वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt उपदेशक १:१-१२:१४
  • उपदेशक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उपदेशक
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उपदेशक

उपदेशक

१ यरुशलेममध्ये असलेला राजा, दावीदचा मुलगा,+ उपदेशक*+ याचे हे शब्द आहेत.

 २ उपदेशक म्हणतो, “व्यर्थ* आहे! व्यर्थ आहे!

सगळंच व्यर्थ आहे!”+

 ३ माणूस इतके कष्ट करतो,

सूर्याखाली* राब राब राबतो, तरी त्याला काय मिळतं?+

 ४ एक पिढी जाते आणि दुसरी येते,

पृथ्वी मात्र सर्वकाळ राहते.*+

 ५ सूर्य उगवतो आणि मावळतो;

मग परत तिथेच धावत जाऊन,* पुन्हा उगवतो.+

 ६ वारा दक्षिणेला जातो आणि परत फिरून उत्तरेकडे येतो;

तो असा गोल गोल फिरतच राहतो; वाऱ्‍याच्या या फेऱ्‍या सतत सुरू राहतात.

 ७ सगळ्या नद्या* सागराला जाऊन मिळतात, तरी सागर भरून जात नाही;+

त्या जिथून वाहत आल्या, तिथेच परत जातात आणि पुन्हा वाहू लागतात.+

 ८ सगळ्याच गोष्टी थकवणाऱ्‍या आहेत;

कोणीच त्यांचं वर्णन करू शकत नाही.

कितीही पाहिलं, तरी डोळ्यांचं समाधान होत नाही;

कितीही ऐकलं, तरी कानांचं समाधान होत नाही.

 ९ जे घडून गेलंय, तेच परत घडणार

आणि जे करून झालंय, तेच पुन्हा केलं जाणार;

सूर्याखाली नवीन असं काहीच नाही.+

१० अशी एकतरी गोष्ट आहे का, जिला पाहून म्हणावं, “पाहा, ही नवीन आहे”?

ती तर फार पूर्वीपासूनच होती;

आपल्या काळाच्या आधीपासूनच ती होती.

११ पूर्वीच्या लोकांची कोणालाही आठवण राहत नाही;

जे पुढे येतील त्यांचीही राहणार नाही.

आणि जे त्यांच्यानंतर येतील, त्यांचीही कोणाला आठवण राहणार नाही.+

१२ मी, उपदेशक, यरुशलेममध्ये इस्राएलवर राजा म्हणून राज्य करत आलोय.+ १३ मी आपल्या बुद्धीचा+ वापर करून, आकाशाखाली चाललेल्या सर्व कामांचा अभ्यास आणि परीक्षण करायचं ठरवलं.+ देवाने माणसांना दिलेल्या या त्रासदायक उद्योगात, ते आयुष्यभर गुंतून राहतात.

१४ सूर्याखाली केली जाणारी सर्व कामं मी पाहिली,

पण सगळंच व्यर्थ आणि वाऱ्‍यामागे धावण्यासारखं होतं.+

१५ जे वाकडं आहे, ते सरळ केलं जाऊ शकत नाही,

आणि जे नाही, ते मोजणं अशक्य आहे.

१६ तेव्हा मी मनात म्हणालो: “मी भरपूर बुद्धी मिळवली आहे. यरुशलेममध्ये आजपर्यंत होऊन गेलेल्या कोणत्याही माणसापेक्षा जास्त बुद्धी मी मिळवली आहे.+ मी आपल्या हृदयात पुष्कळ बुद्धीच्या गोष्टी आणि ज्ञान साठवलं.”+ १७ बुद्धी, वेडेपणा* आणि मूर्खपणा काय असतो, हे जाणून घेण्याकडे मी आपलं मन लावलं.+ पण हेही वाऱ्‍यामागे धावण्यासारखंच आहे.

१८ कारण जितकी बुद्धी वाढते, तितकीच निराशाही वाढते.

त्यामुळे जो जास्त ज्ञान मिळवतो, तो आपल्या दुःखात भर घालतो.+

२ मग मी मनात म्हणालो: “मौजमजा करावी आणि त्यातून आनंद मिळतो का ते पाहावं.” पण शेवटी तेही व्यर्थच होतं!

 २ मी म्हणालो, “हसणं म्हणजे मूर्खपणा!”

मी विचार केला, “मौजमजा करूनही माणसाला काय मिळतं?”

३ मी द्राक्षारसात मन रमवून पाहिलं.+ पण मी माझा समंजसपणा* सोडला नाही. मी मूर्खपणाही करून पाहिला. आकाशाखाली माणूस आपल्या थोड्याशा आयुष्यात सर्वात चांगली गोष्ट कोणती करू शकतो, हे मला पाहायचं होतं. ४ मी मोठमोठी कामं हाती घेतली.+ मी स्वतःसाठी घरं बांधली+ आणि द्राक्षमळे लावले.+ ५ मी बागा लावल्या, उद्यानं बनवली आणि त्यांत सर्व प्रकारची फळझाडं लावली. ६ हिरव्यागार झाडांच्या मळ्यांना* पाणी देण्यासाठी, मी तलाव बांधले. ७ मी दासदासी+ ठेवल्या; माझ्या घरातच जन्मलेले दासही* माझ्याकडे होते. मी भरपूर जनावरं विकत घेतली. माझ्याआधी यरुशलेमच्या कोणत्याही राजाकडे नव्हती, इतकी गुरंढोरं आणि मेंढरं+ माझ्याकडे झाली. ८ मी भरपूर सोनंचांदी जमा केली.+ राजांकडून आणि वेगवेगळ्या प्रांतांमधून मौल्यवान वस्तू जमा केल्या.+ मी स्वतःसाठी गायक आणि गायिका ठेवल्या. माणसाच्या मनाला ज्यामुळे आनंद मिळतो, तो स्त्रीचा सहवास, हो, बऱ्‍याच स्त्रियांचा सहवासही मी उपभोगला. ९ अशा रितीने, माझं ऐश्‍वर्य वाढत गेलं. माझ्याआधी यरुशलेममध्ये कोणाजवळही नव्हती, इतकी धनसंपत्ती मी मिळवली.+ शिवाय माझी बुद्धीही टिकून होती.

