोठं सैन्य घेऊन नक्की येईल. १४ त्या काळात, अनेक जण दक्षिणेच्या राजाच्या विरोधात उभे राहतील.
आणि तुझ्या लोकांमधले जे हिंसक लोक* आहेत तेही इतरांच्या प्रभावाखाली येऊन दृष्टान्त खरा ठरवण्याचा प्रयत्न करतील; पण ते पडतील.
१५ उत्तरेचा राजा येईल आणि एका तटबंदीच्या शहराला वेढा घालून ते काबीज करेल. त्याच्याविरुद्ध दक्षिणेचं सैन्य किंवा त्यांचे शूरवीर टिकाव धरू शकणार नाहीत; आणि त्याचा सामना करण्याचं बळ त्यांच्यात उरणार नाही. १६ त्याच्याविरुद्ध येणारा आपल्या मनाला येईल तसं करेल, आणि त्याच्यापुढे कोणीही टिकाव धरू शकणार नाही. तो ‘सुंदर देशात’+ उभा राहील आणि त्याच्या हातात समूळ नाश करण्याची ताकद असेल. १७ तो आपल्या राज्याच्या पूर्ण ताकदीने येण्याचा पक्का निश्चय करेल. पण त्याच्यासोबत एक करार केला जाईल; आणि तो आपल्या कामात यशस्वी होईल. त्याला स्त्रियांच्या मुलीचा नाश करण्याचा अधिकार दिला जाईल. ती मुलगी त्याला विश्वासू राहणार नाही किंवा त्याच्या पक्षाची राहणार नाही. १८ मग तो समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या प्रदेशांकडे आपलं लक्ष वळवेल आणि त्यांतले अनेक प्रदेश काबीज करेल. त्याने फासलेला काळिमा एक सेनापती पुसून टाकेल; त्या सेनापतीची आणखी बदनामी होणार नाही. उलट, तो सेनापतीच त्याची बदनामी करेल. १९ मग तो स्वतःच्या देशातल्या किल्ल्यांकडे आपलं लक्ष वळवेल. पण तो अडखळून पडेल आणि त्याचा पत्ता लागणार नाही.
२० मग त्याच्या जागी दुसरा एक जण उभा राहील. तो वैभवशाली राज्यात कर वसूल करणाऱ्याला* पाठवेल. मात्र काही दिवसांतच त्याचा नाश होईल; पण क्रोधाने किंवा युद्धाने नाही.
२१ नंतर तुच्छ असलेला एक जण त्याच्या जागी येईल. ते त्याला शाही मानसन्मान देणार नाहीत. तो शांतीच्या काळात येईल* आणि कटकारस्थान* करून राज्य मिळवेल. २२ तो पुरासारख्या मोठ्या सैन्याला हरवून टाकेल, आणि त्यांचा नाश होईल; कराराच्या+ प्रमुखाचाही+ नाश होईल. २३ त्यांनी त्याच्यासोबत केलेल्या करारामुळे तो फसवणूक करत राहील. तो हल्ला करेल आणि छोट्याशा राष्ट्राच्या जोरावर शक्तिशाली बनेल. २४ शांतीच्या काळात,* तो प्रांतामधल्या सगळ्यात चांगल्या भागांत घुसेल आणि अशी कामं करेल जी त्याच्या वाडवडिलांनीही कधी केली नाहीत. तो लुटीचा माल आणि सामानसुमान त्यांना वाटून देईल. आणि तटबंदीच्या जागा काबीज करायला कट रचेल; पण फक्त काही काळासाठी.
२५ तो दक्षिणेच्या राजावर हल्ला करण्यासाठी आपलं सगळं बळ आणि धैर्य एकवटेल; तो त्याच्या विरोधात एक मोठं सैन्य तयार करेल. दक्षिणेचा राजाही युद्धासाठी तयारी करेल; तोसुद्धा एक अतिशय मोठं आणि शक्तिशाली सैन्य उभं करेल. पण त्याचा टिकाव लागणार नाही, कारण ते त्याच्याविरुद्ध कट रचतील. २६ त्याचं अन्न खाणारेच त्याच्या नाशाचं कारण बनतील.
आणि त्याच्या सैन्याचा पराभव होईल आणि त्यातले अनेक जण मारले जातील.
२७ या दोन्ही राजांच्या मनाचा कल वाईट गोष्टी करण्याकडे असेल. ते एकाच मेजावर बसून एकमेकांशी खोटं बोलतील. पण त्यातून काहीच साध्य होणार नाही, कारण अंत हा नेमलेल्या वेळीच येईल.+
२८ उत्तरेचा राजा भरपूर सामानसुमान घेऊन आपल्या देशात परत जाईल, आणि त्याचं मन पवित्र कराराच्या विरोधात असेल. त्याला आपल्या कामात यश मिळेल आणि तो आपल्या देशात परत जाईल.
