एस्तेर
१ अहश्वेरोश* राजाच्या काळात घडलेली ही घटना. त्याचं साम्राज्य हिंदुस्थानापासून इथियोपियापर्यंत* १२७ प्रांतांत+ पसरलेलं होतं. २ त्या काळात अहश्वेरोश राजा शूशन*+ राजवाड्यातून राज्य करायचा. ३ आपल्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी, त्याने आपल्या सगळ्या प्रधानांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी एक शाही मेजवानी ठेवली. त्या मेजवानीला पर्शिया+ आणि मेदचे+ सेनापती, मोठमोठे अधिकारी आणि सर्व प्रांतांचे राज्यपाल आले होते. ४ राजा त्यांना १८० दिवसांपर्यंत आपल्या वैभवशाली साम्राज्याची धनदौलत, ऐश्वर्य आणि शाही थाट दाखवत राहिला. ५ हे दिवस संपल्यावर राजाने शूशन* राजवाड्यात असलेल्या सगळ्या लहान-थोरांसाठी सात दिवस मेजवानी दिली. ही मेजवानी राजवाड्यातल्या अंगणात ठेवण्यात आली होती. ६ संपूर्ण अंगण मलमलीच्या* पांढऱ्या पडद्यांनी, तसंच शुद्ध सुताच्या आणि निळ्या पडद्यांनी सजवलेलं होतं. हे पडदे पांढऱ्या सुताच्या आणि जांभळ्या लोकरीच्या दोरांनी बांधलेले असून, ते संगमरवरी खांबांवर असलेल्या चांदीच्या गोल कड्यांमध्ये लटकवलेले होते. तसंच लाल दगडांनी, मोत्यांनी आणि पांढऱ्या व काळ्या संगमरवरी दगडांनी बनवलेल्या फरशीवर बसण्यासाठी सोन्या-चांदीचे दिवाण ठेवले होते.
७ द्राक्षारस सोन्याच्या प्याल्यांमध्ये दिला जात होता आणि प्रत्येक प्याला हा वेगळा होता. तसंच शाही द्राक्षारसाची रेलचेल राजाला शोभेल अशीच होती. ८ कोणावरही द्राक्षारस पिण्याची सक्ती केली जात नव्हती;* तसा नियमच त्या प्रसंगासाठी देण्यात आला होता. कारण प्रत्येकाला आपल्या मनासारखं करू द्यावं असा हुकूम स्वतः राजाने आपल्या महालातल्या कारभाऱ्यांना दिला होता.
९ राणी वश्तीनेसुद्धा+ अहश्वेरोश राजाच्या महालात स्त्रियांसाठी मेजवानी ठेवली.
१० सातव्या दिवशी राजा द्राक्षारस पिऊन अतिशय खूश होता. तेव्हा त्याने त्याच्या सेवेला नेहमी हजर असलेल्या सात अधिकाऱ्यांना, म्हणजे महूमान, बिजथा, हरबोना,+ बिगथा, अबगथा, जेथर आणि कर्खस यांना अशी आज्ञा दिली, की ११ त्यांनी राणी वश्तीला शाही मुकुट घालून त्याच्यापुढे आणावं. राजाला तिचं सौंदर्य जमलेल्या सगळ्या लोकांना आणि अधिकाऱ्यांना दाखवायचं होतं. कारण ती खूप सुंदर होती. १२ पण अधिकाऱ्यांद्वारे दिलेल्या राजाज्ञेप्रमाणे राजासमोर यायला राणी वश्ती नकार देत राहिली. तेव्हा राजाला खूप राग आला आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
१३ मग राजाने, पूर्वी घडून गेलेल्या अशा प्रकारच्या घटनांची माहिती असलेल्या ज्ञानी लोकांसोबत सल्लामसलत केली. (कारण कायद्याचे आणि न्यायाचे जाणकार असलेल्यांसमोर राजा अशाच प्रकारे आपले प्रश्न मांडायचा. १४ त्यांपैकी कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना आणि ममुखान हे राजाचे खास सल्लागार होते. पर्शिया आणि मेदचे हे सात अधिकारी+ उच्च पदावर असून नेहमी राजाच्या सेवेला हजर असायचे.) १५ राजा त्यांना म्हणाला: “राजा अहश्वेरोशने आपल्या अधिकाऱ्यांद्वारे दिलेली आज्ञा राणी वश्तीने पाळली नाही. मग आता कायद्यानुसार तिच्या बाबतीत काय करायला हवं?”
१६ त्यावर ममुखानने राजाला आणि अधिकाऱ्यांना म्हटलं: “राणी वश्तीने जो अपराध केलाय+ तो फक्त राजाविरुद्धच नाही, तर अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांतल्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि सगळ्या लोकांविरुद्ध केलाय. १७ कारण राणीने जे केलंय ते राज्यातल्या सगळ्या बायकांना समजल्यावर त्यासुद्धा आपल्या नवऱ्यांना तुच्छ लेखतील आणि म्हणतील: ‘राजा अहश्वेरोशने राणी वश्तीला आपल्यासमोर बोलावलं, तेव्हा तिने तरी कुठे ऐकलं?’ १८ पर्शिया आणि मेदमधल्या अधिकाऱ्यांच्या ज्या बायकांना राणीचं हे वागणं माहीत आहे, त्यासुद्धा आपल्या नवऱ्यांशी तसंच बोलतील. आणि त्यामुळे तिरस्काराची आणि संतापाची लाट उसळेल. १९ आता राजाला जर योग्य वाटत असेल, तर त्याने एक शाही फर्मान काढावं. आणि त्याची नोंद कधीही न बदलणाऱ्या पर्शियाच्या व मेदच्या कायद्यात करावी.+ त्या फर्मानानुसार वश्तीने पुन्हा कधीही अहश्वेरोश राजासमोर येऊ नये; आणि तिच्यापेक्षा चांगली अशी एक स्त्री राजाने तिच्या जागी राणी म्हणून निवडावी. २० राजाचं हे फर्मान जेव्हा संपूर्ण साम्राज्यात जाहीर केलं जाईल, तेव्हा सगळ्या बायका आपल्या नवऱ्यांचा आदर करतील; मग त्यांचे नवरे कोणत्याही पदावर असले तरीही.”
२१ ममुखानचा हा सल्ला राजाला आणि अधिकाऱ्यांना पटला आणि राजाने त्याप्रमाणे केलं. २२ राजाने आपल्या सर्व प्रांतांत पत्रं पाठवली.+ त्याने प्रत्येक प्रांतातल्या लोकांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत पत्रं पाठवली. पत्रात असं लिहिलं होतं, की प्रत्येक नवऱ्याने आपल्या घरावर अधिकार चालवावा आणि त्याच्या घरात त्याचीच भाषा बोलली जावी.