१० माझ्या मनात आलेली प्रत्येक इच्छा* मी पूर्ण केली.+ कोणत्याही सुखाचा उपभोग घेण्यापासून मी आपल्या मनाला रोखलं नाही. मी केलेल्या सर्व मेहनतीमुळे माझं मन आनंदी होतं. हे सगळं त्या मेहनतीचंच फळ* होतं.+ ११ पण मी केलेल्या सर्व कामांबद्दल आणि मेहनतीबद्दल मी विचार केला,+ तेव्हा मला कळलं, की तेही सर्व व्यर्थ आणि वाऱ्‍यामागे धावण्यासारखंच होतं.+ सूर्याखाली खऱ्‍या मोलाचं* असं काहीच नव्हतं.+

१२ मग मी बुद्धी, वेडेपणा आणि मूर्खपणा यांच्याकडे आपलं लक्ष वळवलं.+ (कारण राजामागून येणारा माणूस वेगळं काय करू शकतो? जे आधी करण्यात आलं आहे तेच.) १३ तेव्हा मला कळलं, की जसा अंधारापेक्षा प्रकाश चांगला, तशी मूर्खपणापेक्षा बुद्धी चांगली आहे.+

१४ बुद्धिमान माणसाला सगळं काही स्पष्ट दिसतं;*+ पण मूर्ख माणूस अंधारात चालत असतो.+ त्या सर्वांचा शेवट एकच असतो,+ हेही मला समजलं आहे. १५ तेव्हा मी मनात म्हणालो: “जे मूर्खासोबत होतं, तेच माझ्यासोबतही होणार.”+ मग इतकी बुद्धी मिळवून मला काय फायदा झाला? म्हणून मी मनात म्हणालो: “हेही व्यर्थच.” १६ कारण बुद्धिमान असो किंवा मूर्ख, कोणाचीही लोकांना कायम आठवण राहत नाही.+ येणाऱ्‍या दिवसांत लोक सर्वांनाच विसरतील. मूर्खासारखंच बुद्धिमानालासुद्धा मरण येईल.+

१७ म्हणून मला जीवनाचा कंटाळा येऊ लागला,+ कारण सूर्याखाली केली जाणारी सगळी कामं मला त्रासदायक वाटू लागली. सर्वकाही व्यर्थ+ आणि वाऱ्‍यामागे धावण्यासारखं होतं.+ १८ सूर्याखाली खूप मेहनत करून मिळवलेल्या सगळ्या गोष्टी+ मला नकोशा वाटू लागल्या, कारण माझ्यानंतर येणाऱ्‍या माणसासाठी मला त्या सोडून जाव्या लागणार आहेत.+ १९ कोण जाणे तो बुद्धिमान असेल की मूर्ख?+ तरीही, सूर्याखाली ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मी इतकी बुद्धी आणि शक्‍ती खर्च केली, त्यांचा तो ताबा घेईल. हेही व्यर्थच आहे. २० त्यामुळे सूर्याखाली मेहनत करून मी जितकी कामं केली होती, त्यांचा विचार करून माझं मन निराश झालं. २१ कारण माणसाने बुद्धी, ज्ञान आणि कौशल्य वापरून कितीही मेहनत केली, तरीही त्याला आपला वाटा* अशा माणसासाठी सोडून जावा लागेल, ज्याने त्यासाठी मेहनत केली नाही.+ ही फार दुःखाची गोष्ट आहे. हेही व्यर्थच आहे.

२२ सूर्याखाली इतकी मेहनत करून आणि यश मिळवण्यासाठी धडपड करून* माणसाला नक्की काय मिळतं?+ २३ कारण त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याच्या कामामुळे त्याला दुःख आणि निराशा होते.+ त्याच्या मनाला रात्रीही विश्रांती नसते.+ हेही व्यर्थच आहे.

२४ माणसाने खावं-प्यावं आणि आपल्या मेहनतीच्या फळाचा आनंद घ्यावा, हेच त्याच्यासाठी सर्वात चांगलं आहे.+ हे खऱ्‍या देवाकडून आहे, हेही मला समजलं आहे.+ २५ शेवटी, माझ्यापेक्षा चांगलं खायला प्यायला कोणाला मिळतं?+

२६ जो देवाला खूश करतो, त्याला तो बुद्धी, ज्ञान आणि आनंद देतो.+ पण जो पापी आहे त्याला तो गोळा करण्याचं काम देतो, म्हणजे त्याने गोळा केलेल्या गोष्टी अशा माणसाला मिळतील, जो खऱ्‍या देवाला खूश करतो.+ हेही व्यर्थ आणि वाऱ्‍यामागे धावण्यासारखं आहे.

३ प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते;

आकाशाखालच्या प्रत्येक कामासाठी एक वेळ असते.

 २ जन्म होण्याची वेळ आणि मरण्याची वेळ;

रोप लावण्याची वेळ आणि लावलेलं रोप उपटून टाकण्याची वेळ;

 ३ मारून टाकण्याची वेळ आणि बरं करण्याची वेळ;

पाडून टाकण्याची वेळ आणि बांधण्याची वेळ;

 ४ रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ;

आक्रोश करण्याची वेळ आणि आनंदाने नाचण्याची* वेळ;

 ५ दगड फेकून देण्याची वेळ आणि दगड गोळा करण्याची वेळ;

मिठी मारण्याची वेळ आणि मिठी मारण्यापासून स्वतःला आवरण्याची वेळ.

 ६ शोधण्याची वेळ आणि हरवलं म्हणून सोडून देण्याची वेळ;

जवळ ठेवण्याची वेळ आणि फेकून देण्याची वेळ;

 ७ फाडून टाकण्याची वेळ+ आणि शिवण्याची वेळ;

शांत राहण्याची वेळ+ आणि बोलण्याची वेळ;+

 ८ प्रेम करण्याची वेळ आणि द्वेष करण्याची वेळ;+

युद्धाची वेळ आणि शांतीची वेळ.

९ काम करणाऱ्‍याला त्याच्या सगळ्या मेहनतीमुळे काय फायदा होतो?+ १० माणसांना गुंतवून ठेवण्यासाठी देवाने त्यांना जी कामं दिली आहेत, ती मी पाहिली आहेत. ११ त्याने प्रत्येक गोष्ट सुंदर* आणि योग्य वेळी घडवली आहे.+ त्याने माणसांना अनंतकाळाची जाणीव दिली आहे; तरीही, खऱ्‍या देवाने जे काही केलं आहे, ते माणसाला कधीही पूर्णपणे* समजणार नाही.

१२ मी या निष्कर्षावर आलोय, की माणसांनी आपल्या आयुष्यात आनंदी राहावं आणि योग्य ते करत राहावं; हेच त्यांच्यासाठी सर्वात चांगलं आहे.+ १३ तसंच, प्रत्येकाने खावं-प्यावं आणि आपल्या सगळ्या मेहनतीच्या फळाचा आनंद घ्यावा. ही देवाची देणगी आहे.+

१४ खरा देव जे काही बनवतो ते सर्वकाळ टिकून राहतं, हे मला कळलं आहे. त्यात कशाचीच भर घालता येत नाही आणि त्यातून काही कमीही करता येत नाही. माणसांनी खऱ्‍या देवाचं भय मानावं, म्हणून त्याने ते असं बनवलं आहे.+

१५ जे काही घडतं, ते आधीच घडलं आहे आणि जे होणार आहे, ते आधीच झालं आहे;+ पण मानवांनी जे मिळवण्याचा प्रयत्न केला,* त्याचा देव शोध घेतो.

१६ सूर्याखाली हेही माझ्या पाहण्यात आलं आहे: जिथे न्याय असायला हवा, तिथे अन्याय* होता आणि जिथे नीती असायला हवी, तिथे अनीती* होती.+ १७ म्हणून मी आपल्या मनात म्हणालो: “खरा देव नीतिमान आणि दुष्ट या दोघांचाही न्याय करेल,+ कारण प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक कामासाठी एक वेळ असते.”