२९ पण नेमलेल्या समयी तो परत येईल आणि दक्षिणेवर हल्ला करेल. मात्र आधी घडलं होतं, तसं या वेळी घडणार नाही. ३० कारण कित्तीमची+ जहाजं त्याच्या विरोधात येतील, आणि त्याला नमवलं जाईल.
तो मागे फिरेल आणि पवित्र करारावर आपला राग काढेल+ व आपल्या कामात यशस्वी होईल; तो मागे जाईल आणि पवित्र करार सोडून देणाऱ्यांकडे लक्ष देईल. ३१ त्याचं सैन्य उठेल आणि पवित्र ठिकाण, म्हणजे किल्ला भ्रष्ट करेल+ व नियमितपणे दिलं जाणारं बलिदान काढून टाकेल.+
आणि ते उद्ध्वस्त करणारी घृणास्पद गोष्ट उभी करतील.+
३२ आणि उत्तरेचा राजा कराराच्या विरोधात दुष्टपणे वागणाऱ्यांना फूस लावून* बंड* करायला लावेल. पण जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते शक्तिशाली होऊन आपल्या कामात यशस्वी होतील. ३३ लोकांपैकी ज्यांच्याकडे सखोल समज+ आहे ते अनेकांना बोध करतील.* ते काही दिवस तलवार, आग, बंदिवास आणि लूटमार यांमुळे अडखळून पडतील. ३४ पण जेव्हा ते अडखळतील, तेव्हा त्यांना थोडी मदत केली जाईल; आणि अनेक जण गोडगोड बोलून* त्यांना जाऊन मिळतील. ३५ सखोल समज असलेल्यांपैकी काही जण अडखळतील; म्हणजे त्यांच्यामुळे पारखण्याचं काम, आणि अंताच्या समयापर्यंत शुद्ध आणि शुभ्र करण्याचं काम होईल.+ कारण हे नेमलेल्या समयी पूर्ण होईल.
३६ उत्तरेचा राजा आपल्या मनाला येईल तसं वागेल. तो इतर सर्व देवांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ करेल आणि स्वतःचा जास्त गौरव करेल. तो देवांच्या देवाविरुद्ध+ धक्कादायक गोष्टी बोलेल. आणि क्रोधाचा काळ पूर्ण होईपर्यंत तो यशस्वी ठरेल; कारण देवाने जे ठरवलंय ते नक्कीच पूर्ण होईल. ३७ तो इतर कोणत्याही देवाची किंवा स्त्रियांच्या इच्छेची कदर करणार नाही. तो इतर सर्वांपेक्षा स्वतःचा जास्त गौरव करेल. तो आपल्या वाडवडिलांच्या देवाचा सन्मान करणार नाही. ३८ त्याच्या ऐवजी तो किल्ल्यांच्या देवाचा गौरव करेल; त्याच्या वाडवडिलांना माहीत नव्हता अशा देवाचा तो सोनं, चांदी, मौल्यवान रत्नं आणि अनमोल गोष्टी यांनी गौरव करेल. ३९ तो एका परक्या देवाच्या मदतीने सगळ्यात मजबूत किल्ल्यांवर हल्ला करेल.* त्याला मान देणाऱ्यांचा* तो खूप गौरव करेल आणि त्यांना अनेकांवर राज्य करायचा अधिकार देईल; तसंच, तो किंमत घेऊन जमीन वाटून देईल.
४० अंताच्या समयी दक्षिणेचा राजाही त्याच्याशी लढाई करेल.* आणि उत्तरेचा राजा आपले रथ, घोडेस्वार आणि अनेक जहाजं घेऊन त्याच्याशी लढायला येईल; तो अनेक देशांमध्ये घुसेल आणि पुराच्या पाण्यासारखा त्यांच्यातून पार जाईल. ४१ तो ‘सुंदर देशातही’+ शिरेल आणि अनेक देशांचा पराभव होईल. पण जे त्याच्या हातून सुटतील ते हे: अदोम, मवाब आणि अम्मोनी लोकांपैकी मुख्य लोक. ४२ तो देशांवर आपला हात चालवत राहील; आणि इजिप्त देशही त्याच्या हातून सुटणार नाही. ४३ तो इजिप्तच्या गुप्त धनावर, म्हणजे सोनं, चांदी आणि इतर सर्व मौल्यवान गोष्टी यांवर अधिकार मिळवेल. आणि लिबियाचे व इथियोपियाचे लोकही त्याच्या पावलांजवळ असतील.*
४४ पण पूर्वेकडून आणि उत्तरेकडून येणाऱ्या बातम्यांमुळे तो बेचैन होईल. आणि अनेकांचा नाश करण्यासाठी आणि त्यांचं नामोनिशाण मिटवण्यासाठी तो मोठ्या संतापाने निघेल. ४५ मोठा समुद्र आणि ‘सुंदर देशाचा’+ पवित्र डोंगर, यांच्या मधे तो आपले शाही तंबू ठोकेल. पण त्याचा नाश होईल; कोणीही त्याच्या मदतीला येणार नाही.