२ या गोष्टी घडल्यावर काही काळाने राजा अहश्वेरोशचा+ राग शांत झाला. मग वश्तीने जे काही केलं होतं+ आणि तिच्या बाबतीत जे ठरवण्यात आलं होतं+ त्यावर राजा विचार करू लागला. २ तेव्हा राजाच्या खास सेवकांनी त्याला सुचवलं, की “राजासाठी तरुण आणि सुंदर कुमारींचा शोध केला जावा. ३ त्यासाठी राजाने आपल्या सगळ्या प्रांतांत अधिकारी नेमावेत.+ म्हणजे ते राज्यातल्या सगळ्या सुंदर, तरुण कुमारींना शूशन* राजवाड्यात घेऊन येतील. त्या तरुणींना राजाचा सेवक* आणि स्त्रियांचा रक्षक हेगे+ याच्या देखरेखीखाली स्त्रियांच्या कक्षात ठेवलं जावं आणि सुगंधी तेलांनी त्यांच्यावर सौंदर्य-उपचार करण्यात यावेत. ४ मग त्यांच्यापैकी जी मुलगी राजाला सगळ्यात जास्त आवडेल तिला वश्तीच्या जागी राणी बनवावं.”+ राजाला त्यांचं हे म्हणणं पटलं आणि त्याने तसंच केलं.
५ त्या वेळी शूशन*+ राजवाड्यात मर्दखय+ नावाचा एक यहुदी माणूस होता. तो बन्यामीन+ वंशातला असून याईरचा मुलगा होता; याईर शिमीचा, तर शिमी हा कीशचा मुलगा होता. ६ बाबेलचा* राजा नबुखद्नेस्सर याने यहूदाचा राजा यखन्या*+ याच्यासोबत ज्या लोकांना यरुशलेममधून बंदी बनवून नेलं होतं त्यांपैकी तो* एक होता. ७ मर्दखयने आपल्या काकांची मुलगी हदस्सा,* म्हणजे एस्तेर हिचं पालनपोषण केलं होतं;+ कारण ती अनाथ होती. तिच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर मर्दखयने तिचा आपली मुलगी म्हणून सांभाळ केला होता. ती दिसायला अतिशय सुंदर आणि बांधेसूद होती. ८ राजाचं फर्मान आणि त्याचा हुकूम जाहीर झाल्यानंतर जेव्हा अनेक तरुण मुलींना शूशन* राजवाड्यात आणून हेगेच्या+ देखरेखीखाली सोपवण्यात आलं, तेव्हा एस्तेरलाही राजाच्या महालात आणण्यात आलं, आणि स्त्रियांचा रक्षक असलेल्या हेगेच्या देखरेखीखाली सोपवण्यात आलं.
९ हेगेला एस्तेर आवडली आणि तो तिच्यावर प्रसन्न झाला.* त्यामुळे त्याने लगेच तिच्या सौंदर्य-उपचारांची आणि आहाराची व्यवस्था केली.+ एस्तेरला काय हवं काय नको ते पाहण्यासाठी त्याने राजाच्या महालातल्या सात तरुण स्त्रिया तिच्यासोबत ठेवल्या. इतकंच नाही, तर हेगेने तिला आणि तिच्या तरुण सेविकांना स्त्रियांच्या कक्षातली सगळ्यात चांगली जागासुद्धा राहायला दिली. १० एस्तेरने आपल्या लोकांबद्दल किंवा नातेवाइकांबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही;+ कारण मर्दखयने+ तिला तशी सूचना दिली होती.+ ११ एस्तेरचं कसं काय चाललं आहे आणि तिच्या बाबतीत काय होत आहे, हे जाणून घेण्यासाठी मर्दखय स्त्रियांच्या कक्षाच्या अंगणासमोर रोज फेऱ्या घालायचा.
१२ सौंदर्य-उपचार झाल्यानंतर मुलींना आळीपाळीने अहश्वेरोश राजापुढे जावं लागायचं. सौंदर्य-उपचाराचा हा काळ १२ महिन्यांचा असायचा; सहा महिने गंधरसाचं तेल+ आणि सहा महिने बाल्सम* तेल+ व वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं लावून प्रत्येक मुलीचं रंगरूप खुलवलं जायचं. १३ मग राजासमोर जाण्यासाठी ती तयार असायची. स्त्रियांच्या कक्षातून राजकक्षात राजासमोर जाताना ती जे काही मागायची ते तिला दिलं जायचं. १४ ती संध्याकाळी राजकक्षात जायची आणि सकाळी शाशगजच्या देखरेखीखाली असलेल्या स्त्रियांच्या दुसऱ्या कक्षात यायची. शाशगज हा राजाचा सेवक*+ आणि त्याच्या उपपत्नींचा रक्षक होता. राजाने त्या मुलीवर प्रसन्न होऊन आणि तिचं नाव घेऊन बोलावल्याशिवाय ती परत कधीही त्याच्याकडे जायची नाही.+
१५ मग एस्तेरची राजापुढे जाण्याची पाळी आली. एस्तेर ही मर्दखयचा काका अबीहईल याची मुलगी होती आणि मर्दखयने तिला आपली मुलगी म्हणून सांभाळलं होतं.+ राजापुढे जाताना, स्त्रियांचा रक्षक आणि राजाचा सेवक* हेगे याने एस्तेरला जे काही दिलं होतं, त्यापेक्षा जास्त तिने काहीही मागितलं नाही. (या काळात ज्यांनी ज्यांनी एस्तेरला पाहिलं त्या सर्वांना ती आवडली.) १६ अहश्वेरोश राजाच्या शासनकाळाच्या सातव्या वर्षी दहाव्या महिन्यात, म्हणजे तेबेथ* महिन्यात एस्तेरला शाही महालात राजासमोर नेण्यात आलं.+ १७ राजाला एस्तेर पसंत पडली. तो तिच्यावर खूप प्रसन्न झाला आणि इतर सर्व कुमारींपेक्षा ती त्याला जास्त आवडली.* म्हणून त्याने तिच्या डोक्यावर शाही मुकुट ठेवला आणि वश्तीच्या जागी+ तिला राणी बनवलं.+ १८ मग राजाने खास एस्तेरच्या सन्मानात आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सेवकांना एक मोठी मेजवानी दिली. तसंच, त्या प्रसंगी त्याने आपल्या सर्व प्रांतांत माफीचा ठराव* जाहीर केला आणि आपल्या राजेशाही थाटाला शोभेल अशी बक्षिसं दिली.