१८ खरा देव मानवांची परीक्षा घेईल आणि ते प्राण्यांसारखेच आहेत, हे त्यांना दाखवून देईल, असंही मी आपल्या मनात म्हणालो. १९ कारण माणसांचा शेवट होतो आणि प्राण्यांचाही शेवट होतो; त्या सर्वांचा शेवट एकच असतो.+ जसा एक मरतो, तसा दुसराही मरतो आणि त्या सर्वांमध्ये असलेला प्राण* सारखाच असतो.+ त्यामुळे माणूस प्राण्यांपेक्षा काही श्रेष्ठ नाही. सगळंच व्यर्थ आहे! २० ते सर्व एकाच ठिकाणी जातात.+ सगळे मातीतून आले+ आणि सगळे पुन्हा मातीतच जाणार.+ २१ माणसांचा प्राण वर जातो, पशूंचा खाली जमिनीत जातो, हे खातरीने कोण सांगू शकतं?+ २२ त्यामुळे मला कळलं, की माणसाने आपल्या कामातून आनंद मिळवावा, हेच त्याच्यासाठी सर्वात चांगलं आहे.+ कारण ते त्याचं प्रतिफळ* आहे. शेवटी तो गेल्यानंतर काय घडेल, हे त्याला कोण दाखवू शकतं?+

४ मग मी सूर्याखाली होणाऱ्‍या जुलमांवर पुन्हा विचार केला. मी पीडितांचे अश्रू पाहिले, पण त्यांना सांत्वन देणारं कोणीही नव्हतं.+ त्यांच्यावर जुलूम करणाऱ्‍यांकडे सत्ता होती, खरंच, पीडितांचं सांत्वन करणारं कोणीच नव्हतं. २ म्हणून जे जिवंत आहेत त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी, मी मेलेल्यांचं अभिनंदन केलं.+ ३ आणि ज्याचा अजून जन्म झाला नाही, तो तर या दोघांपेक्षाही चांगला आहे.+ कारण त्याने सूर्याखाली होणारी वाईट कृत्यं पाहिलेली नाहीत.+

४ लोक चढाओढीमुळे खूप मेहनत करतात आणि कौशल्याने काम करतात, हे मी पाहिलं आहे;+ पण हेही व्यर्थ आणि वाऱ्‍यामागे धावण्यासारखंच आहे.

५ मूर्ख हाताची घडी घालून बसतो आणि स्वतःचा नाश करतो.+

६ वाऱ्‍यामागे धावण्यापेक्षा आणि कष्टाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा, विश्रांतीची एक मूठ चांगली.+

७ सूर्याखाली होणाऱ्‍या आणखी एका व्यर्थ गोष्टीबद्दल मी पुन्हा विचार केला: ८ एक असा माणूस आहे जो एकटाच राहतो. त्याला कोणीही सोबती नाही. त्याला मुलगा नाही किंवा भाऊही नाही, पण तो खूप मेहनत करतो. खूप श्रीमंती पाहूनही त्याचे डोळे तृप्त होत नाहीत.+ पण, तो स्वतःला असं विचारत नाही, “मी इतके कष्ट कोणासाठी करतोय? मी थोडी मौजमजा का करत नाही?”+ हे दुःख देणारं काम आहे. हेही व्यर्थच आहे.+

९ एकापेक्षा दोघं चांगले,+ कारण त्यांच्या मेहनतीचं त्यांना चांगलं फळ मिळतं.* १० कारण त्यांच्यातला एक पडला, तर दुसरा त्याला मदत करू शकतो. पण ज्याला मदत करणारं कोणी नाही असा माणूस पडला, तर त्याचं काय होईल?

११ दोघं एकत्र झोपले तर त्यांना ऊब मिळते, पण एकट्याला ऊब कशी मिळेल? १२ एखादा माणूस एकट्यावर वरचढ होईल, पण दोघं असले तर ते त्याचा सामना करू शकतील. तीन धाग्यांनी बनलेली दोरी सहजासहजी* तुटत नाही.

१३ सल्ला न मानणाऱ्‍या+ वृद्ध आणि मूर्ख राजापेक्षा, गरीब आणि बुद्धिमान तरुण चांगला!+ १४ कारण तो* जरी वृद्ध राजाच्या राज्यात गरीब म्हणून जन्माला आला, तरी तो तुरुंगातून निघून राजा बनला.+ १५ सूर्याखाली चालणाऱ्‍या सर्व लोकांबद्दल मी विचार केला. तसंच, राजाची जागा घेणाऱ्‍या तरुणाचं काय होईल, यावरही मी विचार केला. १६ जरी त्याने पुष्कळ लोकांवर राज्य केलं, तरी नंतर येणारे त्याच्यावर खूश होणार नाहीत.+ हेही व्यर्थ आणि वाऱ्‍यामागे धावण्यासारखंच आहे.

५ तू खऱ्‍या देवाच्या मंदिरात जाशील, तेव्हा सांभाळून पाऊल ठेव;+ मूर्ख लोकांसारखं बलिदान द्यायला जाण्यापेक्षा,+ ऐकून घ्यायला तिथे जाणं+ कधीही चांगलं. कारण आपण जे करत आहोत ते वाईट आहे, याची त्यांना कल्पना नसते.

२ खऱ्‍या देवासमोर बोलण्याची घाई करू नकोस आणि त्याच्यासमोर विचार न करता बोलू नकोस.+ कारण खरा देव स्वर्गात आहे, पण तू पृथ्वीवर आहेस. म्हणून, जे काही बोलशील ते सांभाळून बोल.+ ३ मनात खूप चिंता असल्या की माणसाला स्वप्न पडतं+ आणि एखादा खूप जास्त बोलतो, तेव्हा त्याच्या वटवटीतून त्याचा मूर्खपणा दिसून येतो.+ ४ तू देवाला नवस करशील तेव्हा तो फेडायला उशीर करू नकोस,+ कारण मूर्खांमुळे देवाला आनंद होत नाही.+ तू केलेला नवस फेड.+ ५ नवस करून तो न फेडण्यापेक्षा, नवस न केलेलाच बरा.+ ६ तुझ्या तोंडामुळे तुझ्याकडून काही पाप होणार नाही याची काळजी घे+ आणि मी चुकून बोललो असं स्वर्गदूतासमोर* म्हणू नकोस.+ नाहीतर कदाचित, खऱ्‍या देवाला तुझ्या बोलण्याचा राग येईल आणि तो तुझ्या हाताचं कार्य नष्ट करेल.+ ७ कारण, जशी पुष्कळ चिंतांमुळे स्वप्नं पडतात,+ तसंच जास्त बोलल्यामुळे तोंडातून व्यर्थ गोष्टी निघतात. पण, तू खऱ्‍या देवाचं भय मान.+

८ तुझ्या प्रांतात गरिबावर अत्याचार होताना किंवा काही अन्याय किंवा दुष्टपणा घडताना तुला दिसला, तर याबद्दल आश्‍चर्य करू नकोस.+ कारण उच्च अधिकाऱ्‍यावर नजर ठेवणारा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असा एक आहे; आणि त्यांच्यापेक्षा आणखी श्रेष्ठ असलेले इतरही आहेत.