१२ त्या वेळी तुझ्या लोकांच्या वतीने उभा राहणारा महान अधिकारी,+ म्हणजे मीखाएल*+ उभा राहील. आणि राष्ट्र निर्माण झालं तेव्हापासून कधीही आला नाही असा संकटाचा काळ त्या वेळी येईल. पण त्या वेळी तुझे लोक वाचतील;+ ज्यांची नावं पुस्तकात+ लिहिण्यात आली आहेत ते सगळे वाचतील. २ आणि पृथ्वीच्या मातीत झोपलेले अनेक जण उठतील; काही सर्वकाळाच्या जीवनासाठी, तर काही बदनामी आणि सर्वकाळाचा अपमान सहन करण्यासाठी उठतील.
३ ज्यांच्याकडे सखोल समज आहे ते आकाशाच्या प्रकाशासारखे झळकतील. आणि जे अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर आणतात, ते सदासर्वकाळ ताऱ्यांसारखे चमकतील.
४ पण हे दानीएल, तू अंताच्या समयापर्यंत+ हे शब्द गुप्त ठेव आणि पुस्तक मोहर लावून बंद कर. अनेक जण शोधत फिरतील* आणि खरं ज्ञान खूप वाढेल.”+
५ मग मला, दानीएलला आणखी दोन जण तिथे उभे असलेले दिसले. एक जण नदीच्या या किनाऱ्यावर, तर दुसरा नदीच्या त्या किनाऱ्यावर उभा होता.+ ६ त्यातल्या एकाने, नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या आणि मलमलीचे* कपडे घातलेल्या माणसाला+ विचारलं: “या अद्भुत गोष्टी पूर्ण व्हायला आणखी किती काळ बाकी आहे?” ७ तेव्हा नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या आणि मलमलीचे कपडे घातलेल्या माणसाला मी बोलताना ऐकलं. त्याने आपले दोन्ही हात आकाशाकडे वर केले, आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे+ त्याच्या नावाने शपथ घेऊन तो म्हणाला: “यासाठी एक काळ, दोन काळ आणि अर्धा काळ ठरवण्यात आला आहे.* पवित्र लोकांच्या ताकदीचा चुराडा व्हायचं संपेल,+ तेव्हा या गोष्टी पूर्ण होतील.”
८ मी या गोष्टी ऐकल्या, पण मला त्या समजल्या नाहीत.+ म्हणून मी म्हणालो: “माझ्या प्रभू, या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होईल?”
९ त्यावर तो मला म्हणाला: “हे दानीएल, आता जा. कारण या गोष्टी अंताच्या समयापर्यंत गुप्त ठेवून त्यांवर मोहर लावण्यात आली आहे.+ १० अनेक जण स्वतःला शुद्ध व शुभ्र करतील आणि ते पारखले जातील.+ पण दुष्ट लोक दुष्टपणे वागत राहतील, आणि त्यांच्यापैकी एकालाही या गोष्टी समजणार नाहीत. सखोल समज असलेल्यांना मात्र या गोष्टी समजतील.+
११ नियमितपणे दिलं जाणारं बलिदान+ काढून टाकलं जाईल आणि उद्ध्वस्त करणारी घृणास्पद गोष्ट उभी केली जाईल,+ तेव्हापासून १,२९० दिवस लोटतील.
१२ जो १,३३५ दिवस संपेपर्यंत आतुरतेने* वाट पाहतो तो सुखी आहे!
१३ तू मात्र शेवटपर्यंत खंबीर राहा. तू विसावा घेशील, पण नेमलेली वेळ येईल तेव्हा तू तुझा हिस्सा* मिळवण्यासाठी पुन्हा उठशील.”+
किंवा “बॅबिलॉनचा.”
शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, बॅबिलोनिया.
शब्दशः “मुलं.”
किंवा कदाचित, “त्यांचं तीन वर्षं पोषण करायचं होतं.”
म्हणजे, “देव माझा न्यायाधीश आहे.”
म्हणजे, “यहोवाने कृपा केली आहे.”
कदाचित याचा अर्थ, “देवासारखा कोण आहे?” असा होतो.