१९ सगळ्या कुमारींना+ दुसऱ्या वेळी एकत्र केलं गेलं, तेव्हा मर्दखय राजमहालाच्या दरवाजाजवळ बसला होता.* २० मर्दखयने एस्तेरला सूचना दिली होती त्याप्रमाणे तिने आपल्या लोकांबद्दल किंवा नातेवाइकांबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही.+ मर्दखय तिचा सांभाळ करत असताना ती जसं त्याचं ऐकायची, तसंच पुढेही ती त्याच्या आज्ञेत राहिली.+
२१ मर्दखय राजमहालाच्या दरवाजाजवळ बसायचा त्या काळात राजाच्या द्वारपालांपैकी बिग्थान आणि तेरेश हे दोन दरबारी भडकले आणि त्यांनी अहश्वेरोश राजाला मारून टाकण्याचा कट रचला. २२ पण, मर्दखयला ही गोष्ट समजली आणि त्याने लगेच एस्तेर राणीला त्याबद्दल सांगितलं. तेव्हा एस्तेर मर्दखयच्या वतीने राजाशी बोलली. २३ या गोष्टीची चौकशी करण्यात आली तेव्हा ती खरी असल्याचं समजलं. मग त्या दोन्ही माणसांना वधस्तंभांवर लटकवण्यात आलं. आणि या सगळ्या गोष्टी राजासमोर त्या काळातल्या इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आल्या.+
३ या घटना घडल्यावर, अहश्वेरोश राजाने हामानला+ बढती दिली आणि त्याच्या सोबतच्या इतर सर्व अधिकाऱ्यांपेक्षा त्याला उच्च पद दिलं.+ हामान हा अगाग+ वंशातल्या हम्मदाथाचा मुलगा होता. २ राजमहालाच्या दरवाजाजवळ बसणारे राजाचे सर्व सेवक हामानला वाकून नमन करायचे आणि त्याला दंडवत घालायचे. कारण राजाने तसा हुकूमच दिला होता. पण मर्दखयने मात्र त्याला वाकून नमन करायला किंवा दंडवत घालायला साफ नकार दिला. ३ म्हणून राजमहालाच्या दरवाजाजवळ बसणाऱ्या राजाच्या सेवकांनी मर्दखयला विचारलं: “तू राजाचा हुकूम का मानत नाहीस?” ४ ते दररोज त्याला हाच प्रश्न विचारायचे. पण तो त्यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही. मग त्यांनी ही गोष्ट हामानला सांगितली. मर्दखयचं हे वागणं हामान कितपत खपवून घेईल हे त्यांना पाहायचं होतं.+ कारण आपण यहुदी आहोत हे मर्दखयने त्यांना सांगितलं होतं.+
५ मर्दखय आपल्याला वाकून नमन करत नाही आणि आपल्याला दंडवत घालत नाही हे पाहून हामान संतापला.+ ६ पण एकट्या मर्दखयला मारून हामानचं समाधान झालं नसतं. कारण त्याला मर्दखयच्या लोकांबद्दल, म्हणजे यहुद्यांबद्दलही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे हामान, अहश्वेरोशच्या साम्राज्यात असलेल्या मर्दखयच्या सर्व लोकांना मारून टाकण्याची संधी शोधू लागला.
७ त्यासाठी एक विशिष्ट महिना आणि दिवस ठरवण्यासाठी हामानसमोर पूर, म्हणजे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.+ त्या चिठ्ठ्या अहश्वेरोश राजाच्या शासनकाळाच्या १२ व्या वर्षातल्या पहिल्या महिन्यात, म्हणजे निसान* महिन्यात टाकण्यात आल्या.+ तेव्हा १२ व्या महिन्याची, म्हणजे अदार*+ महिन्याची चिठ्ठी निघाली. ८ मग हामान अहश्वेरोश राजाला म्हणाला: “तुमच्या साम्राज्याच्या सर्व प्रांतांतल्या+ लोकांमध्ये असे काही लोक विखुरलेले आहेत+ ज्यांचे कायदे-कानून बाकीच्या लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत. ते राजाचे कायदे मानत नाहीत. आणि अशा लोकांना राहू देणं राजासाठी चांगलं नाही. ९ आता जर राजाला योग्य वाटत असेल, तर या लोकांचा नाश करावा असं एक लिखित फर्मान आपण काढावं. त्यासाठी मी अधिकाऱ्यांना शाही खजिन्यात जमा करायला १०,००० तालान्त* चांदी देईन.”*
१० तेव्हा राजाने आपल्या बोटातली मुद्रेची अंगठी+ काढून अगागी+ हम्मदाथाच्या मुलाला आणि यहुद्यांच्या शत्रूला, म्हणजे हामानला+ दिली. ११ राजा हामानला म्हणाला: “ते लोक आणि त्यांची चांदी मी तुझ्या हवाली करतो. त्यांच्या बाबतीत तुला जे योग्य वाटतं ते कर.” १२ मग पहिल्या महिन्याच्या १३ व्या दिवशी राजाच्या सचिवांना+ बोलावण्यात आलं. आणि त्यांनी हामानच्या सर्व आज्ञा राजाच्या सुभेदारांसाठी, प्रांतांच्या राज्यपालांसाठी आणि सगळ्या लोकांच्या अधिकाऱ्यांसाठी लिहून काढल्या.+ प्रत्येक प्रांतात राहणाऱ्या लोकांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत त्या लिहिण्यात आल्या. त्या अहश्वेरोश राजाच्या नावाने लिहून त्यांवर राजमुद्रेच्या अंगठीची मोहर लावण्यात आली.+
१३ मग ही पत्रं दूतांच्या हातून राजाच्या सर्व प्रांतांत पाठवण्यात आली. पत्रांमध्ये असा हुकूम देण्यात आला होता की सर्व यहुदी लोकांना, म्हणजे तरुण-वृद्ध आणि बायका-मुलं अशा सर्वांना एकाच दिवशी मारून टाकावं. अदार+ या १२ व्या महिन्याच्या १३ व्या दिवशी त्या सगळ्यांचा समूळ नाश करून त्यांची मालमत्ता लुटावी.+ १४ सगळ्या लोकांनी त्या दिवसासाठी तयार राहावं, म्हणून पत्रातल्या माहितीला सर्व प्रांतांत कायद्याचं स्वरूप द्यायचं होतं. आणि सगळ्या लोकांमध्ये त्याची जाहीर घोषणा करायची होती. १५ राजाच्या हुकमाप्रमाणे सगळे दूत लगेच निघाले;+ हा कायदा शूशन*+ राजवाड्यातून देण्यात आला. मग राजा आणि हामान प्यायला बसले. पण शूशन* शहरात मात्र खळबळ माजली होती.