९ तसंच, जमिनीतून मिळणारं उत्पन्‍न त्या सर्वांमध्ये वाटलं जातं; शेताच्या उत्पन्‍नातून राजाच्याही गरजा पूर्ण होतात.+

१० ज्याला चांदीची हाव असते, त्याचं चांदीने कधीच समाधान होत नाही आणि ज्याला धनसंपत्तीची हाव असते त्याचं धनसंपत्तीने कधीच समाधान होत नाही.+ हेही व्यर्थच.+

११ चांगल्या गोष्टी वाढल्या, की त्यांचा उपभोग घेणारेही वाढतात.+ त्यांच्या मालकाला त्यांच्याकडे पाहण्याशिवाय, दुसरा कोणता फायदा होतो?+

१२ सेवकाने कमी खाल्लं काय किंवा जास्त खाल्लं काय, त्याला चांगली झोप लागते. पण श्रीमंत माणसाकडे असलेली भरपूर संपत्ती त्याला झोपू देत नाही.

१३ सूर्याखाली मी एक फार दुःखाची गोष्ट* पाहिली: संपत्ती साठवून ठेवणारा आपल्या संपत्तीमुळे स्वतःवर दुःख ओढवून घेतो. १४ व्यवसाय बुडाल्यामुळे त्याची सगळी संपत्ती जाते. त्याला मुलगा होतो, तेव्हा आपल्या मुलाला वारशात देण्यासाठी त्याच्याजवळ काहीही नसतं.+

१५ माणूस जसा आपल्या आईच्या उदरातून नग्न येतो, तसाच तो परत जाईल.+ आयुष्यभर मेहनत करूनही, तो आपल्यासोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही.+

१६ हीसुद्धा फार दुःखाची गोष्ट* आहे: तो जसा आला, तसाच परत जाईल; मग, इतकी मेहनत करण्याचा आणि वाऱ्‍यामागे धावण्याचा काय उपयोग?+ १७ तो दररोज अंधारात बसून जेवतो आणि निराशा, आजारपण, राग यांनी ग्रासलेला असतो.+

१८ पण मला जे चांगलं आणि योग्य असल्याचं दिसून आलं ते हे: माणसाने खावं-प्यावं आणि आपल्या मेहनतीमुळे आनंद करावा.+ कारण खऱ्‍या देवाने त्याला दिलेल्या थोड्याशा आयुष्यात तो सूर्याखाली जी मेहनत करतो, त्याचं हे प्रतिफळ* आहे.+ १९ खरा देव जेव्हा एखाद्याला धनसंपत्तीसोबतच+ तिचा आनंद उपभोगण्याचं सामर्थ्यही देतो, तेव्हा त्याने हे प्रतिफळ* स्वीकारावं आणि आपल्या मेहनतीमुळे आनंद करावा. ही देवाची देणगी आहे.+ २० आपल्या आयुष्याचे दिवस कसे निघून गेले हे त्याला कळणारसुद्धा नाही, कारण खरा देव त्याला मनापासून आनंद करण्यात गुंतवून ठेवतो.+

६ सूर्याखाली मी आणखी एक दुःखाची गोष्ट* पाहिली आहे आणि माणसांमध्ये ती सहसा पाहायला मिळते: २ खरा देव माणसाला धनसंपत्ती आणि वैभव देतो आणि माणसाला हवं असलेलं सर्वकाही त्याच्याकडे असतं.* पण तरीही देव त्याला त्यांचा उपभोग घेऊ देत नाही. कोणी परकाच त्यांचा उपभोग घेतो. ही एक व्यर्थ आणि फार दुःखाची गोष्ट आहे. ३ एखाद्या माणसाला १०० मुलं जरी झाली आणि जरी तो बरीच वर्षं जगून म्हातारा झाला; तरी, कबरेत जाण्याआधी त्याने आपल्या चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतला नाही, तर मी म्हणीन, जे मूल मेलेलं जन्माला येतं, ते त्याच्यापेक्षा बरं.+ ४ कारण ते उगीचच जन्माला येतं आणि अंधारात निघून जातं. त्याचं नावही कोणाला माहीत नसतं. ५ जरी त्याने कधीच दिवसाचा उजेड पाहिला नसला आणि काहीच अनुभवलं नसलं, तरी ते त्या आधीच्या माणसापेक्षा चांगलं आहे.*+ ६ जर माणसाने आनंदच उपभोगला नाही, तर हजार वर्षांचं आयुष्य दोनदा जगूनही काय फायदा? सगळे एकाच ठिकाणी जात नाहीत का?+

७ माणसाची सगळी मेहनत पोट भरण्यासाठी असते;+ तरी त्याची भूक कधीच भागत नाही.* ८ बुद्धिमान माणूस मूर्खापेक्षा कोणत्या बाबतीत वरचढ असतो?+ किंवा आयुष्याला सामोरं कसं जायचं* हे गरिबाला माहीत असूनही काय फायदा होतो? ९ मनातल्या इच्छांमागे धावण्यापेक्षा, जे डोळ्यांसमोर आहे त्याचा आनंद घेणं कधीही चांगलं. हेही व्यर्थ आणि वाऱ्‍यामागे धावण्यासारखंच आहे.

१० जे काही अस्तित्वात आहे, त्याला आधीच नाव देण्यात आलं आहे; माणूस मुळात कसा आहे, हे उघड झालं आहे. त्याच्यापेक्षा ताकदवान असलेल्याशी तो वाद करू शकत नाही.* ११ जितके जास्त शब्द,* तितकी जास्त व्यर्थता; शेवटी त्यांच्यापासून माणसाला काय फायदा? १२ माणूस आपल्या निरर्थक आयुष्याचे मोजके दिवस सावलीसारखे घालवतो. या आयुष्यात काय करणं त्याच्यासाठी सर्वात चांगलं आहे, हे कोणाला माहीत आहे?+ तो गेल्यावर सूर्याखाली काय घडेल, हे त्याला कोण सांगू शकतं?

७ मौल्यवान तेलापेक्षा चांगलं नाव* बरं+ आणि जन्माच्या दिवसापेक्षा मरणाचा दिवस बरा. २ मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाच्या घरी जाणं चांगलं,+ कारण प्रत्येक माणसाचा शेवट हाच आहे. जे जिवंत आहेत त्यांनी हे आठवणीत ठेवलं पाहिजे. ३ हसण्यापेक्षा दुःखी असणं बरं,+ कारण चेहरा उदास झाल्यामुळे मन सुधारतं.+ ४ बुद्धिमान माणसाचं मन शोकाच्या घराकडे लागलेलं असतं, पण मूर्खाचं मन मात्र मेजवानीच्या* घराकडे लागलेलं असतं.+

५ मूर्खांचं गाणं ऐकण्यापेक्षा बुद्धिमान माणसाचं ताडन ऐकणं बरं.+ ६ कारण मूर्खांचं हसणं, भांड्याखाली कडकड आवाज करत जळणाऱ्‍या काट्याकुट्यांसारखं असतं;+ हेही व्यर्थच आहे. ७ पण अत्याचार झाल्यामुळे कधीकधी बुद्धिमान माणूसही वेड्यासारखा वागू लागतो आणि लाचेमुळे मन भ्रष्ट होतं.+

८ एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट बरा. गर्विष्ठ असण्यापेक्षा सहनशील असणं बरं.+ ९ लगेच रागावू नकोस,+ कारण राग मूर्खांच्या मनात राहतो.*+