म्हणजे, “यहोवाने मदत केली आहे.”
म्हणजे, बॅबिलोनी नावं.
शब्दशः “मुलांपेक्षा.”
शब्दशः “मुलं.”
शब्दशः “मुलांपेक्षा.”
शब्दशः “मुलं.”
म्हणजे, शकुनविद्या आणि ज्योतिष यांमध्ये कुशल असलेल्यांचा एक गट.
दान २:४ख ते ७:२८ हा भाग मुळात ॲरामेईक (अरामी) भाषेत लिहिला होता.
किंवा कदाचित, “उकिरडे; विष्ठेच्या टेकड्या.”
किंवा “अनंतकाळापासून अनंतकाळापर्यंत.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “मानवांच्या वंशजांसोबत,” म्हणजे सामान्य लोक.
सुमारे २७ मी. (८८ फूट). अति. ख१४ पाहा.
सुमारे २.७ मी. (८.८ फूट). अति. ख१४ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
बॅगपाईप नावाचं वाद्य.
किंवा “यहुद्यांची निंदा.”
किंवा “त्याची मनोवृत्ती पूर्णपणे बदलली.”
किंवा कदाचित, “उकिरडे; विष्ठेच्या टेकड्या.”
शब्दशः “त्यांची भरभराट केली.”
म्हणजे, शकुनविद्या आणि फलज्योतिष यांमध्ये कुशल असलेल्यांचा एक गट.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “शासन करणारा स्वर्ग आहे.”
किंवा “त्याचा हात धरू शकत नाही.”
एक प्रकारची समई.
म्हणजे, शकुनविद्या आणि फलज्योतिष यांमध्ये कुशल असलेल्यांचा एक गट.
शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, शकुनविद्या आणि फलज्योतिष यांमध्ये कुशल असलेल्यांचा एक गट.
किंवा कदाचित, “संगीतकारांना त्याच्यापुढे आणण्यात आलं नाही.”
किंवा “निंदा केली होती.”
किंवा “त्याचा सर्वोच्च अधिकार.”
किंवा “फुशारक्या मारणारं.”
शब्दशः “हिम.”
किंवा “फुशारक्या मारत होतं.”
किंवा “फुशारक्या मारणारं.”
म्हणजे, साडेतीन काळ.
किंवा “सूसा.”
किंवा “किल्ल्यात.”
किंवा “कालव्याजवळ.”
किंवा “कटकारस्थान करण्यात तरबेज असलेला.”
किंवा “तो खूप मोठ्या प्रमाणावर नाश करेल.”
किंवा कदाचित, “कोणतीही चेतावणी न देता.”
किंवा “दूरच्या भविष्यासाठी आहे.”
म्हणजे, पवित्र पुस्तकांतून.
शब्दशः “आमचा न्याय करणाऱ्या न्यायाधीशांच्या.”
किंवा “तुझा विश्वासूपणा.”
किंवा “मिसरमधून.”
किंवा “मौल्यवान.”
इथे एक आठवडा म्हणजे सात वर्षं.
किंवा “अभिषिक्त.”
शब्दशः “हिद्दकेल.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “मौल्यवान.”
किंवा “पहिल्या श्रेणीतल्या अधिकाऱ्यांपैकी.”
म्हणजे, “देवासारखा कोण आहे?”
किंवा “मौल्यवान.”
किंवा “त्याच्यासाठी मजबूत किल्ला म्हणून उभा राहिलो.”
शब्दशः “आकाशाच्या चार वाऱ्यांकडे.”
किंवा “ओतीव मूर्ती.”
किंवा “लुटारूंची मुलं.”
हे अशा माणसालाही सूचित करू शकतं, जो लष्करी सेवेसाठी लोकांची नावनोंदणी करतो.
किंवा कदाचित, “तो चेतावणी न देता येईल.”
किंवा “फसवणूक.”
किंवा “चेतावणी न देता.”
किंवा “गोडगोड बोलून; फसवणूक करून.”
किंवा “धर्मत्याग.”
किंवा “समज देतील.”
किंवा “खुशामत करून.”
किंवा “किल्ल्यांविरुद्ध यशस्वी होईल.”
किंवा कदाचित, “तो ज्यांचा सन्मान करतो.”
किंवा “त्याला शिंगं मारेल.”
किंवा “त्याच्यामागे जातील.”
म्हणजे, “देवासारखा कोण आहे?”
किंवा “त्याचं [म्हणजे, पुस्तकाचं] सखोल परीक्षण करतील.”
शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, साडेतीन काळ ठरवण्यात आले आहेत.
किंवा “धीराने.”
किंवा “प्रतिफळ.”