४ मर्दखयने+ या सगळ्या गोष्टी ऐकल्या+ तेव्हा त्याने दुःखाने आपले कपडे फाडले आणि गोणपाट* घालून अंगाला राख फासली. मग तो शहराच्या मध्यभागी गेला आणि मोठमोठ्याने आक्रोश करून रडू लागला. २ तो तसाच राजमहालाच्या दरवाजापर्यंत आला. पण तो आत गेला नाही, कारण गोणपाट घालून कोणालाही दरवाजाच्या आत जाण्याची परवानगी नव्हती. ३ राजाचा हुकूम आणि फर्मान ज्या-ज्या प्रांतात+ पोहोचला तिथे यहुदी लोकांमध्ये शोककळा पसरली. ते उपास करू लागले+ आणि आक्रोश करून मोठमोठ्याने रडू लागले. कित्येक जण गोणपाट घालून राखेत पडून राहिले.+ ४ एस्तेरच्या सेवकांनी* आणि सेविकांनी ही गोष्ट तिला येऊन सांगितली तेव्हा राणी अतिशय दुःखी झाली. मर्दखयने गोणपाटाऐवजी कपडे घालावेत म्हणून तिने त्याच्यासाठी कपडे पाठवले. पण त्याने ते घेतले नाहीत. ५ तेव्हा एस्तेरने राजाच्या एका सेवकाला,* हथाकला बोलावून घेतलं; राजाने त्याला तिच्या सेवेसाठी नेमलं होतं. एस्तेरने हथाकला अशी आज्ञा दिली, की त्याने मर्दखयकडे जाऊन तो असं का करत आहे आणि नेमकं काय घडलं आहे याची चौकशी करावी.
६ म्हणून हथाक राजमहालासमोर असलेल्या शहराच्या चौकात मर्दखयकडे गेला. ७ तेव्हा, आपल्यावर कोणतं संकट ओढवलं आहे आणि यहुदी लोकांचा नाश करण्यासाठी+ हामानने राजाच्या खजिन्यात नेमकी किती रक्कम+ जमा करण्याचं कबूल केलं आहे, ते सर्व मर्दखयने हथाकला सांगितलं. ८ तसंच, शूशनमध्ये*+ यहुद्यांचा समूळ नाश करण्याची जी राजाज्ञा देण्यात आली होती त्याची एक प्रतही त्याने त्याला दिली. मर्दखयने हथाकला सांगितलं, की त्याने जाऊन एस्तेरला ती प्रत दाखवावी आणि तिला परिस्थितीची कल्पना द्यावी.+ तसंच तिला असंही सांगावं, की तिने स्वतः राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी दयेची भीक मागावी.
९ मग हथाक एस्तेरकडे परत आला आणि मर्दखयने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्याने तिला सांगितल्या. १० तेव्हा एस्तेरने मर्दखयसाठी+ हथाकजवळ असा निरोप पाठवला: ११ “राजाच्या सगळ्या सेवकांना आणि त्याच्या प्रांतातल्या सगळ्या लोकांना हे चांगलं माहीत आहे, की कोणतीही स्त्री किंवा कोणताही पुरुष राजाने बोलावल्याशिवाय आतल्या अंगणात राजाकडे गेला,+ तर त्याच्या बाबतीत एकच कायदा लागू होतो; तो म्हणजे मृत्युदंड! राजाने जर आपला सोन्याचा राजदंड+ त्याच्यापुढे केला, तरच तो जिवंत राहू शकतो. आणि मला तर गेल्या ३० दिवसांपासून राजाकडून बोलावणंही आलेलं नाही.”
१२ एस्तेरचा हा निरोप मर्दखयला कळवण्यात आला, १३ तेव्हा त्याने एस्तेरला म्हटलं: “असं समजू नकोस, की तू राजाच्या घराण्यातली आहेस म्हणून वाचशील आणि इतर यहुद्यांसोबत तुझा नाश होणार नाही. १४ कारण आता जर तू शांत बसलीस, तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने यहुद्यांची सुटका आणि उद्धार तर होईलच.+ पण तुझा आणि तुझ्या वडिलांच्या घराण्याचा मात्र नाश होईल. आणि कोण जाणे, कदाचित अशाच प्रसंगासाठी तुला राणीपद मिळालं असेल?”+
१५ मग एस्तेरने मर्दखयला असा निरोप पाठवला: १६ “जाऊन शूशनमधल्या* सगळ्या यहुद्यांना जमवा आणि माझ्यासाठी उपास करा.+ तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊपिऊ नका.+ मी आणि माझ्या सेविकासुद्धा उपास करू. नंतर मी राजाकडे जाईन; मग ते कायद्याविरुद्ध असलं तरीही. आणि त्यामुळे मला मरावं लागलं तरी चालेल.” १७ तेव्हा मर्दखय निघाला आणि एस्तेरने त्याला जे काही करायला सांगितलं होतं ते सर्व त्याने केलं.
५ मग तिसऱ्या दिवशी+ एस्तेरने राजवस्त्रं घातली आणि ती राजमहालाच्या आतल्या अंगणात राजकक्षासमोर येऊन उभी राहिली. त्या वेळी राजा आपल्या कक्षात राजासनावर बसला होता. तिथून त्याला राजकक्षाचा दरवाजा स्पष्ट दिसत होता. २ एस्तेर राणी अंगणात उभी असलेली राजाला दिसली. तिला पाहताच त्याला आनंद झाला आणि त्याने आपल्या हातातला सोन्याचा राजदंड+ तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ येऊन राजदंडाच्या टोकाला स्पर्श केला.
३ राजाने तिला विचारलं: “एस्तेर राणी, काय झालं? तुला काय हवंय? तू अर्धं राज्य जरी मागितलंस तरी ते मी तुला देईन.” ४ एस्तेर म्हणाली: “आज मी खास राजासाठी एक मेजवानी ठेवली आहे. राजाची मर्जी असेल तर त्यांनी मेजवानीला यावं आणि हामानलाही+ सोबत आणावं.” ५ तेव्हा राजा आपल्या सेवकांना म्हणाला: “एस्तेर राणीच्या म्हणण्याप्रमाणे करा. जा! आणि हामानला लवकर यायला सांगा.” मग राजा आणि हामान दोघंही एस्तेरने ठेवलेल्या मेजवानीला गेले.
६ नंतर, द्राक्षारस पीत असताना राजाने एस्तेरला विचारलं: “सांग तुला काय हवंय? तू जे मागशील ते तुला मिळेल. अगदी अर्धं राज्य जरी मागितलंस, तरी ते मी तुला देईन. सांग काय हवंय?”+ ७ तेव्हा एस्तेर म्हणाली: “माझी अशी विनंती आहे, की ८ जर राजा माझ्यावर प्रसन्न असेल आणि राजाला माझी मागणी पूर्ण करायची इच्छा असेल, तर राजाने उद्या परत हामानसोबत मी ठेवलेल्या मेजवानीला यावं. मग मला काय हवंय ते मी उद्या सांगीन.”