१० “पूर्वीचे दिवस आजच्यापेक्षा चांगले होते,” असं म्हणू नकोस. कारण असं बोलणं बुद्धीचं लक्षण नाही.+

११ वारशाने मिळालेल्या संपत्तीसोबत बुद्धीही असेल, तर ही एक चांगली गोष्ट आहे. जिवंत असलेल्यांसाठी बुद्धी फायद्याची गोष्ट आहे. १२ पैशामुळे जसं संरक्षण मिळतं,+ तसं बुद्धीमुळेही संरक्षण मिळतं;+ पण ज्ञानाचा फायदा असा, की ज्याच्याकडे बुद्धी असते, त्याच्या जिवाचं ती रक्षण करते.+

१३ खऱ्‍या देवाच्या कार्याकडे लक्ष दे, कारण जे त्याने वाकडं केलं आहे, ते कोण सरळ करू शकतं?+ १४ चांगल्या दिवशी, चांगुलपणा दाखव;+ पण, संकटाच्या* दिवशी हे लक्षात घे, की त्या दिवसाप्रमाणेच हा दिवसही देवाने बनवला आहे.+ याच कारणामुळे, भविष्यात आपल्यासोबत काय होईल हे माणूस खातरीने सांगू* शकत नाही.+

१५ माझ्या निरर्थक आयुष्यात+ मी सर्वकाही पाहिलं आहे. नीतीने वागत असून ज्याचा नाश होतो, असा नीतिमान माणूसही मी पाहिला आहे;+ आणि वाईट गोष्टी करत असून मोठं आयुष्य जगणारा दुष्टही मी पाहिला आहे.+

१६ खूप जास्त नीतिमान होऊ नकोस+ आणि खूप जास्त बुद्धिमान असल्याचंही दाखवू नकोस.+ तू स्वतःवर नाश का ओढवून घ्यावा?+ १७ मर्यादेबाहेर दुष्टपणा करू नकोस, तसंच मूर्खपणे वागू नकोस.+ तू आपल्या वेळेआधी का मरावं?+ १८ यांतली एक ताकीद मानणं आणि दुसरीही न विसरणं, हेच सर्वात चांगलं.+ कारण जो देवाचं भय मानतो, तो या दोन्हींचं पालन करेल.

१९ बुद्धिमान माणूस आपल्या बुद्धीमुळे, शहरातल्या दहा शक्‍तिशाली माणसांपेक्षा ताकदवान ठरतो.+ २० कारण जो नेहमीच चांगलं वागतो आणि कधीच पाप करत नाही, असा एकही नीतिमान माणूस या पृथ्वीवर नाही.+

२१ लोकांनी बोललेला प्रत्येक शब्द मनाला लावून घेऊ नकोस;+ नाहीतर, तुझ्या सेवकाने तुला दिलेला शाप तू ऐकशील. २२ कारण, तू स्वतःही बऱ्‍याच वेळा इतरांना शाप दिला आहेस, हे तुझ्या मनाला माहीत आहे.+

२३ या सर्व गोष्टी मी बुद्धीने पारखून पाहिल्या आणि म्हणालो: “मला बुद्धिमान व्हायचंय.” पण ते माझ्या शक्‍तिपलीकडे होतं. २४ जे घडून गेलंय ते आवाक्याबाहेर आणि खूप खोल आहे. ते कोण समजू शकतं?+ २५ बुद्धीच्या गोष्टी आणि जे काही घडतं त्यामागची कारणं जाणून घ्यावीत, त्यांचा तपास करावा आणि त्यांचा शोध घ्यावा; तसंच, मूर्खतेतला दुष्टपणा आणि वेडेपणातलं अज्ञान समजून घ्यावं, असं मी आपल्या मनाशी ठरवलं.+ २६ तेव्हा मला हे कळलं: जी स्त्री शिकाऱ्‍याच्या पाशासारखी असते, जिचं मन जाळ्यासारखं आणि जिचे हात तुरुंगाच्या साखळ्यांसारखे असतात, ती मृत्यूपेक्षा वाईट असते. खऱ्‍या देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा तिच्यापासून सुटतो,+ पण पापी माणूस तिच्या तावडीत सापडतो.+

२७ उपदेशक+ म्हणतो, “पाहा, मला जे समजलं ते हे आहे. मी एकापाठोपाठ एक गोष्टींचा तपास करून या निष्कर्षावर आलो, २८ पण मी* ज्याचा सतत शोध घेत राहिलो, ते मला अजूनही सापडलेलं नाही. हजार लोकांमध्ये एक सरळ मनाचा माणूस तर मला सापडला, पण स्त्री मात्र सापडली नाही. २९ मला ही एकच गोष्ट दिसून आली आहे: खऱ्‍या देवाने माणसांना सरळ मनाचं बनवलं होतं,+ पण त्यांनी आपल्याच योजनांप्रमाणे वागायचं ठरवलं.”+

८ बुद्धिमान माणसासारखं कोण आहे? समस्येवरचा उपाय* कोणाला माहीत असतो? बुद्धीमुळे माणसाच्या चेहऱ्‍यावर तेज येतं आणि त्याचा कठोर चेहरा आनंदी दिसू लागतो.

२ मी म्हणतो: “देवाला दिलेल्या शपथेचा+ आदर करून राजाच्या आज्ञा पाळ.+ ३ त्याच्यासमोरून निघून जाण्याची घाई करू नकोस.+ वाईट गोष्टींमध्ये सामील होऊ नकोस;+ कारण त्याला वाटेल तसं तो करू शकतो. ४ राजाचा शब्द पाळावाच लागतो;+ ‘तू हे काय करतोस?’ असं त्याला कोण म्हणू शकतं?”

५ जो आज्ञा पाळतो त्याचं नुकसान होणार नाही.+ कोणत्या वेळी कसं वागायचं, हे बुद्धिमान माणसाला माहीत असतं.+ ६ माणसांना बऱ्‍याच समस्या असल्या, तरी प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ आणि पद्धत असते.+ ७ काय होणार, हे कोणालाही माहीत नसतं; मग ते कसं होणार, हे त्याला कोण सांगू शकतं?

८ जसं कोणत्याही माणसाचं आपल्या प्राणावर* नियंत्रण नसतं आणि तो त्याला रोखू शकत नाही, तसंच मरणाच्या दिवसावरही त्याची सत्ता नसते.+ जसं युद्धातून परत जाण्याची परवानगी दिली जात नाही, तसंच दुष्टता करणारे तिच्या परिणामांपासून वाचू शकत नाहीत.*

९ मी हे सर्व पाहिलं आणि सूर्याखाली केल्या जाणाऱ्‍या सर्व कामांवर मनापासून विचार केला. या सबंध काळात माणसाने माणसावर अधिकार गाजवून त्याचं नुकसान* केलं आहे.+ १० मी अशा दुष्टांना पुरलं जाताना पाहिलं, जे पवित्र ठिकाणात ये-जा करायचे. पण ज्या शहरात ते दुष्टपणा करायचे, त्या शहरातले लोक त्यांना लगेच विसरून गेले.+ हेही व्यर्थच आहे.

११ वाईट कृत्याबद्दल लगेच शिक्षा दिली जात नाही,+ तेव्हा माणसांचं मन आणखी वाईट करण्याचं धाडस करतं.+ १२ पापी माणूस शंभर वेळा वाईट कृत्यं करूनही बरीच वर्षं जगला, तरी जे खऱ्‍या देवाचं भय मानतात त्यांचं भलं होतं, हे मला माहीत आहे; कारण ते खरंच त्याचं भय मानतात.+ १३ पण दुष्टाचं भलं होणार नाही+ आणि सावलीसारखं असलेलं त्याचं आयुष्य तो वाढवू शकणार नाही,+ कारण तो देवाचं भय मानत नाही.

१४ या पृथ्वीवर एक व्यर्थ* गोष्ट घडते: काही नीतिमान माणसांशी असा व्यवहार केला जातो, जणू काही त्यांनी दुष्टता केली आहे.+ आणि काही दुष्टांशी असा व्यवहार केला जातो, जणू काही ते नीतीने वागले आहेत.+ मी म्हणतो, हेही व्यर्थच आहे.

१५ म्हणून मी आनंदी राहण्याचा सल्ला देतो.+ कारण माणसाने खावं-प्यावं आणि आनंदी राहावं, हीच त्याच्यासाठी सूर्याखाली सर्वात चांगली गोष्ट आहे. खऱ्‍या देवाने त्याला सूर्याखाली दिलेल्या आयुष्यात मेहनत करत असताना, त्याने हेही करावं.+

१६ मी बुद्धी मिळवण्याकडे आणि पृथ्वीवर होणाऱ्‍या सर्व कामांचं* परीक्षण करण्याकडे आपलं मन लावलं.+ कधीकधी तर मी रात्रंदिवस झोपत नव्हतो.* १७ मग मी खऱ्‍या देवाच्या सर्व कार्यांवर विचार केला आणि मला जाणीव झाली, की सूर्याखाली जे काही घडतं, ते मानवांना समजू शकत नाही.+ माणसांनी कितीही प्रयत्न केला, तरी त्यांना ते समजू शकत नाही. ती कार्यं जाणून घेण्याइतके आम्ही बुद्धिमान आहोत, असा त्यांनी दावा केला, तरीही त्यांना ती अजिबात समजू शकत नाहीत.+

९ या सर्व गोष्टींवर मी विचार केला आणि अशा निष्कर्षावर आलो, की नीतिमान आणि बुद्धिमान लोक, तसंच, त्यांची कार्यं खऱ्‍या देवाच्या हातात असतात.+ माणसांना आपल्याआधी होऊन गेलेल्या लोकांच्या प्रेमाबद्दल आणि द्वेषाबद्दल माहीत नसतं. २ नीतिमान आणि दुष्ट,+ चांगले, शुद्ध आणि अशुद्ध, बलिदान करणारे आणि बलिदान न करणारे, या सर्वांचा शेवट सारखाच असतो.+ चांगला माणूस हा पापी माणसासारखाच असतो; शपथ घेणारा हा शपथ घेण्याबद्दल सावध असलेल्या माणसासारखाच असतो. ३ सूर्याखाली एक दुःखाची गोष्ट घडते: सर्वांचा शेवट सारखाच असल्यामुळे,+ माणसांचं मन वाइटाने भरलेलं असतं. आयुष्यभर त्यांच्या मनात वेडेपणा असतो आणि शेवटी ते मरून जातात!*

४ जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत त्याला आशा असते, कारण मेलेल्या सिंहापेक्षा जिवंत कुत्रा बरा.+ ५ आपण मरणार हे जिवंतांना माहीत असतं,*+ पण मेलेल्यांना तर काहीच माहीत नसतं;+ तसंच त्यांच्यासाठी कोणतंही प्रतिफळ* नसतं, कारण कोणालाही त्यांची आठवण राहत नाही.+ ६ शिवाय त्यांचं प्रेम, त्यांचा द्वेष आणि त्यांचे हेवेदावे संपलेले असतात; सूर्याखाली घडणाऱ्‍या गोष्टींमध्ये त्यांचा काहीच वाटा नसतो.+

७ आनंदाने जाऊन आपलं अन्‍न खा आणि खूश होऊन आपला द्राक्षारस पी,+ कारण खरा देव तुझ्या कार्यांवर संतुष्ट आहे.+ ८ नेहमी पांढरेशुभ्र* कपडे घाल आणि डोक्याला तेल लावायला विसरू नकोस.+ ९ देवाने तुला सूर्याखाली दिलेल्या तुझ्या थोड्याशा आयुष्यात, आपल्या प्रिय बायकोसोबत जीवनाचा आनंद घे.+ कारण सूर्याखाली तू करत असलेल्या सगळ्या मेहनतीबद्दल, तुझ्या थोड्याशा आयुष्यात तुला मिळालेला हा वाटा आहे.+ १० तुझ्या हातांना जे काही काम मिळेल, ते मन लावून कर. कारण ज्या कबरेकडे* तू जात आहेस, तिथे कोणतंही काम, योजना, ज्ञान किंवा बुद्धी नाही.+

११ सूर्याखाली मी आणखी एक गोष्ट पाहिली आहे: जे वेगवान असतात, ते नेहमीच शर्यत जिंकत नाहीत; जे शक्‍तिशाली असतात, ते नेहमीच युद्ध जिंकत नाहीत;+ जे बुद्धिमान असतात, त्यांना नेहमीच अन्‍न मिळत नाही; जे  हुशार असतात, त्यांना नेहमीच संपत्ती लाभत नाही+ आणि जे ज्ञानी असतात, त्यांना नेहमीच यश मिळत नाही,+ कारण वेळ आणि अनपेक्षित घटना त्या सर्वांसोबत घडतात. १२ कारण माणसाला त्याची वेळ माहीत नसते.+ मासे जसे जीवघेण्या जाळ्यात आणि पक्षी जसे पाशात अडकतात, तशीच माणसंसुद्धा संकटाच्या काळात, अचानक कोसळणाऱ्‍या विपत्तीत सापडतात.

१३ सूर्याखाली मी बुद्धीबद्दल आणखी एक गोष्ट पाहिली आणि मला ती फार लक्षवेधक वाटली: १४ एक लहानसं शहर होतं आणि त्यात थोडीच माणसं राहत होती. मग एका शक्‍तिशाली राजाने त्या शहरावर हल्ला करून, चारही बाजूंनी त्याला वेढा घातला. १५ त्या शहरात एक गरीब, पण बुद्धिमान माणूस राहत होता. त्याने आपल्या बुद्धिमत्तेने शहराला वाचवलं. पण कोणालाही त्या गरीब माणसाची आठवण राहिली नाही.+ १६ तेव्हा मी मनात म्हणालो: ‘बुद्धी शक्‍तीपेक्षा श्रेष्ठ असते;+ पण, गरीब माणसाची बुद्धी तुच्छ लेखली जाते आणि त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देत नाही.’+

१७ मूर्खांच्या राजाचा आरडाओरडा ऐकण्यापेक्षा, बुद्धिमान माणसाने शांतपणे बोललेल्या शब्दांकडे लक्ष देणं बरं.