९ त्या दिवशी मेजवानी करून बाहेर पडताना हामान खूप खूश होता; त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. पण राजमहालाच्या दरवाजाजवळ बसलेल्या मर्दखयला त्याने बघितलं तेव्हा त्याच्या रागाचा पारा चढला. कारण, मर्दखय त्याला पाहून उठून उभा राहिला नाही किंवा त्याला जराही घाबरला नाही.+ १० पण हामानने आपला राग आवरला आणि तो आपल्या घरी निघून गेला. मग त्याने आपल्या मित्रांना आणि आपली बायको जेरेश+ हिला बोलावून घेतलं. ११ हामानने त्यांच्यासमोर आपल्या श्रीमंतीची आणि आपल्या अनेक मुलांची+ बढाई मारली. तसंच, राजाने त्याला बढती देऊन इतर सेवकांपेक्षा आणि अधिकाऱ्यांपेक्षा कसं उच्च पद दिलं याचीही तो फुशारकी मारू लागला.+
१२ हामान असंही म्हणाला: “इतकंच काय, एस्तेर राणीने जी मेजवानी ठेवली होती त्यासाठी तिने राजासोबत फक्त मलाच आमंत्रण दिलं होतं.+ आणि उद्याही तिने राजासोबत मला मेजवानीला बोलावलंय.+ १३ पण जोपर्यंत तो यहुदी मर्दखय राजमहालाच्या दरवाजाजवळ बसलाय, तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे.” १४ तेव्हा त्याची बायको जेरेश आणि त्याचे सगळे मित्र त्याला म्हणाले: “एक काम कर. ५० हात उंचीचा* एक वधस्तंभ उभा कर आणि त्यावर मर्दखयला लटकवलं जावं+ असं सकाळी राजाला जाऊन सांग. मग खुशाल राजासोबत जा आणि मेजवानीचा आनंद घे.” त्यांची ही कल्पना हामानला आवडली आणि त्याने एक वधस्तंभ तयार करून घेतला.
६ त्या रात्री राजाला झोप येत नव्हती.* म्हणून त्याने त्या काळातला इतिहासाचा ग्रंथ मागवला+ आणि तो त्याच्यापुढे वाचण्यात आला. २ त्यात असं लिहिलं होतं, की अहश्वेरोश राजाला मारून टाकण्याचा कट रचणाऱ्या दोन दरबाऱ्यांची, म्हणजे बिग्थान आणि तेरेश या द्वारपालांची मर्दखयने खबर दिली होती.+ ३ तेव्हा राजाने विचारलं: “यासाठी मर्दखयचा मानसन्मान केला होता का? त्याला काही बक्षीस दिलं होतं का?” त्यावर राजाचे खास सेवक त्याला म्हणाले: “नाही, त्याच्यासाठी असं काहीही केलं नव्हतं.”
४ नंतर राजाने विचारलं: “अंगणात कोण आहे?” त्या वेळी हामान महालातल्या बाहेरच्या अंगणात+ आला होता. आपण तयार केलेल्या वधस्तंभावर मर्दखयला लटकवण्याची विनंती करायला तो राजाकडे आला होता.+ ५ तेव्हा सेवक राजाला म्हणाले: “अंगणात हामान+ उभा आहे.” त्यावर राजा म्हणाला: “त्याला आत बोलवा.”
६ हामान आत आला तेव्हा राजाने त्याला विचारलं: “राजाला जर कोणाचा मानसन्मान करायची इच्छा असेल, तर त्याने त्याच्यासाठी काय केलं पाहिजे?” हामान मनातल्या मनात म्हणाला: “मला सोडून राजाला आणखी कोणाचा मानसन्मान करायचा असेल?”+ ७ मग हामान राजाला म्हणाला: “राजाला ज्याचा मानसन्मान करायची इच्छा आहे, ८ त्याच्यासाठी राजा घालतो ती शाही वस्त्रं+ आणि राजा स्वारी करतो तो घोडा आणावा. त्या घोड्याचं डोकं शाही मुकुटाने सजवलेलं असावं. ९ त्यानंतर ती शाही वस्त्रं आणि तो घोडा राजाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याकडे सोपवावा. मग राजाला ज्याचा सन्मान करायची इच्छा आहे त्याला राजाच्या सेवकांनी शाही वस्त्रं घालावीत आणि घोड्यावर बसवून शहराच्या चौकात फिरवावं. तसंच त्यांनी त्याच्यापुढे अशी घोषणा करावी: ‘राजाला ज्याचा सन्मान करायची इच्छा असते त्याचा असा सन्मान केला जातो!’”+ १० त्यावर राजा हामानला म्हणाला: “लगेच जा! शाही वस्त्रं आणि घोडा घे आणि तू आता जे काही बोललास ते सगळं राजमहालाच्या दरवाजाजवळ बसलेल्या यहुदी मर्दखयसाठी कर. त्यातली एकही गोष्ट अपुरी ठेवू नकोस.”
११ म्हणून हामानने शाही वस्त्रं घेऊन ती मर्दखयला+ घातली आणि घोड्यावर बसवून त्याला शहरातल्या चौकात फिरवलं. त्याने त्याच्यापुढे अशी घोषणा केली: “राजाला ज्याचा सन्मान करायची इच्छा असते त्याचा असा सन्मान केला जातो!” १२ त्यानंतर मर्दखय परत राजमहालाच्या दरवाजाकडे गेला. पण हामान मात्र आपलं डोकं कपड्याने झाकून शोक करत घाईघाईने आपल्या घरी गेला. १३ आणि आपल्यासोबत जे काही घडलं होतं ते सर्व त्याने आपली बायको जेरेश+ आणि आपले सगळे मित्र यांना सांगितलं. तेव्हा त्याची बायको आणि त्याचे सल्लागार त्याला म्हणाले: “ज्या मर्दखयसमोर तुमचा पराभव होऊ लागला आहे, तो जर यहुदी वंशातला असेल, तर त्याच्यापुढे तुमचं काहीही चालणार नाही. तुम्ही नक्की अपयशी व्हाल.”
१४ ते हामानशी बोलत होते इतक्यात राजाचे दरबारी तिथे आले आणि हामानला एस्तेरने ठेवलेल्या मेजवानीला घाईघाईने घेऊन गेले.+
७ मग राजा आणि हामान+ हे दोघं एस्तेर राणीने ठेवलेल्या मेजवानीला आले. २ मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी जेव्हा द्राक्षारस दिला जात होता तेव्हा राजाने पुन्हा एकदा एस्तेरला विचारलं: “सांग तुला काय हवंय? तू जे मागशील ते तुला मिळेल. अगदी अर्धं राज्य जरी मागितलंस तरी ते मी तुला देईन. सांग काय हवंय?”+ ३ त्यावर एस्तेर राणी म्हणाली: “राजा जर माझ्यावर प्रसन्न असेल आणि राजाची जर इच्छा असेल, तर राजाने माझा आणि माझ्या लोकांचा+ जीव वाचवावा, इतकीच माझी विनंती आहे. ४ कारण मला आणि माझ्या लोकांना मारून टाकण्यासाठी आणि आमचा समूळ नाश करण्यासाठी आम्हाला विकण्यात आलंय.+ फक्त गुलाम म्हणून आम्हाला विकलं असतं, तर मी शांत बसले असते. पण आमच्यावर आलेल्या या संकटामुळे राजाचंही मोठं नुकसान होणार आहे. म्हणून राजाने कसंही करून हे संकट थांबवावं.”
५ त्यावर अहश्वेरोश राजा एस्तेर राणीला म्हणाला: “कोण आहे तो? कोणाची एवढी हिंमत झाली असं करायची?” ६ तेव्हा एस्तेर म्हणाली: “तो विरोधी आणि शत्रू दुसरा कोणी नाही; हा दुष्ट हामानच आहे!”
हे ऐकून राजा आणि राणी यांच्यासमोर हामानचा भीतीने थरकाप उडाला. ७ राजा अतिशय संतापला आणि मेजवानीतून उठून राजमहालाच्या बागेत गेला. हामान मात्र आपला जीव वाचवण्यासाठी उठून एस्तेर राणीपुढे गयावया करू लागला. कारण राजा आता आपल्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही हे हामानला कळून चुकलं होतं. ८ राजमहालाच्या बागेतून राजा परत मेजवानी-गृहात आला, तेव्हा हामान एस्तेरच्या दिवाणावर टेकलेला त्याला दिसला. तेव्हा राजा ओरडून म्हणाला: “आता हा माझ्याच घरात राणीवर जबरदस्तीही करणार काय?” राजाच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले न पडले तोच हामानचं तोंड कपड्याने झाकण्यात आलं. ९ राजाच्या दरबाऱ्यांपैकी एक असलेला हरबोना+ हा राजाला म्हणाला: “ज्या मर्दखयमुळे राजाचा जीव वाचला,+ त्याच्यासाठी हामानने एक वधस्तंभही बनवलाय.+ तो ५० हात* उंचीचा वधस्तंभ हामानच्या घराजवळ उभा केलेला आहे.” तेव्हा राजा म्हणाला: “त्यावर यालाच लटकवून टाका.” १० म्हणून हामानने मर्दखयसाठी जो वधस्तंभ बनवला होता, त्यावर त्यांनी हामानला लटकवलं. मग राजाचा राग शांत झाला.
८ त्या दिवशी अहश्वेरोश राजाने यहुद्यांच्या शत्रूची,+ हामानची+ सगळी मालमत्ता एस्तेर राणीच्या हवाली केली. मर्दखयसुद्धा राजापुढे आला, कारण त्याचं आपल्याशी काय नातं आहे हे एस्तेरने राजाला सांगितलं होतं.+ २ मग राजाने हामानकडून काढून घेतलेली मुद्रेची अंगठी+ मर्दखयला दिली. आणि एस्तेरने मर्दखयला हामानच्या सगळ्या मालमत्तेवर अधिकारी नेमलं.+
३ एस्तेर पुन्हा राजाशी बोलण्यासाठी त्याच्याकडे गेली आणि त्याच्या पायांजवळ पडून रडायला लागली. यहुद्यांचा नाश करण्यासाठी अगागी हामानने केलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी, अशी विनवणी ती राजाकडे करू लागली.+ ४ तेव्हा राजाने आपला सोन्याचा राजदंड एस्तेरपुढे धरला.+ मग ती उठून राजासमोर उभी राहिली. ५ ती म्हणाली: “राजा माझ्यावर प्रसन्न असेल आणि माझ्यावर राजाची कृपा असेल तर त्यांनी माझी विनंती ऐकावी. राजाला जर योग्य वाटत असेल, तर त्यांनी एक लेखी फर्मान काढावं. आणि अगागी+ हम्मदाथाच्या मुलाने, म्हणजे कटकारस्थान रचणाऱ्या त्या हामानने राजाच्या सर्व प्रांतांतल्या यहुद्यांचा नाश करण्यासाठी जी पत्रं पाठवलीत ती रद्द करावीत.+ ६ कारण माझ्या लोकांवर ओढवलेलं संकट मी कसं सहन करू? आणि माझ्या नातेवाइकांचा होणारा नाश मी उघड्या डोळ्यांनी कसा पाहू?”
७ त्यावर अहश्वेरोश राजा एस्तेर राणीला आणि यहुदी मर्दखयला म्हणाला: “हामानने यहुद्यांना संपवण्याचा कट रचला. म्हणून बघा, मी त्याची सगळी मालमत्ता एस्तेरच्या हवाली केली+ आणि त्याला वधस्तंभावर लटकवलं.+ ८ आता यहुद्यांसाठी तुम्हाला जे योग्य वाटतं ते राजाच्या नावाने लिहा आणि त्यावर राजमुद्रेच्या अंगठीची मोहर लावा. कारण राजाच्या नावाने लिहिलेलं आणि त्याच्या मुद्रेच्या अंगठीची मोहर असलेलं फर्मान रद्द करता येत नाही.”+
९ त्यामुळे राजाच्या सचिवांना तिसऱ्या महिन्याच्या, म्हणजे शिवान* महिन्याच्या २३ व्या दिवशी बोलावण्यात आलं. आणि मर्दखयने यहुद्यांसाठी, सुभेदारांसाठी,+ राज्यपालांसाठी, तसंच हिंदुस्थानापासून इथियोपियापर्यंत १२७ प्रांतांतल्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी+ जे आदेश दिले ते त्यांनी लिहून काढले. त्यांनी प्रत्येक प्रांतातल्या लोकांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत पत्रं लिहिली. त्यांनी यहुद्यांनाही त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत पत्रं लिहिली.
१० मर्दखयने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्रं लिहिली आणि त्यावर राजमुद्रेच्या अंगठीची+ मोहर लावली. मग त्याने ती पत्रं दूतांच्या हातून पाठवली. ते दूत राजाच्या सेवेसाठी असलेल्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांवर स्वार होऊन गेले. ११ त्या पत्रांमध्ये राजाने सगळ्या शहरांतल्या यहुद्यांना अशी परवानगी दिली होती, की त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी एकत्र यावं. आणि कोणत्याही प्रांतातल्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला, तर त्या सगळ्यांना त्यांच्या बायका-मुलांसह मारून टाकावं; त्यांचा समूळ नाश करावा आणि त्यांची मालमत्ता लुटावी.+ १२ हे सगळं अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत एकाच दिवशी, म्हणजे अदार* या १२ व्या महिन्याच्या १३ व्या दिवशी होणार होतं.+ १३ पत्रांतल्या माहितीला कायद्याचं स्वरूप देऊन सगळ्या प्रांतांत लागू करायचं होतं. आणि सर्व लोकांमध्ये त्याची घोषणा करायची होती. म्हणजे यहुदी लोक आपल्या शत्रूंचा बदला घेण्यासाठी+ त्या दिवशी तयार राहतील. १४ राजाच्या आज्ञेवरून त्याचे दूत त्याच्या सेवेसाठी असलेल्या घोड्यांवर स्वार होऊन लगेच निघाले. हा कायदा शूशन*+ राजवाड्यातही देण्यात आला.
१५ नंतर मर्दखय राजासमोरून निघून गेला. त्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगाची शाही वस्त्रं घातली होती. त्याच्या डोक्यावर सोन्याचा वैभवी मुकुट असून त्याने उत्तम प्रतीच्या लोकरीचा जांभळ्या रंगाचा झगाही घातला होता.+ शूशन* शहरातल्या लोकांनी आनंदोत्सव केला. १६ यहुद्यांना आशा* मिळाली होती. त्यांनी आनंदित होऊन जल्लोष केला, आणि त्यांना मानसन्मान मिळाला. १७ ज्या-ज्या प्रांतांत आणि ज्या-ज्या शहरांत राजाचं फर्मान आणि त्याचा हुकूम पोहोचला, तिथल्या यहुद्यांना अतिशय आनंद झाला. ते मेजवान्या करून उत्सव करू लागले. आणि त्या देशातले अनेक लोक यहुदी बनले,+ कारण त्यांना यहुदी लोकांची दहशत बसली होती.
९ मग अदार* या १२ व्या महिन्याचा १३ वा दिवस उजाडला.+ त्या दिवशी राजाचा हुकूम आणि कायदा अंमलात आणायचा होता.+ यहुद्यांच्या शत्रूंना आशा होती, की ते यहुद्यांवर वरचढ ठरतील. पण घडलं उलटंच! कारण त्या दिवशी यहुदी लोकच त्यांचा द्वेष करणाऱ्यांवर वरचढ ठरले.+ २ अहश्वेरोश+ राजाच्या सगळ्या प्रांतांतले यहुदी, आपल्या जिवावर उठलेल्या शत्रूंशी लढण्यासाठी आपापल्या शहरांत एकत्र जमले. यहुद्यांपुढे कोणाचाही टिकाव लागला नाही, कारण सगळ्या लोकांना त्यांची दहशत बसली होती.+ ३ प्रांतांतल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, सुभेदारांनी,+ राज्यपालांनी आणि राजाचा कारभार पाहणाऱ्या सगळ्यांनी यहुद्यांना मदत केली. कारण त्या सर्वांना मर्दखयचा धाक वाटत होता. ४ राजमहालात मर्दखयला मोठं मानाचं स्थान होतं.+ आणि जसजसा त्याचा अधिकार वाढत गेला, तसतशी त्याची कीर्ती सर्व प्रांतांमध्ये पसरत गेली.
५ यहुद्यांनी आपल्या सगळ्या शत्रूंना तलवारीने मारलं आणि त्यांचा समूळ नाश केला. त्यांनी मनाला येईल तसं आपला द्वेष करणाऱ्यांचं केलं.+ ६ शूशन*+ राजवाड्यात यहुद्यांनी ५०० माणसांना ठार मारलं. ७ तसंच त्यांनी या माणसांनाही ठार मारलं: पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा, ८ पोराथा, अदलिया, अरीदाथा, ९ पर्मश्ता, अरीसई, अरीदय आणि वैजाथा. १० यहुद्यांचा शत्रू+ आणि हम्मदाथाचा मुलगा हामान याची ही दहा मुलं होती. पण त्यांना ठार मारल्यानंतर यहुद्यांनी त्यांची मालमत्ता मात्र लुटली नाही.+
११ त्या दिवशी शूशन* राजवाड्यात एकूण किती लोक मारले गेले ती संख्या नंतर राजाला सांगण्यात आली.
१२ मग राजा एस्तेर राणीला म्हणाला: “शूशन* राजवाड्यातच यहुद्यांनी ५०० माणसांना आणि हामानच्या दहा मुलांना मारून टाकलंय. तर मग राजाच्या इतर प्रांतांमध्ये त्यांनी आणखी किती लोकांना मारलं असेल?+ एस्तेर राणी, आता तुझी आणखी काही विनंती आहे का? तुला आणखी काही हवंय का? तू जे काही मागशील ते पूर्ण होईल.” १३ त्यावर एस्तेर म्हणाली: “राजाला जर हे ठीक वाटत असेल,+ तर राजाचा जो हुकूम आज लागू केला गेला तो उद्यासुद्धा शूशनमधल्या* यहुद्यांना लागू करायची परवानगी राजाने द्यावी.+ आणि हामानच्या दहा मुलांचे मृतदेह वधस्तंभांवर लटकवण्यात यावेत.”+ १४ तेव्हा राजाने तसं करण्याची आज्ञा दिली. मग शूशन* राजवाड्यात एक फर्मान काढलं गेलं आणि हामानच्या दहा मुलांचे मृतदेह वधस्तंभांवर लटकवण्यात आले.
१५ शूशन* राजवाड्यातले यहुदी अदार महिन्याच्या १४ व्या दिवशी पुन्हा एकत्र आले+ आणि त्यांनी तिथल्या ३०० माणसांना ठार मारलं. पण त्यांनी त्यांची मालमत्ता मात्र लुटली नाही.
१६ राजाच्या इतर प्रांतांतले यहुदीसुद्धा एकत्र जमले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी लढले.+ त्यांनी आपला द्वेष करणाऱ्या ७५,००० लोकांना ठार मारलं आणि आपल्या शत्रूंचा काटा काढला.+ पण त्यांनी त्यांची मालमत्ता मात्र लुटली नाही. १७ हे अदार महिन्याच्या १३ व्या दिवशी घडलं. १४ व्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि मेजवान्या करून तो दिवस आनंदाने साजरा केला.
१८ शूशनमधले* यहुदी १३ व्या+ आणि १४ व्या+ अशा दोन्ही दिवशी आपल्या शत्रूंशी लढण्यासाठी एकत्र आले. त्यांनी १५ व्या दिवशी विश्रांती घेतली आणि मेजवान्या करून तो दिवस आनंदाने साजरा केला. १९ बाकीच्या शहरांत राहणाऱ्या यहुद्यांनी अदार महिन्याच्या १४ व्या दिवशी मेजवान्या करून आनंदोत्सव साजरा केला.+ त्या दिवशी त्यांनी एकमेकांना खाण्यापिण्याच्या वस्तू पाठवल्या.+
२० मर्दखयने+ या सगळ्या गोष्टी लिहून काढल्या. आणि त्याने अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातल्या जवळच्या आणि दूरच्या सर्व प्रांतांत राहणाऱ्या यहुद्यांना पत्रं पाठवली. २१ पत्रांत त्याने त्यांना अशी सूचना दिली, की त्यांनी दरवर्षी अदार महिन्यातला १४ वा आणि १५ वा दिवस सण म्हणून पाळावा. २२ कारण या दिवशी यहुद्यांना आपल्या शत्रूंपासून सुटका मिळाली. आणि त्या महिन्यात त्यांच्या दुःखाचं आनंदात आणि शोकाच्या+ दिवसाचं उत्सवाच्या दिवसात रूपांतर झालं. म्हणून या दिवशी यहुद्यांनी मेजवान्या करून आनंदोत्सव साजरा करावा. तसंच, एकमेकांना खाण्यापिण्याच्या वस्तू पाठवाव्यात आणि गोरगरिबांना दानधर्म करावा.
२३ यहुद्यांनी कबूल केलं, की जो उत्सव त्यांनी सुरू केला होता तो ते दरवर्षी साजरा करतील, आणि मर्दखयने पत्रात त्यांना जे काही करायला सांगितलं होतं तेही ते करतील. २४ कारण अगागी+ हम्मदाथाचा मुलगा आणि यहुद्यांचा शत्रू हामान+ याने यहुद्यांचा नाश करण्याचा कट रचला होता.+ यहुद्यांना गोंधळात पाडून त्यांचा नायनाट करण्यासाठी त्याने पूर,+ म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या होत्या. २५ पण एस्तेर राणी जेव्हा राजासमोर गेली तेव्हा राजाने असं लेखी फर्मान काढलं,+ की “हामानने यहुद्यांविरुद्ध जी दुष्ट योजना केली आहे+ ती त्याच्यावरच उलटावी.” त्यामुळे हामानला आणि त्याच्या मुलांना वधस्तंभांवर लटकवण्यात आलं.+ २६ म्हणून पूर*+ या शब्दावरून त्या सणाच्या दिवसांना पुरीम हे नाव पडलं. पत्रात जे काही लिहिलं होतं आणि यहुद्यांनी स्वतः जे काही पाहिलं होतं, तसंच त्यांच्यावर जो प्रसंग ओढवला होता त्यावरून, २७ त्यांनी असं ठरवलं की ते, त्यांचे वंशज आणि त्यांच्यात सामील झालेले लोक+ दरवर्षी न चुकता हे दोन दिवस सण म्हणून साजरा करतील. आणि त्या दिवसांविषयी पत्रांत जे काही सांगितलं होतं ते सगळं ते पाळतील. २८ यहुद्यांनी पुरीम सणाचे दिवस पाळण्याचं कधीच सोडू नये आणि त्या दिवसांची आठवण त्यांच्या वंशजांमधून कधीही नाहीशी होऊ नये, म्हणून ते दिवस पाळले जाणार होते; प्रत्येक प्रांतात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक कुटुंबात पिढ्या न् पिढ्या त्या दिवसांची आठवण म्हणून ते पाळले जाणार होते.
२९ मग पुरीम सण पाळण्याविषयी दुसरं एक पत्र लिहिण्यात आलं. आणि अबीहईलची मुलगी एस्तेर राणी आणि यहुदी मर्दखय यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराने असा आदेश दिला, की पत्रात लिहिलेल्या सर्व गोष्टी पाळल्या जाव्यात. ३० मर्दखयने ही पत्रं, अहश्वेरोश+ राजाच्या साम्राज्यात असलेल्या १२७ प्रांतांतल्या+ सर्व यहुद्यांना पाठवली. त्यांत त्याने विश्वसनीय गोष्टी लिहिल्या आणि सदिच्छा व्यक्त केल्या. ३१ पत्राचा आशय असा होता, की यहुदी मर्दखय आणि एस्तेर राणी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे नेमलेल्या दिवसांत पुरीमचा सण पाळला जावा;+ आणि यहुद्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या वंशजांसाठी ठरवलं होतं त्याप्रमाणे+ त्यांनी त्या दिवसांत उपास+ आणि याचना करावी.+ ३२ पुरीम+ सणाबद्दल सांगितलेल्या या गोष्टी एस्तेर राणीच्या आदेशावरून पक्क्या करण्यात आल्या आणि ग्रंथात लिहून ठेवण्यात आल्या.
१० अहश्वेरोश राजाने आपल्या संपूर्ण देशात आणि समुद्रातल्या बेटांवर राहणाऱ्या लोकांवर सक्तीची मजुरी लादली.
२ अहश्वेरोश राजाने केलेल्या पराक्रमांचा आणि त्याच्या महान कार्यांचा; तसंच त्याने मर्दखयला+ मोठं पद कसं दिलं+ या सर्व गोष्टींचा तपशीलवार अहवाल, मेद आणि पारस यांच्या राजांच्या+ काळातल्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिलेला आहे.+ ३ संपूर्ण साम्राज्यात अहश्वेरोश राजाच्या खालोखाल कोणी असेल तर तो यहुदी मर्दखयच होता. यहुद्यांमध्ये त्याचं मोठं नाव होतं आणि त्याचे यहुदी बांधव त्याचा खूप आदर करायचे. मर्दखय आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या मुलाबाळांच्या भल्यासाठी काम करत राहिला.*
असं मानलं जातं, की हा महान दारयावेश (दारयावेश हिस्टास्पिस) राजाचा मुलगा झेरेक्सिस पहिला असावा.
किंवा “कूशपर्यंत.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसा.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कोणी किती द्राक्षारस प्यावा यावर कोणतीही मर्यादा नव्हती.”
किंवा “सूसा.”
शब्दशः “षंढ.” शब्दार्थसूचीत “षंढ” पाहा.
किंवा “सूसा.”
किंवा “बॅबिलॉनचा.”
२रा २४:८ मध्ये याला यहोयाखीन असं म्हटलं आहे.
हा कीश किंवा मर्दखय असू शकतो.
म्हणजे, “पांढऱ्या सुंदर सुगंधी फुलांचं सदाहरित झाड.”
किंवा “सूसा.”
किंवा “एकनिष्ठ प्रेम करू लागला.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “षंढ.”
शब्दशः “षंढ.”
अति. ख१५ पाहा.
किंवा “तो तिच्यावर एकनिष्ठ प्रेम करू लागला.”
हा कदाचित कर-माफीला किंवा राजकीय कैद्यांच्या सुटकेला किंवा या दोन्ही गोष्टींना सूचित करत असावा.
किंवा “एक राजदरबारी होता.”
अति. ख१५ पाहा.
अति. ख१५ पाहा.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
किंवा कदाचित, “हे काम करणाऱ्या लोकांना देण्यासाठी मी शाही खजिन्यात १०,००० तालान्त जमा करीन.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसा.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “षंढ.”
शब्दशः “षंढ.”
किंवा “सूसामध्ये.”
किंवा “सूसामधल्या.”
जवळजवळ २२.३ मी. (७३ फूट). अति. ख१४ पाहा.
शब्दशः “राजाची झोप उडाली.”
जवळजवळ २२.३ मी. (७३ फूट). अति. ख१४ पाहा.
अति. ख१५ पाहा.
अति. ख१५ पाहा.
किंवा “सूसा.”
किंवा “सूसा.”
शब्दशः “प्रकाश.”
अति. ख१५ पाहा.
किंवा “सूसा.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसामधल्या.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसामधले.”
“पूर” म्हणजे “चिठ्ठ्या.” “पुरीम” हे त्याचं अनेकवचनी रूप असून ते यहुद्यांच्या सणाला सूचित करतं. हा सण, त्यांच्या पवित्र कॅलेंडरनुसार १२ व्या महिन्यात येतो. अति. ख१५ पाहा.
शब्दशः “शांतीच्या गोष्टी बोलत राहिला.”