१८ युद्धाच्या शस्त्रांपेक्षा बुद्धी बरी; पण, एक पापी माणूस पुष्कळ चांगल्या गोष्टींचा नाश करू शकतो.+

१० जसं मेलेल्या माशांमुळे, सुगंधित तेलाला दुर्गंधी आणि फेस येतो, तसंच थोड्याशा मूर्खपणामुळे, बुद्धीचा आणि सन्मानाचा नाश होतो.+

२ बुद्धिमानाचं मन त्याला योग्य मार्गाने नेतं,* पण मूर्खाचं मन त्याला चुकीच्या मार्गाने नेतं.*+ ३ मूर्ख कोणत्याही मार्गाने चालला तरी त्याच्याजवळ शहाणपण नसतं;+ तो आपला मूर्खपणा सर्वांना दाखवून देतो.+

४ शासकाचा क्रोध* तुझ्यावर भडकला, तरीही आपली जागा सोडू नकोस,+ कारण शांततेमुळे मोठी पापं टळतात.+

५ मी सूर्याखाली एक दुःखाची गोष्ट पाहिली आहे. सत्तेवर असणारे सहसा ही चूक करतात:+ ६ मूर्खांना उच्च पदांवर बसवलं जातं, पण योग्यता असलेले* खालच्या पदांवर राहतात.

७ मी सेवकांना घोड्यावर बसलेलं आणि अधिकाऱ्‍यांना सेवकांसारखं पायी चालताना पाहिलं आहे.+

८ खड्डा खोदणारा स्वतःच त्यात पडू शकतो;+ भिंत फोडणाऱ्‍याला साप चावू शकतो.

९ खडक फोडणाऱ्‍याला त्यांमुळे इजा होऊ शकते; आणि लाकूड तोडणाऱ्‍याच्या जिवाला धोका असतो.*

१० लोखंडाच्या बोथट हत्याराला धार लावली नाही, तर ते चालवणाऱ्‍याला खूप जोर लावावा लागेल. पण बुद्धीमुळे यश मिळतं.

११ सापाला वश करण्याआधी जर तो चावला, तर गारुड्याच्या कौशल्याचा काय फायदा?

१२ बुद्धिमानाच्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांमुळे त्याच्यावर कृपा होते,+ पण मूर्खाच्या ओठांतून निघणारे शब्द त्याचा नाश करतात.+ १३ त्याच्या तोंडून निघणारे सुरुवातीचे शब्द मूर्खपणाचे असतात+ आणि त्याचे शेवटचे शब्द वेडेपणाचे आणि नुकसानकारक असतात. १४ तरी तो मूर्ख बोलतच राहतो.+

पुढे काय घडेल हे माणसाला माहीत नसतं; मग तो गेल्यावर काय होईल, हे त्याला कोण सांगू शकतं?+

१५ मूर्खाची मेहनत त्याला दमवून टाकते, कारण त्याला शहराकडे जाणारा रस्ताही शोधता येत नाही.

१६ ज्या देशाचा राजा लहान मुलगा आहे+ आणि जिथले अधिकारी सकाळीच मेजवानी सुरू करतात, त्या देशाची किती दुर्दशा होईल! १७ पण, ज्या देशाचा राजा उच्च घराण्यातला असतो आणि जिथले अधिकारी धुंद होण्यासाठी नाही,+ तर ताकद मिळण्यासाठी योग्य वेळी खातात-पितात, तो देश सुखी होतो!

१८ खूप आळशीपणामुळे घराचं छत वाकतं आणि रिकामटेकड्या हातांमुळे घर गळायला लागतं.+

१९ अन्‍नामुळे* मन आनंदी होतं आणि द्राक्षारसामुळे जीवनात मौज येते;+ पण पैशांमुळे प्रत्येक गरज पूर्ण होते.+

२० मनातल्या मनातही* कधी राजाला शाप देऊ नकोस+ आणि तुझ्या झोपायच्या खोलीत श्रीमंतांना शाप देऊ नकोस; नाहीतर एखादा पक्षी* तुझे शब्द* त्यांच्यापर्यंत नेईल किंवा एखादं पाखरू त्या गोष्टी त्यांना जाऊन सांगेल.

११ आपलं अन्‍न* पाण्यावर सोड.+ बऱ्‍याच दिवसांनी तुला ते परत मिळेल.+ २ तुझ्याजवळ असलेल्या वस्तू सात किंवा आठ जणांना वाट,+ कारण पृथ्वीवर कोणती विपत्ती* येईल हे तुला माहीत नाही.

३ ढग पाण्याने भरले, की पृथ्वीवर पाऊस पडतोच. झाड दक्षिणेकडे पडो किंवा उत्तरेकडे, ते जिथे पडतं तिथेच राहतं.

४ जो वाऱ्‍याकडे पाहत राहतो, तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांकडे पाहत राहतो, तो कापणी करणार नाही.+

५ गरोदर स्त्रीच्या पोटात वाढणाऱ्‍या बाळाच्या हाडांमध्ये* जीवन-शक्‍ती* कशी कार्य करते, हे तुला माहीत नाही.+ त्याच प्रकारे, सर्व गोष्टी करणाऱ्‍या खऱ्‍या देवाचं कार्य तू समजू शकत नाहीस.+

६ सकाळीच बी पेर आणि संध्याकाळपर्यंत आपल्या हाताला विश्रांती देऊ नकोस.+ कारण कोणतं बी फळ देईल, हे की ते, किंवा दोन्ही चांगली निघतील हे तुला माहीत नाही.

७ उजेड सुखावणारा असतो आणि सूर्याकडे पाहणं डोळ्यांसाठी चांगलं असतं. ८ माणूस बरीच वर्षं जगला, तर त्याने ती सर्व आनंदात घालवावीत.+ पण अंधाराचा काळही मोठा असू शकतो, हे त्याने आठवणीत ठेवावं; पुढे येणारं सर्वकाही व्यर्थ आहे.+

९ तुझ्या तरुणपणाच्या दिवसांत आनंदी राहा आणि तुझ्या तारुण्याच्या काळात तुझं मन सुखी असो. मनाला वाटेल त्या मार्गाने चाल आणि तुझे डोळे दाखवतील त्या वाटेने जा. पण या सर्व गोष्टींबद्दल खरा देव तुझ्याकडून हिशोब घेईल,* हे लक्षात ठेव.+ १० म्हणून, दुःख देणाऱ्‍या गोष्टी आपल्या मनातून काढून टाक आणि नुकसान करणाऱ्‍या गोष्टी आपल्या शरीरापासून दूर ठेव, कारण तारुण्य आणि तारुण्यातला जोमही व्यर्थच आहे.+

१२ आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या महान निर्माणकर्त्याला आठव,+ कारण पुढे दुःखाचे* दिवस येतील+ आणि अशी वर्षं येतील जेव्हा तू म्हणशील: “माझ्या जीवनात काहीच आनंद नाही.” २ तेव्हा सूर्य आणि प्रकाश, चंद्र आणि तारे अंधूक होतील+ आणि पाऊस पडल्यावर* आभाळ पुन्हा भरून येईल. ३ त्या दिवसांत घराचे पहारेकरी* लटपटू लागतील* आणि ताकदवान माणसं वाकतील; दळणाऱ्‍या कमी झाल्यामुळे त्या दळायचं सोडून देतील आणि खिडक्यांतून डोकावणाऱ्‍या स्त्रियांना बाहेर अंधार दिसेल.+ ४ तेव्हा रस्त्याकडे उघडणारी दारं बंद झालेली असतील; जात्याचा आवाज मंद होईल. पक्ष्याच्या आवाजानेही माणसाला जाग येईल आणि सगळ्या मुली अगदी हळू आवाजात गातील.+ ५ तसंच, माणसाला उंच ठिकाणांची भीती वाटेल आणि रस्त्यावर जायची कल्पनाही त्याला भीतिदायक वाटेल. बदामाच्या झाडाला बहर येईल+ आणि नाकतोडा रखडत, पाय ओढत चालेल. माणसाची भूक* मरेल, कारण तो आपल्या कायमच्या घराकडे चालला आहे+ आणि शोक करणारे रस्त्यावर फिरत आहेत.+ ६ मग चांदीचा दोर कापला जाईल आणि सोन्याच्या कटोऱ्‍याचा चुराडा होईल; झऱ्‍याजवळचा घडा फुटेल आणि विहिरीचा रहाट मोडेल. ७ तेव्हा माती पूर्वीप्रमाणेच मातीला मिळेल+ आणि जी जीवनशक्‍ती खऱ्‍या देवाने दिली होती, ती त्याच्याकडे परत जाईल.+

८ उपदेशक+ म्हणतो, “व्यर्थ* आहे! सगळंच व्यर्थ आहे!”+

९ उपदेशकाने बुद्धी तर मिळवलीच, पण तो सतत आपल्याजवळ असलेलं ज्ञान लोकांना द्यायचा.+ त्याने बराच विचार करून आणि बारकाईने संशोधन करून पुष्कळ नीतिवचनं रचली.*+ १० उपदेशकाने सुंदर* शब्द+ आणि सत्याची अचूक वचनं शोधण्यासाठी बरेच परिश्रम घेतले.

११ बुद्धिमानांचे शब्द पराणीसारखे* असतात+ आणि संग्रहित केलेले त्यांचे बोल, घट्ट ठोकलेल्या खिळ्यांसारखे असतात; ते एकाच मेंढपाळाकडून मिळालेले आहेत. १२ पण माझ्या मुला, यांपलीकडे जे काही आहे, त्यापासून सांभाळून राहा. कारण, पुस्तकं लिहिण्याला अंतच नाही आणि त्यांचं खूप जास्त वाचन केल्यामुळे माणूस थकून जातो.+

१३ आता सर्वकाही ऐकून झाल्यावर, सर्व गोष्टींचा सारांश हा आहे: खऱ्‍या देवाचं भय मान+ आणि त्याच्या आज्ञा पाळ;+ हेच माणसाचं कर्तव्य आहे.+ १४ कारण खरा देव प्रत्येक कृत्याचा आणि प्रत्येक गुप्त गोष्टीचा न्याय करेल, मग ती चांगली असो किंवा वाईट.+

शब्दशः “सभा भरवणारा.”

किंवा “निरर्थक.”

बायबलच्या या पुस्तकात, “सूर्याखाली” या शब्दाचा अर्थ “या पृथ्वीवर” किंवा “या जगात” असा होतो.

शब्दशः “उभी आहे.”

किंवा “धापा टाकत.”

किंवा “हिवाळ्यात वाहणाऱ्‍या नद्या; मोसमी नद्या.”

किंवा “कमालीचा मूर्खपणा.”

किंवा “बुद्धी.”

किंवा “वनाला.”

शब्दशः “घराची मुलं.”

शब्दशः “माझ्या डोळ्यांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट.”

किंवा “वाटा.”

किंवा “फायद्याचं.”

किंवा “डोळे उघडे असतात.”

किंवा “सर्वकाही.”

शब्दशः “त्याच्या हृदयाच्या परिश्रमामुळे.”

शब्दशः “उड्या मारण्याची.”

किंवा “व्यवस्थित; उचित.”

शब्दशः “सुरुवातीपासून शेवटपर्यंत.”

किंवा कदाचित, “पण जे होऊन गेलं आहे.”

किंवा “दुष्टता.”

किंवा “दुष्टता.”

किंवा “श्‍वास; जीवन-शक्‍ती.”

किंवा “वाटा.”

किंवा “मोठा फायदा होतो.”

किंवा “लगेच.”

हे कदाचित बुद्धिमान तरुणाला सूचित करतं.

किंवा “निरोप आणणाऱ्‍यासमोर.”

किंवा “संकट.”

किंवा “संकट.”

किंवा “वाटा.”

किंवा “वाटा.”

किंवा “संकट.”

किंवा “त्याच्या जिवाला कशाचीही कमी नसते.”

शब्दशः “जास्त विश्रांती आहे.”

किंवा “त्याच्या जिवाचं समाधान होत नाही.”

शब्दशः “जिवंतांसमोर कसं चालायचं.”

किंवा “आपली बाजू मांडू शकत नाही.”

किंवा कदाचित, “गोष्टी.”

किंवा “चांगला नावलौकिक.” शब्दशः “नाव.”

किंवा “मौजमजेच्या.”

किंवा कदाचित, “मूर्खाचं लक्षण आहे.”

किंवा “विपत्तीच्या.”

किंवा “समजू.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “एखाद्या गोष्टीचा अर्थ.”

किंवा “श्‍वासावर; वाऱ्‍यावर.”

किंवा कदाचित, “दुष्टांचा दुष्टपणा त्यांना वाचवू शकत नाही.”

किंवा “इजा.”

किंवा “निराश करणारी.”

किंवा “उद्योगांचं.”

किंवा कदाचित, “लोक रात्रंदिवस झोपत नाहीत.”

शब्दशः “आणि त्यानंतर मेलेल्यांत जाऊन मिळतात.”

किंवा “जाणीव असते.”

किंवा “मजुरी.”

म्हणजे, शोक व्यक्‍त करणारे नाहीत, तर आनंदी मनःस्थिती दाखवणारे उजळ कपडे.

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “त्याच्या उजव्या हाताला असतं.”

शब्दशः “त्याच्या डाव्या हाताला असतं.”

शब्दशः “प्राण; श्‍वास.”

शब्दशः “श्रीमंत.”

किंवा कदाचित, “त्याने त्याच्यापासून सावध असावं.”

किंवा “भाकरीमुळे.”

किंवा कदाचित, “तुझ्या बिछान्यावरही.”

शब्दशः “आकाशात उडणारे जीव.”

किंवा “निरोप.”

किंवा “भाकर.”

किंवा “संकट.”

शब्दशः “गर्भातल्या हाडांत.”

हे देवाच्या पवित्र शक्‍तीलाही सूचित करतं.

किंवा “तुझा न्याय करेल.”

किंवा “संकटाचे.”

किंवा कदाचित, “पावसासोबत.”

किंवा “राखणदार.”

किंवा “थरथर कापू लागतील.”

हा वाक्यांश अशा एका फळाला सूचित करतो, जे भूक वाढवण्यासाठी वापरलं जायचं.

किंवा “निरर्थक.”

किंवा “योग्य क्रमाने लावली.”

किंवा “मनाला आनंद देणारे.”

शब्दार्थसूची पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा